सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्यप्रणाली द्वारे, 51,000 हून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान करतील. यावेळी पंतप्रधान या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करतील.
हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी होणार आहे. या रोजगार मेळाव्या द्वारे, केंद्रीय राखीव पोलीस दल (सी आर पी एफ), सीमा सुरक्षा दल (बी एस एफ), सशस्त्र सीमा दल (एस एस बी), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सी आय एस एफ), भारत तिबेट सीमा पोलीस दल (आय टी बी पी) आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एन सी बी) तसेच दिल्ली पोलीस अशा विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सी ए पी एफ), केंद्रीय गृहमंत्रालय भर्ती करत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी, गृह मंत्रालयाच्या विविध संस्थांमध्ये, हवालदार (जनरल ड्युटी), उपनिरीक्षक (जनरल ड्युटी) आणि बिगर जनरल ड्युटी श्रेणीतील पदे, अशा विविध पदांवर रुजू होणार आहेत.
दिल्ली पोलीस तसेच सी ए पी एफच्या बळकटीकरणामुळे , अंतर्गत सुरक्षेमध्ये मदत करणे, दहशतवाद-बंडाळी-नक्षलवादी कारवाया यांचा सामना करणे, आणि राष्ट्राच्या सीमांचे रक्षण करणे, यासारख्या बहुपेडी भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडण्यात, सर्व दलांना मदत होईल.
रोजगार मेळावा, हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. रोजगार मेळावा, या पुढील रोजगार निर्मितीमध्ये चालना देणारा म्हणून काम करेल आणि युवावर्गाला त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.
नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवरील कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन अभ्यासक्रमाद्वारे स्वयंप्रशिक्षण घेण्याची संधी देखील मिळत आहे. या अध्ययन सुविधेत, 673 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम, 'कुठेही कोणत्याही उपकरणावर’ या अध्ययन पद्धती मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.