सहाय्यक सचिव म्हणून आपल्या समारोप सत्रात 2014च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण केले.
थेट लाभ हस्तांतरण, स्वच्छ भारत, ई-न्यायालये, पर्यटन, आरोग्य आणि प्रशासनाबाबत उपग्रह ॲप्लीकेशन अशा निवडक संकल्पनांवर आधारीत सादरीकरणे यावेळी करण्यात आली.यावेळी पंतप्रधानांनी सविस्तर सादरीकरण करणाऱ्या युवा अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
केंद्र सरकारच्या सेवेत सहाय्यक सचिव म्हणून रुजू होणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी हे तारुण्य आणि अनुभवाचा उत्तम संगम असतात, त्यादृष्टीने त्यांचा यंत्रणेतील सहभाग मोलाचा असतो. आज निकाल प्रदान केल्यानंतर या अधिकाऱ्यांबद्दल वाटलेला विश्वास प्रत्यक्षात खरा ठरेल, अशी समाधानाची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
अधिकाऱ्यांनी संघभावनेने काम करावे आणि साचेबद्ध पध्दतीने काम न करता आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यरत रहावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
राजकारण कधीही धोरणापेक्षा वरचढ होऊ नये, असे सांगत निर्णय घेतांना, पुढील दोन बाबींची दक्षता घ्यावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
तुमचे निर्णय देशहिताला बाधक ठरू नयेत.तुमच्या निर्णयामुळे गरीबांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये.