आज 24 ऑगस्ट, म्हणजे संस्थेचा स्थापना दिवस’ आपण मोठ्या अभिमानाने साजरा करीत आहात. ‘‘बायफ‘‘ ची राष्ट्रनिर्माणासाठी जी भूमिका आहे, त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. आपल्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या आनंदामध्ये सहभागी राहणे व्यक्तिगत माझ्यासाठी जास्त सुखद ठरणारी गोष्ट होती. आपले अनुभव जाणून घेता आले असते, आपल्याकडून काही नवीन शिकता आले असते.
काही वर्षांपूर्वी ‘‘वाडी‘‘कार्यक्रम सुरू झाला होता, याविषयी मला आठवतेय. नवसारी आणि वलसाड या भागामध्ये आपण केलेले कार्य मी खूप जवळून पाहिले आहे. आणि यामुळेच ‘बायफ‘बरोबर मी स्वतः भावनिकरुपाने जोडला गेलो आहे. बायफविषयी माझ्या मनात एक आपुलकीची भावना आहे. हा एक संस्थेसाठी आनंदाचा भाग आहे.
आज या कार्यक्रमामध्ये अनेक पुरस्कार दिले गेले. गौरव प्राप्तकर्त्यांमध्ये काही स्वमदत समुहांचाही समावेश आहे. काहीजणांनी व्यक्तिगत पातळीवर केलेल्या कार्याला पुरस्कार मिळाला आहे. कोणी कर्नाटकचा आहे, कोणी गुजरातचा आहे, कोणी महाराष्ट्राचा आहे, कोणी झारखंडचा आहे. मी या सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि ते यापुढेही असेच समाजहितासाठी कार्यरत राहतील, अशी आशा व्यक्त करतो.
सहकार्यांनो, यावर्षी साबरमती आश्रमाच्या स्थापनेला 100 वर्ष आणि चंपारण सत्याग्रहाला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या इतिहासामध्ये हे तीनही टप्पे स्वातंत्र्य आंदोलनाला नवी दिशा देणारे ठरले होते. जनतेच्या भागीदारीतून एखादा संकल्प कशा पद्धतीने सिद्धीस जाऊ शकतो, त्याचे हे प्रतीक आहे.
जनतेच्या भागीदारीमधून जनतेच्या कल्याणाची दूरदृष्टी ठेवणे हा भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठानचा पाया, आधार आहे. या संस्थेला 50 वर्षे भले आत्ता पूर्ण झाली असतील, परंतु या संस्थेचा खरा पाया तर मणिभाईयांनी1946 मध्ये गांधीजींच्याबरोबर उरळी कांचन या गावी पोहोचले होते, त्याचवेळी घातला गेला होता. गांधीजींच्या प्रेरणेने मणिभाईंनी या संपूर्ण क्षेत्राचा कायाकल्प करण्याचा संकल्प केला होता. आणि त्याचा प्रारंभ गुजरातमधून गीर गाईंना येथे आणून केला होता.
आपल्या गावांमध्ये उपलब्ध असलेले परंपरागत ज्ञान आणि विज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतकरी बंधुंच्या उत्पन्नामध्ये कशी वाढ होते, हे आपल्या संस्थेने दाखवून दिले आहे.
सहकाऱ्यांनो,देशाच्या संतुलित विकासाठी देशाच्या गावांमध्ये वास्तव्य करीत असलेला शेतकरी वर्ग सशक्त होणे आवश्यक आहे. एका सशक्त शेतकऱ्या शिवाय नवभारताचे स्वप्न साकार होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच सरकार2022 पर्यंत शेतकरी बंधूंचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी काम करीत आहे. म्हणूनच आता कृषी योजनांविषयीचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांना उत्पादन केंद्रीत ठेवण्याबरोबरच उत्पन्न केंद्रीतही बनवण्यात आले आहे.
आज सरकार बियाणांपासून ते बाजारापर्यंत शेतकरी बंधूंच्या पाठीशी आहे. पाण्याचा एका एका थेंबाचा वापर कसा केला जाईल, यावर भर देण्यात येत आहे. सेंद्रीय शेती आणि पिके घेताना वैविध्य राखणे याला प्राधान्य दिले जात आहे. शेतकरी बंधूंना मातीच्या आरोग्याविषयी योग्य माहिती मिळावी यासाठी आत्तापर्यंत 9 कोटींपेक्षा जास्त मृदा आरोग्य पत्रिका देण्यात आल्या आहेत.
‘ई-नाम‘च्या माध्यमातून देशभरातल्या 500 पेक्षा जास्त कृषी मंडई ऑनलाईन जोडण्याचे काम सुरू आहे. अगदी अलिकडेच ‘प्रधानमंत्री कृषी संपदा योजना‘ सुरू करण्यात आली आहे. हे सगळे करण्यामागे उद्देश आहे, तो देशाची अन्नधान्याची समस्या संपुष्टात आणण्याचा आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा आहे.
एखादेवेळेस जर काही संकट ओढवले, आणि शेतकरी बांधवाचे पीक वाया गेले तर त्या शेतकरी बांधवाच्या आयुष्यावरच संकट येवू नये म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून त्याचे भविष्य सुरक्षित केले जाते. शेतकरी बांधवांना सावकारांच्या व्याजदराच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी सर्वात कमी व्याजदराने कर्ज दिले जात आहे.
आपल्या लक्षात येईल की, सरकारने इतक्या उपाय योजना केल्या आहेत ते केवळ शेतकरी बंधू शेतीशी संबंधित चिंतेतून मुक्त व्हावा, त्याचा खर्च कमी व्हावा आणि त्याचे उत्पन्न वाढावे म्हणून ! जर देशाचा अन्नदाता चिंतामुक्त असेल, तर देशही विकासाची नवी उंची प्राप्त करू शकणार आहे.
‘बायफ‘ अतिशय सेवाभावीपणाने गेले अनेक वर्षे हे कार्य करीत आहे. परंतु आज मी आपल्यामध्ये काही नवीन विचारांचे बीजारोपण करू इच्छित आहे. हे काही एखाद्या तज्ञाला मत सांगणे किंवा ज्ञान देणे नाही तर एका तज्ञाला आग्रह करण्यासारखे आहे.
महिला स्वमदत समुहाच्या माध्यमातून ‘बायफ‘ कशा पद्धतीने लाखो महिलांना सक्षम बनवत आहे, हे मला चांगले माहीत आहे. मग हेच काम आणखी जास्त चांगले लक्ष केंद्रीत करून करता येऊ शकेल.
एका अहवालानुसार देशात पशुपालन क्षेत्रामध्ये जवळपास 70 टक्के महिला कार्यरत आहेत. मग जनावरांना लागत असलेल्या चाÚयाचा बंदोबस्त करायचा असो की पाण्याची व्यवस्था करायची असो, औषधे- दूध अशी सगळी कामे प्रामुख्याने महिलाच करत आहेत.
याचा अर्थ एका दृष्टीने देशाचे पशुपालन क्षेत्र संपूर्णपणे महिलांच्या कौशल्यावर टिकून आहे. आणि म्हणूनच आज महिलांच्या स्वमदत समुहांनापशू वैद्यकीय शिक्षण देण्याची खूप आवश्यकता आहे. संशोधन, सेवा पद्धतीविषयी विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जितक्या जास्त महिला या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित होतील, तितकेच देशाचे पशुधन अधिक सक्षम होईल आणि या महिलांचेही भले होईल.
‘‘बायफ‘‘ सारखी संस्था जास्तीत जास्त महिलांना यासाठी प्रोत्साहन देवू शकते. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम सुरू करू शकते.
सहकारींनो, आपल्या देशामध्ये दरवर्षी जवळपास 40हजार कोटी रुपयांचे नुकसान पशुंना होत असलेल्या आजारांमुळे होते. यावर उपाय म्हणून काही राज्यांनी पशु आरोग्य मेळावे भरविण्यास प्रारंभ केल आहे. या मेळाव्यांमध्ये जनावरांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यापासून ते त्यांच्या दातांची सफाई करण्यापर्यंतची कामे केली जातात. परंतु अशा प्रकारचे मेळाव्यांची संख्या आणखी खूप वाढण्याची आवश्यकता आहे. ‘‘बायफ‘‘सारख्या संस्था देशभरामध्ये राज्य सरकारच्या मदतीने पशु आरोग्य मेळावे भरवण्याच्या कामात खूप मोठी भूमिका पार पाडू शकते.
यासाठी आपल्याला मी विशेष आग्रह करतो, याला कारण म्हणजे आपली संस्था पहिल्यापासूनच 15 राज्यांमध्ये काम करीत आहे. आणि आपल्याकडे संपूर्ण देशात विस्तार करण्याइतकी क्षमता आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्ये, त्यांना मी अष्टलक्ष्मी असे संबोधतो. या राज्यांमध्ये सेंद्रीय शेती करण्यासाठी खूप संधी आहेत. त्यांना आपल्या अनुभवाचा खूप चांगला लाभ मिळू शकतो.
अगदी याचप्रमाणे औषधी आणि सुवासिकवनस्पतीची शेती याविषयीही शेतकरी बंधूंमध्ये जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशामध्ये औषधी आणि सुंगधित वनस्पतींच्या हजारो जाती आहेत. संपूर्ण दुनियेमध्ये त्यांना भरपूर मागणी आहे. परंतु मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये खूप मोठे अंतर आहे. सरकार, प्रगतीशील शेतकरी आणि बायफसारख्या संघटना मिळून अशा प्रकारच्या शेतीची पुरवठा साखळी कशी काम करते याची माहिती देण्याचे काम अतिशय सक्षमतेने करू शकतात.
सहकार्यांनो, हरित क्रांती आणि धवल क्रांती याविषयी देशाला सगळे माहीत आहे. आताचा काळाची गरज आहे ती नील क्रांती घडवून आणण्याची. त्याव्दारे आमच्या कोळी बांधवांच्या जीवनात परिवर्तन येवू शकणार आहे. मधूर क्रांती, म्हणजे मधुमक्षिका पालन आणि मध उत्पादनातून शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवता येणार आहे.
हरित क्रांती, धवल क्रांती च्या जोडीन आता आपण नील क्रांती, मधूर क्रांती, आणि जल क्रांतीला जोडण्याचे काम आम्ही करीत आहोत.
शेतामध्ये फक्त गहू, धान, आणि मोहरी पिकवावे असे नाही. परंपरागत शेतीबरोबरच शेतीशी संलग्न असणारे जोडधंद्यांवरही लक्ष दिले तर तितकेच शेतकरी बांधवाचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळणार आहे. एका संशोधनानुसार परंपरागत शेती करणारा शेतकरी 50 मधमाशी वसाहतीचे एक छोटा उद्योग करू लागला तर तो वर्षभरामध्ये दोन लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न कमावू शकतो. मधमाशा मध उत्पादन करतातच त्याचबरोबर परागीभवनामध्येही त्या खूप मोठी भूमिका पार पाडतात.
मधमाशा पालन असेल, मत्सपालन असेल, उसाच्या चिपाडापासून इथेनॉलचे उत्पादन असेल, यांच्यामुळे आज समाजात असलेली मागणी पूर्ण होते. आणि म्हणूनच परंपरागत शेती करीत असलेल्या शेतकरी बांधवांनी अशा उप-क्षेत्राविषयी जागरूक झाले पाहिजे, काम केले पाहिजे. त्यांना मदत करण्याचे काम ‘‘बायफ‘‘ खूप चांगले करू शकते.
सहकारींनो, महाराष्ट्राचा विदर्भ असो, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, आंध्र प्रदेशाचा काही भाग असो, उत्तर प्रदेशातला बुंदेलखंड असो, या काही क्षेत्रांमध्ये शेतकरी बांधवांना पाण्याचा प्रश्न भेडसावतो. दुष्काळाशी सामना करावा लागतो.
सरकारच्यावतीने हा दुष्काळाचा प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत दीर्घकाळ रखडलेले 99 प्रकल्प पूर्ण केले जात आहेत. यापैकी 21 प्रकल्प यावर्षी पूर्ण झाले आहेत. याच्याच बरोबर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा चांगल्या पद्धतीने वापर केला जावा, यावर भर दिला जात आहे. ठिबक सिंचन,सूक्ष्म सिंचन आणि पिकांमध्ये वैविध्य आणण्याचे माध्यमही यासाठी वापरले जात आहे. ‘मनरेगा‘चा 60 टक्के निधी सरकार जल संरक्षण आणि जल व्यवस्थापन यासाठी खर्च करत आहे.
परंतु बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत आपले शेतकरी या प्रयत्नांमध्ये सहभागी होत नाहीत, जोडले जात नाहीत, तोपर्यंत त्यांना यश येणार नाही. आज या कार्यक्रमामध्ये हिवरे बाजार येथून श्री. पोपटराव पवार आले आहेत, असे मला सांगण्यात आले आहे. हिवरे बाजार एक खूप चांगले उदाहरण आहे. एकसाथ मिळून, एक-दुस-याचे हित ध्यानात घेवून आपण कशा पद्धतीने पाण्याचा योग्य वापर करू शकतो, ज्यायोगे आपली पाणी वापराची क्षमता वाढू शकते आणि आपल्या जमिनीतील जलस्त्रोताचा शाश्वत पद्धतीने वापर होवू शकेल. मला ‘‘बायफ‘‘विषयी आशा आहे की, ते ज्या गावांमध्ये काम करत आहेत, तिथे ‘‘जन-आंदोलन आणि जल-आंदोलन‘‘ यांचे एक आदर्श उदाहरण तयार करतील.
याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि बॅंकांकडून कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तर शेतकरी बांधवांचे आयुष्य सोपे बनण्यासाठी आपण मदत करू शकणार आहात.
बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेमध्ये लिहिले आहे-
‘‘ग्रामसुधारणेचा मूलमंत्र, सज्जनांनी व्हावे एकत्र !
संघटन हेची शक्तीचे सूत्र, ग्रामराज्य निर्माण करी‘‘!!
याचा अर्थ गाव सुधारण्याचा मूलमंत्र हा आहे की, सगळ्या लोकांनी एकजूट होवून, संघटन शक्ती वापरून एकसाथ काम करावे. तरच ग्राम -राज्याचे निर्माण होणार आहे. हाच मंत्र महात्मा गांधी यांनी दिला होता. याचेच पालन मणिभाई देसाई यांनी केले. आज आपल्या संस्थेच्या संघटन शक्तीमुळेगावाच्या विकासाचे नवे व्दार उघडणार आहे. आज आपण आपल्या गावांविषयी गर्व, अभिमान करण्याची आवश्यकता आहे. गावातल्या लोकांनी स्थापना दिवस साजरा करावा, एक दृष्टिकोन बनवावा, त्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी वाटचाल करावी. आपण ज्या 80 हजार गावांमध्ये काम करीत आहात, त्या गावांनी एक विशिष्ट दृष्टिकोन समोर ठेवून पुढे जाण्यासाठी नेतृत्व करावे. हेच नवभारताच्या निर्माणाचे एक माध्यम बनेल.
सहकारींनो, शेती व्यवसाय कमी खर्चात कसा करता येईल, यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. आज मृदा आरोग्य व्यवस्थापनामुळे, मृदा आरोग्य पत्रिकेमुळे युरियाला कडुलिंबाचे आवरण केल्यामुळे ठिबक सिंचनाला प्रोत्साहन दिल्यामुळे शेतीवर होणारा शेतकरी बांधवांचा खर्च कमी झाला आहे. सौरपंपाचा जास्तीत जास्त वापर करून शेतकरी वर्ग डिझेलवर होणार खर्च वाचवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पीक उत्पादनही वाढले आहे. या विषयामध्ये ‘‘बायफ‘‘ खूप अनुभवी आहे, आणि म्हणूनच शेतीसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी आणखी काय काय करता येवू शकते, याविषयी आपण जर काही शिफारसी केल्या तर त्याचे नेहमीच स्वागत आहे. आपण या मोहिमेमध्ये जितक्या जास्त संख्येने शेतकरी बांधवांना सहभागी करून घ्याल, तितक्या शेतक-यांची बचत होणार आहे आणि त्यांचा नफा वाढणार आहे.
सहकारी बंधूंनो, टाकाऊतून संपत्ती हा विषयही असाच आहे. आजच्या आवश्यकता आणि भविष्यातील आव्हानांशी हा प्रश्न जोडला गेला आहे.
कृषी कच-याचा फेरवापर करण्याचे काम आहे. कंपोस्ट खत बनवण्याचे काम असो, यातूनही शेतकरी बांधवाचे उत्पन्न वाढू शकते आणि त्याचा संपूर्ण गावाल लाभ मिळू शकतो.
आज शेतामधली कोणतीही गोष्ट टाकावू नसते. प्रत्येक गोष्टीचा वापर होवू शकतो. त्यातून संपत्ती बनू शकते.
याप्रमाणे गावांमध्ये सौर ऊर्जेला प्रोत्साहन देवून, संपूर्ण गावाला विजेच्याबाबतीत स्वावलंबी बनवता येवू शकते.
शेतांच्या कडेला, बांधावर भरपूर मोकळी जागा असते. भागात सौर ऊर्जेचे संच बसवून विजेच्या निर्मितीसाठी शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देता येईल. ज्याप्रमाणे देशभरामध्ये दुधाच्या सहकारी संस्था आहेत, त्याचप्रमाणे सौर सहकारी संस्था बनवून विजेचे उत्पादन करता येवू शकते. ती वीज विकता येवू शकते.
सहकारी मंडळींनो, आज आपण पाहतो, सगळीकडे अगदी गावांमध्येही जवळपास सगळ्या घरांवर एक छोटी छत्री दिसते. हे तर डिजिटल तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाने सगळे काही सोपे करून टाकले आहे. प्रारंभी एक- दोन वाहिन्या दिसत होत्या. आता शंभर, दोनशे वाहिन्या दिसतात. रिमोट काही आता वापरायला खूप अवघड यंत्र राहिलेले नाही. अगदी दोन-तीन वर्षाचा बालकही रिमोटने वाहिन्या बदलू शकतो.
नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारले तर देशात डिजिटल गावाची कल्पना साकार होवू शकणार आहे. या गावामध्ये पैशाच्या देवघेवीचे बहुतांश व्यवहार डिजिटल माध्यमातून व्हावी, कर्जापासून ते शिष्यवृत्तीपर्यंत सगळे अर्ज ऑनलाइन भरले जावेत, शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकवले जावे, आरोग्य सेवाही डिजिटल तंत्रज्ञानाने जोडलेली असावी.
डिजिटल गावाची ही संकल्पना साकार करण्यासाठी सरकार देशातल्या प्रत्येक पंचायतीला ऑप्टिकल फायबरने जोडत आहे. परंतु साधने आणि संसाधने जोडून चालणार नाही. त्या साधन सामुग्रीचा वापर करण्यासाठी लोकांना समर्थ, सक्षम बनवण्याचे काम आपल्यासारख्या संस्थाच करू शकतात. यासाठी आपली संस्था संकल्प करेल काय? दरवर्षी कमीत कमी500 गावांना ‘‘कमीतकमी रोखीने व्यवहार करणारे गाव‘‘ बनवण्याचा संकल्प आपल्या संस्थेने करावा. एकदा का 500गावे कमीतकमी रोखीने व्यवहार करणारी बनली की, आजूबाजूची एक-दोन हजार गावे तर आपोआपच रोखीने व्यवहार करणे कमी करतील. क्रिया-प्रतिक्रिया यातून एक साखळी बनेल आणि एकाबरोबरच आसपासची सगळी गावे डिजिटल व्यवहार जास्त करू लागतील. सहकारींनो, गांधीजींचा मंत्र गावांना सशक्त, सक्षम करूनच देशाला मजबूत बनवण्याचा होता. याच मंत्राचा जप करीत ‘‘बायफ’’ ने सेवाभावेतून लाखो शेतकरी बांधवांचे आयुष्य बदलले आहे. त्यांना स्वरोजगार कसा करायचा हे शिकवले आहे. संकल्प करून तो सिद्धीस कसा न्यायचा, याचे साक्षात उदाहरण म्हणजे आपली संस्था आहे.
माझा आग्रह आहे की, जे काही विचार मी आपल्यासमोर मांडले आहेत, त्याला अनुसरून काही नव्या संकल्पांना आपल्याबरोबर जोडावे. 2022मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यावेळी आपण केलेले संकल्प सिद्धीस गेलेले असतील आणि त्यामुळे या देशातल्या करोडो शेतकरी बांधवांना त्याचे फळ मिळालेले असेल. त्यांच्या यशामध्येच तुमच्या संकल्पाची सिद्धी असणार आहे.
For the development of the nation, prosperity of farmers is essential: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 24, 2017
The 'Anna Datas' of the nation should be free from worries: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 24, 2017
Women self help groups should get quality training in research, veterinary education. Animal husbandry sector will benefit due to this: PM
— PMO India (@PMOIndia) August 24, 2017
We saw the green & white revolution. Time has come for the blue revolution, for fishermen & sweet revolution, for more honey production: PM
— PMO India (@PMOIndia) August 24, 2017
Along with 'Jan Andolan', 'Jal Andolan' can help us for the future: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 24, 2017
We take immense pride in our villages and the culture of our villages: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 24, 2017
The way ahead lies in improving digital infrastructure in our villages: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 24, 2017