पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित देखील केले.
या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले होते . कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कोटा राजस्थान येथील सपना प्रजापती या स्वनिधि योजनेच्या लाभार्थी असून महामारीच्या काळात त्यांनी मास्क तयार करून योगदान दिले. डिजिटल व्यवहारांद्वारे बहुतांश व्यवसाय चालवत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. स्थानिक खासदार आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांना जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सपना यांच्या गटातील महिला भरड धान्याचा प्रसार आणि त्याची उत्पादने तयार करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
पंतप्रधानांनी ‘कुंभार’ समाजातील उद्योजिकेला विश्वकर्मा योजनेबद्दल सांगितले. “तुमची सामूहिक मातृशक्ती तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि मी तुम्हा सर्व दीदींना आवाहन करतो की तुम्ही लोकांना विविध योजनांचे मिळणारे फायदे सांगून मोदी की गॅरंटी की गाडी यशस्वी बनवा ”, असे ते म्हणाले.