उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या राज्यसभेतील निरोप समारंभात अन्य सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. अन्सारी यांच्या कुटुंबाचा 100 वर्षांहून अधिक काळ लोकसेवेचा दैदिप्यमान इतिहास असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. उपराष्ट्रपती हे मुत्सद्दी होते तसेच अनेक प्रसंगी राजनैतिक मुद्दयांवर उपराष्ट्रपतींच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा त्यांना लाभ झाला असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी हमीद अन्सारी यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांचे वक्तव्य खालीलप्रमाणे आहे
आदरणीय सभापती,
दीर्घकालीन सेवेनंतर आज आपण एका नव्या कार्यक्षेत्राच्या दिशेने प्रयाण कराल, याची मला खात्री वाटते, कारण शारीरिकदृष्ट्या आपण स्वत:ची चांगली काळजी घेतली आहे. आपण अशा एका परिवारातून आले आहात, ज्याला सुमारे १०० वर्षांच्या सार्वजनिक आयुष्याचा इतिहास आहे. आपले दोन्ही आजोबा, कधी राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होते तर कधी संविधान सभेत सहभागी होते. आपले पूर्वज दीर्घकाळ काँग्रेस सोबत तसेच खिलाफत चळवळीतही चांगलेच सक्रिय होते.
आपली स्वत:ची कारकीर्दही एका धोरणी मुत्सद्याची राहिली आहे. मुत्सद्दी म्हणजे काय, हे पंतप्रधान झाल्यानंतर आता मला चांगलेच समजते आहे. त्याच्या हसण्याचा अर्थ काय असतो, त्याने हात हाती घेण्याचा अर्थ काय असतो, हे लवकर समजत नाही, त्यांना तसेच प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या या कौशल्याचा या ठिकाणी मात्र तब्बल १० वर्षे चांगलाच वापर झाला असणार. या सदनातील सर्वांना सांभाळून घेताना हे कौशल्य निश्चितच त्यांच्या कामी आले असेल.
मुत्सद्दी म्हणून आपल्या कार्यकाळातील मोठा भाग पश्चिम आशियाशी संबंधित आहे. त्याच परिघात आपण आयुष्यातील अनेक वर्षे काम केले. त्याच वातावरणात, त्याच परिघात, त्याच चर्चेत आणि समविचारी लोकांसोबत आपण दीर्घकाळ राहिलात. तेथून सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपण त्याच प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त राहिलात. अल्पसंख्याक आयोग असो किंवा अलिगढ विद्यापीठ असो, आपण त्याच परिघात कार्यरत राहिलात. मात्र गेल्या १० वर्षांत आपण एका पूर्ण वेगळ्या कार्यक्षेत्रात काम केले. पूर्णपणे संवैधानिक परिघातील हे काम होते आणि ते काम संपूर्ण जबाबदारीने पार पाडण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केलात.
काही वेळा तुम्ही फार अस्वस्थही झाले असाल, पण आजच्या नंतर तुम्हाला त्या त्रासातून जावे लागणार नाही. मुक्तीचा आनंद असेल आणि आपल्या मूलभूत विचारसरणीला अनुसरून काम करण्याची, व्यक्त होण्याची, विचार करण्याची संधी तुम्हाला आता मिळू शकेल.
माझा-तुमचा फार परिचय नाही, मात्र जेव्हा आपली भेट झाली तेव्हा तुमच्याकडून बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. मी परदेशात दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी, तिथून आल्यानंतर मला जेव्हा कधी तुमच्याशी संवाद साधता येई, तेव्हा तुमची मते जाणून घेण्याची संधी मला मिळत असे. मला कायम हे अनुभवता येई. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला जशा दिसतात, त्या प्रत्यक्षात कशा असतात, हे उमगण्याची संधी मला मिळत असे. मी त्याबद्दल तुमचा मनापासून ऋणी आहे. मी अगदी हृदयापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आहे.
देशाचे उपराष्ट्रपती म्हणून तुम्ही प्रदान केलेल्या सेवेप्रती, दोन्ही सदनांच्या आणि देशवासियांच्या मनातही आदराची भावना आहे. तुमचे हे कर्तृत्व, अनुभव आणि या पदावरून निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य, हे दीर्घकाळ समाजासाठी स्मरणीय असेल. देशाच्या घटनेने आखलेल्या मर्यादांच्या परिघात राहून देशाला मार्गदर्शन करण्यात तुमचा वेळ आणि शक्ती कामी येईल, अशा शुभेच्छा मी मनापासून व्यक्त करतो.
अनेकानेक आभार !