पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत- मध्य आशिया शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीचे यजमानपद भूषवणार असून यामध्ये कझाकिस्तान, किरगीझ रिपब्लिक, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. 27 जानेवारी 2022 ला होणारी ही बैठक दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. भारत आणि मध्य आशियाई देशांचे नेते या स्तरावर अशा प्रकारची पहिलीच बैठक होत आहे.
पहिली भारत- मध्य आशिया शिखर परिषद म्हणजे भारताच्या ‘विस्तारित शेजार’ या धोरणा अंतर्गत, मध्य आशियाई देशांसमवेत वाढत्या संबंधांचे हे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये मध्य आशियाई देशांना ऐतिहासिक भेट दिली होती. त्यानंतर द्विपक्षीय आणि बहु पक्षीय मंचावर उच्च स्तरीय आदान- प्रदान झाले होते.
भारत-मध्य आशिया संवादाची परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर सुरवात झाली, ज्याची तिसरी बैठक 18- 20 डिसेंबर 2021 या काळात नवी दिल्लीत झाली. या बैठकीने भारत-मध्य आशिया संबंधाना प्रोत्साहन दिले. नवी दिल्लीत 10 नोव्हेंबर 2021 ला अफगाणीस्तान संदर्भात आयोजित प्रादेशिक सुरक्षा चर्चेत मध्य आशियाई देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदांच्या सचिवांनी भाग घेतला. या बैठकीत अफगाणीस्तान संदर्भात एक सर्वसंमत प्रादेशिक दृष्टीकोन आखण्यात आला.
पहिल्या भारत-मध्य आशिया शिखर परिषदेत, भारत-मध्य आशिया संबंध नव्या शिखरावर नेण्याच्या दृष्टीने उचलाव्या लागणाऱ्या आवश्यक पावलांविषयी हे नेते चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. प्रादेशिक सुरक्षा स्थितीसह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही हे नेते विचारांचे आदान-प्रदान करतील असा कयास आहे.
व्यापक आणि स्थायी भारत-मध्य आशिया भागीदारीला, भारत आणि मध्य आशियाई देशातले नेते देत असलेले महत्व या परिषदेतून प्रतीत होत आहे.