पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना 1 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरण करणार आहेत.
यावेळी पंतप्रधान नवी दिल्ली येथील एकात्मिक संकुल “कर्मयोगी भवन” च्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी करतील. हे एकात्मिक संकुल मिशन कर्मयोगी उपक्रमाच्या विविध प्रकारच्या कार्यात सहकार्य आणि समन्वय वाढवेल.
देशभरात 47 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांमध्ये भरती होत आहे. नव्याने नियुक्ती झालेल्या उमेदवारांना महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग, संरक्षण मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यासारख्या विविध सरकारी मंत्रालये/विभागांमधील विविध पदांवर समाविष्ट करण्यात आले आहे.
देशातील रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने हे रोजगार मिळावे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहेत. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील त्याचबरोबर तरुणांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना राष्ट्रीय विकासात थेट सहभागी करून घेण्यासाठी तरुणांना लाभदायक ठरणाऱ्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.
नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना आयजीओटी (iGOT) कर्मयोगी पोर्टलवरील कर्मयोगी प्रारंभ ऑनलाइन मॉड्यूलच्या माध्यमातून स्वत:ला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळणार आहे, जिथे 880 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम ‘कुठेही आणि कोणत्याही उपकरणावर’ या शिक्षण पद्धतीनुसार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.