Our freedom was not only about our country. It was a defining moment in ending colonialism in other parts of the world too: PM
The menace of corruption has adversely impacted our country's development journey: PM Modi
Poverty, lack of education and malnutrition are big challenges that our nation faces today, says PM Modi
In 1942, the clarion call was 'Karenge Ya Marenge' - today it is 'Karenge Aur Kar Ke Rahenge.'
From 2017-2022, these five years are about 'Sankalp Se Siddhi’, says PM Modi

आदरणीय अध्‍यक्ष महोदया, मी आपले आणि सदनातील सर्व आदरणीय सदस्यांचे आभार मानतो. आज, या सदनासारख्या पवित्र ठिकाणी आपल्याला ऑगस्ट क्रांती दिनाचे स्मरण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, याबद्दल आपणा सर्वांनाच अभिमान वाटतो आहे. आपल्यापैकी अनेक जण असे असतील ज्यांना ऑगस्ट क्रांती दिन अर्थात ९ ऑगस्टच्या अनेक आठवणी स्मरत असतील. मात्र त्यानंतरही त्या सर्व घटना पुन्हा आठवणे हे निश्चितच प्रेरक आहे. संपूर्ण आयुष्यातील अशा अनेक चांगल्या आणि महत्वपूर्ण घटनांच्या स्मरणातून आपल्या आयुष्याला एक नवी शक्ती मिळते, राष्ट्र जीवनालाही एक नवी शक्ती मिळते. त्याचप्रमाणे आपली जी नवीन पीढी आहे, त्यांच्यापर्यंत हा वारसा पोहोचवणे, हे आपले कर्तव्य आहे. पिढ्यानुपिढ्या इतिहासाची ही सुवर्ण पृष्ठे, त्या काळातील वातावरण, त्या काळी आपल्या देशातील महापुरूषांनी केलेले बलिदान, कर्तव्य, सामर्थ्य हे सर्व काही येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हे सुद्धा प्रत्येक पिढीचे कर्तव्य असते.

जेव्हा ऑगस्ट क्रांती दिनाला २५ वर्षे पूर्ण झाली, ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देशातील सर्व लोकांनी त्या घटनांचे स्मरण केले होते. आज त्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि हा दिवस माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. म्हणूनच आज आम्हाला ही संधी मिळाल्याबद्दल मी अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात ९ ऑगस्टची चळवळ हे असे एक व्यापक आणि तीव्र आंदोलन होते, ज्याची कल्पनाही इंग्रजांनी केली नव्हती.

महात्मा गांधींसह अनेक ज्येष्ठ नेते तुरूंगात गेले होते. ही अशी वेळ होती, जेव्हा नवे नेतृत्व जन्माला आले. लाल बहादुर शास्‍त्री, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण अशा अनेक युवा नेत्यांनी नेतृत्वाची ती उणीव भरून काढली आणि चळवळ पुढे नेली. इतिहासातील या घटनांमधून आपल्या लोकांना नवी प्रेरणा, नवे सामर्थ्य, नवे संकल्प, नवी कृतीप्रवणता जागवण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे.

१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. १८५७ पासून १९४७ पर्यंत, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या आंदोलनाचे अनेक टप्पे पाहायला मिळाले, अनेकांनी बलिदान केले, अनेक चढ-उतार होत राहिले. या आंदोलनाला वेगवेगळ्या दिशा मिळाल्या. मात्र १९४७ पूर्वी १९४२ साली घडलेली घटना, ही व्यापक आंदोलनाची सुंरूवात होती, तो अंतिम व्यापक लोक संघर्ष होता. त्या लोक संघर्षाने जनतेला अंतिम लढ्यासाठी योग्य आणि अनुकुल शी संधी उपलब्ध करून दिली. जेव्हा आपण या आंदोलनाकडे त्रयस्थपणे पाहतो, तेव्हा लक्षात येते की १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातच देशाच्या कानाकोपऱ्यात १९४२ च्या लढ्यासाठीचे रणशींग फुंकले गेले होते. त्यानंतर महात्मा गांधीजी परदेशातून मायदेशी परतले, लोकमान्य टिळकांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे”, अशी सिंहगर्जना केली, १९३० साली गांधीजींनी दांडी यात्रा काढली, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि या सर्वांच्या बरोबरीने भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आजाद, चाफेकर बंधु अशा असंख्य वीरांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

या सर्व घटनांनी वातावरण निर्मिती केली आणि परिणामी १९४२ मध्ये संपूर्ण देशभरात अशी स्थिती निर्माण झाली की स्वातंत्र्य मिळवायचेच. आता नाही, तर कधीच नाही. सर्व देशवासियांच्या मनात हीच भावना रूजली आणि त्याचमुळे या आंदोलनात लहान-मोठे सर्वच सहभागी झाले. १९४२ च्या आंदोलनात देशाच्या कानाकोपऱ्यातील, प्रत्येक सामाजिक स्तरातील, प्रत्येक वर्गातील सर्व नागरिक हिरीरीने उतरले. गांधीजींच्या शब्दाखातर या सर्वांनी आपले पाऊल पुढे टाकले. हीच ती चळवळ होती, ज्यात निर्वाणीचा संदेश देण्यात आला, “भारत छोडो”. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा गांधीजींच्या संपूर्ण आंदोलन काळात, त्यांच्या आचार-विचारांविरूद्ध त्यांच्या चिंतन-मननाशी विपरित वाटणारी अशी ही घटना होती. या महापुरूषाने शब्द उच्चारले, “करेंगे या मरेंगे”. गांधीजींच्या मुखातून “करेंगे या मरेंगे”, हे शब्द बाहेर पडणं हा देशासाठी चमत्कार होता. त्याचमुळे गांधीजींनाही त्या वेळी सांगावे लागले की आजपासून आपल्यापैकी प्रत्येकाने स्वत:ला स्वतंत्र महिला आणि स्वतंत्र पुरूष समजावे आणि आपण स्वतंत्र आहोत, असे मानूनच आपले सर्व व्यवहार करावे. संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय इतर कशानेही माझे समाधान होणार नाही. आता करेंगे या मरेंगे, हेच खरे. हे बापूंचे शब्द होते आणि त्याचवेळी बापुंनी स्पष्ट केले होते की त्यांनी अहिंसेचा मार्ग सोडलेला नाही. मात्र तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, सर्वसामान्यांवर इतका ताण होता की त्यांचे नेतृत्व करणाऱ्या बापुंना जनसामान्यांच्या भावना व्यक्त करणारे शब्द उच्चारावेच लागले.

माझ्या आकलनाप्रमाणे त्या काळी समाजातील सर्व लोक त्या चळवळीत सहभागी झाले. गाव असो, शेतकरी असो, मजूर असो, शिक्षक असो, विद्यार्थी असो, प्रत्येक जण या आंदोलनात उतरले. करेंगे या मरेंगे, हीच भावना त्यांच्या मनात होती. बापुंनी तर इथवर सांगितले होते की इंग्रजांच्या हिंसेमुळे जर कोणी हुतात्मा होत असेल तर त्याच्या शरीरावर एका पट्टीवर “करेंगे या मरेंगे” तसेच “हा या स्वातंत्र्ययुद्धातील हुतात्मा आहे”, असे लिहिले जावे. बापुंनी हे आंदोलन इतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. आणि त्याची परिणती भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीत झाली. या मुक्तीसाठी देशाची तडफड सुरू होती. नेता असो वा सर्वसामान्य नागरिक, प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना सारखीच प्रखर होती. म्हणूनच मला असे वाटते की, जेव्हा अवघा देश उठून उभा राहतो आणि सामुहिकतेतून जी शक्ती निर्माण होते, ध्येय ठरलेले असते आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जेव्हा एका विचाराने भारलेले लोक निर्धाराने पुढे चालू लागतात, तेव्हा १९४२ ते १९४७ अशा अवघ्या पाच वर्षांच्या अवधीत पारतंत्र्याच्या साखळ्या गळून पडतात आणि भारतमाता स्वतंत्र होते. त्या काळी रामवृक्ष बेनीपुरी यांनी एक पुस्तक लिहिले होते, ‘जंजीर और दिवारे’. त्याचे वर्णन करतांना त्यांनी लिहिले होते, “संपूर्ण देशभरात एक अद्‌भूत वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक व्यक्ती नेता झाला असून प्रत्येक घराचा उंबरठा हा “करेंगे या मरेंगे” या आंदोलनाचा भाग झाला आहे. देशाने स्वत:ला क्रांतीच्या हवनकुंडात झोकून दिले. क्रांतीची ज्वाला देशभरात धडाडून पेटली होती. मुंबईने मार्ग दाखवला. येण्या-जाण्याचे सर्व मार्ग ठप्प झाले होते. सर्व कचेऱ्या ओसाड पडल्या होत्या. भारतीय नागरिकांचे शौर्य आणि ब्रिटीश सरकारच्या नृशंस वर्तणुकीच्या बातम्या येत होत्या. महात्मा गांधीजींचा “करेंगे या मरेंगे” या मंत्राचा सर्वांनीच ध्यास घेतला होता.”

तेव्हा देशात काय परिस्थिती असेल आहे हे पुस्तकातून त्या काळचे वर्णन वाचताना सहज लक्षात येते. या घटनाक्रमावरून एक घटनाक्रम लक्षात येतो की ब्रिटीशांचा वसाहतवाद भारतात सुरू झाला आणि त्याचा अंतही भारतातच झाला. भारताचे स्वतंत्र होणे हे केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते. १९४२ नंतर आशियामध्ये, आफ्रिकेमध्ये ज्या ज्या देशांमध्ये वसाहतवादाविरोधात ठिणगी पडली, त्यामागे भारताच्या लढ्यातून मिळालेली प्रेरणा होती. म्हणूनच भारताचे स्वातंत्र्य हे भारतापुरते मर्यादित नव्हते तर स्वातंत्र्याची लालसा जगातील सर्व देशांतील नागरिकांच्या मनात जागविण्यात भारतातील सर्वसामान्य जनतेचा संकल्प आणि कर्तृत्वाचा मोठा वाटा होता. प्रत्येक भारतीयाला याचा निश्चितच अभिमान वाटेल. एक गोष्ट आपण पाहिली आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर ठराविक क्रमाने वसाहतवादाला बळी पडलेले देश गुलामगिरीतून मुक्त झाले. भारताची इच्छाशक्ती हे प्रबळ इच्छाशक्तीचे एक उत्तम उदाहरण होते, हे यावरून सहज लक्षात येते. यावरून आपण शिकले पाहिजे की जेव्हा आपण एकदिलाने संकल्प करून संपूर्ण ताकतीनिशी आपले निर्धारित ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करू, तेव्हा आपण निश्चितच देशाला संकटातून बाहेर काढू शकतो, गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करू शकतो. नवे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशाला सज्ज करू शकतो. इतिहासाने हे सिद्ध केले आहे. त्या काळच्या त्या संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेताना आणि आदरणीय बापूंच्या व्यक्तीत्वाला जाणून घेताना राष्ट्रकवी सोहन लाल द्विवेदी यांची कविता अतिशय उत्तमरित्या व्यक्त होते. आपल्या कवितेत ते म्हणाले होते,

चल पड़े जिधर दो डग, मग में

चल पड़े कोटि पग उसी ओर

गड़ गई जिधर भी एक दृष्टि

गड़ गए कोटि दृग उसी ओर

अर्थात, ज्या दिशेला गांधीजी दोन पावले टाकत, त्या दिशेला आपोआप कोट्यवधी लोक चालू लागत. जिथे गांधीजी पाहत, तिथे कोट्यवधी लोक पाहू लागत. म्हणूनच गांधीजींचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने महान होते. आज २०१७ साली आपण या गोष्टीला नाकारू शकत नाही. आज आपल्याकडे गांधीजी नाहीत, आज आपल्याकडे तितकी उंची असणारे नेतृत्वही नाही. मात्र सव्वाशे कोटी नागरिकांवरच्या विश्वासासह आज जर आपण त्यांची स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न केला तर मला असे वाटते की गांधीजींची स्वप्ने, त्या सर्व हुतात्म्यांची स्वप्ने पूर्ण करणे हे फार कठीण काम नाही. आजचा दिवस हा त्यादृष्टीने पुढील पाऊल टाकण्यासाठी अनुकुल आहे. १९४२ साली जी जागतिक स्थिती होती, ती भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या दृष्टीने अनुकुल होती. ज्यांना इतिहासाची चांगली जाण आहे, त्यांना मी काय म्हणतो, ते योग्य प्रकारे समजत असेलच. आज २०१७ साली “भारत छोडो” चळवळीला ७५ वर्षे पूर्ण होत असताना, भारतासाठी तशीच अनुकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुकुल परिस्थितीचा लाभ आपण घेतला पाहिजे. त्या काळी अनेक देशांसाठी आपण प्रेरणास्थान झालो होतो, आता पुन्हा एकदा त्याच वळणावर आपण उभे आहोत. १९४७ आणि २०१७ या दोन्ही वर्षांवर दृष्टीक्षेप टाकला की लक्षात येते ते असे की या दोन्ही कालखंडात भारतासाठीच्या संधी समान पद्धतीने सामोऱ्या उभ्या ठाकतील. आता या परिस्थितीत आपण काय भूमिका घ्यावी, कोणती जबाबदारी स्वीकारावी, हे आपण ठरवायचे आहे. मला असे वाटते की इतिहासातील या अध्यायांतून प्रेरणा घेऊन आपण पक्षांपेक्षा देश मोठा असतो, हे मान्य केले पाहिजे. राजकारणापेक्षा राष्ट्रकारण जास्त महत्वाचे असते आणि माझ्यापेक्षा माझे सव्वाशे कोटी देशवासी जास्त महत्वाचे आहेत. जर ही भावना मनात बाळगून आपण सोबत पुढे पाऊल टाकले तर सर्व समस्यांवर आपण यशस्वीरित्या मात करू शकू, यात शंकाच नाही. आज आपल्या देशाला भ्रष्टाचाराची कीड पोखरत आहे, याची आपणा सर्वांना जाणीव आहे. भ्रष्टाचार, मग तो राजकीय असो, सामाजिक असो किंवा व्यक्तिगत असो. काल काय झाले आणि कोणी केले, असे वाद अनेकदा होतात. मात्र आजच्या पवित्र क्षणी, आपण येणाऱ्या काळात प्रामाणिकपणाचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार करू शकतो, प्रामाणिकपणाचा संकल्प मनाशी बाळगून देशाचे नेतृत्व करू शकतो. ही काळाची गरज आहे. देशातील सर्वसामान्य माणसाची गरज आहे. गरीबी, कुपोषण, निरक्षरता ही केवळ सरकारसमोरची आव्हाने नाहीत, ही देशासमोरची आव्हाने आहेत. देशातील गरीबांसमोर आज अनेक समस्या उभ्या आहेत आणि म्हणूनच देशासाठी प्राण पणाला लावू इच्छिणाऱ्या आणि देशासाठी संकल्प करणाऱ्या लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी देशाला पुढे घेऊन जाताना सर्वांना सोबत घ्यावे. १९४२ च्या चळवळीत उतरलेले लोकही वेगवेगळ्या विचारांचे होते. सुभाष बाबूंचे विचार वेगळे होते. मात्र १९४२ च्या आंदोलनात सर्वांनी एका सुरात सांगितले की महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली “भारत छोडो”, हीच आमची मागणी आहे, हाच आमचा मार्ग आहे. आम्ही वेगवेगळ्या विचारांच्या मुशीतून घडले असू. मात्र काही समस्यांमधून देशाला बाहेर काढण्यासाठी या संकल्पाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहोत. गरीबी असो, उपासमार असो किंवा निरक्षरता असो. महात्मा गांधीजींचे ग्राम स्वराज्याचे स्वप्नं किती दूर गेले आहे. लोक गावे सोडून शहरात वस्ती करण्यासाठी गर्दी करत आहेत. ही जी समस्या आहे, तीचे निराकरण करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या कल्पनेतील गाव साकारणे हा पर्याय असू शकतो. आजही आपण या कल्पनेवर काम करू शकतो. या गावांमधील गरीब शेतकरी, दलीत, शोषित, वंचितांचे आयुष्य मार्गी लावण्यासाठी आपण काही करू शकत असू, तर ते आपण केले पाहिजे. हा प्रश्न माझा किंवा तुझा नाही, हा आपला सर्वांचा प्रश्न आहे, हा सव्वाशे कोटी भारतीयांचा प्रश्न आहे, सव्वाशे कोटी भारतीयांच्या लोकप्रतिनिधींचा हा प्रश्न आहे. हीच खरी वेळ असते, जेव्हा ती प्रेरणा आपल्याला बरेच काही साध्य करण्याची शक्ती देते आणि त्या प्रेरणेसह आपण आगेकूच करू शकतो. देशात फार पूर्वी कधीतरी कळत-नकळत अधिकाराची भावना प्रबळ होत गेली आणि कर्तव्य भावनेचा लोकांना विसर पडत गेला. राष्ट्र जीवनात, समाज जीवनात अधिकाराचे महत्व अबाधित असले तरी कर्तव्याची भावना उणावली तर समाज जीवनात अनेक समस्या उद्‌भवतात. दुर्दैवाने आपल्या रोजच्या जगण्यात अनेक अनिष्ट बाबींचा शिरकाव झाला आहे आणि त्याबद्दल आपल्याला फारसे वाईटही वाटत नाही. आपले काही चुकते आहे, याची जाणीवही होत नाही. चौकात सिग्नलचा लाल दिवा पेटला असतानाही मी माझी गाडी सहज पुढे घेऊन जातो आणि मी नियमाचा भंग करीत असल्याची जाणीवही मला होत नाही. कुठेही थुंकायचे, कचरा टाकायचा आणि हे करताना आपले त्यात काही चुकते आहे, याची जाणीवही मला होत नाही. आपल्या स्वत:च्याही नकळत अशा प्रकारे चुकीचे वागणे हा आपला स्वभाव होऊ लागला आहे. लहान सहान बाबीत आपण हिंसक प्रतिक्रीया देऊ लागलो आहोत. रूग्णालयात रूग्णाच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर डॉक्टर जबाबदार आहे की रूग्णालय दोषी आहे की इतर कोणाचा दोष आहे, हे लक्षात न घेताच रूग्णाचे नातेवाईक डॉक्टरला मारहाण करू लागतात, रूग्णालय पेटवून देतात. कुठे रस्ते अपघात झाला तर गाडी जाळून टाकतात, वाहनचालकाला मारहाण करतात. या सर्व घटना म्हणजे नागरिकांनी कायदा हातात घेण्याचे प्रकार आहेत. कायद्याचे पालन करणारे सुज्ञ नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे. आपल्या रोजच्या जगण्यात आपण अशा अनेक अनिष्ट बाबींना स्थान दिले आहे आणि त्यात आपले काही चुकते आहे, याची जाणीवही आपल्याला होत नाही. अशा वेळी हे दोष दूर करून समाजमनात कर्तव्य भावना जागवणे, ही आपली जबाबदारी असते, नेतृत्वाची जबाबदारी असते.

शौचालयांची स्वच्छता हा थट्टा-मस्करीचा विषय नाही. शौचालय उबलब्ध नसते तेव्हा रात्री अंधार पडण्याची वाट बघत ज्यांना दिवस ढकलावा लागत असेल, त्या माता-भगिनींचा जरा विचार करा. म्हणूनच शौचालये तयार करणे आणि त्यांचा वापर करणे, यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शौचालयांचा वापर करायला शिकवणे अत्यावश्यक आहे, ही भावना जनमानसात रूजविण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ कायदा करणे पुरेसे नाही. कायदा मदत करू शकतो, मात्र कर्तव्य भावना मनात असेल तर ते काम अधिक चांगले होते, प्रभावी होते. म्हणूनच आपल्याला हे काम करावे लागेल. आपल्या देशातील माता-भगिनींसाठी तरी आपल्याला यासाठी प्रयत्न करावे लागतील.

देशाला ज्या वर्गाचे किमान ओझे बाळगावे लागते, असा वर्ग म्हणजे देशातील माता, भगिनी आणि महिला. त्यांचे सामर्थ्य आम्हाला मोठी ताकत देते, त्यांच्या भागिदारीतून आपल्या विकासाला बळ मिळते. स्वातंत्र्यलढ्यावर फक्त एक दृष्टीक्षेप टाका. महात्मा गांधीजींनी ज्या-ज्या ठिकाणी आंदोलने उभारली. त्या सर्व ठिकाणी आमच्या माता-भगिनींनी नेतृत्व केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही आमच्या या माता-भगिनींचा सारखाच सहभाग होता. आजही राष्ट्र जीवनात त्यांचे समान योगदान दिसून येते. त्यांच्या सोई-सुविधांकडेही आपण पुरेसे लक्ष दिले पाहिजे.

१८५७ पासून १९४२ पर्यंत देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे वेगवेगळे टप्पे होते, हे आपण पाहिले. या आंदोलनकाळात अनेक चढ-उतार आले, नवनवी नेतृत्वे आली, कधी क्रांतीचा पक्ष वरचढ ठरला तर कधी अहिंसेच्या पक्षाने बाजी मारली. काही वेळा दोन्ही विचारप्रवाहांमध्ये मतभेद झाले तर काही वेळा दोघांमध्ये सलोखा निर्माण झाला. मात्र १८५७ पासून १९४२ पर्यंतचा कालखंड हा चढत्या भाजणीचा होता, हे लक्षात येते. तो हळू-हळू व्यापक होत होता, विस्तारत होता, हळूहळू लोक त्यात सहभागी होत होते. मात्र १९४२ ते १९४७ पर्यंतचा कालखंड अधिक वेगवान होता. ते एक वेगळेच भारावलेले वातावरण होते आणि त्याने इतर सर्व बाबी बाजूला सारून भारत स्वतंत्र करण्यास इंग्रजांना भाग पाडले, त्यांना हा देश सोडून जाण्यास भाग पाडले. १८५७ ते १९४२ पर्यंतच्या काळात हळूहळू क्रांती रूजत गेली मात्र १९४२ ते १९४७ चा कालखंड वेगळा होता.

आपण सामाजिक आयुष्याचा गेल्या १००-२०० वर्षांचा इतिहास लक्षात घेतला तर विकासाचा प्रवासही असाच संथ गतीने होत आला आहे. हळूहळू जग पुढे चालले होते, हळूहळू जग आपल्यालाही बदलवत होते. मात्र गेल्या ३०-४० वर्षात हे चित्र फार चटकन बदलून गेले आहे. यात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे. गेल्या ३०-४० वर्षांमध्ये जगात जे वेगवान बदल झाले आहेत, त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. मानवी आयुष्यात, विचारांमध्ये इतके मोठे बदल होतील, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. अत्यंत वेगवान घडामोडींनी भारलेले सकारात्मक बदल आपण सध्या अनुभवतो आहोत.

ज्याप्रमाणे आपण हळूहळू होणाऱ्या बदलांच्या टप्प्यातून बाहेर पडून एका विशिष्ट अवधीत फार मोठी झेप घेतली त्याचप्रमाणे २०२२ साली, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत आपल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांनी आपल्या भारतासाठी जी स्वप्ने पाहिली होती, ती साकार करण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करू. त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू. आजपासून पाच वर्षांचा अवधी आपल्यासमोर आहे. १९४२ ते १९४७ प्रमाणेच २०१७ ते २०२२ हा असा संक्रमणाचा काळ असेल, ज्यात एका विशिष्ट ध्येयाच्या पूर्तीसाठी आपण आगेकूच करू. आपल्या संकल्पासह पुढची वाटचाल करू. ज्याप्रमाणे १९४२ च्या आपल्या आंदोलनाने अनेक देशांना प्रेरणा दिली, स्वातंत्र्य प्राप्तीची लालसा त्यांच्या मनात जागवली, त्याचप्रमाणे आजही असे अनेक देश नव्या प्रेरणेसाठी भारताकडे अपेक्षेने पाहत आहेत. २०१७ ते २०२२ या जबाबदारीच्या काळात आपण भारताला प्रगतीच्या एका नव्या उंचीवर घेऊन गेलो तर नेतृत्वासाठी अपेक्षेने पाहणाऱ्या मोठ्या समुदायाला आपण एक नवी प्रेरणा देऊ शकू. जे नेतृत्वासाठी, प्रेरणेसाठी, इतरांच्या अनुभवांवरून शिकून पुढे जाण्यासाठी उत्सुक आहेत, अशा सर्वांची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारत सर्वतोपरी सक्षम आहे. आपण या कामी हातभार लावला तर ती फार मोठी देशसेवा होईल, असे मला वाटते. म्हणूनच सामुहिक इच्छाशक्ती जागृत करणे, संपूर्ण देशाला संकल्पबद्ध करणे, देशातील सर्वांना सोबत घेऊन पुढची वाटचाल करणे गरजेचे आहे. या पाच वर्षांच्या अवधीत जर अशा प्रकारे आपण वाटचाल करत राहिलो तर काही मुद्द्यांबाबत सहमती मिळवून आपण फार मोठे काम पार पाडू शकू.

आताच आपण वस्तु आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे उदाहरण पाहिले. मी वारंवार सांगतो की हे माझे राजकीय वक्तव्य नाही तर हे माझे वैयक्तिक मत आहे. जीएसटीचे यश हे एका सरकारचे यश नाही, जीएसटीचे यश हे एका पक्षाचे यश नाही. जीएसटीचे यश हे या सदनात बसलेल्या सदस्यांच्या इच्छाशक्तीचे यश आहे. ते येथे बसले असोत, वा नसोत. हे सर्वांचे यश आहे. राज्यांचे आहे, देशातील सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे आहे आणि त्याचमुळे हे शक्य झाले आहे. देशाचे राजकीय नेतृत्व आपल्या वचनबद्धतेची बूज राखत इतके मोठे काम करते, ही जगासाठी आश्चर्याची बाब आहे. जीएसटी हा जगासाठी फार मोठा चमत्कार आहे. त्याचे परिमाण लावून बघायचे झाले तर देश हे करू शकत असेल तर सर्वच निर्णय आपण एकत्र बोलून, चर्चा करून घेऊ शकतो. सव्वाशे कोटी देशवासीयांचे प्रतिनिधी म्हणून, सव्वाशे कोटी भारतीयांना सोबत घेऊन २०२२ पर्यंत ध्येय साध्य करण्याच्या संकल्पासह आपण वाटचाल सुरू केली तर आपण आपला इच्छित परिणाम निश्चितच साध्य करू शकू, असा विश्वास मला वाटतो.

“करेंगे या मरेंगे”, अशी घोषणा महात्मा गांधीजींनी केली होती. आज २०१७ ते २०२२ या काळात भारत कसा असावा, याचा संकल्प करून आपल्याला पुढे जायचे आहे. या संकल्पासह आपण पुढे पाऊल टाकले तर आपण सर्व मिळून देशातील भ्रष्टाचार नक्कीच संपवू शकू. आपण सर्व गरीबांना त्यांचे अधिकार मिळवून देऊ शकू. आपण सर्व मिळून युवकांना रोजगार मिळवून देऊ शकू, आपण सर्व मिळून देशातील कुपोषणाचा प्रश्न निकाली काढू शकू. आपण सर्व मिळून महिलांना पुढे जाण्यापासून, प्रगती करण्यापासून रोखणाऱ्या बेड्या तोडून टाकू शकू. आपण सर्व मिळून देशातील निरक्षरता दूर करू. असे अनेक विषय आहेत. करेंगे या मरेंगे, हा त्या काळातील मंत्र होता. आज देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ व्या वर्षाकडे वाटचाल करताना देशाला समस्यांमधून बाहेर काढण्याचा संकल्प आपण करून आपण पुढे पाऊल टाकू. हा संकल्प कोणत्याही एका पक्षाचा नाही, हा संकल्प कोणा एका सरकारचा नाही, हा संकल्प सव्वाशे कोटी भारतीयांचा आहे, त्यांच्या लोकप्रतिनिधींचा आहे. असे सर्व मिळून जेव्हा संकल्प करतील तेव्हा या संकल्पापासून तो सिद्धीला जाईपर्यंतचा प्रवास निर्धोक होईल, असा विश्वास मला वाटतो. २०१७ ते २०२२ पर्यंतचा हा काळ, आपल्याला स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास मला वाटतो. आज ऑगस्ट क्रांती दिनी, त्या महापुरूषांचे स्मरण करीत, त्यांचे आशिर्वाद घेत आपण सर्व एकत्र येऊन काही बाबतीत सहमती जुळवून देशाचे नेतृत्व करू या, देशाला समस्यांमधून बाहेर काढू या. स्वप्ने, सामर्थ्यं, शक्ती आणि ध्येयपूर्तीच्या इच्छेने पुढे जाऊ या. आदरणीय अध्यक्ष महोदया, याच एकमेव अपेक्षेसह मी आपले आभार मानतो आणि सर्व स्वातंत्र्ययोद्ध्यांना अभिवादन करतो.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.