जवळजवळ 1 महिन्यापासून अनेक नव्या मित्रांसोबत प्रत्येकजण आपल्यासोबत स्वतःची एक वेगळी ओळख घेऊन आला आहे,आपल्यासोबत विविधता घेऊन आले आहेत, या महिन्याभरात तुमच्या सर्वांमध्ये एक अतूट नाते निर्माण झाले आहे, आपलेपणाचे नाते. जेव्हा तुम्ही दुसऱ्या राज्यातील कॅडेट ना भेटत असाल तेव्हा त्यांच्यातली वैशिष्ट्ये विशेषतः, विविधता बघून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. तुम्ही इथून जाताना इतकी उत्सुकता घेऊन जाल की, भारताचा नागरिक म्हणून येणाऱ्या काळात, भारताला जितके समजून घेऊ शकेन, भारताच्या प्रत्येक भागाची जितकी माहिती घ्यायला जमेल, भारताची विविधता समजावून घेऊ शकेन, तितकी जास्तीत जास्त माहिती समजावून घ्याल. एनसीसी कॅम्पमध्ये हे सगळे संस्कार तुमच्यात सहज रुजवले जातात. सुरुवातीला असे वाटते की, आपण तर केवळ संचलन करतोय, आपण केवळ गणवेश घालून आलो आहोत, आपणतर फक्त राजपथावरील संचलनासाठी तयारी करत आहोत, परंतु आपल्याला हे कळतंच नाही की आपल्या नकळत आपण स्वतःमध्ये हा विशाल भारत कशाप्रकारे सामावून घेत आहोत. आपण कसे भारतमय होऊ लागतो. भारतासाठी काहीतरी करण्याची वृत्ती आपल्या मनात घर करू लागते. ह्या सगळ्या गोष्टी कधी घडतात हे आपल्याला कळतंच नाही. एक असे वातावरण जे, आपल्याला प्रत्येक क्षणाला माझा देश, माझ्या देशाचे भविष्य, माझ्या देशाच्या उज्वल भविष्यात माझी भूमिका, माझे कर्तव्य, ह्या सर्व गोष्टींची प्रेरणा घेऊन तुम्ही सर्वजण आपापल्या ठिकाणी परत जात आहात. राजपथावरील संचलनात एनसीसी चे कॅडेट आणि ज्यांना राजपथावर चालण्याची, तिथे दिसण्याची संधी मिळाली नाही, ते सर्वजण, महिनाभर कठोर परिश्रम करणाऱ्या प्रत्येका प्रति जगातील दहा देशांचे पाहुणे आणि जगभरातील भारतीय तुमच्या पडणाऱ्या प्रत्येक पावलावर गर्व करत होता. जेव्हा तुम्ही चालत होतात तेव्हा त्याला असे वाटत होते की, माझा देश पुढे मार्गक्रमण करत आहे. जेव्हा तुम्ही तुमचे साहस दाखवत होतात तेव्हा प्रत्येक देशवासीयाला असे वाटत होते की देशाचे साहस वाढत आहे. हे साहसपूर्ण वातावरण केवळ इथवरच मर्यादित राहू नये. खरी परीक्षा तर ह्यानंतर सुरू होते.
एनसीसीची ओळख आहे एकता आणि शिस्त. एनसीसी ही कोणती यंत्रणा नाही. एनसीसी हे एक मिशन आहे, एनसीसी हे केवळ गणवेश आणि एकसमानतेपुरते मर्यादित नाही, हे खऱ्या अर्थाने एकतेचे प्रतीक आहे. आणि म्हणूनच ही भावना घेऊन हे संचलन, हे शिबीर, ही शिस्त, हे अथक परिश्रम कशासाठी, हे सर्व का? देशातल्या गरीबातील गरीब व्यक्तीचा हक्काचा पैसा यासाठी का खर्ची केला जातो, त्याला कारण आहे, देशात अशा संघटनांची निर्मिती झाली पाहिजे जे इतरांना प्रेरणा देत राहतील आणि देशभावना वृद्धिंगत होत राहील आणि अशाप्रकारे नागरिकांचे आयुष्य घडवण्याचा आणि ह्या सर्व घडवलेल्या आयुष्यांच्या सहाय्याने देश निर्मितीचा प्रयत्न केला जाईल. आपण जर हे सगळं इथेच सोडून गेलो. केवळ आयुष्यभर मित्रांमध्ये आठवणींना उजाळा देत राहिलो तर हे सर्व काय उपयोगाचे. हे असे झाले तर त्यात काहीतरी कमतरता राहील. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लष्करासाठी कायदे आणि नियम तयार करण्यायाआधी या देशात एनसीसी कायदा अस्तित्वात होता. देशसुरक्षेच्या आधी राष्ट्रनिर्मितीला आपल्या देशातील युवकांसोबत जोडण्यात आले होते.
आज एनसीसी ला 70 वर्ष पूर्ण झाली आहेत. सात दशकांचा प्रवास आणि माझ्यासारखे लाखो एनसीसी कॅडेट देशभक्तीचे संस्कार घेऊन आयुष्याच्या वाटेवर चालतं आहोत.
मित्रांनो एनसीसी कडून आपल्याला एक मिशन भावना मिळते. 70 वर्षाच्या एनसीसीच्या काळात आपण जिथून सुरुवात केली होती, जिथे पोहोचलो आहोत आणि भविष्यात देशाला ज्या उंचीवर न्यायचे आहे त्या सर्वाचा एकदा आढावा घेणे गरजेचे आहे. भविष्यातील एनसीसीचे स्वरूप काय असेल, कोणत्या नवीन गोष्टींचा समावेश करता येईल. त्याचा विस्तार कशाप्रकारे करता येईल. यासर्व बाबींशी निगडित लोकांना मी आवाहन करतो की, जेव्हा आपण एनसीसीची 75 वर्षे साजरी करू, त्यासाठी आपण एक आराखडा तयार केला पाहिजे आणि 75 वर्षाच्या ह्या मिशनला एका अशा उंचीवर नेऊन ठेवू जिथे देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एनसीसीच्या कामगिरीमुळे, एनसीसीच्या कॅडेटच्या कामगिरीमुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नावीन्य निर्मिती होईल, काही बदल घडतील, देशाला अभिमानास्पद वाटेल. हा संकल्प घेऊन आज आपण 70 वर्ष काम करत असताना, 75 वर्षांचे मिशन निश्चित केले पाहिजे.
मला नाही वाटत की, माझ्या देशातला एकही युवक आता भ्रष्टाचार सहन करेल. भ्रष्टाचाराविरोधात समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. पण आपण केवळ भ्रष्टाचाविरोधात राग व्यक्त करत बसणार आहोत का? एवढं करून भागणार आहे का? असे असेल तर भ्रष्टाचाविरुद्धची ही लढाई दीर्घकाळ सुरू राहील, ही लढाई थांबणार नाही. भ्रष्टाचारविरुद्धची ही लढाई, काळ्यापैशा विरुद्धची ही लढाई माझ्या देशातील युवकांच्या उज्वल भविष्यासाठी आहे. जर माझ्या देशातील युवकांचे भविष्य उज्वल झाले तर त्यातूनच माझ्या देशाचे उज्वल भविष्य घडणार आहे.
आज देशाचा पंतप्रधान म्हणून भारताच्या युवकांकडून मला काहीतरी मागायचे आहे. माझ्या एनसीसीच्या कॅडेटकडे मला काहीतरी मागायचे आहे. मला माहित आहे की, मला तुम्ही कधी निराश करणार नाही. माझ्या देशाचे युवक मला निराश करणार नाहीत. मी तुम्हला मत मागायला सांगत नाही किंवा कोणत्याही राजकीय व्यासपीठावर आमच्या प्रगतीची प्रसिद्धी करण्यास सांगत नाही. भारताला या भ्रष्टाचाररूपी वाळवीपासून मुक्त करण्यासाठी मला आपल्या देशातील युवकांची मदत हवी आहे. तुम्हाला वाटत असेल आपण काय करू शकतो? तुम्ही म्हणाल की आम्ही जास्तीत जास्त हे करू शकतो की कोणाला लाच देणार नाही, कोणाकडून लाच घेणार नाही. ते तर तुम्ही करालच, पण एवढे करून भागणार नाही. तुम्ही एक गोष्ट मनाशी ठरवा आणि एक नियम करा की एका वर्षात मी कमीत कमी 100 कुटुंबांना या कामात सहभागी करून घेईन. जर जबाबदारी आली, पारदर्शकता आली, तर बदल आपोआप घडतील. आता तुम्ही हा निश्चय करा की, तुम्ही आता काहीही खरेदी कराल, जिथे कुठे पैशांचा व्यवहार कराल तो रोखीत करणार नाही. आपल्या सर्वांकडे आता मोबाईल आहे, मग आपण भीम ऍप डाउनलोड करून भीम ऍपच्या माध्यमातूनच सर्व गोष्टी विकत घेऊ, ज्या दुकानात जाल, ज्या मॉल मध्ये जाल तिथे ह्या गोष्टीचा आग्रह धरणे तुमच्या हातात आहे. हे तुम्हालाच करायचे आहे. तुम्ही याची सवय करा. तुम्हाला लवकरच कळेल की पारदर्शकता यायला सुरुवात झाली आहे, उत्तरदायित्व वाढले आहे. यामुळे आपण भ्रष्टाचारमुक्त भारताच्या दिशेने मजबूत पावलं उचलू शकतो आणि हे काम माझ्या देशातील युवकांच्या मदतीशिवाय शक्य नाही. माझ्या एनसीसीच्या कॅडेटनी जर हे काम करण्याचे मनावर घेतले, तर कोणाची हिम्मत आहे का की माझ्या देशाला भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकवून ठेवेल. कितीही भ्रष्ट व्यक्ती कितीही मोठ्या हुद्यावर गेला तरी त्याला इमानदारीच्या मार्गावर चालावे लागेल.
देशात कधी कधी निराशेचे वातावरण असायचे की भ्रष्टाचाराविरुद्ध मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या जातात, परंतु याचा त्रास मोठया लोकांना होत नाही. आज तुम्ही अशा कालखंडातून जात आहात, जिथे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे देशातील तीन तीन माजी मुख्यमंत्री तुरुंगाची हवा खात आहेत. कोण म्हणतं देव नाही, कोण म्हणतं देवाच्या दारी न्याय होत नाही. आता कुणीही वाचणार नाही आणि म्हणूनच आज एनसीसीच्या कॅडेटसमोर, त्यांच्या माध्यमातून देशभरातील एनसीसीचे कॅडेट असो, एनसीसीचे युवक असो, नेहरू युवा केंद्राचे युवक असु देत, शाळा महाविद्यालयाचे विध्यार्थी असो, माझ्या देशासाठी प्राणांची आहुती देणारे युवक असो, मला तुमची मदत हवी आहे. या लढाईत तुम्ही माझे सैनिक बनून माझ्यासोबत चला. आपण सर्व एकत्र येऊन भारताला या वाळवीपासून मुक्त करूया, तेव्हाच आपण देशातील गरीबांच्या हक्काची लढाई जिंकू शकू.
जेव्हा आपण वाईट गोष्टींचा नायनाट करतो, तेव्हा त्याचा सर्वात जास्त फायदा माझ्या देशातील गरीबांना होतो. जेव्हा पैसे योग्य ठिकाणी खर्च होतात तेव्हा एखाद्या गरीबाच्या घरी स्वस्तात औषध मिळतात. जेव्हा पैसे योग्य ठिकाणी खर्च होतात तेव्हा एका गरीब मुलाच्या शिक्षणासाठी चांगले शिक्षक मिळतात, चांगली शाळा बांधली जाते. जेव्हा पैसे योग्य ठिकाणी वापरले जातात तेव्हा गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता बांधला जातो, जेव्हा पैशाचा योग्य वापर केला जातो तेव्हा या देशातील दलित, पीडित, शोषित, वंचित लोकांच्या हितासाठी काहीतरी करण्याच्या संधी निर्माण होतात.
माझ्या देशाच्या प्रिय युवकांनो, तुम्ही सध्या आधारविषयी चर्चा ऐकत असाल. ज्या लोकांना तंत्रज्ञानाची माहिती आहे, ज्यांना बदलत्या युगाची माहिती आहे, त्यांना हे नक्की माहीत आहे की, येणाऱ्या काळात डेटा एका मोठ्या शक्तीच्या रुपात समोर येणार आहे. ज्यांच्याकडे डेटा आहे तो देश सर्वशक्तीशाली ठरेल. तो दिवस आता दूर नाही. आधारने डिजिटल युगात, डेटाच्या विश्वात भारताला खूप मोठा अभिमान मिळवून दिला आहे.
आता आधारच्या माध्यमातून लोकांना जे लाभ मिळायला पाहिजेत, गरीबांना, सामान्य जनतेला जे लाभ मिळायला पाहिजेत, ते याआधी चुकीच्या लोकांच्या हातात जात होते. भ्रष्टाचाराचा तो पण एक मार्ग होता. जी मुलगी जन्मालाच आली नव्हती, ती सरकारी कागदपत्रांमध्ये मोठी व्हायची, लग्न व्हायचे आणि ती विधवा पण व्हायची आणि सरकारी तिजोरीतून विधवा पेन्शन पण सुरू व्हायची. असाच कारभार सुरू होता. आधारमुळे, थेट लाभ हस्तांतरणामुळे जे खरे लाभधारक आहेत, त्यांची ओळख पटून त्यांना त्याचा लाभ मिळू लागला आहे. माझ्या देशाच्या युवकांनो, केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने काही योजनांमध्ये अगदी 100% नाही पण लाभ मिळायला सुरुवात झाली आहे, अंदाजे 60 हजार कोटी रुपये जे चुकीच्या लोकांच्या हातात जात होते ते वाचले. हे सगळे शक्य आहे आणि म्हणूनच माझ्या युवकांनो रोखविरहीत समाजाच्या दिशेने लेस कॅशचा मंत्र घेऊन भीम ऍपचा सर्वाधिक वापर करत जर खरेदी विक्री केली, शाळेचे शुल्क देखील भीम ऍप नेच भरले तर तुम्ही बघाल की देशात कशाप्रकारे बदल घडतील.
माझ्या युवक मित्रांनो तुम्हाला एक चांगला अनुभव आयुष्यात मिळाला आहे. खूप कमी कालावधीत देशातील प्रत्येक कोपऱ्यातील व्यक्तीसोबत जगण्याची संधी मिळाली. एक भावना निर्माण झाली आहे. एक, नवीन भारताचा अनुभव तुम्हाला मिळतो, या नवचेतनेसोबत, या नवीन संकल्पासोबत, या नवीन आकांक्षा सोबत नवीन भारताच्या निर्मितीचा आपण संकल्प करूया. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची जेव्हा 75 वर्ष साजरी करू, तेव्हा स्वातंत्र्यवीरांची स्वप्ने पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्यात येऊन आपण देशाला प्रगती पथावर घेऊन जाऊ, नवीन भारताची निर्मिती करूया.
तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद!