- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कचे पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन यांदरम्यान 28 सप्टेंबर 2020 रोजी आभासी माध्यमातून द्विपक्षीय शिखरपरिषद घेण्यात येत असून याचे यजमानपद भारताकडे असेल.
- भारत-डेन्मार्क द्विपक्षीय संबंधांमध्ये नियमितपणे उच्चस्तरीय देवाणघेवाण होत असते. ऐतिहासिक संबंध, समान लोकशाही परंपरा तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शांतता व स्थैर्याची एकसमान इच्छा यांचा पाया या द्विपक्षीय संबंधांना लाभला आहे.
- भारत आणि डेन्मार्कदरम्यान वस्तू आणि सेवांच्या द्विपक्षीय व्यापारात 30.49% इतकी वाढ झाली आहे. 2016 मध्ये हा व्यापार 2.82 अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता, तोच 2019 मध्ये 3.68 अब्ज अमेरिकी डॉलर इतका झाला. सुमारे दोनशे डॅनिश कंपन्यांनी भारतात जहाजबांधणी, पुनर्नवीकरणीय ऊर्जा, पर्यावरण, शेती, अन्नप्रक्रिया, स्मार्ट शहरविकास इत्यादी क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत डेन्मार्कच्या अनेक कंपन्यांनी नवे कारखानेही सुरु केले आहेत. तर माहिती-तंत्रज्ञान, पुनर्नवीकरणीय ऊर्जा आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील सुमारे 25 भारतीय कंपन्या डेन्मार्कमध्ये कार्यरत आहेत.
- यावेळी भारत आणि डेन्मार्क दरम्यान, बौद्धिक संपदाविषयक सहकार्य करण्यासंबंधी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. तसेच, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ISA अर्थात आंतरराष्ट्रीय सौर संघटनेत डेन्मार्क प्रवेश करणार आहे.
- काळाच्या कसोटीवर खरे ठरलेल्या उभय देशांच्या संबंधांच्या व्याप्तीचा सर्वंकष आढावा घेणे दोन्ही नेत्यांना या आभासी द्विपक्षीय शिखर परिषदेमुळे शक्य होणार आहे. तसेच, परस्पर हिताच्या महत्त्वाच्या मुद्यांवर , बळकट आणि सखोल अशा भारत-डेन्मार्क सहयोगी भागीदारीला, एका व्यापक राजकीय परिप्रेक्ष्यातून दिशा देणेही यामुळे शक्य होणार आहे.