श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून बातचित केली.
श्रीलंकेचे राष्ट्रध्यक्ष आणि एक माजी संरक्षण सचिव यांच्या हत्येचा कट रचण्यामागे भारताचा हात आहे, अशा आशयाचे वृत्त श्रीलंकेच्या काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. या तथाकथित वृत्ताचे सिरीसेना यांनी स्पष्टपणे खंडन केले आहे.
हे वृत्त निराधार असून कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणाने आणि दुष्ट हेतूने प्रसारित केले आहे. अशा असत्य वृत्तामुळे दोन्ही नेत्यांमध्ये गैरसमज निर्माण होवू शकतात, त्याचबरोबरच या शेजारी देशांत असलेल्या चांगल्या, सौहार्दपूर्ण मैत्रीच्या नात्यामध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
अशा प्रकारच्या वृत्ताचे सार्वजनिक पातळीवर खंडन करण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर प्रयत्न केले आहेत असे सिरीसेना यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणी श्रीलंका सरकारच्यावतीनेही तातडीने कोणती पावले उचलण्यात आली, याची माहिती सिरीसेना यांनी दूरध्वनीवरून दिली. यासंदर्भामध्ये त्यांनी आज सकाळी श्रीलंकेमधले भारताचे उच्चायुक्त यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे. या भेटीविषयीही मैत्रिपाला सिरीसेना यांनी श्री. मोदी यांना माहिती दिली.
भारताच्या पंतप्रधानांना श्रीलंका आपला अतिशय जवळचा आणि खरा मित्र मानते. त्यामुळे उभय देशांमध्येच नाही, तर दोन्ही नेत्यांमध्ये चांगले स्नेहबंध निर्माण झालेले आहेत. भारत आणि श्रीलंका यांची परस्परांतील मैत्री दोन्ही देशांना लाभदायक आहे. यापुढेही ही मैत्री अधिकाधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर कार्य करण्याचा श्रीलंकेने संकल्प केला आहे. या संकल्पाचा पुनरूच्चार यावेळी सिरीसेना यांनी केला.
श्रीलंकेने या खोडसाळ, निराधार वृत्ताचे खंडन करण्यासाठी तातडीने जी पावले उचलली, त्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना कौतुक केले. भारत नेहमीच ‘‘शेजारधर्मा’’च्या कर्तव्याला प्राधान्य देत आला आहे. नीती आणि प्राथमिकता यांचा विचार करून उभय देशांमध्ये सर्वतोपरी सहकार्य कायम ठेवण्याची गरज आहे. भारत-श्रीलंका यांच्यामध्ये आणखी मजबूत संबंध प्रस्थापित करणे आपल्याला व्यक्तिशः अधिक आवडेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.