

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन अफगाणिस्तानचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद अश्रफ घनी 19 सप्टेंबर 2018 रोजी भारत भेटीवर आले.
उभय नेत्यांनी बहुआयामी भारत-अफगाणिस्तान धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि सकारात्मकरित्या मूल्यमापन केले. द्विपक्षीय व्यापारातील वाढीने एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा पार केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मुंबईत 12 ते 15 सप्टेंबर 2018 दरम्यान भारत-अफगाणिस्तान व्यापार आणि गुंतवणूक शो यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली आणि चाबहार बंदर आणि हवाई मालवाहतूक कॉरिडोअरच्या माध्यमातून संपर्क व्यवस्था मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. अफगाणिस्तानातील पायाभूत, मनुष्यबळ विकास आणि अन्य क्षमता निर्मिती प्रकल्पांमध्ये नवीन विकास भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. अफगाणिस्तान आणि इथल्या जनतेला भेडसावणाऱ्या दहशतवादाचा सामना करण्यात तसेच शांतता आणि सलोखा राखण्यासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रपती घनी यांनी पंतप्रधानांना अवगत केले.
अफगाण प्रणित आणि अफगाण नियंत्रित शांतता आणि सलोखा प्रक्रियेला भारताचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. यामुळे अफगाणिस्तान एकसंघ, शांतीपूर्ण, सर्वसमावेशक आणि लोकशाही देश म्हणून यापुढेही ओळखला जाईल आणि आर्थिकदृष्ट्या व्हायब्रंट देश म्हणून उदयाला येईल. अफगाणिस्तानच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी अफगाण सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवून आणणारे दहशतवादी हल्ले आणि हिंसाचाराचा त्यांनी तीव्र निषेध केला आणि दहशतवादविरोधी लढ्यात अफगाणिस्तानची जनता आणि सुरक्षा दलाच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचा पुनरुच्चार केला.
आंतरराष्ट्रीय मंचावर विविध मुद्यांवर समन्वय आणि विचार विनिमय होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच उभय नेत्यांनी हे सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत तसेच आपल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर समृद्धी, शांतता, स्थैर्य आणि प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत सहमती दर्शवली.