पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की बिमस्टेक राष्ट्रांनी हे शतक आशियाचे शतक बनवण्याची गरज आहे कारण या देशांमध्ये एकूण जागतिक लोकसंख्येच्या एक पंचमांश लोकसंख्या आहे आणि एकत्रित जीडीपी 3.8 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘प्रारंभ : स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला ’ संबोधित करत होते.
बांग्लादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड सारख्या बिम्सटेक देशांमध्ये स्टार्टअप स्पेसमधील उत्साही उर्जेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. हे शतक डिजिटल क्रांती आणि आधुनिक काळातील नवसंशोधनाचे एक शतक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. हे देखील आशियाचे शतक आहे. म्हणूनच भविष्यातील तंत्रज्ञान आणि उद्योजक या प्रदेशांमधून पुढे येणे ही सध्याच्या काळाची मागणी आहे. यासाठी सहकार्याची इच्छा असणार्या आशियाई देशांनी जबाबदारी स्वीकारून एकत्र यावे यावर पंतप्रधानांनी भर दिला. या देशांमध्ये संस्कृती, सभ्यता आणि संबंधांचा सामायिक वारसा आहे. आपण आपले विचार, आपले आदर्श आणि कल्याण सामायिक करतो, म्हणून आपले यश देखील सामायिक केले जाईल. आपण एक पंचमांश लोकसंख्येसाठी काम करतो त्यामुळे ही जबाबदारी नैसर्गिकरित्या बिमस्टेक देशांवर येते असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी या प्रांतातील तरुणांच्या अधीरपणा, उर्जा आणि उत्सुकतेच्या नव्या शक्यता पाहिल्या आहेत. म्हणूनच ते म्हणाले की त्यांनी 2018 मध्ये बिमस्टेक शिखर परिषदेत तंत्रज्ञान आणि नाविन्य यासाठी सहकार्याचे आवाहन केले आणि बिम्सटेक स्टार्ट अप कॉन्क्लेव्हचा प्रस्ताव मांडला. आजची स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषद ही तो संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
मोदी यांनी या प्रांतातील संपर्क आणि व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी आठवण करून दिली की डिजिटल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी 2018 मध्ये बिमस्टेकचे मंत्री इंडिया मोबाइल कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले होते. संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, अंतराळ, शेती आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रातही सहकार्य सुरु आहे. “या क्षेत्रांमधील मजबूत संबंधांमुळे आपल्या स्टार्टअपला मूल्यवर्धित चक्राकडे वळता येईल आणि पायाभूत सुविधा, शेती आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात संबंध अधिक दृढ होतील तसेच यामुळे या क्षेत्रांमध्ये वाढ होण्यास मदत होईल”, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.