Historic MoA for Ken Betwa Link Project signed
India’s development and self-reliance is dependent on water security and water connectivity : PM
Water testing is being taken up with utmost seriousness: PM

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्रसिंह शेखावत जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारियाजी, वेगवेगळ्या राज्यांचे आणि जिल्ह्यांचे सर्व अधिकारी, देशातल्या गावांगावांतून जोडले गेलेले आणि या आंदोलनाची सर्वाधिक जबाबदारी ज्यांची आहे, असे पंच आणि सरपंचवर्ग, इतर सर्व लोकप्रतिनिधी, माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो !

हिंदुस्तानच्या काना-कोप-यातल्या गावागावांतले जे नेते आहेत, ते निसर्गासाठी, पाण्यासाठी, तिथल्या लोकांच्या कल्याणासाठी, सुखासाठी एका साधकाप्रमाणे साधना करीत आहेत, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जात आहेत, या सर्वांची चर्चा ऐकून, मला एक नवीन प्रेरणा मिळाली, नवीन ऊर्जा मिळाली आणि काही नवीन कल्पनाही सूचल्या आहेत, त्यांच्याशी संवाद साधणे, हे मी माझे भाग्य मानतो. मला विश्वास आहे की, तुम्हा सर्व प्रतिनिधींबरोबर आज जी काही चर्चा झाली आहे, ज्या ज्या लोकांनी ती चर्चा ऐकली, त्यामधून प्रत्येकाला आज काही ना काही तरी नवीन शिकायला मिळाले असणार. मलाही नवीन शिकायला मिळाले आहे. आपल्या अधिका-यांनाही शिकायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे जनता जनार्दनालाही शिकायला मिळेल.

जल शक्तीविषयी समाजामध्ये जागरूकता वाढत आहे, यासाठी प्रयत्नांमध्ये वाढ होत आहे, याचा मला आनंद आहे. आज आंतरराष्ट्रीय जल दिन, संपूर्ण जग आज पाण्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय जल दिवस साजरा करीत आहे. याप्रसंगी आपण दोन अतिशय महत्वपूर्ण कार्यासाठी एकत्र जमलो आहोत. ज्या मोहिमेचा उल्लेख मी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये केला होता, त्या मोहिमेचा प्रारंभ आज केला जात आहे. मात्र जगासमोर एक उदाहरण निर्माण करण्यासाठी आणि भारतातल्या पाण्याच्या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा निघावा यासाठी ‘कॅच द रेन’ या मोहिमेच्या प्रारंभाबरोबरच केन-बेतवा जोडणा-या कालव्यासाठीही खूप महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. अटल जींनी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधल्या लाखों परिवारांच्या कल्याणाचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला आहे आणि हे खूप मोठे काम झाले आहे. जर आज कोरोना नसता आणि जर आम्ही झांसी येथे येऊन बुंदेलखंड येथे येऊन, मग उत्तर प्रदेश असो अथवा मध्य प्रदेश असो, आजचा कार्यक्रम केला असता तर, लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहिले असते आणि त्यांनी आम्हांला आशीर्वाद दिला असता. इतके मोठे आणि महत्वाचे काम आता होत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

21 व्या शतकातल्या भारतासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले पाहिजे आणि पाणी हा खूप महत्वाचा घटक आहे. पाणी प्रत्येक घराची, प्रत्येक शेताची गरज आहेच त्याचबरोबर जीवनाच्या, अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक घटकासाठी अतिशय जरूरीचे आहे. आज ज्यावेळी आपण वेगाने विकासकार्य करण्‍याविषयी चर्चा करतो, प्रयत्न करतो, त्यावेळी जल सुरक्षेशिवाय, प्रभावी जल व्यवस्थापनाशिवाय काहीही करणे शक्य होणार नाही. भारताच्या विकासाचे ‘व्हिजन’, आत्मनिर्भरतेचे ‘व्हिजन’, आपल्या जल स्त्रोतांवर अवलंबून आहे. आपल्या जल संपर्क यंत्रणेवर अवलंबून आहे. ही गोष्ट गांभीर्याने जाणून घेऊन जर दशकांपूर्वीच आपण या दिशेने खूप काही करण्याची आवश्यकता होती. आणि मी आपल्याला गुजरातच्या अनुभवातून सांगतो की, जर आपण नियोजनपूर्वक लोकांच्या सहभागातून पाणी बचत करण्याची मोहीम सुरू केली तर, आपल्याकडे पाणी ही समस्याच राहणार नाही. पाणी आपल्यासाठी पैशांपेक्षाही जास्त मूल्यवान ठरून ते आपली ताकद म्हणून काम करू शकते. हे काम खूप आधी पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने जितक्या प्रमाणात होणे आवश्यक होते, आणि जितक्या व्यापक स्वरूपामध्ये व्हायला हवे होते, लोकांच्या भागीदारीमधून व्हायला हवे होते, त्यामध्ये कुठे ना कुठे, काही ना काहीतरी कमतरता राहिली. त्याचे परिणाम म्हणजे, भारत विकास मार्गावरून जस-जसे पुढे जात आहे, तस-तसे जल-संकटाचे आव्हान वाढत आहे. जर देशाने पाण्याच्या बचतीकडे लक्ष दिले नाही, पाणी वाया घालवणे सुरू ठेवले, पाण्याचा उपसा थांबवला नाही तर आगामी दशकांमध्ये परिस्थिती अधिकच बिघडणार आहे. आपल्या पूर्वजांनी पाण्याचा ठेवा आपल्याकडे सुपूर्त केला आहे. आता येणा-या आगामी पिढीकडे हाच ठेवा सुरक्षितपणे देण्याची जबाबदारी आपलीच आहे. पुढच्या पिढीकडे जलठेवा सुपूर्त करण्यापेक्षा मोठे कोणतेही पुण्यकार्य असणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला निर्धार करायचा आहे की, आपण पाणी वाया घालवायचे नाही. आपण पाण्याचा दुरूपयोग करू देणार नाही, आपण पाण्याबरोबर पवित्र नाते कायम ठेवणार आहोत. आपल्या मनातली ही पवित्र भावनाच पाण्याची बचत करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आगामी पिढ्यांसाठी आत्तापासूनच आपण पाण्याविषयीच्या जबाबदारीचे पालन केले पाहिजे, हे देशाच्या वर्तमान पिढीचे कर्तव्य आहे. सर्वांनी आत्तापासूनच या जबाबदारीचे पालन केले पाहिजे.

बंधू आणि भगिनींनो,

आपण वर्तमानातल्या या परिस्थितीला बदलायचेही आहे आणि भविष्यातल्या संकटांचा विचार करून त्यावर तोडगा काढण्याचे कामही करायचे आहे. यासाठी आमच्या सरकारने ‘जल प्रशासना’चा विचार करून त्याची धोरणे आणि निर्णय यांना प्राधान्य दिले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये या दिशेने अनेक पावले उचलण्यात आली आहेत. पंतप्रधान कृषी सिंचन योजना असो अथवा प्रत्येक शेताला पाणी देण्याची मोहीम असो. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ अभियान असो, किंवा नमामि गंगे, जल जीवन मिशन असो, अटल भूजल योजना असो, या सर्वांवर वेगाने कामे सुरू आहेत.

 

मित्रांनो,

या प्रयत्नांमध्ये एक चिंतेचा विषय म्हणजे, आपल्या देशामध्ये पावसाचे बहुतांश पाणी वाहून, वाया जाते. भारतामध्ये पावसाच्या पाण्याचे जितके उत्तम व्यवस्थापन केले जाईल, तितकेच भूगर्भातील जलस्तरावर देशाचे अवलंबित्व कमी होईल. आणि त्यासाठी ‘कॅच द रेन’ यासारखी मोहीम राबविण्याची आणि ती यशस्वी करण्याची खूप आवश्यकता आहे. यावेळी जल शक्ती अभियानामध्ये विशेष गोष्ट अशी की, शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्रांना त्यामध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे. मौसमी पावसाला प्रारंभ होण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा काळ आहे. म्हणूनच त्यासाठी आपल्याला आत्तापासून पाणी बचतीची तयारी वेगाने केली पाहिजे. आपल्या तयारीमध्ये कोणत्याही प्रकारे कमतरता राहू नये. मौसमी पाऊस येण्यापूर्वीच पाण्याच्या टाक्यांची, तलावांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरींचा गाळ काढला गेला पाहिजे. जलसाठ्यांमध्ये साचलेली माती बाहेर काढली पाहिजे. ही सगळी कामे आधी केली गेली तरच जलसाठ्यांची क्षमता वाढणार आहे. पावसाचे पाणी वाहून जाते, त्या मार्गावर असलेले अडथळे दूर केले पाहिजेत. अशा प्रकारची सर्व कामे आपण सर्व शक्तीनिशी केली पाहिजेत. आणि या कामांसाठी काही खूप मोठे अभियांत्रिकीचे ज्ञान असण्याची गरज नाही. कोणी खूप मोठे-मोठे अभियंते येतील, कागदावर खूप मोठी संरचना, आराखडे बनवून देतील, त्यानंतर हे काम केले जाईल, अशी काहीही गरज नाही. गावांतल्या लोकांना या सर्व गोष्टी खपू चांगल्या माहिती असतात. ते सर्व अतिशय सहजपणाने ही कामे पार पाडतात. फक्त कोणीतरी पुढाकार घेऊन करणारा पाहिजे आणि यामध्ये तंत्रज्ञानाचा जितका जास्तीत जास्त उपयोग केला जाईल, तितके जास्त चांगले होईल. मला तर असे वाटते की, मनरेगाचे एक-एक पैसा, एक-एक पैसा पाऊस येईपर्यंत फक्त आणि फक्त याच कामासाठी खर्च केला जावा.

जल संचयासंबंधी जी काही तयारी करायची आहे, त्यासाठी मनरेगाचा निधी खर्च केला गेला पाहिजे, इतर कशासाठीही खर्च केला जावू नये. आणि मला असे वाटते की, या मोहिमेला यशस्वी बनविण्यासाठी सर्व देशवासियांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. यामध्‍ये तुम्हां सर्व सरपंच मंडळींची, सर्व जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आयुक्त आणि त्यांच्या इतर सहका-यांचीही खूप मोठी तसेच महत्वाची भूमिका आहे. आज यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आणि त्या सभांमध्ये जलप्रतिज्ञा दिली जात आहे, अशी माहिती मला दिली गेली आहे. ही जलप्रतिज्ञा- जलशपथ लोकांचा, जनांचा संकल्प बनली पाहिजे. लोकांचा स्वभाव बनली पाहिजे. पाणी याविषयी आपण आपल्या सवयी बदलल्या, आपल्या प्रकृतीमध्ये बदल केला तर निसर्गही आपल्याला खूप मदत करणार आहे. आपण अनेकदा ऐकले आहे, लष्कराविषयी असे म्हटले जाते की, शांतीच्या काळामध्ये जे लष्कर जितके जास्त घाम गाळते, युद्धाच्या काळात तितकेच रक्त कमी सांडते!! जर आपण परिश्रम करणार असू, योजना तयार करणार असू, पाणी वाचविण्याचे काम करणार असू, तर दुष्काळामुळे जे अनेक अब्जावधींचे नुकसान होते, ते पाणी वाचविल्यामुळे टळू शकणार आहे. दुष्काळामुळे इतर अनेक काम थांबवावी लागतात, सामान्य माणसांना अतिशय संकटाचा सामना करावा लागतो, पशुंना पलायन करावे लागते. या सर्व गोष्टी टाळता येणार आहेत. म्हणूनच ज्याप्रमाणे युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावे असे वाटत असेल तर शांतीच्या काळात घाम गाळण्याचा मंत्र जपावा लागतो. त्याचप्रमाणे जीवन वाचविण्यासाठी पावसाळ्यापूर्वी जितके जास्त परिश्रम केले जातील, त्याचा लाभ तितकाच जास्त मिळेल.

 

बंधू आणि भगिनींनो,

जल पुनर्भरणा सोबतच आपल्या देशात नदीच्या पाण्याच्या व्यवस्थापनावर देखील अनेक दशकं चर्चा होते आहे. आमच्या असं लक्षात आलं आहे, अनेक ठिकाणी धरणं बनली आहेत, पण त्यातला गाळ काढला गेला नाही.

जर त्यातला गाळ काढला गेला, हे त्यातल्या तज्ञ अभियंत्यांच्या मार्गदर्शनात केले पाहिजे, तरी सुद्धा त्यात जास्त पाणी साठवलं जाईल. जास्त पाणी साठवलं गेलं तर जास्त दिवस पुरेल. आणि अशाच प्रकारे आमच्या नद्या, आमचे कालवे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त आपण हे करण्याची गरज आहे. देशा पुढच्या पाणी संकटावर उपाय म्हणून जलदगतीने काम करणे ही आपली सर्वांचे जबाबदारी आहे. केन-बेतवा जोड प्रकल्प याच दूरगामी प्रकल्पाचा एक भाग आहे. मी, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, इथले दोन्ही मुख्यमंत्री, दोन्ही सरकारं आणि दोन्ही राज्यातील जनतेचं कितीही अभिनंदन केलं तरीही ते कमी पडेल. आज या दोन नेत्यांनी, या दोन सरकारांनी इतकं मोठं काम केलं आहे, जे हिंदुस्तानच्या जलसंवर्धनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. हे साधारण काम नाही, त्यांनी आज केवळ कागदांवर सह्या केल्या नाहीत, तर बुंदेलखंडाचं नवीन भाग्य लिहिलं आहे, यासाठी हे दोन्ही मुख्यमंत्री, त्या दोन्ही राज्याचे नागरिक अभिनंदांचे पात्र आहेत. पण, बुंदेलखंडातील माझ्या बांधवांनो, आता ही तुमची देखील जबाबदारी आहे. या कामात इतकं झोकून द्या, इतकं झोकून द्या की केन-बेतवाचं काम आमच्या डोळ्यादेखत पूर्ण होईल आणि आम्हाला पाणी बघायला मिळेल. आमची शेतं हिरवीगार होतील, चला, सगळे मिळून कामाला लागुया. या प्रकल्पातून ज्या जिल्ह्यांतील लाखो लोकांना, शेतकऱ्यांना पाणी तर मिळेलच, यातून वीज निर्मिती देखील होईल. म्हणजे, तहानही भागेल, प्रगती देखील होईल.

 

बंधू आणि भगिनींनो,

भगीरथ प्रयत्न केले तर लक्ष्यप्राप्ती होतेच. आणि आज देशात जल जीवन मिशनमध्ये देखील हेच बघायला मिळत आहे. केवळ दीड वर्षापूर्वी आपल्या देशात 19 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी केवळ साडे तीन कोटी कुटुंबांना नळ जोडण्या होत्या. मला सांगायला आनंद होतो की जल जीवन मिशन सुरु झाल्यावर इतक्या कमी वेळातच जवळपास 4 कोटी नवीन कुटुंबांना नळ जोडण्या मिळाल्या आहेत. या मिशनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की याच्या मुळाशी लोकसहभाग आहे, स्थानिक कारभाराचं मॉडेल आहे आणि मी तर म्हणेन आणि माझ्या अनुभवातून मी हे म्हणतो, या जल जीवन मिशनमध्ये जितक्या जास्त भगिनी सहभाग घेतील, जितक्या जास्त भगिनी जबाबदाऱ्या घेतील, तुम्ही बघा, पाण्याची किंमत माता-भगिनींना जितकी चांगली समजते, तितकी अन्य कुणालाच कळत नाही. पाणी कमी असेल तर घरात किती समस्यांना तोंड द्यावं लागतं, हे माता-भगिनींना चांगलंच माहित असतं. जर त्या मातेच्या हातात पाण्याचं व्यवस्थापन दिलं, त्या भगिनीच्या हातात पाण्याचं व्यवस्थापन देऊन बघा, या माता भगिनी असं परिवर्तन आणतील ज्याचा पण विचार देखील करू शकणार नाही. पंचायत राजच्या सहकाऱ्यांना हे चांगलंच ठाऊक आहे, की हा संपूर्ण कार्यक्रम गावातले लोकच सांभाळत आहेत, गावच चालवत आहे. विशेषतः, मी आधी म्हणालो त्याप्रमणे आमच्या महिलांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पुढे न्या, तुम्ही बघा, परिणाम दिसायला सुरवात होईल. मला आनंद होतो आहे की, शाळा असो, अंगणवाडी असो, आश्रमशाळा असो, आरोग्य केंद्र असो, समाज मंदिर असो, अशा ठिकाणी प्राधान्याने नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

 

मित्रांनो,

जल जीवन मिशनचा एक पैलू आहे, ज्याची फारशी चर्चा झाली नाही. आपल्याकडे पाण्यात अर्सेनिक आणि इतर काही प्रकारचे प्रदूषक असतात, रसायनं असतात. ही फार मोठी समस्या आहे. दुषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार, लोकांचं जीवन उध्वस्त करतात, त्यात हाडांच्या रोगांमुळे जगणं कठीण होतं. जर आपण ही आजारपणं रोखू शकलो तर त्यांचे जीव वाचवू शकू. यासाठी पाण्याची चाचणी एखील तितकीच गरजेची आहे. जर आपण पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात वाचवू शकलो तर बाकी शक्ती कमी होईल. स्वतंत्र भारतात प्रथमच कुठलंही सरकार इतक्या गंभीरतेने पाण्याच्या चाचण्या करत आहे. आणि मला या गोष्टीचा देखील आनंद आहे, की पाण्याच्या चाचण्या करण्याच्या या मोहिमेत खेड्यात राहणाऱ्या आमच्या बहिणी-मुलींना सामील करून घेतलं आहे. करोना काळातच साडे चार लाखाहून अधिक महिलांना पाण्याच्या चाचण्या करण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं आहे. जल कारभारात (Water Governance) मध्ये बहिणी-मुलींना जितकं जास्त प्रोत्साहन दिलं जाईल, तितके चांगले परिणाम मिळतील.

मला विश्वास आहे की लोकसहभागातून, लोकसामर्थ्यातून आम्ही देशातले जल वाचवू शकू आणि देशाचा भविष्यकाळ पुन्हा एकदा उज्जवल करु शकू. माझा पुन्हा एकदा, देशातल्या सर्व युवकांना, सर्व माता-भगिनींना, सर्व मुलांना, स्थानिक स्वराज्य संस्थाना, सरकारच्या विविध विभागांना, सर्व राज्य सरकारांना आग्रह आहे की जलशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एक संकल्प घेऊन पुढे जाऊया. आगामी 100 दिवसांत पाण्याची तयारी.. घरात जेव्हा खूप पाहुणे येणार असतात, गावात लग्नाची वरात येणार असते, त्यावेळी गावात कशी तयारी होते? एक महिना आधीपासून तयारी सुरु होते !! तर मित्रांनो, पावसाची देखील अशीच एखाद्या पाहुण्यासारखीच तयारी करत जा. तोच उत्साह, तेच अगत्य असले पाहिजे. आपण बघा, इतकी जय्यत तयारी केली तर एक थेंबही पाणी वाया जाणार नाही. आणखी एक म्हणजे, जेव्हा अधिक पाणी मिळते तेव्हा त्याचा गैरवापर, उधळपट्टी करण्याची प्रवृत्तीही वाढत जाते.माझा तुम्हाला आग्रह आहे पाणी वाचवणे जेवढे आवश्यक आहे, तेवढंच त्याचा विवेक बुद्धीने वापर करणेही आवश्यक आहे.हे आपण कधीही विसरता कामा नये.

पुन्हा एकदा, आज जागतिक जल दिनानिमित्त, पाण्याविषयीच्या या लोकजागृती अभियानाला आणि ज्या सरपंचांनी यासाठी प्रत्यक्ष काम केले आहे, ज्या युवकांनी पृथ्वीवर पाणी संवर्धन हे आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले आहे, असे अनेक लोक आहेत. आज तर मला अशा केवळ पाच जणांशी बोलण्याची संधी मिळाली. मात्र भारताच्या कानाकोपऱ्यात असे कित्येक लोक आहेत. अशा सर्व शक्तींना नमन करत, चला आपण सगळे मिळून पाण्यासाठी एकत्र काम करुया. पाणी वाचवण्यात आपण यशस्वी व्हावे, आणि पाण्याने आपल्या भूमीला अधिक जलमय बनवावे, आपल्या अर्थव्यवस्थेला समृद्ध बनवावे, आपण सगळ्यांनी मिळून एका ऊर्जामय राष्ट्राची निर्मिती करत पुढे वाटचाल करावी,प्रगती करावी याच सदीच्छेसह तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो.

धन्यवाद !!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage