भारताचे प्राचीन वैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवलेल्या सरदार पटेल यांना केले नमन
विश्वनाथ ते सोमनाथ अशा विविध मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे केले स्मरण
धार्मिक पर्यटनात नव्या शक्यतांचा शोध घेत तीर्थयात्रा आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांची सांगड अधिक दृढ करणे ही प्रत्येक काळाची गरज- पंतप्रधान
दहशतीच्या पायावर साम्राज्य उभे करण्याचा विचार करणाऱ्या विघातक शक्ती कदाचित क्षणिक वरचढ ठरू शकतील मात्र त्यांचे अस्तित्व कदापि कायमस्वरूपी नाही, या शक्ती मानवतेला दीर्घ काळ दडपू शकत नाहीत. हे सत्य, काही हल्लेखोर सोमनाथ उध्वस्त करत असतानाही होते आणि आजच्या काळातही अशा मानसिकतेची जगाला धास्ती असतानाही तितकेच सत्य आहे- पंतप्रधान
कठीण समस्यांवर सलोख्याने तोडगा काढण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु. राम मंदिराच्या रूपाने आधुनिक भारताच्या वैभवाचा झळाळता स्तंभ येत आहे- पंतप्रधान
आमच्यासाठी इतिहासाचे सार आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मूलमंत्र - पंतप्रधान
कठीण समस्यांवर सलोख्याने तोडगा काढण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु. राम मंदिराच्या रूपाने आधुनिक भारताच्या वैभवाचा झळाळता स्तंभ येत आहे- पंतप्रधान
भारताचे प्राचीन वैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवलेल्या सरदार पटेल यांना केले नमन

जय सोमनाथ ! या कार्यक्रमात सहभागी झालेले आदरणीय लालकृष्ण आडवाणी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, श्रीपाद नाईक, अजय भट्ट, गुजरातचे मुख्यमंत्री विजय जी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन भाई, गुजरात सरकारचे  पर्यटन मंत्री जवाहर जी, वासन भाई, लोकसभेतले माझे सहकारी राजेशभाई, सोमनाथ मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी प्रवीण लाहिरी, भाविकजन, बंधू-भगिनींनो,

या पवित्र प्रसंगी मी दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झालो आहे, मात्र मनाने मी भगवान श्री सोमनाथांच्या चरणी असल्याचे अनुभवत आहे. सोमनाथ मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने या पुण्य स्थानाची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे हे माझे भाग्य आहे. आज पुन्हा एकदा आपण या पवित्र तीर्थस्थानाच्या कायाकल्पाचे साक्षीदार होत आहोत. समुद्र दर्शन पथ, सोमनाथ प्रदर्शन गॅलरी आणि जीर्णोद्धारानंतर नव्या स्वरूपातले जुने सोमनाथ मंदिर लोकार्पणाचे भाग्य आज मला लाभले आहे. त्याचबरोबर पार्वती माता मंदिराची पायाभरणीही झाली आहे. हा पवित्र योग आणि त्याचबरोबर श्रावण महिना, आपणा सर्वांसाठी भगवान सोमनाथ यांच्या आशीर्वादाची ही प्रचीती आहे असे मी मानतो. आपणा सर्वांना, ट्रस्टच्या सदस्यांना आणि भगवान सोमनाथांच्या देश परदेशातल्या कोट्यवधी भक्तांना मी या वेळी शुभेच्छा देतो. विशेष करून लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणी मी नमन करतो, ज्यांनी भारताचे प्राचीन वैभव पुनरुज्जीवित करण्याची इच्छाशक्ती दाखवली. सोमनाथ मंदिर स्वतंत्र भारताच्या मुक्त भावनेशी जोडलेले आहे असे सरदार साहेब मानत असत. आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, सरदार साहेबांचे प्रयत्न आपण पुढे नेत आहोत, सोमनाथ मंदिराला नवी भव्यता देत आहोत हे आपले भाग्य आहे. आज मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनाही प्रणाम करतो, ज्यांनी विश्वनाथ पासून ते सोमनाथ पर्यंत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पुरातन आणि आधुनिकता यांचा जो संगम त्यांच्या जीवनात होता त्यालाच आदर्श मानत देश आज पुढची वाटचाल करत आहे.

मित्रांनो,

स्टॅच्यू ऑफ यूनिटी आणि कच्छचे परिवर्तन यासारख्या उपक्रमातून, पर्यटनाला आधुनिकतेची जोड दिल्याने घडणारे परिवर्तन गुजरातने जवळून अनुभवले आहे. धार्मिक पर्यटनात नव्या शक्यतांचा शोध घेत तीर्थयात्रा आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांची सांगड अधिक दृढ करणे ही प्रत्येक काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत सोमनाथ मंदिरात देश आणि जगभरातले भाविक दर्शनासाठी येत असत, मात्र आता इथे समुद्र दर्शन पथ, प्रदर्शन, यात्रेकरू प्लाझा आणि शॉपिंग कॉप्लेक्सही पर्यटकांना आकर्षित करेल. आता इथे येणारा भाविक आकर्षक स्वरूपातल्या जुन्या सोमनाथ मंदिराचेही दर्शन घेतील, नव्या पार्वती मंदिराचेही दर्शन घेतील. यातून इथे नव्या संधी आणि नव्या रोजगारांची निर्मिती होईल आणि या स्थानाच्या महात्म्यात आणखी भर पडेल. इतकेच नव्हे तर प्रोमनेड सारख्या निर्मितीतून समुद्र किनारी असलेल्या आपल्या मंदिरांची सुरक्षाही अधिक वाढेल. आज इथे सोमनाथ प्रदर्शन गॅलरीचेही लोकार्पण झाले आहे. यामुळे आपल्या युवा वर्गाला, भावी पिढीला या इतिहासाशी नाळ जोडण्याची आपल्या श्रद्धा प्राचीन स्वरुपात पाहण्याची, जाणण्याची एक संधीही प्राप्त होईल.

मित्रांनो,

सोमनाथ ही शतकांपासून सदाशिवाची भूमी राहिली आहे. आपल्या पुराणात सांगितले आहे,

"शं करोति सः शंकरः"

म्हणजेच जो कल्याण, सिद्धी प्रदान करतो तो शिव आहे. हा शिव आहे जो विनाशातून विकासाचे बीज अंकुरित करतो आणि संहारातून सृजनाची निर्मिती करतो. म्हणूनच शिव अविनाशी आहे, अव्यक्त आहे आणि अनादी आहे आणि म्हणूनच भगवान शिव यांना अनादी योगी म्हटले गेले आहे. भगवान शिवावरची आपली श्रद्धा आपल्याला काळाच्या मर्यादेपलिकडे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते त्याच बरोबर काळाची आव्हाने पेलण्यासाठी आपल्याला सामर्थ्यही देते. सोमनाथ यांचे हे मंदिर आपल्या या आत्मविश्वासाचे एक प्रेरणा स्थळ आहे.

मित्रांनो,

आज जगातली कोणतीही व्यक्ती ही भव्य संरचना पाहते तेव्हा त्या व्यक्तीला केवळ मंदिरच नव्हे तर शेकडो, हजारो वर्षे प्रेरणा देणारे, मानवतेच्या मुल्यांचा गजर करणारे एक अस्तित्व त्यांना दिसून येते. एक असे स्थळ, ज्याला हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनींनी प्रभास क्षेत्र म्हणजे प्रकाशाचे, ज्ञानाचे क्षेत्र म्हटले होते आणि हे क्षेत्र आजही अवघ्या जगाला आवाहन करत आहे की असत्याने, सत्याचा पराजय कधीच होऊ शकत नाही. श्रद्धेला दहशतीने चिरडता येत नाही. या मंदिराचा शेकडो वर्षांच्या इतिहासात किती वेळा विध्वंस करण्यात आला, इथल्या मूर्ती खंडित करण्यात आल्या, याचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जितक्या वेळा याला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला तितक्याच वेळा ते उभेही राहिले. म्हणूनच भगवान सोमनाथ मंदिर आज भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक विश्वास आहे आणि एक आश्वासनही आहे. दहशतीच्या पायावर साम्राज्य उभे करण्याचा विचार करणाऱ्या विघातक शक्ती कदाचित क्षणिक वरचढ ठरू शकतील मात्र त्यांचे अस्तित्व कदापि कायमस्वरूपी नसते. या शक्ती मानवतेला दीर्घ काळ दडपू शकत नाहीत. काही हल्लेखोर सोमनाथ उध्वस्त करत असतानाही हे सत्य होते आणि आजच्या काळात अशा मानसिकतेची जगाला धास्ती असतानाही तितकेच सत्य आहे.

मित्रांनो,

आपणा सर्वाना माहित आहे की सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणापासून ते भव्य विकास हा प्रवास काही वर्षे किंवा काही दशकांचा परिणाम नव्हे. शतकांपासूनची दृढ इच्छाशक्ती आणि वैचारिक अखंडता यांचा हा परिपाक आहे. राजेन्द्र प्रसाद जी, सरदार वल्लभ भाई पटेल आणि  के.एम. मुन्शी यासारख्या महान व्यक्तींनी स्वातंत्र्यानंतरही आव्हानांना तोंड दिले. मात्र अखेर 1950 मध्ये सोमनाथ मंदिर आधुनिक भारताचा दिव्य स्तंभ म्हणून स्थापित झाले. कठीण समस्यांवर सलोख्याने तोडगा काढण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु आहे. राम मंदिराच्या रूपाने आधुनिक भारताच्या वैभवाचा झळाळता स्तंभ उभा होत आहे.

मित्रांनो,

इतिहासातून शिकवण घेऊन वर्तमान सुधारण्याची आपली मानसिकता असली पाहिजे. म्हणूनच मी ‘भारत जोडो चळवळ’याबाबत बोलतो तेव्हा त्यामागची भावना केवळ भौगोलिक किंवा वैचारिक जोडण्यापुरताच मर्यादित नाही. भविष्यात भारत निर्माणासाठी आपल्या भूतकाळाला जोडण्याचा संकल्पही आहे. याच आत्मविश्वासावर आपण भूतकाळातल्या भग्नावशेषांवर आधुनिक गौरव स्थान निर्माण केले आहे. राजेंद्र प्रसाद सोमनाथला आले तेव्हा त्यांनी म्हटले होते, ‘शतकापूर्वी भारत सोने आणि चांदीचे भांडार होता. जगातला सोन्याचा मोठा भाग भारतातल्या मंदिरातच असे. माझ्या दृष्टीकोनातून सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण त्या दिवशी पूर्ण होईल जेव्हा यावर विशाल मंदिरा बरोबरच समृध्द आणि संपन्न भारताचे भव्य भवन तयार झाले असेल. समृध्द भारताचे जे भवन, ज्याचे प्रतिक सोमनाथ मंदिर असेल'. आपले पहिले  राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांचे हे स्वप्न, आपणा सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे.

मित्रांनो,

आपल्यासाठी इतिहास आणि आस्था यांचे सार आहे -

'सबका साथसबका विकाससबका विश्वासआणि सबका प्रयास'

आपल्याकडे ज्या बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली आहे, त्यांची सुरुवात 'सौराष्ट्रे सोमनाथम्' सह  सोमनाथ मंदिरापासूनच होते. 'पश्चिमेकडील सोमनाथ आणि नागेश्वरपासून पूर्वेकडे बैद्यनाथ पर्यंत, उत्तरेत बाबा केदारनाथपासून भारताचे दक्षिणेकडील टोक श्री रामेश्वरपर्यंत, ही 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण भारताला एकमेकांशी जोडण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे, आपली चारधामची व्यवस्था, आपल्या 56 शक्तीपीठांची संकल्पना, आपल्या देशाच्या वेगवेगळ्या काना कोपऱ्यात वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची स्थापना, आपल्या श्रद्धेची ही रूपरेषा प्रत्यक्षात 'एक भारतश्रेष्ठ भारत' च्या भावनेची अभिव्यक्तीच आहे.

जगाला कित्येक शतकांपासून आश्चर्य वाटत राहिले आहे की एवढा वैविध्याने नटलेला भारत एकसंध कसा आहे, आपली एकजूट कशी आहे? मात्र जेव्हा तुम्ही पूर्वेकडून  हजारो किमी चालत पूर्व ते पश्चिम सोमनाथाचे दर्शन करणाऱ्या भाविकांना पाहता, किंवा दक्षिण भारतमधील हजारो भक्तांना काशी येथील माती मस्तकावर लावताना पाहता तेव्हा तुम्हाला जाणवते की भारताची ताकद किती आहे? आपण एकमेकांची भाषाही समजत नाही, वेशभूषा देखील वेगळी असते, खाण्यापिण्याच्या सवयीही वेगळ्या असतात, मात्र आपल्याला जाणवते की आपण एक आहोत. आपल्या या आध्यात्मिकतेने गेली अनेक शतके भारताला एकतेच्या सूत्रात बांधण्यात, परस्पर संवाद स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे आणि ती निरंतर मजबूत करत राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

मित्रांनो,

आज संपूर्ण जग भारताच्या योग, दर्शन, आध्यात्म आणि संस्कृतीकडे आकर्षित होत आहे. आपल्या नव्या पिढीतही आता आपल्या मुळांशी जोडले जाण्याबाबत नवीन जागरूकता निर्माण झाली आहे. म्हणूनच आपल्या पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन क्षेत्रात आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संधी आहेत. या संधी साकारण्यासाठी देश आज आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, प्राचीन गौरव पुनरुज्जीवित करत आहे. रामायण कालिन महत्व असलेल्या स्थळांना जोडणारे रामायण मंडल उदाहरण आपल्यासमोर आहे. आज देश विदेशातील कित्येक रामभक्तांना यया मंडलाच्या माध्यमातून भगवान राम यांची जीवनाशी संबंधित नवनवीन ठिकाणांची माहिती मिळत आहे. भगवान राम कसे संपूर्ण भारताचे राम आहेत, याची प्रचिती या ठिकाणी गेल्यावर अनुभवण्याची संधी मिळत आहे. त्याचप्रमाणे बुद्ध कालिन महत्व असलेल्या स्थळांना जोडणारे बुद्ध मंडल, जगभरातील बौद्ध अनुयायांना भारतात येण्याची, पर्यटन करण्याची सुविधा देत आहे. आज या दिशेने काम वेगाने सुरु आहे. याचबरोबर आपले पर्यटन मंत्रालय 'स्वदेश दर्शन योजने' अंतर्गत 15 निरनिराळ्या संकल्पनांवर पर्यटक सर्किट विकसित करत आहे. या सर्किट्समुळे देशातील अनेक उपेक्षित भागांमध्ये पर्यटन आणि विकासाच्या संधी निर्माण होतील.

मित्रांनो,

आपल्या पूर्वजांची दूरदृष्टि इतकी होती की त्यांनी दूर-सुदूर क्षेत्रांनाही आपल्या आस्थेशी जोडण्याचे काम केले, त्यांना आपलेपणाची जाणीव करून दिली. मात्र दुर्दैवाने जेव्हा आपण सक्षम झालो, जेव्हा आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने आली तेव्हा आपण या भागांना दुर्गम समजून त्यांना सोडून दिले. आपला पर्वतीय परिसर याचे खूप मोठे उदाहरण आहे. मात्र आज देश या पवित्र तीर्थक्षेत्रांमधील अंतर देखील मिटवत आहे. वैष्णोदेवी मंदिराच्या आजूबाजूचा विकास असेल, किंवा ईशान्येपर्यंत पोहचत असलेल्या उच्च तंत्राच्या पायाभूत सुविधा असतील, आज देशात आपल्यामधील अंतर कमी होत आहे. त्याचप्रमाणे, 2014 मध्ये अशाच प्रकारे तीर्थक्षेत्रे विकसित करण्यासाठी प्रसाद योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 40 प्रमुख तीर्थक्षेत्रे विकसित  केली जात आहेत, त्यापैकी 15 प्रकल्पांचे काम आधीच पूर्ण झाले आहे. गुजरातमध्ये 100 कोटींहून अधिक किमतीच्या तीन प्रकल्पांचे काम प्रसाद योजनेअंतर्गत सुरू आहे. गुजरातमध्ये सोमनाथ आणि अन्य पर्यटन स्थळे आणि शहरांना परस्परांशी जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटीवर  विशेष लक्ष दिले जात आहे. प्रयत्न हा आहे की जेव्हा पर्यटक एका ठिकाणी दर्शन करायला येतील तेव्हा इतर पर्यटक स्थळांनाही ते भेट देतील. त्याचबरोबर देशात 19 प्रमुख पर्यटक स्थळांची निवड करून ती विकसित केली जात आहेत. हे सर्व प्रकल्प आपल्या पर्यटन उद्योगाला आगामी काळात एक नवीन ऊर्जा देतील.

मित्रांनो,

पर्यटनाच्या माध्यमातून आज देश केवळ सामान्य माणसाला जोडत नाही तर स्वतःही पुढे मार्गक्रमण करत आहे. याचाच परिणाम आहे की  2013 मधील प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकातल्या 65 व्या स्थानावरून देशाने 2019 मध्ये 34 व्या स्थानावर झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी देशाने या 7 वर्षांमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय देखील घेतले, ज्याचा लाभ आज देशाला होत आहे. देशाने ई-व्हिसा व्यवस्था, व्हिसा ऑन अरायव्हलसारख्या व्यवस्था विकसित केल्या आहेत आणि व्हिसा शुल्क देखील कमी केले आहे. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्रात आदरातिथ्यासाठी लागणारा जीएसटी देखील कमी केला आहे. याचा पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होईल, आणि कोविडच्या प्रभावांमधून सावरण्यास मदत मिळेल. अनेक निर्णय पर्यटकांचे हित लक्षात घेऊन घेतले आहेत. उदा. अनेक पर्यटक जेव्हा येतात तेव्हा त्यांचा उत्साह काहीतरी साहस करण्याचा देखील असतो. हे ध्यानात घेऊन देशाने 120 पर्वत शिखरे ट्रेकिंगसाठी खुली केली आहेत. पर्यटकांची नवीन ठिकाणी गैरसोय होऊ नये, नवीन ठिकाणांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी देखील कार्यक्रम राबवून गाईड्सना प्रशिक्षण दिले जात आहे.  यामुळे मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत.

मित्रांनो,

आपल्या देशाच्या परंपरा आपल्याला कठीण काळात बाहेर पडून, वेदना विसरून पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आपण पाहिले देखील आहे, कोरोनाच्या या काळात पर्यटन लोकांसाठी आशेचा किरण आहे. म्हणूनच आपण आपल्या  पर्यटनाचे स्वरूप आणि संस्कृतीचा  नियमितपणे विस्तार करायचा आहे, पुढे जायचे आहे आणि स्वतःही पुढे जायचे आहे. मात्र त्याचबरोबर आपण हे देखील लक्षात घ्यायला हवे की आपण आवश्यक सावधगिरी बाळगत, आवश्यक सुरक्षेचा पूर्ण विचार करायला हवा. मला विश्वास आहे, याच भावनेसह देश पुढे जात राहील, आणि आपल्या परंपरा, आपला गौरव आधुनिक भारताच्या निर्मितीत आपल्याला दिशा दाखवत राहील. भगवान सोमनाथचा आपल्यावर कायम आशीर्वाद राहो, गरीबातील गरीब व्यक्तीचे कल्याण करण्यासाठी आपल्यात नवनवीन क्षमता, नवनवीन ऊर्जा मिळत राहो जेणेकरून सर्वांच्या कल्याणासाठी आपण  समर्पित भावनेने सेवा करण्याच्या माध्यमातून जन सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकू याच शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे खूप-खूप धन्यवाद!! जय सोमनाथ!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'

Media Coverage

'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi condoles loss of lives due to stampede at New Delhi Railway Station
February 16, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives due to stampede at New Delhi Railway Station. Shri Modi also wished a speedy recovery for the injured.

In a X post, the Prime Minister said;

“Distressed by the stampede at New Delhi Railway Station. My thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that the injured have a speedy recovery. The authorities are assisting all those who have been affected by this stampede.”