पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गुजरातमधील केवडिया हा आता काही दुर्गम भागातील छोटासा तालुका राहिला नाही तर तो जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ बनले आहे. देशातील विविध प्रांतांना गुजरातमधील केवडियाशी जोडणार्या आठ गाड्यांना रवाना केल्यानंतर आणि राज्यातील रेल्वेशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केल्यानंतर मोदी बोलत होते.
केवडियाचा विकासाचा प्रवास सुरू ठेवत पंतप्रधानांनी सांगितले की स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे. देशाला समर्पित झाल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी 50 लाखाहून अधिक पर्यटक येऊन गेले आहेत आणि कोरोना काळात बंद राहिल्यानंतर ते आता पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. संपर्क व्यवस्था जसजशी सुधारेल , तसतसे केवडियामध्ये दररोज सुमारे एक लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पर्यावरणाचे रक्षण करताना अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाच्या नियोजित विकासाचे केवडिया हे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
सुरुवातीला केवडिया हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव स्वप्नवत वाटत होता. जुन्या पद्धतीचे कामकाज पाहता, रस्ते, पथदिवे, रेल्वे, पर्यटकांची राहण्याची काहीही सोय नव्हती आता केवडिया सर्व सुविधांसह संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे. येथील आकर्षणांमध्ये, भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, विशाल सरदार पटेल प्राणीविज्ञान पार्क, आरोग्य वन आणि जंगल सफारी आणि पोषण पार्क यांचा समावेश आहे. यात ग्लो गार्डन, एकता क्रूझ आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. पंतप्रधान म्हणाले, वाढत्या पर्यटनामुळे आदिवासी तरुणांना रोजगार मिळत आहे आणि स्थानिक लोकांना आधुनिक सुविधा मिळत आहेत. एकता मॉलमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसाठी नवीन संधी आहेत. आदिवासी गावांमध्ये होम स्टेसाठी सुमारे 200 खोल्या विकसित केल्या जात आहेत असेही त्यांनी नमूद केले.
वाढते पर्यटन लक्षात घेऊन केलेल्या केवडिया स्थानकाच्या विकासाबाबत पंतप्रधानांनीही माहिती दिली. इथे आदिवासी आर्ट गॅलरी आणि प्रेक्षक गॅलरी आहे जिथून स्टॅच्यू ऑफ युनिटीची झलक पाहता येईल.
ध्येय-केंद्रित प्रयत्नातून भारतीय रेल्वेच्या कायापालटाबाबत पंतप्रधानांनी विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले की, प्रवासी आणि वस्तू वाहतुकीच्या पारंपारिक भूमिकेशिवाय रेल्वे पर्यटन आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना थेट संपर्क व्यवस्था पुरवत आहे. ते म्हणाले की अहमदाबाद-केवडियासह अनेक मार्गांवरील जनशताब्दीमध्ये आकर्षक ‘व्हिस्टा-डोम कोच’ असतील.