नमस्कार।
‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे एक सुंदर चित्र इथे पहायला मिळत आहे. आज या कार्यक्रमाचे स्वरूप खरोखरच भव्य आहे , ऐतिहासिक आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीजी आज केवडियात उपस्थित आहेत. प्रतापनगरचे आमदार आणि गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी आहेत. अहमदाबादहून गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेलजी, दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयलजी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकरजी, डॉक्टर हर्षवर्धनजी, दिल्लीचे मुख्यमंत्री भाई अरविंद केजरीवालजी आमच्यासोबत आहेत। मध्य प्रदेशातील रेवाहून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जी आपल्यासोबत आहेत। मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाई उद्धव ठाकरेजीसुद्धा उपस्थित आहेत. वाराणसीहून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आपल्यासह आहेत. याशिवाय तमिळनाडूसह अन्य राज्य सरकारांचे माननीय मंत्री, खासदार, आमदारही आज या भव्य कार्यक्रमात आमच्यासह आहेत आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आज आणंदमध्ये असलेले सरदार वल्लभ भाई पटेलजीच्या मोठ्या कुटुंबातील अन्य सदस्यही आज आम्हाला आर्शीवाद देण्यासाठी आले आहेत.
कला विश्वातील अनेक कलाकार, क्रीडाविश्वातील अनेक खेळाडू आज मोठ्या संख्येने या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. आणि या सर्वांसोबत आहे तो आम्हाला ईश्वर स्वरूप असणारा, आशीर्वाद देणारा जनताजनार्दन. प्रिय बंधू भगिनींनो, संपूर्ण भारताच्या उज्वल भविष्य प्रतिनिधित्व करणाऱ्या बालकवर्गाचे खूप खूप आभार.
देशाच्या विविध भागातून एकाच ठिकाणी येण्यासाठी एवढ्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला गेल्याचे रेल्वेच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच घडत असेल. कारण केवडिया ही जागाचअशी आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा मंत्र देणाऱ्या, देशाला एकत्र आणणाऱ्या सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ही त्याची ओळख आहे. सरदार सरोवर धरण ही याची ओळख आहे. आजचा हा समारंभ खरोखरच भारताला एकत्र आणणार्या भारतीय रेल्वेचे व्हिजन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे मिशन या दोहोंच्या व्याख्या स्पष्ट करत आहे आणि मला आनंद होतोय की या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. आपणा सर्वांचे मी आभार मानतो.
आज केवड़ियाकडे निघणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी एक गाडी पुरुची थलयवर डॉक्टर एमजी रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्थानकावरून येत आहे. आज एम जी आर यांची जयंती सुद्धा आहे. हा सुखद योगायोग आहे. एमजीआर यांनी चित्रपटांच्या पडद्यापासून ते राजकारणाच्या पडद्यापर्यंत लोकांच्या हृदयावर राज्य केले. त्यांचे जीवन, त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास हा गरिबांसाठी समर्पित होता. गरिबांना सन्मानित जीवन जगता यावे यासाठी त्यांनी निरंतर काम केले होते. भारतरत्न एम जी आर यांची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी आज आपण सगळे प्रयत्न करत आहोत. काही वर्षांपूर्वी देशाने त्यांच्या सन्मानार्थ चेन्नई सेंट्रल रेलवे स्थानकाचे नाव बदलून एम जी आर चे नाव दिले होते. मी भारतरत्न एम जी आर यांना प्रणाम करतो , त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्र हो,
देशातील प्रत्येक भाग केवडियाशी थेट रेल्वे कनेक्टिविटीने जोडले जाणे हा संपूर्ण देशासाठी एक अद्भुत क्षण आहे. आम्हाला अभिमान वाटायला लावणारा आहे. थोड्याच वेळापूर्वी चेन्नई तसेच वाराणसी, रेवा, दादर आणि दिल्लीहून केवडिया एक्सप्रेस आणि अहमदाबादहून जनशताब्दी एक्सप्रेस केवडियाकडे निघाली आहे. याचप्रमाणे कोवडिया व प्रताप नगरच्या दरम्यान मेमू या सेवा सुरू झाली आहे. डभोई- चांदवड रेल्वेमार्ग रुंदीकरण आणि चांदवड केवडीया दरम्यान नवी रेल्वेमार्ग हे आता केवडियाच्या विकासयात्रेतील नवे अध्याय आहेत, आणि आज मी या रेल्वेच्या कार्यक्रमात उपस्थित असताना त्यानिमित्ताने माझ्या काही जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. बडोदा आणि डभोई यादरम्यान नॅरोगेज रेल्वे चालत असे , हे आता फार कमी लोकांना माहिती असेल. मला त्यातून प्रवास करण्याची संधी मिळाली. एके काळी माता नर्मदेचे मला मोठे आकर्षण वाटत असे. माझी ये जा सुरू असताना, जीवनातील काही क्षण माता नर्मदेच्या कुशीत घालवत होतो, आणि त्या वेळी या narrow gauge railway मधून आम्ही प्रवास करत असू narrow-gauge ट्रेनच्या प्रवासाची गंमत अशी होती की त्या गाडीचा वेग एवढा कमी असे की कुठेही र उतरून जावे कुठेही त्यात चढावे, अगदी आरामात. काही काळ आपण तिच्याबरोबर चालत राहिलो तर आपला वेग तिच्यापेक्षा जास्त आहे असे वाटे. मी ही कधीकधी हा आनंद लुटत असे परंतु आज तो broad-gauge मध्ये convert होत आहे. या रेल्वे कनेक्टीविटीचा सर्वात मोठा फायदा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पहाणार्या पर्यटकांना होणार आहेच, याशिवाय या कनेक्टिव्हिटीमुळे केवडियाच्या आदिवासी बंधू-भगिनींचे जीवनमानसुद्धा बदलत आहे. ही कनेक्टिव्हीटी सुविधेसह रोजगार आणि स्वयंरोजगार यातील नव्या संधी घेऊन येईल. हा रेल्वेमार्ग माता नर्मदेच्या किनाऱ्यावर वसलेल्या करनाली, पोईचा आणि गरुडेश्वर यासारख्या महत्त्वाच्या श्रद्धास्थानाही जोडणार आहे. एक प्रकारे हे संपूर्ण क्षेत्र अध्यात्मिक जाणीवेने परिपूर्ण असे क्षेत्र आहे ही गोष्ट सुद्धा सत्य आहे. या व्यवस्थेमुळे सर्वसाधारणपणे अध्यात्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने इथे जे येतात त्यांच्यासाठी ही मोठीच भेट आहे.
बंधू-भगिनींनो,
आज केवडिया गुजरातच्या दूरगामी प्रदेशातील छोटा भाग राहिलेला नाही तर जगातील सर्वात मोठे टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून केवडिया आज आकार घेत आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही जास्त पर्यटक येत आहेत. स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या लोकार्पणानंतर जवळपास पन्नास लाख लोक येथे भेट देण्यासाठी येऊन गेले आहेत. करोनाकाळामध्ये कित्येक महिने सर्व काही बंद राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वेगाने वाढत आहे. एका सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार जसजशी संपर्क सुविधा वाढत जाईल तसतसे भविष्यात दररोज एक लाखांपर्यंत लोक केवडियात येऊ लागतील.
मित्रहो,
नियोजनबद्ध पद्धतीने पर्यावरण संरक्षण करतानाच इकॉनॉमी आणि इकॉलॉजीदोहोंचाही जलद गतीने विकास केला जाऊ शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छोटेसे सुंदर केवडिया. या कार्यक्रमात उपस्थित असलेले बरेचसे मान्यवर लोक कदाचित केवडियाला कधी गेलेही नसतील परंतु मला विश्वास आहे की एकदा केवडियाची विकास यात्रा बघितल्यानंतर आपल्याला आपल्या देशातील या शानदार जागेबद्दल अभिमानच वाटेल.
मित्रहो, मला आठवते आहे, सुरुवातीला केवडिया हे जगातील एक उत्कृष्ट फॅमिली टुरिस्ट डेस्टिनेशन बनवण्याचे बोलले गेले तेव्हा लोकांना हे स्वप्नच वाटत होतं . लोक म्हणत हे शक्यच नाही, हे होऊच शकत नाही, असे होण्यासाठी कित्येक दशके लागतील. असो, जुन्या अनुभवांच्या आधारे बघितले तर त्यांचे म्हणणेही खरे होते. केवडियाला जाण्यासाठी ना रुंद रस्ते, ना भरपूर स्ट्रीट लाईट्स, ना रेल्वे, ना पर्यटकांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था. आपल्या ग्रामीण पार्श्वभूमीसह केवडिया हे देशातील इतर छोट्या छोट्या गावांसारखंच एक गाव होतं. पण आज काही वर्षातच केवडियाचा कायापालट झाला आहे. केवडियाला पोहोचण्यासाठी रुंद रस्ते आहेत, इथे राहण्यासाठी संपूर्ण टेन्ट सिटी आहे, उत्तम प्रकारची इतर व्यवस्था आहे, उत्कृष्ट मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे, चांगली रुग्णालये आहेत. काही दिवसांपूर्वीच सी-प्लेनची सुविधा सुरु झाली आहे. आणि आज देशातून बऱ्याच ठिकाणांहून आलेल्या रेल्वेमार्गांमुळे केवडीया जोडले गेले आहे. हे शहर एक प्रकारे कम्प्लीट फॅमिली पॅकेज म्हणून सेवा देत आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवर धरणाची भव्यता, त्यांची विशालता यांचा अनुभव आपण केवडियाला येऊनच घेऊ शकता. तिथे आता शेकडो एकरात पसरलेले सरदार पटेल झूलॉजिकल पार्क आहे, जंगल सफारी आहे. एकीकडे आयुर्वेद आणि योगावर आधारित आरोग्य वन आहे तर दुसरीकडे पोषण पार्क आहे. रात्री झगमगते ग्लो गार्डन आहे तर दिवसा बघण्यासाठी कॅक्टस गार्डन आणि बटरफ्लाय गार्डन आहे. पर्यटकांना फिरण्यासाठी एकता क्रूज आहे, तर दुसरीकडे तरुणांना आपले साहस आजमावण्यासाठी राफ्टींगचीही सोय आहे. म्हणजेच बच्चे कंपनी असो तरुण असोत व वयस्कर, सर्वांसाठी खूप काही आहे. वाढत्या पर्यावरणामुळे येथील आदिवासी युवकांना रोजगार मिळत आहे. इथल्या लोकांच्या जीवनात वेगाने आधुनिक सोयी-सुविधा पोहोचत आहेत. कोणी मॅनेजर झाले आहे, कोणी कॅफे मालक बनले आहे, कोणी गाईडचे काम करत आहे. मी जेव्हा झूलॉजिकल पार्कमध्ये पक्षांसाठीच्या खास Aviary Dome मध्ये गेलो होतो तेव्हा तिथे एका स्थानिक महिला गाईडने मला अगदी सविस्तर माहिती दिली होती हे माझ्या लक्षात आहे. स्थानिक महिलांना त्यांच्या हस्तकला उत्पादनासाठी बनलेल्या विशेष एकता मॉलमध्ये आपल्या सामानाची विक्री करण्याची संधी मिळत आहे. मी तर ऐकले आहे की केवडियाच्या आदिवासी गावांमध्ये दोनशेहून जास्त खोल्यांचे निरीक्षण करून त्यांना पर्यटकांसाठी होम स्टे म्हणून विकसित केले जात आहे.
बंधू-भगिनींनो,
केवडिया येथे जे रेल्वे स्टेशन उभारले आहे त्यात सोयींबरोबरच पर्यटनाचा दृष्टीकोन सांभाळला गेला आहे. येथे ट्रायबल आर्ट गॅलरी आणि ह्यूईंग गॅलरी तयार होत आहे. या गॅलरीमधून पर्यटक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहू शकतील.
मित्रहो,
याप्रकारे लक्ष्यकेंद्रीत प्रयत्न हे भारतीय रेल्वेच्या बदलत्या स्वरूपाचेही उदाहरण आहे. भारतीय रेल्वे आपली परंपरागत प्रवासी गाडी आणि मालवाहू गाडी या भूमिका निभावत असतानाच आपल्या प्रमुख टुरिझम आणि श्रद्धेशी जोडलेल्या सर्किट विभागात थेट कनेक्टिविटी देत आहे. आता अनेक रूटवर विस्टाडोमवाले कोचेस भारतीय रेल्वे प्रवास अधिक आकर्षक करणार आहेत. अहमदाबाद-केवडिया जनशताब्दी एक्सप्रेस हीसुद्धा “विस्टा डोम कोच”ची सुविधा असणाऱ्या ट्रेनपैकी एक असेल.
मित्रहो,
गेल्या काही वर्षात देशातील रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर आधुनिक करण्यासाठी जेवढे काम झाले आहे ते अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमची अधिकाधिक ऊर्जा आधीपासून असलेल्या रेल्वे व्यवस्थेला ठिक-ठाक करण्यात वा सुधारण्यात वापरली गेली. त्यादरम्यान नवीन विचार आणि नव्या टेक्नॉलॉजीवर फोकस कमी होता. हा अप्रोच बदलणे खूप आवश्यक होते आणि म्हणूनच गेल्या काही वर्षात देशात रेल्वेच्या संपूर्ण तंत्रात जास्त बदल करण्यावर काम केले गेले. हे काम फक्त बजेट वाढवणे, कमी करणे, नव्या गाड्यांची घोषणा करणे इथपर्यंतच मर्यादित राहिले नाही. हा बदल अनेक ठिकाणी एकाच वेळी झाला. आता केवडियाला रेल्वेने जोडणाऱ्या या प्रकल्पाचे उदाहरण घेतले तर आत्ता ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले गेले त्याप्रमाणे हे उभारताना हवामान, करोना महामारी अशी अनेक प्रकारची संकटे आली. परंतु याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले गेले. ज्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आता रेल्वे करत आहे त्यात टेक्नॉलॉजीचा यात बराच उपयोग झाला. ट्रॅकपासून पुलांच्या उभारणीपर्यंत नवीन तंत्रज्ञानावर लक्ष्य केंद्रित केला गेला. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर केला गेला. सिग्नलिंगचे काम वेगाने करण्यासाठी आभासी माध्यमातून तपासणी केली गेली. याआधी अशा अडचणी आल्यावर बहुतांश वेळा असे प्रकल्प प्रलंबित रहात असत.
मित्रहो,
डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉरचे प्रकल्प हे आपल्या देशात सुरुवातीपासून ज्या पद्धती होत्या त्यांचे एक उदाहरण आहे. पूर्वेकडील व पश्चिमेकडील डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉर या विभागाचे लोकार्पण करण्याची संधी काहीच दिवसांपूर्वी मला मिळाली होती. राष्ट्रासाठी अतिशय आवश्यक असणाऱ्या या प्रोजेक्टवर 2006 पासून 2014 पर्यंत फक्त कागदांवरच काम झाले होते. 2014 पर्यंत एक किलोमीटर अंतराचा ही रुळ टाकला गेला नाही. आता पुढील काही महिन्यातच 1100 किलोमीटरचे काम पूर्ण होत आहे
मित्रहो,
देशातील रेल्वेचे जाळ्याचे आधुनिकीकरण होत असताना आज देशातील असे भाग रेल्वेने जोडले जात आहेत ते आत्तापर्यंत जोडलेले नव्ह्ते. आज आधीपेक्षा कितीतरी जास्त रेल्वे मार्गांचे रुंदीकरण आणि विद्युतीकरण केले जात आहे. रेल्वे ट्रॅक हे जास्त वेगाच्या दृष्टीकोनातून सक्षम केले जात आहेत. यामुळेच आज देशात सेमी हायस्पीड ट्रेन चालवणे शक्य होत आहे आणि आपण तसेच हाय स्पीड ट्रॅक आणि टेक्नॉलॉजीकडे वेगाने जात आहोत. या कामासाठी बजेट कित्येक पटीने वाढवले गेले आहे एवढेच नाही तर रेल्वे पर्यावरण पूरक असावी याकडेही लक्ष पुरविले आहे. केवडिया रेल्वे स्थानक भारतातील असे असे पहिले रेल्वे स्थानक आहे ज्याला सुरुवातीपासूनच हरित इमारतीच्या स्वरुपात प्रमाणपत्र मिळाले आहे.
बंधू भगिनींनो,
रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे एक मोठे कारण आहे रेल्वे मनुफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरता. हीच आमची शक्ती आहे, आमचा फोकस आहे. गेल्या काही वर्षात या दिशेने जे काम झाले त्याचा परिणाम आता हळूहळू आपल्याला दिसत आहे. आता विचार करा जर भारतात उच्चतम पावरच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव तयार झाले नसते तर जगातील पहिली डबल स्टॅक लॉन्ग हॉल कंटेनर ट्रेन भारतात चालवता आली असती का? आज भारतातच तयार झालेल्या एका पेक्षा एक आधुनिक गाड्या भारतीय रेल्वेचा भाग आहेत.
बंधू भगिनींनो,
आज भारतीय रेल्वेच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या बाबतीत आपण पुढे चाललो आहोत त्यावेळी उच्च दर्जाची कौशल्य असलेले विशेषज्ञ् यांची अतिशय आवश्यकता आहे. बडोद्यात भारताच्या पहिल्या रेल्वे अभिमत रेल्वे विद्यापिठाच्या स्थापनेपाठी हेच उद्दिष्ट आहे. रेल्वेसाठी याप्रकारे उच्च संस्था असणाऱ्या जगातील ठराविक देशांमधील एक भारत आहे. रेल्वे वाहतूक असो वा प्रशिक्षण , सर्व प्रकारची आधुनिक सुविधा असून या सर्व गोष्टी इथे उपलब्ध केल्या गेल्या आहेत. 20 राज्यातील शेकडो बुद्धीमान युवावर्ग भारतीय रेल्वेचे वर्तमान आणि भविष्याला गती देण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करत आहे. येथे होणाऱ्या नवोन्मेष व संशोधनाळे भारतीय रेल्वे आधुनिक बनवण्यास मदत होईल. भारतीय रेल्वे भारताच्या प्रगतीच्या मार्गाला गती देत रहावी यासाठी शुभेच्छा देतानाच पुन्हा एकदा गुजरातसहीत सर्व देशाचे या नव्या रेल्वे सुविधांसाठी अभिनंदन. सरदार साहेबांना ''एक भारत श्रेष्ठ भारताचे'' त्यांचे जे स्वप्न होते, जेव्हा हिंदूस्थानच्या कानाकोपऱ्यातून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या या पवित्र स्थानी देशातील विभिन्न भाषा, विभिन्न वेशातील लोकांचे जाणेयेणे वाढेल तेव्हा देशाच्या एकतेचे ते दृश्य , त्यातून एकप्रकारे छोटा भारतच आपल्याला दिसून येईल. केवडियासाठी आजचा दिवस खास आहे. देशाची एकता व अखंडता यासाठी जे सतत प्रयत्न सुरू आहेत त्यातील एक नवा अध्याय आहे. पुन्हा एकवार मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे.
खुप-खुप धन्यवाद !