अमेरिकन संसदेच्या सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष प्रतिनिधी मायकेल मॅककॉल यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळातील इतर सदस्यांमध्ये प्रतिनिधी नॅन्सी पेलोसी, प्रतिनिधी ग्रेगरी मिक्स, प्रतिनिधी मरियानेट मिलर-मीक्स, प्रतिनिधी निकोल मॅलियोटाकिस, प्रतिनिधी अमरीश बाबूलाल “अमी” बेरा आणि प्रतिनिधी जिम मॅकगव्हर्न यांचा समावेश होता.
शिष्टमंडळाच्या सदस्यांनी सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
त्याचबरोबर त्यांनी भारतात नुकत्याच पार पडलेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही निवडणूक प्रक्रियांच्या प्रचंड व्याप्तीचे, निष्पक्षता आणि पारदर्शकतेबद्दल मनापासून कौतुक व्यक्त केले.
शिष्टमंडळाने भारत-अमेरिका संबंध सर्वात महत्वाचे असल्याचे नमूद केले आणि व्यापार, नाविन्यपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण, लोकांमधील आदानप्रदान यासह सर्व क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापक धोरणात्मक जागतिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.
सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या अंमलबजावणीचा आदर आणि जनतेतील परस्पर मजबूत संबंधांवर आधारित असलेले भारत-अमेरिका संबंध वाढवण्यात अमेरिकन काँग्रेसच्या सातत्यपूर्ण आणि द्विपक्षीय पाठिंब्याने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली.त्याचबरोवर जागतिक हितासाठी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी गेल्या वर्षी जूनमध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्याचे स्मरण केले, जेव्हा त्यांना अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला दुसऱ्यांदा संबोधित करण्याची संधी मिळाली होती.