नमस्कार! माझ्या प्रिय देशवासियांनो! ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याबरोबर संवाद साधण्याचं भाग्य मला आज पुन्हा एकदा मिळालं आहे. अलिकडेच काही दिवसांपूर्वी बेंगलुरूमध्ये क्रिकेटचा एक ऐतिहासिक सामना झाला. आपल्याही अगदी लगेचच लक्षात आलं असेल, मी भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या क्रिकेट कसोटीविषयी बोलतोय. ही अफगाणिस्तानची पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी होती. अफगाणिस्तानने त्यांचा हा पहिला ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामना भारताबरोबर खेळला ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी खूप चांगल्या खेळाचं दर्शन घडवले. अफगाणिस्तानचे एक गोलंदाज राशिद खान यांनी तर यावर्षी ‘आयपीएल’मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. याविषयी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी मला टॅग करून आपल्या व्टिटरवर व्यक्त केलेलं मनोगत माझ्या स्मरणात आहे. त्यांनी लिहिलं होतं - ‘‘ अफगाणिस्तानच्या जनतेला आपला ‘क्रिकेटपटू नायक’ म्हणून राशिद खान याच्याविषयी अभिमान वाटतो. आमच्या क्रीडापटूंना त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, याबद्दल मी आपल्या भारतीय मित्रांचे आभार मानतो. अफगाणिस्तानमध्ये जे काही उत्तम, सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं प्रतिनिधित्व राशिद करतोय. तो म्हणजे क्रिकेट विश्वाची संपत्ती आहे आणि या बरोबरच पुढं, त्यांनी थोडं गंमतीशीर लिहिलं होतं की, आम्ही काही त्याला कुणाला देणार नाही.’’ हा सामना आपल्या सर्वांच्याच कायम स्मरणात राहणार आहे. अर्थात, हा पहिला सामना होता, त्यामुळं तो लक्षात राहणार, हे तर स्वाभाविकच आहे. भारतीय संघाने या सामन्याच्यावेळी दाखवलेलं औदार्य संपूर्ण विश्वासाठी आदर्श ठरणारं आहे. भारतीय संघाने करंडक घेताना एक विजेता संघ काय करू शकतो- हे त्यांनी दाखवून दिलं. भारतीय संघाने विजयी चषक घेताना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघालाही बोलावलं आणि दोन्ही संघांनी संयुक्तपणे छायाचित्र काढून तो ऐतिहासिक क्षण टिपून ठेवला. खिलाडू वृत्ती म्हणजे नेमकं काय, खिलाडूपणा कसा असतो, याचा अनुभव या एका घटनेनं आपल्याला आला. खेळ समाजाला एकजूट करण्यासाठी आणि आपल्या युवकांमधले कौशल्य, प्रतिभा दाखवण्यासाठी एक खूप चांगले माध्यम आहे. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांना माझ्या खूप शुभेच्छा. यापुढेही आपण अशाच प्रकारे खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन करीत एकमेकांशी खेळत राहू आणि विकसितही होत राहू, अशी मला आशा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो! या 21 जून रोजी म्हणजे चौथ्या ‘योग दिनी’एक वेगळेच दृष्य होते. संपूर्ण विश्व एकजूट असल्याचं दृष्य दिसत होतं. जगभरामध्ये लोकांनी अतिशय उत्साहानं आणि उल्ल्हासानं योगाभ्यास केला. युरोपियन संसद असेल, संयुक्त राष्ट्राचं न्यू यॉर्कमधलं मुख्यालय असेल अथवा जपानी नौसेनेचे लढावू जहाज असेल, सगळीकडे लोक योग करताना दिसत होते. सऊदी अरबमध्ये पहिल्यांदाच योगविषयक ऐतिहासिक कार्यक्रम झाला आणि मला माहिती मिळाली की यावेळी अनेक आसनं करण्यासाठी मार्गदर्शनाचं कार्य महिलांनी केलं. लडाखमध्ये अतिउंचावरील बर्फाळ पर्वतशिखरावर भारत आणि चीनच्या सैनिकांनी संयुक्तपणे योगाभ्यास केला. सीमांची बंधने तोडून सर्वांना जोडण्याचं काम करत आहे. शेकडो देशांतल्या हजारो उत्साही लोकांनी जाती, धर्म, क्षेत्र, रंग अथवा लिंग अशा प्रकारच्या भेदांच्या पलिकडे जाऊन योग दिनाचा एक खूप मोठा उत्सव केला आहे. जर केला संपूर्ण जगभरातले लोक इतक्या उत्साहानं ‘योग दिवसा’च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होते, तर मग अशावेळी भारतामध्ये त्याच्या कैकपट उत्साह का बरं असणार नाही?
आमच्या देशाच्या सुरक्षा दलाचे जवान, पायदळ,नौदल,हवाईदल अशा तीनही ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. काही वीर सैनिकांनी पाणबुडीवर योगासने केली. तर काही सैनिकांनी सियाचीनच्या बर्फाळ डोंगरावर योगाभ्यास केला. आमच्या वायुसेनेच्या योद्धांनी योद्धा जवान यांनी तर जमिनीपासून 15 हजार फूट उंचीवर आकाशामध्ये योगासने करून सगळ्यांनीना अचंबित केलं. यामध्ये सांगण्यासारखे विशेष म्हणजे त्यांनी विमानामध्ये बसून योगाभ्यास केला असं नाही, तर हवेमध्ये तरंगत योगाभ्यास केला. शाळा असो, महाविद्यालय असो, कार्यालय असो, उद्यान असो, उंच इमारत असो अथवा क्रीडा मैदान, सगळीकडे योगाभ्यास केला गेला. अहमदाबादचे एक दृश्य सगळ्यांच्या मनाला स्पर्श करणारे होते. तिथं एकाच ठिकाणी जवळपास 750 दिव्यांग बंधू-भगिनींनी एकत्रित योगाभ्यास केला आणि जगामध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला. जाती, पंथ आणि भौगोलिक सीमा पार करून संपूर्ण जगभरातल्या लोकांना एकजूट करण्याचं काम योगाभ्यासाने केलं आहे. आपण प्राचीन काळापासून ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही भावना मनात ठेवून जगत आलो आहे. आपले ऋषी, मुनी, संत यांनी नेहमी याच विचारावर भर दिला आहे. आज ‘योग’ ते योग्य प्रकारे सिद्ध करून साधनेने दाखवलं आहे. आज ‘वेलनेस’ हा विचार क्रांतीसारखं काम करत आहे, असं मला वाटतं. ‘वेलनेस’ची जी मोहीम सुरू झाली आहे, ती ‘योगा’मुळे अधिक पुढे जाईल. जास्तीत जास्त लोक ‘योग’ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवतील, अशी मला आशा वाटते.
माझ्या प्रिय देशवासियांनो! ‘माय गव्ह’ आणि ‘नरेंद्रमोदीअॅप’ यावर काही लोकांनी मला लिहिलं आहे की, मी यावेळच्या ‘मन की बात’मध्ये 1 जुलैला साजरा होणाऱ्या ‘डॉक्टर्स डे’विषयी काही बोलावं. आजाराचं संकट ओढवलं की त्यावेळीच आपल्याला डॉक्टरांची आठवण येते, हे अगदी खरं आहे. परंतु 1 जुलै या एका दिवशी आपल्या देशातल्या डॉक्टरांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला जातो. समाजासाठी त्यांनी केलेल्या सेवेबद्दल, त्यांच्या समर्पणाच्या भावनेबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद दिले जातात. आपण मातेला देवाच्या रूपात पाहतो, माता आपल्याला जन्म देते म्हणून तिला आपण देवासमान मानतो. ही आपली संस्कृती आहे. काहीवेळा तर डॉक्टर आपल्याला पुनर्जन्म देतात. डॉक्टरांची भूमिका केवळ औषधोपचारापुरती मर्यादित असत नाही. बरेचवेळा डॉक्टर कुटुंबाच्या मित्रासारखे असतात. आपल्यासाठी हे डॉक्टरमित्र जीवनाचे मार्गदर्शकच असतात.
“They not only cure but also heal” (दे नॉट ओन्ली क्युअर बट ऑल्सो हील) डॉक्टरांकडे वैद्यकीय ज्ञान तर असतेच त्याचबरोबर त्यांना आपली जीवनशैली कशी असावी, सध्या कोणत्या ‘शैली’चा प्रभाव वाढतोय आणि त्याचा आपल्या आरोग्यावर नेमका कोणता, कसा परिणाम होतो आहे, याच्याविषयी चांगला, सखोल अनुभव असतो. भारतीय डॉक्टरांनी आपल्या अमर्याद क्षमता आणि कौशल्य यांचं दर्शन घडवून संपूर्ण विश्वामध्ये आपली वेगळी, स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये पारंगत होतानाच कठोर परिश्रम करून आमचे डॉक्टर अतिशय गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या सोडवण्यात तज्ज्ञ आहेत. अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी सर्व देशवासियांच्यावतीनं आमच्या सर्व डॉक्टर सहकारी मंडळींना आगामी 1 जुलैच्या ‘डॉक्टर्स डे’च्या खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो! आपले भाग्य थोर आहे, म्हणून आपल्याला या भारतभूमीवर जन्म मिळाला आहे. भारताला एक समृद्ध इतिहास आहे. आपल्याकडे ऐतिहासिक घटना घडली नाही, असा एखादा महिना किंवा दिवस शोधूनही सापडणार नाही. तुम्ही पर्यटन करायला निघाला तर दिसून येईल की, भारतात प्रत्येक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा वारसा आहे. त्या विशिष्ट स्थानाशी नातं सांगणारा कोणी संत असतो, एखादा महापुरूष असेल, कोणी प्रसिद्ध व्यक्ती असेल, प्रत्येकानं आपल्यापरीने योगदान दिलेलं असतं. प्रत्येकाचं असं महात्म्य असतं.
‘‘प्रधानमंत्री जी नमस्कार! मी डॉ. सुरेंद्र मिश्र बोलतोय. आपण 28 जून रोजी मगहर इथं येणार आहात, असं मला समजलं. मी मगहरला अगदी लागून असलेल्या गोरखपूर जिल्हयातल्या टडवा या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. मगहर या गावात कबीर यांचं समाधीस्थळ आहे. आणि कबीर म्हणजे इथल्या लोकांमध्ये सामाजिक समरसता साधणारा धागा आहे. इथं कबीर यांच्या विचारांवर प्रत्येक पातळीवर चर्चा होत असते. आपण जी कार्ययोजना आखली आहे, त्यामुळे समाजातल्या सर्व स्तरावर खूप चांगला परिणाम होणार आहे. भारत सरकारची ही नेमकी काय कार्ययोजना आहे, याची माहिती आपण द्यावी, अशी माझी विनंती आहे.’’
आपण दूरध्वनी केल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. मी 28 तारखेला मगहर इथं येणार आहे, हे खरं आहे. गुजरातचा कबीरवड आपल्याला चांगलाच ठाऊक असणार. ज्यावेळी मी गुजरातमध्ये होतो, तिथं काम करत होतो, त्यावेळी संत कबीर यांच्या परंपरेतल्या लोकांचं एक मोठं राष्ट्रीय अधिवेशन भरवलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये पूर्व भागात मगहर या गावी संत कबीरदास यांनी समाधी घेतली होती, हे सगळ्यांनीनाच माहीत आहे. परंतु कबीरदास जी यांनी समाधी घेण्यासाठी मगहर हेच स्थान का बरं निवडलं, हे आपल्याला ठाऊक आहे का? त्याकाळी असं मानत होते की, ज्याचा मृत्यू मगहर इथं होतो, त्याला स्वर्गामध्ये स्थान मिळत नाही. आणि याउलट जो काशीमध्ये देहत्याग करतो, तो स्वर्गात जातो. मगहरला अपवित्र स्थान मानले जात होते. परंतु संत कबीरदास यांचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. त्याकाळात प्रचलित असलेल्या अशा वाईट आणि अंधविश्वासानं चालत आलेल्या परंपरा तोडण्यासाठी ते मगहर इथं गेले आणि तिथंच समाधी घेतली. संत कबीरदास जी यांनी साखिया आणि दोह्यांच्या माध्यमातून सामाजिक समानता, शांतता आणि बंधुभाव यावर भर दिला. हेच त्यांचे आदर्श होते. त्यांच्या रचनांमधून आपल्याला हेच आदर्श दिसून येतात. विशेष म्हणजे आजच्या काळातही कबीर जींच्या रचना तितक्याच प्रेरक आहेत. त्यांचा एक दोहा आहे:-
‘‘कबीर सोई पीर है, जो जाने पर पीर!
जो पर पीर न जानही, सो का पीर में पीर !!’’
याचा अर्थ असा आहे की, जो दुसऱ्याची पीडा समजतो तोच खरा फकीर, संत असतो. आणि जो कोणी दुसऱ्याचे दुःख जाणून घेत नाही, ते निष्ठूर असतात. कबीरदासजी यांनी सामाजिक समरसतेवर विशेष भर दिला होता. ते काळाच्या पुढे जाऊन विचार करीत होते. ज्याकाळात संपूर्ण विश्वामध्ये अधोगती आणि संघर्षाचा काळ सुरू होता, त्यावेळी त्यांनी शांती आणि सद्भावाचा संदेश दिला आणि सर्वांनी मतभेद दूर सारून लोकमानस कशा पद्धतीने एकजूट होऊ शकेल, यासाठी कार्य केले.
‘‘जग में बैरी कोई नही, जो मन शीतल होय!
यह आपा तो डाल दे, दया करे सब कोय !!’’
आणखी एका दोह्यामध्ये कबीरजी लिहितात -
‘‘जहां दया तहं धर्म है, जहां लोभ तहं पाप!
जहां क्रोध तहं काल है, जहां क्षमा तहं आप !!’’
त्यांनी म्हटलं आहे की -
जाति न पूछो साधू की, पूछ लीजिये ज्ञान !
अशा शब्दातून त्यांनी लोकांना आवाहन केलं की, धर्म आणि जात यांना बाजूला सारून, त्या पलिकडे जावून त्यांनी विचार करावा. लोकांकडे असलेले ज्ञान हा आधार मानला जावा. त्यांचा सन्मान करावा. आज इतका काळ लोटला तरीही कबीर यांनी सांगितलेल्या गोष्टी तितक्याच प्रभावी आहेत. आज कबीरजींच्या गोष्टीं वाचल्या, ऐकल्या तर वाटत की, हे तर आजच्या ज्ञानयुगातल्या गोष्टीच आपल्याला सांगत आहेत. त्यांचे विचार आजच्या काळाशीही सुसंगत आहेत, हे आपल्याला जाणवतं.
आता आपण संत कबीरदास जी यांच्याविषयी बोलतोच आहोत, अशावेळी मला त्यांच्या एका दोह्याचं स्मरण होतंय. त्यामध्ये ते म्हणतात:-
‘‘गुरू गोविंद दोऊ खडे, काके लागूं पांय!
बलिहारी गुरू आपने, गोविंद दियो बताय!!’’
गुरू असा महान असतो. असेच एक महान गुरू आहेत, जगतगुरू - गुरू नानकदेव. त्यांनी कोट्यवधी लोकांना सन्मार्ग दाखवला. अनेक पिढ्यांपासून ते प्रेरणा देत आले आहेत. गुरू नानकदेवजी यांनी समाजातला जातीपातीमध्ये असलेला भेदभाव संपुष्टात आणून संपूर्ण मानवजातीला एक मानून सगळ्यांनी एकमेकांना जवळ करून आपलेसे करण्याची शिकवण दिली. गुरू नानकदेव सांगायचे की, गरीब आणि गरजू यांची सेवा करणं म्हणजेच देवाची सेवा केल्यासारखं आहे. ते जिथं जिथं गेले, तिथं तिथं त्यांनी समाजाच्या भल्यासाठी कार्य केलं. सामाजिक भेदभावमुक्त स्वयंपाकघराची व्यवस्था त्यांनी आणली. अशा स्वयंपाकघरामधे कोणत्याही जाती-पंथाची, धर्माची, संप्रदायाची व्यक्ती येऊन भोजन करु शकते. गुरू नानकदेव यांनीच तर ‘लंगर’ची पद्धत सुरू केली. 2019 मध्ये गुरू नानकदेवजी यांचं 550 वे प्रकाशपर्व साजरं करण्यात येणार आहे. आपण सगळ्यांनीनी उत्साहानं आणि उल्हासानं या पर्वामध्ये सहभागी व्हावं. गुरू नानकदेवजी यांचं 550 वं प्रकाशपर्व संपूर्ण विश्वभरामध्ये साजरं करण्यात यावं, असं मला वाटतं. ते कशा पद्धतीने, नवनवीन कल्पनांनी हे पर्व संस्मरणीय ठरेल, याचा विचार आपण सर्वांनी करावा. त्यासाठी तयारी करावी, असा माझा आग्रह आहे. हे पर्व साजरं करणं आपल्यासाठी अतिशय गौरवाची गोष्ट ठरणार आहे. आपण सगळ्यांनीनी या प्रकाशपर्वाला ‘प्रेरण पर्व’चे स्वरुप द्यावे.
माझ्या प्रिय देशवासियांनो ! भारताला स्वातंत्र्यासाठी खूप दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. हा संघर्ष व्यापक आहे. अगणित लोकांना त्यासाठी हौतात्म्य पत्करावं लागलं. पंजाबमधल्या एका घटनेमागे इतिहास आहे. जालियनवाला बाग इथं घडलेल्या भयकारी घटनेला 2019 मध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. ही घटना संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी होती.
13 एप्रिल,1919 हा काळा दिवस कोण विसरू शकेल? सत्तेचा दुरूपयोग करून क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून निर्दोष, निशस्त्र आणि निष्पाप, निरपराध लोकांवर गोळ्यांनीचा वर्षाव करण्यात आला. या दुःखद घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेचं स्मरण आपण कशा पद्धतीनं करणार आहोत, याच्यावरही विचार करू शकतो. या घटनेनं जो अमर संदेश दिला आहे, तो आपण कायमस्वरूपी स्मरणात ठेवला पाहिजे. कोणत्याही समस्येला हिंसा आणि क्रूरता हे उत्तर कधीच असू शकत नाही. शांती आणि अहिंसा, त्याग आणि बलिदान यांचाच नेहमी विजय होत असतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो! दिल्लीतल्या रोहिणी इथल्या श्रीमान रमण कुमार यांनी ‘नरेंद्र मोदी मोबाईल अॅप’वर लिहिलं आहे की, येत्या 6 जुलैला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती आहे आणि या आजच्या कार्यक्रमामध्ये मी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी देशवासियांशी बोलावं, अशी त्यांची इच्छा आहे. रमण जी सर्वात प्रथम तर मी आपल्याला खूप-खूप धन्यवाद देतो. भारताच्या इतिहासामध्ये आपण इतकी रुची घेताय, हे पाहून खूप बरं वाटलं. आपल्याला ठाऊक असेलच कालच म्हणजे 23 जूनला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी होती. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अनेक क्षेत्रांमध्ये कार्य केलं परंतु त्यांना शिक्षण, प्रशासन आणि संसदीय व्यवहार या क्षेत्राविषयी आत्मीयता वाटायची. ते कोलकाता विद्यापीठाचे सर्वात कमी वयाचे कुलगुरू होते, ही गोष्ट फारच थोड्या लोकांना माहीत असेल. ज्यावेळी ते कुलगुरू झाले, त्यावेळी डॉ. मुखर्जी यांचं वय फक्त 33 वर्ष होतं. 1937 मध्ये कोलकाता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी श्री.गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांना आमंत्रित केलं होतं आणि या पदवीदान सोहळ्यामध्ये त्यांनी बांगला भाषेत मार्गदर्शनपर भाषण केलं होतं, ही गोष्टही फारच कमी लोकांना माहीत असणार. विशेष म्हणजे त्यावेळी देशात इंग्रजांची राजवट असतानाही कोलकाता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये एखाद्यानं बांगला भाषेत भाषण करणं, या गोष्टीला खूप महत्व आहे. 1947 ते 1950 या कालावधीमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी भारताचे पहिले उद्योग मंत्री होते.एका अर्थाने त्यांनी भारताची आणि औद्योगिक विकासाची मजबूत पायाभरणी केली होती. तो एक प्रकारे भारताच्या विकासाची पायाभरणी होती, असं म्हणता येईल. 1948 मध्ये भारताचे पहिले औद्योगिक धोरण तयार करण्यात आलं. त्यावर डॉ. मुखर्जी यांच्या कल्पना आणि दूरदृष्टी यांचा अमिट ठसा होता. भारतानं प्रत्येक क्षेत्रामध्ये औद्योगिकरूपाने स्वावलंबी व्हावं, कुशल आणि समृद्ध व्हावं, असं डॉ. मुखर्जी यांचं स्वप्न होतं. भारतामध्ये मोठमोठ्या उद्योगांची उभारणी व्हावी, विकास व्हावा, त्याचबरोबर एमएसएमई, हातमाग, वस्त्र आणि कुटीरोद्योग यावरही संपूर्ण लक्ष दिलं जावं. कुटीर आणि लघु उद्योगांचा चांगल्या पद्धतीनं विकास व्हावा, यासाठी त्यांना वित्त पुरवठा आणि त्याचबरोबर संस्थात्मक पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे, असं त्यांचं मत होतं. 1948 ते 1950 या काळामध्ये अखिल भारतीय हस्तकला मंडळ, अखिल भारतीय हातमाग मंडळ, खादी आणि ग्रामोद्योग मंडळ यांची स्थापना करण्यात आली होती. देशासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण सामुग्रीचे उत्पादन स्वदेशातच व्हावं, यावर डॉ. मुखर्जी यांचा भर होता. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स फॅक्टरी, हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी, सिंदरीचा खत कारखाना आणि दामोदर घाटी निगम या चार सर्वात मोठ्या आणि यशस्वी प्रकल्पांची स्थापना त्यांनी केली. त्याचबरोबर रिव्हर व्हॅली प्रकल्पाची स्थापना करण्यामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं खूप मोठं योगदान होतं. पश्चिम बंगालच्या विकासासाठी अतिशय उत्साही आणि समर्पित होते. प्रत्येक कार्यात त्यांची असलेली सक्रियता, त्यांच्याकडे असलेली विवेकबुद्धी यामुळेच बंगालचा एक भाग आपण वाचवू शकलो. आजही तो भाग भारतात आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या दृष्टीने भारताची अखंडता आणि एकता सर्वात महत्वाची गोष्ट होती. आणि त्यासाठी वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी त्यांना आपले प्राण गमवावे लागले. चला तर मग, आपण सगळेजण डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या एकतेच्या संदेशाचं कायम स्मरण करू या. सद्भाव आणि बंधुभावनेनं सर्वांच्या सहकार्याने भारताच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो! गेल्या काही आठवड्यामध्ये मला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. फायलींच्या पलिकडे जावून लोकांच्या जीवनामध्ये येत असलेल्या परिवर्तनाविषयी त्यांच्याचकडून जाणून घेण्याची संधी मिळाली, असं म्हणता येईल. लोकांनी आपले संकल्प, आपली सुख-दुःख, आपण गाठलेलं ध्येय यांच्याविषयी सांगितलं. माझ्या दृष्टीनं हा काही केवळ सरकारी कार्यक्रम होता, असं अजिबात नाही. तर एक वेगळा खूप काही शिकवणारा अनुभव होता. त्यांच्याशी बोलताना त्या लोकांच्या चेहऱ्यांवर जो आनंद दिसत होता, त्याचाही मी अनुभव घेत होतो. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणे, त्यापेक्षा आनंदाची, समाधानाची इतर कोणतीच गोष्ट असू शकत नाही. सामान्य व्यक्तीकडून त्याच्या यशाची, त्याच्या स्वप्नपूर्तीची कथा ऐकणं, त्याच्या निष्पाप, साध्या, सच्च्या शब्दातून त्याचा अनुभव ऐकणं, ही गोष्ट खरोखरीच हृदयस्पर्शी आहे. दुर्गम-अतिदुर्गम गांवामध्ये युवती ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’च्या माध्यमातून गावांमधल्या वयोवृद्धांच्या निवृत्ती वेतनापासून पारपत्र बनवण्यापर्यंत सेवा-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. छत्तीसगढमध्ये एक भगिनी सीताफळ गोळा करून त्याचे आईसक्रिम बनवण्याचा व्यवसाय करतेय. झारखंडमध्ये अंजन प्रकाश यांच्याप्रमाणे देशातले लाखो युवक जन औषधी केंद्र चालवण्याबरोबरच जवळपासच्या वाड्या-वस्त्या-गावांमध्ये जावून स्वस्त दरामध्ये औषधं उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधला कोणी एक युवक दोन-तीन वर्षांपूर्वी नोकरी शोधत होता, तोच आता केवळ आपला व्यवसाय यशस्वीपणानं चालवतोय असं नाही तर इतर आणखी दहा-पंधरा लोकांनाही रोजगार देत आहे. इकडे तामिळनाडू, पंजाब,गोवा या राज्यातले शालेय विद्यार्थी अगदी लहान वयातच आपल्या शाळेच्या ‘टिंकरिंग लॅब’मध्ये कचरा व्यवस्थापन यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर काम करीत आहेत. अशी कितीतरी, असंख्य उदाहरणं देता येतील. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सरकारच्या यशापेक्षा जास्त, सामान्य माणसाच्या यशाची गोष्ट समोर येते, या कारणासाठी मला सगळ्यात जास्त आनंद होतो! सामान्य माणसाचे यश हीच या देशाची खरी शक्ती आहे. नवभारताच्या स्वप्नांची ही शक्ती आहे. नवभारताच्या संकल्पाची ही शक्ती आहे. त्याचा अनुभव मी घेत होतो. समाजामध्ये वेगवेगळे लोक असतात. काहीजण जोपर्यंत निराशाजनक बोलत नाहीत, हताश स्वर काढत नाहीत, अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, जोडण्याऐवजी तोडण्याची भाषा करून तशी कृती करीत नाहीत, तोपर्यंत त्यांना चैनच पडत नाही. अशा निराशाजनक वातावरणामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये पल्लवीत झालेली आशा, नवीन उत्साह आणि आपल्या जीवनात घडत असलेल्या घटनांची माहिती तो आपल्याला देतो, अशावेळी त्याचे श्रेय सरकारला देता येणार नाही. दुर्गम-अतिदुर्गम क्षेत्रातल्या एका छोट्याशा गावातल्या लहानग्या बालिकेची घटनाही सव्वाशे कोटी देशवासियांना प्रेरणा देणारी ठरते. माझ्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने, व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून लाभार्थींशी संवाद साधून, त्यांच्या समवेत व्यतीत केलेला एक क्षणही खूप सुखद, अतिशय प्रेरक ठरला आहे. आणि यामुळे कार्य केल्याचा आनंद मिळतो त्याचबरोबर अधिक जोमानं कार्य करण्यासाठी उत्साहही येतो. गरीबातल्या गरीब व्यक्तींसाठी आयुष्य कारणी लावताना आणखी एका पद्धतीने नवा आनंद, नवा उत्साह, नवी प्रेरणा प्राप्त होते. मी देशवासियांचा खूप आभारी आहे. 40-40, 50-50 लाख लोक या व्हिडिओ ब्रिजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी मला नवीन बळ देण्याचं काम केलं. यासाठी मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करू इच्छितो.
माझ्या प्रिय देशवासियांनो! आपण जर आपल्या आजू-बाजूला पाहिलं तर काहीना काही, कुठं ना कुठ खूप काही चांगलं घडत असतं, असा अनुभव मी नेहमीच घेत असतो. चांगलं काम करणारे लोक आपल्या सभोवती असतात. अशा चांगुलपणाचा परिमल येत असतो. या सुगंधाचा आपणही अनुभव घेऊ शकतो. काही दिवसांपूर्वी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. हे एक वेगळंच समिकरण आहे. एकीकडे व्यावसायिक आणि तंत्रज्ञ आहेत तर दुसरीकडे शेतामध्ये काम करणारे आमचे शेतकरी बंधू-भगिनी आहेत. आता आपणही विचार करत असणार की, शेती आणि तंत्रज्ञान हे दोन तर अगदीच वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यांचा काय संबंध? परंतु बेंगलुरूमध्ये कॉर्पोरेट व्यावसायिक आणि आय.टी. इंजिनीअर्स एकत्र आले. त्यांनी मिळून एक सहज समृद्धी न्यास बनवला आणि त्यांनी शेतकरी बंधूंचे उत्पन्न दुप्पट कसे होऊ शकेल, यासाठी या न्यासामार्फत कार्य सुरू केलं. शेतकरी बंधूंना सहभागी करून घेण्यास सुरूवात केली. योजना तयार केल्या जावू लागल्या आणि शेतकरी बांधवांचं उत्पन्न वाढवण्यात त्यांचे यशस्वी प्रयत्न सुरू झाले. शेती कशा पद्धतीनं केली जावी, त्यासाठी नवंनवे प्रयोग ते शिकवू लागले. त्याच्या जोडीला जैविक शेती कशी केली जाते? शेतामध्ये आंतरपिकाच्या माध्यमातून एकाच वेळी जास्त पिकं कशी घेता येतात? याचं प्रशिक्षण व्यावसायिक, इंजिनीअर, तंत्रज्ञ शेतकरी बांधवांना देत आहेत. याआधी शेतकरी बंधू आपल्या शेतात पिकत असलेल्या एकाच पिकावर अवलंबून असे. त्याला पिकही फार चांगले मिळत नव्हते आणि नफाही तर अजिबातच मिळत नसायचा. आज तोच शेतकरी बंधू केवळ भाज्या पिकवतोय असं नाही तर आपल्या शेतातल्या भाज्यांचे मार्केटिंग म्हणजे विपणन या न्यासाच्या माध्यमातून करत आहे आणि त्याला खूप चांगली किंमत मिळत आहे. अन्नधान्य उत्पादन करणारे शेतकरीही या योजनेमध्ये सहभागी झाले आहेत. एकीकडे पिकाच्या उत्पादनापासून ते त्याच्या विपणनापर्यंत एक साखळी तयार केली आहे, त्यामध्ये शेतकरी बांधवाची भूमिका महत्वाची आहे तर दुसरीकडे मिळत असलेल्या नफ्यामध्येही शेतकरी वर्गाची भागीदारी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे. पिक चांगलं यावं, यासाठी चांगल्या वाणाचं, उच्च दर्जाचं, बियाणं वापरलं पाहिजे. यासाठी एक स्वतंत्र ‘बीज बँक’ तयार करण्यात आली आहे. या बीज बँकेचं कामकाज महिला पाहतात. महिलांनाही विविध कृषी कामामध्ये सहभागी करून घेतलं आहे. या अभिनव प्रयोगाबद्दल मी या युवकांचे खूप खूप अभिनंदन करतो. आत्तापर्यंत व्यावसायिक, तंत्रज्ञ, इंजिनीअरिंग यांच्या दुनियेशी जोडले गेलेल्या नवयुवकांनी आपल्या कक्षेतून बाहेर येऊन शेतकरी बांधवांसाठी कार्य करणं, ग्रामीण भागाशी जोडून, शेती आणि शिवाराशी आपलं नाते तयार करण्याचा रस्ता स्वीकारला आहे, याचा मला जास्त आनंद होत आहे. मित्रांनो! आपण तरूणपणात केलेलं हे काम खरोखरीच नवयुवकांना प्रेरणा देणारं आहे. देशाच्या इतर नवतरूणांनी या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर जाऊन त्यांनी केलेल्या कामाची बारकाईनं माहिती घ्यावी आणि आपल्या परिसरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशाप्रकारे नेमके काय आणि कसे काम करता येईल, याचा विचार करता येईल, अशी प्रेरणा बेंगलुरूच्या या प्रकल्पाकडून जरूर घेतील. देशाच्या नवीन युवा- पिढीच्या या अभिनव प्रयोगाबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. हा नवीन प्रयोग नेमका कसा कार्यरत आहे याविषयी कदाचित मला फारसं ठाऊक नाही. फारच थोडी माहिती मी जाणून घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. देशात निरंतर कोट्यवधी लोक काही-ना-काही चांगलं कार्य करत असतात. त्या सगळ्यांनीना माझ्यावतीने खूप-खूप शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो! जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करप्रणाली लागू होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे. ‘वन नेशन, वन टॅक्स’ हे देशाच्या लोकांचे स्वप्न होते. ते आता प्रत्यक्षात आलं आहे. ‘वन नेशन, वन टॅक्स’ सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वात जास्त श्रेय द्यायचे असेल तर ते मी राज्यांना देईन. ‘जीएसटी कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम’ हे एक खूप चांगले उदाहरण आहे. यामध्ये सर्व राज्यांनी मिळून देशहितासाठी निर्णय घेतला आणि त्यानंतरच देशामध्ये इतक्या व्यापक स्तरावर कर सुधारणा करणं शक्य झालं. आतापर्यंत जीएसटी परिषदेच्या 27 बैठका झाल्या आहेत आणि या बैठकीला वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असलेले लोक एकत्र येतात. भिन्न-भिन्न राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक येतात. प्रत्येक राज्यांचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. तरीही जीएसटी परिषदेमध्ये आत्तापर्यंत जितके निर्णय झाले, ते सगळे सर्वांच्या सहमतीनंच घेतले गेले आहेत. जीएसटीच्या आधी देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 17 करप्रणाली अस्तित्वात होत्या. परंतु आता नवीन व्यवस्थेमध्ये संपूर्ण देशामध्ये एकच करप्रणाली लागू झाली आहे. जीएसटी म्हणजे प्रामाणिकपणाचा विजय आहे आणि प्रामाणिकपणाचा तो एक उत्सवही आहे. याआधी अनेकवेळा कर प्रकरणांमध्ये ‘इंस्पेक्टरराज’ विषयी तक्रारी येत होत्या. जीएसटीमध्ये इंस्पेक्टरची जागा आता ‘आयटी’ म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाने घेतली आहे. विवरणपत्रापासून ते परताव्यापर्यंत सगळी कामं ऑनलाईन, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत आहेत. जीएसटी आल्यामुळे तपास नाक्यांचं अस्तित्व आता संपुष्टात आलं आहे आणि सामानमालाची वाहतूक वेगानं होत आहे. यामुळे केवळ वेळेची बचत होते असं नाही तर लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्येही त्याचा चांगला लाभ मिळत आहे. जीएसटी, कदाचित, जगातली सर्वात मोठी कर सुधारणा असेल. भारतामध्ये इतक्या मोठ्याप्रमाणावर करसुधारणा यशस्वी झाली, याला कारण म्हणजे देशातल्या लोकांनीच ही सुधारणा स्वीकारली. जनशक्तीमुळे जीएसटीचं यश सुनिश्चित होवू शकलं. सर्वसामान्यपणे इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतकी प्रचंड लोकसंसख्या असताना सुधारणा करण्यासाठी आणि संपूर्ण योजना पूर्ण स्वरूपामध्ये स्थिर होण्यासाठी 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागू शकला असता. परंतु देशाच्या प्रामाणिक लोकांचा उत्साह, देशाच्या प्रामाणिकपणाचा उत्सव, जन-शक्तीची भागीदारी याचा सुपरिणाम म्हणजे एक वर्षाच्या आतच ही नवीन करप्रणाली बहुतांश भागात चांगल्या प्रकारे लागू झाली आहे. या नवीन व्यवस्थेला आता स्थिरता मिळाली आहे. आता आवश्यकतेनुसार अंतर्गत व्यवस्थेनुरूप त्यामध्ये सुधारणाही केल्या जात आहेत. हे एकप्रकारे खूप मोठे यश सव्वाशे कोटी देशवासियांनी मिळवले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो! आत्ता ‘मन की बात’ पूर्ण करतानाच पुढच्या ‘मन की बात’ ची प्रतीक्षा मी करतोय. या माध्यमातून आपली भेट घेण्याची, आपल्याशी संवाद साधण्याची प्रतीक्षा मी करतोय. आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा !
खूप-खूप धन्यवाद!!
A historic test match in Bengaluru. #MannKiBaat pic.twitter.com/9N9maegX3L
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
PM @narendramodi lauds the Indian cricket team for their gesture during the test match against Afghanistan. #MannKiBaat pic.twitter.com/3c0aTcZhWo
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
Sports unites people. #MannKiBaat pic.twitter.com/NmixwI2jjH
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
Great enthusiasm during this year's Yoga Day. #MannKiBaat pic.twitter.com/5hGZ25dTf3
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
Yoga unites humanity. #MannKiBaat pic.twitter.com/WEObjPT6PX
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
Sights that made 125 crore Indians proud. #MannKiBaat pic.twitter.com/PKgiWwBKuQ
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
Yoga is ushering a wellness revolution. #MannKiBaat pic.twitter.com/TpNwlDg6kG
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
The doctors of India can solve complex medical problems thanks to their diligence. #MannKiBaat pic.twitter.com/gBtGxBfvcC
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
Hear #MannKiBaat. PM is talking about the life and message of Sant Kabir Das Ji. https://t.co/zuDP05llHv
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
The thoughts and ideals of Sant Kabir Das Ji emphasize on social harmony. #MannKiBaat pic.twitter.com/eGUQmaQ8zS
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
In 2019 we mark the 550th Prakash Parv of Guru Nanak Dev Ji. Let us think about ways in which we can mark this historic occasion. #MannKiBaat pic.twitter.com/gA4o2Oo1eV
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
Remembering the martyrs of the Jallianwala Bagh massacre. #MannKiBaat pic.twitter.com/XLd5ivgxlD
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
PM @narendramodi remembers the great Dr. Syama Prasad Mookerjee during #MannKiBaat.
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
He remembers Dr. Mookerjee's role in the education sector and industrial development of India. pic.twitter.com/yt2iaMa6Hf
Over the last few days, I have been interacting with beneficiaries of various initiatives of the Government of India. I learnt a lot from their experiences and life journeys: PM @narendramodi #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018
PM @narendramodi speaks about the historic GST, calls it a great example of cooperative federalism. #MannKiBaat pic.twitter.com/ciDAPfPEdr
— PMO India (@PMOIndia) June 24, 2018