थॉमस चषकामधे ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.
पंतप्रधानांनी संघाचे अभिनंदन केले आणि भारताचा सर्वोत्तम क्रीडा विजय म्हणून क्रीडा विश्लेषकांना याची गणना करावी लागेल असे सांगितले. संघाने एकही फेरी गमावली नाही याचा मला विशेष आनंद असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी खेळाडूंना विचारले की आपण कोणत्या टप्प्यावर जिंकणार आहोत असे तुम्हाला वाटले. किदाम्बी श्रीकांतने त्यांना सांगितले की उपांत्यपूर्व फेरीनंतर, संघाचा अंतिम लक्ष्य गाठण्याचा निर्धार खूप मजबूत झाला. त्यांनी पंतप्रधानांना सांगितले की सांघिक भावना फलद्रुप झाली आणि प्रत्येक खेळाडूने आपले 100 टक्के योगदान दिले.
प्रशिक्षकही सर्वांच्या कौतुकास पात्र असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी लक्ष्य सेन यांना सांगितले की त्यांना अल्मोडा येथून ‘बाल मिठाई’ द्यावी लागेल. तो मूळचा देवभूमी उत्तराखंडचा आहे. लक्ष्य हा तिसऱ्या पिढीचा खेळाडू असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या स्पर्धेदरम्यान त्याचे वडील उपस्थित होते, अशी माहिती लक्ष्य सेनने दिली. त्यानेही श्रीकांतला दुजोरा देत सांगितले की, उपांत्यपूर्व फेरीनंतर विजयावरचा विश्वास अधिक पक्का झाला. एचएस प्रणॉयने असेही सांगितले की, उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवणे खूप महत्त्वाचे होते. या विजयानंतर भारतीय संघ कोणत्याही संघाशी टक्कर देण्याच्या स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. संघाच्या पाठिंब्यामुळे मलेशियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सात्विक साईराज, रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचेही विजयाबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधानांनी चिराग शेट्टीशी मराठीत संवाद साधला ज्याने त्यांना सांगितले की भारताकडून जागतिक विजेते बनण्यासारखी दुसरी गोष्ट नाही. “तुम्ही सर्वांनी अशी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. संपूर्ण संघ कौतुकास पात्र आहे.” भारतात परतल्यावर पंतप्रधानांनी त्यांना त्यांच्या प्रशिक्षकांसह त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले कारण त्यांना त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांचे अनुभव ऐकण्याची इच्छा आहे.
बॅडमिंटन, टेबल टेनिस तसंच जलतरण यांसारख्या खेळांची निवड केलेल्या नवोदित खेळाडू आणि लहान मुलांसाठी, विजेत्या संघांनी प्रोत्साहनपर संदेश द्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. यावेळी किदांबी श्रीकांत याने विजेत्या संघाच्या वतीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. आज भारतात खेळांना उत्तम पाठबळ मिळत असल्याचं ते म्हणाले. भारतीय क्रीडा प्राधिकरण, सरकार, क्रीडा महासंघ आणि उच्च स्तरावर - लक्ष्यीत ऑलिम्पिक पोडियम स्कीम अर्थात टॉप्स या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांमुळे आपल्यामागे उत्तम पाठबळ असल्याची भावना खेळाडूंमध्ये प्रबळ झाल्याचे त्यांनी नमूद केलं. असे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच राहिले, तर देशांत असंख्य निष्णात विजेते खेळाडू दिसू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या आवडीचे खेळांमध्ये कारकिर्द घडवू पाहणाऱ्या लहान मुलांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं. या खेळाडूंनी आपल्या क्षमतेच्या 100 टक्के योगदान दिलं, तर त्यांना भारताच्या क्रिडा क्षेत्राकडून मोठे पाठबळ मिळेल असं ते म्हणाले. भारतात चांगले प्रशिक्षक आणि पायाभूत सुविधा आहेत. खेळाडूंनी आपल्या खेळाप्रती सर्वस्व झोकून देत प्रयत्न केले तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करू शकतील. त्यांनी खेळासाठी स्वतःचं शंभर टक्के योगदान दिलं तर ते नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास किदांबी श्रीकांत यांनी व्यक्त केला.
मुलांनी खेळाकडे वळावं यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यासाठी शेवटपर्यंत त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहणं, हे आव्हानात्मक आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी खेळाडूंच्या पालकांचं कौतुक केलं, आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. यावेळी विजय साजरा करतांना खेळाडूंनी केलेल्या जल्लोषातही पंतप्रधान सहभागी झाले, तसंच त्यांनी खेळाडूंसोबत 'भारत माता की जय' च्या जयघोषही केला.
A special interaction with our badminton 🏸 champions, who have won the Thomas Cup and made 135 crore Indians proud. pic.twitter.com/KdRYVscDAK
— Narendra Modi (@narendramodi) May 15, 2022