या उपक्रमांतर्गत येत्या 2- 3 महिन्यात एक लाख युवकांना प्रशिक्षित केले जाणार
26 राज्यात 111 केंद्रांवर 6 विशेष अभ्यासक्रम सुरु
विषाणू अद्यापही असून उत्परिवर्तनाची शक्यता, आपण सज्ज राहण्याची आवश्यकता : पंतप्रधान
कौशल्य, पुनः कौशल्य आणि कौशल्य वृद्धीचे महत्व कोरोना काळाने केले अधोरेखित : पंतप्रधान
या महामारीने जगातला प्रत्येक देश, संस्था,समाज,कुटुंब आणि व्यक्तीच्या सामर्थ्याची घेतली कसोटी: पंतप्रधान
21 जूनपासून लसीकरणासंदर्भात 45 वर्षाखालील आणि 45 वर्षावरील व्यक्तीं यांना एकसमान वागणूक
गावामध्ये दवाखान्यात तैनात आशा सेविका, आरोग्य सेविका ,आंगणवाडी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची केली प्रशंसा

नमस्कार, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी महेंद्रनाथ पांडे जी, आर. के. सिंह जी, इतर सर्व वरिष्ठ मंत्रिवर्ग, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व युवा सहकारी, व्यावसायिक, इतर मान्यवर आणि बंधू आणि भगिनींनो,

कोरोनाच्या विरोधामध्ये सुरू केलेल्या महायुद्धामध्ये आज एका महत्वपूपर्ण मोहिमेचा पुढचा टप्पा प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी देशामध्ये हजारो व्यावसायिक, कौशल्य विकास मोहिमेशी जोडले गेले. अशा प्रकारे केलेल्या प्रयत्नांमुळे देशाला कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी खूप मोठी शक्ती मिळाली. आता कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये कोरोना विषाणूचे  वारंवार बदलणारे स्वरूप आपल्यासमोर नवनवीन आव्हाने कशा पद्धतीने निर्माण करीत आहे, हे तुम्ही लोकांनी पाहिले आहे. हा विषाणू आपल्यामध्ये अजूनही आहे आणि जोपर्यंत तो असणार आहे, तोपर्यंत त्याचे स्वरूप बदलत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणूनच सर्व प्रकारे औषधोपचार करताना दक्षता बाळगण्याबरोबरच आगामी आव्हानांना परतवून लावण्यासाठी देशामध्ये तयारी अधिक जास्त करावी लागणार आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आज देशामध्ये कोरोना आघाडीवर कार्यरत राहणा-या एक लाख योद्ध्यांना तयार करण्याचे महाअभियान सुरू करण्यात येत आहे.

मित्रांनो,

या महामारीने जगातला प्रत्येक देश, प्रत्येक संस्था, प्रत्येक समाज, प्रत्येक कुटुंब, अगदी प्रत्येक व्यक्तीच्या  सामर्थ्‍याची, त्याच्या मर्यादांची पुन्हा पुन्हा परीक्षा घेतली आहे. तसेच या महामारीने विज्ञान, सरकार, समाज, संस्था आणि व्यक्ती या रूपामध्येही आपल्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी सतर्कही केले आहे. पीपीई संच आणि चाचणीच्या पायाभूत सुविधा यांच्यापासून कोविड दक्षता केंद्र आणि औषधोपचार यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधांचे जे मोठे महाजाल आज भारतामध्ये बनले आहे, अर्थात, अजूनही हे काम सुरू आहे, हा त्याचाच परिणाम आहे. आज देशाच्या दुर्गमातल्या दुर्गम भागातल्या रूग्णालयांमध्येही व्हँटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स पोहोचविण्यासाठीही वेगाने प्रयत्न केले जात आहेत. दीड हजारपेक्षा जास्त ऑक्सिजन प्रकल्प बनविण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे आणि भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी जलदरित्या प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमध्येच कुशल मनुष्यबळाचा एक मोठा सेतू असणे गरजेचे आहे. या सेतूबरोबरच नवीन लोक जोडले जाणेही तितकेच गरजेचे आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन कोरोनाबरोबर युद्ध करणा-या सध्याच्या फौजेला पुरक ठरेल अशी कुमक तयार करण्यात येत आहे. यासाठी देशातल्या जवळपास एक लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. हा अभ्यासक्रम दोन-तीन महिन्यांमध्ये पूर्ण होईल, त्यामुळेच हे लोक ताबडतोब कामासाठी उपलब्धही होवू शकणार आहेत. आणि एक कुशल, प्रशिक्षित सहायकाच्या रूपाने वर्तमान व्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकणार आहे. त्यांच्यावर असलेला कामाचे ओझे कमी होवू शकणार आहे. देशाच्या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या मागणीच्या आधारे देशातल्या अव्वल दर्जाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी हा विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. आज नवीन सहा ‘कस्टमाईज्ड‘ अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. नर्सिंगशी संबंधित सामान्य कार्य असो, घरामध्ये घेण्यात येणारी दक्षता असो, अतिदक्षता विभागात करावयाची मदत असो, नमुने गोळा करणे, वैद्यकीय तंत्रज्ञ असो, नव-नवीन उपकरणे वापरण्यासाठी प्रशिक्षण असेल, अशा विविध गोष्टींसाठी युवकांना तयार करण्यात येत आहे. यामध्ये नवीन युवकांना कौशल्य प्राप्त होईल आणि जे आधीपासूनच या प्रकारच्या कामामध्ये प्रशिक्षित झाले आहेत, त्यांनाही उन्नत कौशल्य प्राप्त करण्याची संधी मिळेल. या अभियानामुळे कोविडच्या विरोधात लढत असलेल्या आपल्या आरोग्य क्षेत्रातल्या आघाडीच्या तुकडीला नवीन शक्तीही मिळू शकणार आहे आणि आपल्या युवकांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होवून त्यांच्यासाठी उत्पन्नाची सुविधा मिळणार आहे.

मित्रांनो,

कौशल्य, पुनः कौशल्य आणि कौशल्य वृद्धी हा मंत्र किती महत्वपूर्ण आहे, हे कोरोना काळाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आरोग्य क्षेत्रातले लोक कुशल तर होतेच, कोरोनाशी दोन हात करताना तेही बरेच काही नवीन शिकले. याचा अर्थ त्यांनी स्वतःला पुन्हा एकदा कुशल बनवले. त्याचबरोबर त्यांच्याकडे जे कौशल्य आधीपासूनच होते, त्याचाही त्यांनी विस्तार केला. बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याकडील कौशल्य उन्नत करणे अथवा त्याचे मूल्यवर्धन करणे, म्हणजे उन्नत कौशल्य प्राप्त करणे आहे. ही आजच्या काळाची एक मागणी आहे. आणि आता ज्या वेगाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा प्रवेश होत आहे, तो पाहता सातत्याने आणि वेगाने व्यवस्थेमध्ये उन्नत कौशल्य आणणे अनिवार्य झाले आहे. कुशलता, पुन्हा एकदा कौशल्य प्राप्त करणे आणि उन्नत कौशल्य यांचे महत्व समजून घेऊन देशामध्ये स्किल इंडिया मिशन सुरू केले होते. पहिल्यांदाच वेगळ्या प्रकारे कौशल्य विकास मंत्रालय बनवण्याचे काम असो, देशभरामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र उघडणे असो, आयटीआयच्या संख्या वाढविणे असो, यामध्ये लाखो नवीन जागा तयार करणे असो, यावर सातत्याने काम केले गेले आहे. आज कुशल भारत अभियानामुळे दरवर्षी लाखो युवकांच्या आजच्या गरजा लक्षात घेवून त्यानुसार त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी खूप मोठी मदत मिळत आहे. या गोष्टीविषयी देशामध्ये खूप काही चर्चा होवू शकलेली नाही की, कौशल्य विकास अभियानाने कोरोनाच्या या काळामध्ये देशाला किती मोठी शक्ती दिली, याचाही चर्चा झाली नाही. गेल्या वर्षी ज्यावेळेपासून कोरोनाचे आव्हान आपल्या समोर उभे ठाकले, त्यावेळीही कौशल्य विकास मंत्रालयाने देशभरातल्या लाखो आरोग्य कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्याच्या कामामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘मागणी लक्षात घेवून कुशल वर्ग तयार करण्याच्या भावनेने या मंत्रालयाने जे काम केले. त्याप्रमाणेच आज आता अधिक वेगाने काम होत आहे.

मित्रांनो,

आपली लोकसंख्या पाहिली तर, आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टर, परिचारिका आणि निम-वैद्यकीय क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या सेवा आहेत, त्यांचा विस्तार करीत राहणे, तितकेच आवश्यक आहे. यासाठीही गेल्या काही वर्षांमध्ये एक लक्ष्य निश्चित करून काम केले गेले आहे. गेल्या सात वर्षांमध्ये नवीन एम्स, नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि नवीन परिचारिका महाविद्यालयांची निर्मिती करण्यावरही जास्त भर दिला गेला आहे. यामध्ये बहुतांश संस्थांचे काम आता सुरूही झाले आहे. त्याचप्रमाणे, वैद्यकीय शिक्षण आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या संस्थांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आज ज्या वेगाने, ज्या गांभीर्याने आरोग्य व्यावसायिक तयार करण्यासाठी काम केले जात आहे, ते अभूतपूर्व आहे.

मित्रांनो,

आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या आरोग्य क्षेत्रातल्या एक अतिशय मजबूत स्तंभाची चर्चा करणे, मला जरूरीचे वाटते. साधारणपणे आपल्या या सहका-यांविषयी चर्चा करण्याचा विषय राहून जातो. हे सहकारी आहेत- आपल्या आशा-एनएम आंगणवाडी आणि गावांगावांमध्ये दवाखान्यांमध्ये कार्यरत असलेले आमचे आरोग्य कर्मचारी. आपले हे सहकारी संक्रमण रोखण्यापासून ते दुनियेतले सर्वात मोठे लसीकरणाचे अभियान चालविण्यापर्यंत अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. मौसमी हवामानाची स्थिती, भौगोलिक परिस्थिती कितीही विपरीत असो, हे सहकारी एका-एका देशवासियाच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस झटत आहेत. गावांमध्ये लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आपल्या या सहका-यांनी खूप मोठी भूमिका बजावली आहे. 21 जूनपासून देशामध्ये लसीकरण अभियानाचा विस्तार होत आहे. या कार्यक्रमालाही आपले हे सहकारी खूप शक्ती, ताकद देत आहेत. मी आज सार्वजनिक स्वरूपात त्यांचे खूप-खूप कौतुक करतो. आपल्या या सहका-यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करतो.

मित्रांनो,

21 जूनपासून जे लसीकरण अभियान सुरू होत आहे, त्याच्याशी संबंधित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत 45 वर्षावरील व्यक्तींना जी सुविधा मिळत होती तीच सुविधा यापुढे 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळणार आहे. केंद्र सरकार, प्रत्येक देशवासियाला मोफत लस देण्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्याला कोरोना कार्यपद्धतीचेही योग्य प्रकारे, संपूर्ण पालन करायचे आहे. मास्क आणि दो गज अंतर राखणे अतिशय गरजेचे आहे. अखेरीस मी, हा विशेष अभ्यासक्रम करणा-या सर्व युवकांना खूप-खूप शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की, आपण शिकत असलेले नवीन कौशल्य देशवासियांचे जीवन वाचविण्यासाठी सातत्याने उपयोगी ठरणार आहे. आणि तुम्हालाही आपल्या जीवनात एका नवीन क्षेत्रात होत असलेला प्रवेश आनंददायी ठरेल. कारण ज्यावेळी तुम्ही याआधी रोजगारासाठी नवीन जीवनाचा प्रारंभ करीत होता, आता मात्र त्याच कामाला मानवी जीवनाचे रक्षण करण्याचे कार्य आपोआपच जोडले गेले आहे. लोकांचे जीवन वाचविण्याच्या कामामध्ये तुम्ही सहभागी होत आहात. गेल्या दीड वर्षात रात्रंदिवस काम करणा-या आपल्या डॉक्टरांनी, आपल्या परिचारिकांनी कामाचा इतका भार पेलला आहे की, आता तुमच्या कामामुळे त्यांना खूप मदत मिळणार आहे. त्यांनाही एक नवीन शक्ती मिळणार आहे. म्हणूनच हे अभ्यासक्रम तुमच्या जीवनामध्ये नवीन संधी घेवून येत आहेत. या पवित्र कार्यासाठी, मानव सेवेच्या कार्यासाठी ईश्वराने तुम्हाला भरपूर शक्ती द्यावी. आपण लवकरात लवकर या अभ्यासक्रमातले बारकावे शिकून घ्यावेत. स्वतःला एक उत्तम व्यक्ती बनविण्याचा प्रयत्न करावा. तुमच्यामध्ये निर्माण होणा-या कौशल्यामुळे प्रत्येकाचा जीव वाचविण्याचे काम होणार आहे. यासाठी माझ्यावतीने तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा आहेत.

खूप - खूप धन्यवाद!!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage