हर हर महादेव !

कोरोना महामारी विरोधातल्या काशीच्या लढ्याबाबत मी सतत आपल्या संपर्कात राहिलो आहे, माहितीही घेत आहे आणि अनेक स्रोतांकडून याबाबत कळतही असतं. काशीचे लोक, तिथल्या यंत्रणा, व्यवस्था, रुग्णालयं, या कठिण परिस्थितीतही कशी काम करत आहेत हे वेळेची मर्यादा असताना देखील आपण खूपच चांगल्या पद्धतीनं आमच्या समोर आताच मांडलंत. आपलं म्हणणं सांगितलं. आपण सगळेच जाणतो की आपल्याकडे म्हटलं जातं - “काश्याम् विश्वेश्वरः तथा” अर्थात्, काशीमधे सर्वत्र बाबा विश्वनाथ विराजमान आहेत, इथे प्रत्येकजण बाबा विश्वनाथ यांचाच अंश रूप आहे.

कोरोनाच्या या कठिण काळात आपल्या  काशीवासियांनी, आणि इथे काम करत असलेल्या प्रत्येकाने हे कथन सर्वाथानं सिद्ध केलं आहे. आपण सर्वांनीच शिवाच्या कल्याण भावनेनं काम करत जनसामान्यांची सेवा केली आहे. मी काशीचा एक सेवक या नात्यानं, प्रत्येक काशीवासीला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. विशेषत: आपले डॉक्टर्स, परिचारीका, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉईज, रुग्णवाहिका चालक, आपण सर्वांनीच जे काम केलंय ते खरंच प्रशंसनीय आहे. खरंतर ही महामारी इतकी मोठी आहे की आपल्या सगळ्यांच्या अथक परिश्रम आणि असीम प्रयत्नांनंतरही आपण आपल्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांना वाचवू शकलो नाही. या विषाणूनं आपल्या अनेक जिवलगांना हिरावून घेतलं आहे. मी त्या सर्वांप्रती विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सांत्वन तसेच सहवेदना व्यक्त करतो.

 

मित्रांनो,

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढावं लागत आहे. यावेळी संक्रमण दर पहिल्यापेक्षा अनेकपटीने जास्त आहे. आणि रुग्णांना अधिक दिवस रुग्णालयात राहावं लागत आहे. या सगळ्यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. तसंही बनारस केवळ काशीसाठीच नाही तर संपूर्ण पूर्वांचलच्या आरोग्य सेवांचं केन्द्र आहे. बिहारच्या काही भागातले लोकही काशीवर अवलंबून असतात. अशात, साहजिकच इथल्या आरोग्य व्यवस्थेवरचा प्रचंड ताण एक मोठं आव्हान म्हणून उभं ठाकलं आहे. गेल्या सात वर्षात इथल्या आरोग्य व्यवस्थेवर जे काम झालं त्याने आपल्याला खूपच हात दिला. तरीही असाधारण परिस्थिती राहिली. आपले डॉक्टर्स, वैदयकीय कर्मचारी यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा ताण हाताळणं शक्य झालं. आपण सगळ्यांनीच एकेका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अहोरात्र काम केलं. स्वतःच्या त्रास-आराम या सगळ्या पलिकडे विचार करत झटत राहिलात, कष्ट उपसत राहिलात. आपल्या तपस्येमुळेच इतक्या कमी वेळात बनारसनं स्वतःला सावरलं, त्याची चर्चा आज संपूर्ण देशभरात होत आहे.

 

मित्रांनो,

या कठिण काळात, बनारसच्या सेवेत सक्रीय आपल्या जनप्रतिनिधी, अधिकारी आणि सुरक्षा दलांनीही अविरत परिश्रम केले आहेत. प्राणवायूचा पुरवठा वाढवण्यासाठी, प्राणवायू प्रकल्प सुरू केले, अनेक नवीन प्राणवायू प्रकल्पही सुरु करण्यात आले. बनारससह, पूर्वांचलमधे नवीन जीवरक्षक प्रणाली ( व्हेंटिलेटर्स) आणि प्राणवायू कॉन्सेट्रेटर्सचीही व्यवस्था केली.

 

मित्रांनो,

बनारसने ज्या वेगानं इतक्या कमी वेळात प्राणवायू आणि अतिदक्षता खाटांची (आयसीयू बेडची) संख्या अनेक पटीने वाढवली आहे, ज्या पद्धतीने इतक्या कमी कालावधीत पंडित राजन मिश्र कोविड रुग्णालय कार्यरत केलं आहे, हे देखील स्वतःच एक उदाहरण आहे. आधुनिक तंत्रज्ञान असणारी नवीन यंत्र आल्याने इथे RT-PCR चाचण्यांची संख्याही वाढली आहे. मला सांगण्यात आलं की बनारस इथलं इंटीग्रेटेड कोविड कमांड सेंटरही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. आपण ज्या प्रकारे तंत्रज्ञानांचा वापर केला, रुग्ण आणि सामान्यांसाठी सर्व आवश्यक  व्यवस्था सुलभ केल्या हे अनुकरणीय आहे. आपल्या देशात गेल्या काही वर्षांत ज्या योजना सुरू झाल्या, अभियान राबवण्यात आले, त्यामुळे कोरोना विरुद्ध लढण्यात खूप मदत झाली आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे बनलेली शौचालयं असोत, तुम्ही जरा विचार करा, जेव्हा 2014 मधे तुम्ही मला निवडून संसदेत पाठवलं आणि मी जेव्हा तुमचे आभार मानण्यासाठी आलो होतो, तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. भरभरुन आशीर्वाद दिले होते. पण मी काय केलं, पहिल्याच दिवशी देण्याविषयी काहीच बोललो नाही, मी आपल्याकडेच मागितलं, काशीवासीयांकडे मागितलं, मी सार्वजनिकरित्या म्हटलं होतं की तुम्ही मला वचन द्या की आपण काशी स्वच्छ करु.

आज आपण पाहतो आहोत की काशी वाचवण्यासाठी आपण स्वच्छतेचं जे वचन मला दिलं होतं आणि काशीवासीयांनी स्वच्छतेसाठी ज्या खस्ता खाल्या, सातत्यानं प्रयत्न केले त्याचाच लाभ आज मिळत आहे. आयुष्मान भारत योजने अंतर्गत मोफत उपचाराची सुविधा देण्यात आली, ती ही यासाठी लाभदायक ठरली. उज्वला योजनेमुळे मिळालेले गॅस सिलेंडर असोत, जनधन बँक खाते, किंवा  फिट इंडिया अभियान, योग आणि आयुष आता जेव्हा संयुक्त राष्ट्रांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिवसाला संपूर्ण जगातून स्वीकृती मिळाली आणि  21 जून रोजी योग दिवस साजरा होऊ लागला, तेव्हा सुरुवातीला खूप थट्टा करण्यात आली, टीका झाली, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला परंतु आता संपूर्ण विश्वात कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगचे महात्म्य प्रचलित होत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात योग आणि आयुष प्रती जागरूकतेने लोकांचं बळ खूप वाढवलं आहे.

 

मित्रांनो,

महादेवाच्या कृपेनं बनारस आध्यात्मिक क्षमतांनी समृध्द शहर आहे. कोरोनाची पहिली लाट असो वा दुसरी इथल्या जनतेनं धैर्य आणि सेवा यांचा अद्भुत आदर्श घालून दिला आहे. काशीचे लोक, इथल्या सामाजिक संघटना, रुग्णांची, गरीबांची, ज्येष्ठांची सातत्याने कुटुंबातल्या एखााद्या सदस्‍याची करावी तशी सेवा करत आहेत. काळजी घेत आहेत. कुठल्याही कुटुंबाला खाण्याची चिंता करावी लागू नये, कोणत्याही गरीबाला औषधांची चिंता करावी लागू नये, यासाठी काशी शहरानं स्वत:ला समर्पित केलं आहे. संक्रमणाची साखळी तुटावी यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी पुढे येत आपली दुकानं बंद ठेवली आहेत.

या सर्व व्यापारी बांधवांनी आपल्या आर्थिक नफ्या-तोट्याची चिंता केली नाही, तर आपल्या संसाधनांसह ते सेवाकार्यात सक्रीय झालेत. तुमचा हा सेवाभाव कोणालाही भारावून टाकणाराच आहे.

मला माहिती आहे की माता अन्नपूर्णेची नगरी आणि या नगरीचा हा सहजभावच आहे. सेवा हाच एकप्रकारे इथल्या साधनेचा मंत्र आहे.

 

मित्रांनो,

तुमची तपस्या, आणि आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महामारीच्या या हल्ल्यापासून बऱ्याच प्रमाणात आपण स्वतःला सावरुन घेतलं आहे. पण यावर समाधान मानण्याची ही वेळ नाही. आपल्याला एक दीर्घ युद्ध लढायचं आहे. आता आपल्याला  बनारस आणि पूर्वांचलच्या ग्रामीण क्षेत्रातही खूप लक्ष द्यावं लागणार आहे.  आता आपला मंत्र काय असेल,  प्रत्येक  व्‍यवस्‍थेसाठी, प्रत्येक विभागासाठी , नवा मंत्र हाच आहे- ‘जहां बीमार वहीं उपचार’, अर्थात जिथे बीमार तिथे उपचार,  विसरु नका, ‘जिथे बीमार तिथे उपचार’. त्यांच्यापर्यंत उपचार घेऊन जाऊ तितका आपल्या आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल. यासाठी तुम्ही सगळ्या व्‍यवस्‍था ‘जिथे बीमार तिथे उपचार’ या सिद्धांतांवर लक्ष केंद्रीत करावं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मायक्रो-कंटेनमेंट झोन.  काशीने खूपच सफलतापूर्वक यावर लक्ष केंद्रित केलं आणि आता त्याचा फायदा होतो आहे. मायक्रो-कंटेनमेंट झोन बनवून ज्याप्रमाणे तुम्ही शहरात तसंच गावांमधे  घराघरात औषधं वाटत आहात, गावकऱ्यांपर्यंत तुम्ही वैद्यकीय किट पोहोचवलं आहेतट. हे खूपच चांगलं पाऊल आहे. हे अभियान शक्य होईल तितकं ग्रामीण भागात व्यापक करायचं आहे. डॉक्टर्स, प्रयोगशाळा आणि ई-विपणन कंपन्यांना एकत्र आणून ‘काशी कवच’ नावानं  टेली-मेडिसिनची सुविधा हा देखील काशीचा अभिनव प्रयोग आहे.

याचा लाभ प्रत्येक गावातल्या लोकांना मिळावा, यासाठी विशेष जागरूकता अभियानही राबवायला हवं. याचप्रकारे उत्तर प्रदेशातील अनेक ज्येष्ठ आणि युवा डॉक्टर्सही ग्रामीण भागात टेलीमेडीसीनच्या माध्यमातून सेवा करत आहेत. त्यांना सोबत घेऊन याला आणखी व्यापक करता येईल.  कोविड विरोधात गावांमधे सुरु असलेल्या लढाईत आपल्या आशा सेविका आणि  ANM  भगीनींची भूमिकाही खूप महत्वाची आहे. त्यांच्या क्षमता आणि अनुभवाचा अधिकाधिक लाभ घ्यायला हवा असं मला वाटतं.

 

मित्रांनो,

दुसऱ्या लाटेत आपण लसीची सुरक्षाही पाहिली आहे. लसीमुळे आघाडीवर काम करणारे आपले कर्मचारी निश्चिंत होऊन लोकांची सेवा करु शकत आहेत. हेच सुरक्षाकवच येणाऱ्या काळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचेल. आपली वेळ येईल तेव्हा लस नक्की घ्यायची आहे. कोरोना विरोधातली आपली लढाई जशी एक  सामूहिक अभियान झाली आहे, तसंच लसीकरणाला देखील सामूहिक जबाबदारी बनवायचं आहे.

 

मित्रांनो,

प्रयत्नांमधे जेव्हा संवेदनशीलता असते, सेवाभाव असतो, लोकांना होणाऱ्या त्रासाची जाण असते, वैज्ञानिक दृष्टिकोन असतो तेव्हा प्रत्यक्ष केलेलं काम सगळ्यांना दिसतं. मला आठवतं आधी पूर्वांचलमधे बालकांत मेंदूज्वराचा कहर झाला होता. मेंदूज्वरामुळे दरवर्षी हजारो बालकांचा मृत्यू होत असे. आणि तुम्हाला आठवत असेल आपले मुख्यमंत्री योगीजी, खासदार असताना ही समस्या संसदेत मांडताना धाय मोकलून रडले होते. तत्कालीन सरकारला ते याचना करत, या मुलांना वाचवा, हजारो बालकं मरत होते. वर्षानुवर्षं हे सुरु होतं. योगीजी संसदेत होते. त्यांनी प्रकरण लावून धरलं.  ते मुख्यमंत्री झाले आणि भारत सरकार तसंच राज्‍य सरकार यांनी मिळून मेंदूज्वराविरुद्ध मोठी मोहीम उघडली, तुम्हाला हे ठाऊकच आहे. मोठ्या प्रमाणावर आम्ही बालकांचे जीव वाचवण्यात यशस्वी झालो आहोत. बऱ्याच प्रमाणात या आजारावर नियंत्रण मिळवण्यात सफल झालो आहोत.  पूर्वांचलच्या लोकांना याचा खूप लाभ झाला आहे. इथल्या बालकांना लाभ झाला आहे. हे उदाहरण दाखवून देतं की  या प्रकारची संवेदनशीलता, सतर्कतेसह आपल्याला अविरत काम करायचं आहे. आपली लढाई एका अदृष्य आणि रुप बदलणाऱ्या धूर्त शत्रू विरुध्द आहे हे लक्षात ठेवायचे आहे. या लढाईत कोरोनापासून आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचं आहे. त्यासाठीही विशेष तयारी करायची आहे. मी, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो, तेव्हा लहान मुलांना कोरोना झाला तर काय काय करायला हवं, त्याबद्दलची व्यवस्था विकसित केली आहे अशी माहिती मुख्य सचिव तिवारीजी यांनी दिली. उत्तर प्रदेश सक्षमतेने आधीच यावर काम करत आहे, बरचसं काम सुरु झालं आहे हे जाणून घेतल्यावर मला खूप बरं वाटलं.

 

मित्रांनो,

आपल्या या लढाईत सध्या काळी बुरशी एक नवं आव्हान म्हणून पुढे उभी ठाकली आहे. यावर मात करण्यासाठी आवश्यक सावधानता आणि व्यवस्थेवर लक्ष देणं गरजेचं आहे. आताही मी तुमच्या बरोबर बोलत होतो तेव्हा याबाबत माझ्याकडे असलेली माहिती तुमच्या सोबत सामयिकही केली होती.

 

मित्रांनो,

दुसऱ्या लाटेत प्रशासनाने जी तयारी केली ती रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरही तशीच सुसज्ज ठेवायची आहे.  सोबतच, सतत  आकडेवारी आणि परिस्थितीवर लक्षही ठेवायचं आहे. बनारसमधे तुम्हाला जो अनुभव मिळाला त्याचा अधिकाधिक लाभ संपूर्ण पूर्वांचल आणि पूर्ण प्रदेशालाही मिळायला हवा. डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात या अनुभवांचं आदानप्रदान करावं असं मला वाटतं.

प्रशासनातल्या लोकांनीही आपले अनुभव आणि माहिती सरकारपर्यंत पोहचवावी जेणेकरुन भविष्यात याचा आणखी व्यापक लाभ मिळू शकेल. अन्‍य क्षेत्रातही आपली सर्वोत्तम सेवा पोहचू शकेल. मी सर्व लोकप्रतिनिधींना देखील सांगू इच्छितो, निवडून आलेल्या सर्वांना सांगू इच्छितो, आपण सगळे सतत काम करत राहा. ओझं खूप आहे. कधी कधी जनता जनार्दनाचा नाराजीचा सूरही ऐकावा लागतो.

पण मला विश्‍वास आहे की ज्या संवेदनशीलतेनं तुम्ही सहभागी झाला आहात, ज्या नम्रतेनं काम करत आहात, हे देखील जनसामान्यांसाठी औषधाचं काम करतं. म्हणूनच सर्व लोकप्रतिनिधींच्या या अभियानातील सहभाग आणि त्याचं नेतृत्व करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतो.

एकाही व्यक्तीला काही समस्या असेल तर लोकप्रतिनीधींनी त्याची काळजी घेणं ही त्याचीं जबाबदारी आहे हे आपण सुनिश्चित करायचं आहे. त्यास अधिकारी आणि सरकारपर्यंत पोहचवणं, त्याचं निराकरण करणं ही कामं पुढेही सुरु ठेवायची आहेत. मला विश्वास आहे, आपल्या सामूहीक प्रयत्नांनी लवकरच चांगले परिणाम दिसून येतील. आणि लवकरच बाबा विश्वनाथ यांच्या आशिर्वादाने काशी ही लढाई जिंकेल. मी आपल्या सगळ्यांच्या उत्तम आरोग्याची कामना करतो, बाबा विश्‍वनाथ यांच्या  चरणी प्रणाम करत प्रार्थना करतो कि सगळे निरामय निरोगी राहावेत, संपूर्ण मानवजातीचं कल्‍याण बाबा विश्‍वनाथ करतातच यासाठी कुठल्या एका भूभागाविषयी त्यांच्याकडे आर्जव करणं योग्य होणार नाही. तुम्ही आरोग्यपूर्ण राहावेत, तुमचे कुटुंबीय आरोग्यपूर्ण राहावेत कामनेसह, तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi