पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचेही उदघाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथील 10,000 जनौषधी केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी, मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत नेण्याच्या कार्यक्रमासही आरंभ केला.महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. या आश्वासनांची पूर्ती या कार्यक्रमाने झाली आहे.
यावेळी आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील एका स्वयं-सहायता गटाच्या सदस्य कोमलपती वेंकट रावणम्मा यांनी; कृषी उद्देशांसाठी ड्रोन उडवायला शिकण्याचा त्यांचा अनुभव सर्वांना सांगितला. ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना 12 दिवस लागले, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
खेड्यापाड्यात शेतीसाठी ड्रोन वापरण्याच्या परिणामाबद्दल पंतप्रधानांनी विचारले असता, त्या म्हणाल्या की त्यामुळे पाण्याच्या समस्या सोडवण्यास मदत होते आणि वेळेची बचत होते. भारतातील महिलांच्या सामर्थ्याविषयी शंका घेणाऱ्यांसाठी श्रीमती वेंकटांसारख्या महिला हे एक उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर नजीकच्या काळात महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून उदयास येईल, असे ते म्हणाले.विकसीत भारत संकल्प यात्रेतील महिलांच्या सहभागाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.