नमस्कार!
समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मित्रांनो, गुरू तेगबहादूर जी यांच्या चारशेव्या प्रकाश पर्वाच्या या बैठकीला उपस्थित राहण्याची मिळालेली संधी म्हणजे माझे अध्यात्मिक भाग्य थोर आहे आणि हे काम एक राष्ट्रीय कर्तव्यही आहे, असे मला वाटते. यामध्ये आपलेही काही योगदान असावे, म्हणजे एक प्रकारे गुरूकृपाच आपल्या सर्वांवर झालेली आहे. आपण सर्वजण देशाच्या सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आपल्या या प्रयत्नांना पुढे नेत आहोत, याचा मला आनंद वाटतो.
आत्ताच इथे गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष या नात्याने समितीच्या विचारांची माहिती आपल्यासमोर सादर केली आहे. ज्या काही शिफारसी, सल्ले आले आहेत, त्या सर्वांसमोर मांडल्या आहेत. कार्यक्रम सादरीकरणामध्येही संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांचे कार्यनियोजन स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या कार्ययोजनेमध्ये एक प्रकारची लवचिकता आहे. त्यामध्ये काही सुधारणा करणेही शक्य आहे. तसेच नवनवीन विचारांचा समावेश करणेही सहज शक्य आहे. तुम्हा सदस्यांकडूनही अतिशय बहुमूल्य सल्ले मिळाले आहेत. खूप उपयुक्त मौल्यवान सल्ले मिळाले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला या संधीचा लाभ घेताना आपल्या देशाचे जे मूळ चिंतन आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची खूप मोठी संधी यामुळे मिळणार आहे, ही गोष्टही महत्वाची आहे. तसे पाहिले तर आज इथे आलेले या समितीमधले सर्व माननीय सदस्य आहेत. मात्र सर्वांनाच आपले मत मांडण्याची संधी मिळू शकलेली नाही. मात्र मला पूर्ण विश्वास आहे की, सर्व माननीय सदस्य आपले विचार, मते लिखित स्वरूपामध्ये पाठवून देतील. त्यामुळे कार्यक्रम अधिक समृद्ध करता येईल. आणि अधिक कार्ययोजना करून वर्षभर हे काम पुढे नेणे शक्य होईल.
मित्रांनो,
गेल्या चार शताब्दीमध्ये भारताचा कोणताही एक कालखंड, कोणताही एक काळ असा नाही की, त्यावर गुरू तेगबहादूर यांचा प्रभाव नाही. त्यांच्या प्रभावाविना काळाची आपण कल्पनाही करू शकत नाही. नववे गुरू म्हणून आपण सर्वजण त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. आपल्या सर्वांना त्यांच्या जीवनातल्या टप्प्यांची पूर्ण कल्पना आहे, त्यांच्या कार्याचा आपल्याला परिचय आहे. मात्र देशाच्या नवीन पिढीला त्यांच्याविषयी माहिती देणे, त्यांचे महान कार्य समजून सांगणेही तितकेच गरजेचे आहे.
मित्रांनो,
गुरूनानक देवजी यांच्यापासून ते गुरू तेगबहादूर जी आणि मग गुरू गोविंद सिंह जी पर्यंत, आपली शीख गुरू परंपरा, स्वतःच एक संपूर्ण जीवन दर्शन आहे. गुरू नानकदेव जी यांचे 550 वे प्रकाश पर्व, गुरू तेगबहादूर यांची 400 वी जयंती आणि गुरू गोविंद सिंह जी यांचे 350 प्रकाश पर्व साजरे करण्याची संधी आमच्या सरकारला मिळाली आहे. संपूर्ण विश्वामध्ये जर जीवनाची सार्थकता म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या गुरूंच्या जीवनाकडे पहावे आणि त्यांचे कार्य जाणून घ्यावे. त्यांच्या जीवनामध्ये आयुष्याची सार्थकता सहजतेने दिसून येते. त्यांच्या जीवनामध्ये सर्वोच्च त्यागही होता आणि सहिष्णुताही होती. त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश होता तसेच अध्यात्मिक उंचीही होती.
मित्रांनो,
गुरू तेगबहादूर जी यांनी म्हटले आहे – सुखु दुखु दोनो सम करि, जानै अउरू मानु अपमान।।
याचा अर्थ असा आहे की, सुख-दुःख, मान-अपमान अशा सर्व काळामध्ये एकसमान राहून आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. त्यांनी जीवनाचा उद्देश काय असावा, हे सांगितले आहे आणि त्याचा मार्गही दाखवला आहे. त्यांनी आपल्याला राष्ट्र सेवेबरोबरच जीवसेवा करण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यांनी समानता, समरसता आणि त्याग यांचा मंत्र आपल्याला दिला आहे. हे मंत्र ते स्वतः जगले आता त्यांचा हा मंत्र लोकां-लोकांपर्यंत पोहोचविणे आता आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
मित्रांनो,
ज्याप्रमाणे आज इथे चर्चा झाली, त्याप्रमाणे 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त संपूर्ण वर्षभर देशामध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले गेले पाहिजेत आणि विश्वामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शीख परंपरेबरोबर जाडले गेलेली जितकी तीर्थ स्थाने आहे, जी जी श्रद्धास्थाने आहे, ते सर्व या कार्यक्रमांना अधिक शक्ती प्रदान करतील. गुरू तेगबहादूर जी यांचे ‘शबद’ त्यांच्या रागांचे भजन, त्यांच्या संदर्भातील साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यामुळे लोकाना प्रेरणा मिळेल. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला तर, हा संदेश संपूर्ण विश्वामध्ये, नवीन पिढीपर्यंत सहजतेने पोहोचवता येईल आणि मला आनंद वाटतो की, आज बहुतांश सदस्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ही गोष्ट म्हणजे बदलेल्या भारताचे एक प्रतिबिंब आहे, असे म्हणता येईल. या कार्यक्रमासाठी करण्यात येणा-या सर्व प्रयत्नांमध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्याबरोबर जोडले पाहिजे.
मित्रांनो,
या संपूर्ण आयोजनामध्ये आपल्याला गुरू तेगबहादूर जी यांच्या जीवन आणि शिकवणुकीबरोबरच सगळ्या गुरू परंपरेची माहिती विश्वामध्ये पोहोचवली पाहिजे. संपूर्ण दुनियेत आज शीख समुदायाचे लोक, आणि आपल्या गुरूंचे कोट्यवधी अनुयायी त्यांच्या पदचिन्हांवरून वाटचाल करीत आहेत. शीख समाज कशा पद्धतीने इतक्या प्रचंड प्रमाणावर मोठमोठी सेवाकार्य करीत असतो, आपल्या गुरूव्दारांमध्ये मानव-सेवेचे जागरण केंद्र कसे कार्यरत असते. हा संदेश आपण संपूर्ण विश्वातल्या लोकांपर्यंत घेऊन गेलो तर आपण मानवतेला खूप मोठी प्रेरणा देऊ शकणार आहे. मला असे वाटते की, याविषयी शोधकार्य करून त्याचे दस्तावेजीकरणही केले जावे. आपण आज जे प्रयत्न करू, ते आपल्या आगामी पिढीला पथदर्शक ठरणार आहेत. हीच गुरू तेगबहादूर जींसह सर्व गुरूंच्या चरणी आपली खरी श्रद्धांजलीही ठरणार आहे. एक प्रकारे ही एक कार्यांजलीही ठरेल. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, या महत्वपूर्ण पर्वाच्या काळामध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा होत आहे. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत. मला विश्वास आहे की, गुरूंच्या आशीर्वादाने आपण आपल्या सर्व आयोजनांमध्ये जरूर यशस्वी होऊ. आपण सर्वांनी खूप उत्तम सल्ले, शिफारसी सादर केल्या आहेत, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आणि आगामी काळामध्ये आपल्या सर्वांकडून सक्रिय सहयोग मिळेल अशी अपेक्षा करतो. ही महान परंपरा आगामी पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण खूप मोठे योगदान द्याल, याचा विश्वास आहे. या पवित्र पर्वामध्ये मी गुरूंच्या सेवेचे जे आपल्याला सौभाग्य मिळाले आहे, ते आपला गौरव आहे, असे मानतो.
या शुभेच्छांसह आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद !!