महोदय,
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे हार्दिक अभिनंदन करतो. परवडण्याजोग्या, सहज उपलब्ध होण्याजोग्या आणि गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवे बाबतच्या आमच्या ठाम दृढ निश्चयाची यातून प्रचिती मिळत आहे. कोविड साथीदरम्यान आम्ही इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी ‘क्वाड लसीकरण उपक्रम’ राबवला होता आणि मला हे सांगताना आनंद होतो आहे की क्वाड च्या माध्यमातून आम्ही सर्व्हायकल कॅन्सर सारख्या समस्यांचा एकत्र येऊन सामना करायचा निर्णय घेतला आहे.
कर्करोगांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे. कर्करोगासारख्या आजाराचा भार कमी करण्यासाठी प्रतिबंध, चाचण्या, निदान आणि उपचारांच्या एकात्मिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. भारतात अत्यंत मोठ्या प्रमाणावर किफायतशीर दरात सर्व्हायकल कॅन्सर चाचणी कार्यक्रम सुरू आहे. त्यासोबतच भारतात जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना राबवण्यात येत आहे. आणि सर्वांना किफायतशीर दरात औषधे उपलब्ध करण्याकरता विशेष केंद्र देखील उभारण्यात आली आहेत. भारताने सर्व्हायकल कॅन्सरवर आपली लस सुद्धा बनवली आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नवीन उपचार शिष्टाचार नियमावली सुद्धा राबवण्यात आली आहे.
महोदय,
भारत आपला अनुभव आणि कौशल्य सामायिक करण्यासाठी तत्पर आहे. कर्करोग उपचारासंबंधी काम करत असणारे भारतातले अनेक तज्ञ या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत. ‘एक वसुंधरा एक आरोग्य, हा भारताचा दृष्टिकोन आहे. याच भावनेतून आपण क्वाड मूनशॉट उपक्रमाच्या अंतर्गत 75 लाख डॉलरच्या नमुना उपकरणे तपास उपकरणे आणि लस यांच्या माध्यमातून सहकार्य करण्याची घोषणा करीत आहोत. रेडिओ थेरपी उपचार आणि क्षमता बांधणीतही भारत आपले सहकार्य करेल.
मला आनंद होत आहे की इंडो पॅसिफिक देशांसाठी GAVI तसेच QUAD उपक्रम अंतर्गत भारतातून चार कोटी लसींच्या माध्यमातून योगदान दिले जाणार आहे. या चार कोटी लसीमुळे कोट्यावधी लोकांच्या जीवनात आशेचे किरण निर्माण होतील. आपण पाहतच आहात की जेव्हा क्वाड कार्यरत होते तेव्हा ते फक्त देशांसाठी नसून लोकांसाठीचे कार्य असते. हे आपल्या मानव केंद्रित दृष्टिकोनाचे खरे सार आहे.
धन्यवाद.