पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.
मेघालयमधील री भोई येथील सिल्मे मराक यांचे छोटेसे दुकान बचत गटाच्या रूपात बदलले तेव्हा त्यांच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळाले. आता त्या स्थानिक महिलांना बचत गटांमध्ये संघटित होण्यासाठी सहाय्य करत आहे आणि 50 पेक्षा जास्त बचत गट तयार करण्यात त्यांनी मदत केली आहे. त्या पीएम किसान सन्मान निधी, विमा आणि इतर योजनांच्या लाभार्थी आहेत..
सिल्मे यांचा कामाचा विस्तार वाढल्यामुळे त्यांनी अलीकडेच एक स्कूटी खरेदी केली आहे. त्या त्यांच्या तालुक्यामध्ये ग्राहक सेवा केंद्र चालवतात आणि लोकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी मदत करतात. त्यांचा बचत गट अन्न प्रक्रिया आणि बेकरीमध्ये सक्रिय आहे. त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या सन्मानार्थ टाळ्यांचा कडकडाट केला.
सरकारी योजनांचा सिल्मे यांचा अनुभव आणि हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व पंतप्रधानांनी नमूद केले, ''तुम्ही खूप अस्खलित हिंदी बोलता , कदाचित माझ्यापेक्षाही चांगले”, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांच्या समाजसेवी वृत्तीची प्रशंसा केली आणि सांगितले की, “सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या संकल्पामागील सामर्थ्य हे तुमच्यासारख्या लोकांचे समर्पण आहे.तुमच्यासारख्या लोकांमुळे माझे काम खूप सोपे होते. तुम्ही तुमच्या गावच्या मोदी आहात,” असे पंतप्रधान म्हणाले.