वणक्कम,
तामिळनाडूचे राज्यपाल आणि या विद्यापीठाचे कुलपती बनवारीलाल पुरोहित, कुलगुरु सुधा शेषय्यन, व्याख्याते आणि प्राध्यापक वृंद, कर्मचारीवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो,
आज या वैद्यकशास्त्राच्या विद्यापीठाचा 33 वा दीक्षांत समारंभ होत असून, आपल्या सर्वांना विविध वैद्यकीय, दंतवैद्यक, आयुष आणि निमवैद्यकीय शाखांच्या सर्व विद्यार्थ्यांन पदवी आणि पदविका प्रदान करण्याच्या समारंभाला उपस्थित राहणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.
मला असे सांगण्यात आले आहे की, आज इथे 21 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका दिल्या जाणार आहेत. मात्र याठिकाणी एका वस्तुस्थितीचा मला विशेष उल्लेख करायचा आहे. या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार, 30 टक्के विद्यार्थी आहेत तर 70 टक्के विद्यार्थिनी आहेत. मी सर्वच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो, मात्र त्यासोबतच, विद्यार्थिनींच्या या यशाचे मला विशेष कौतुक वाटते. कोणत्याही क्षेत्रात, महिलांना आघाडीवर जबाबदाऱ्या सांभाळतांना बघणे विशेष असते, तो आपल्या सर्वांसाठी अभिमान आणि आनंदाचा क्षण असतो.
मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे आणि या संस्थेचे हे यश पाहून एमजीआर आज अत्यंत समाधानी झाले असते.
त्यांच्या सरकारला गरिबांप्रती खूप कळवळा होता. आरोग्य, शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण हे विषय त्यांच्या जिव्हाळयाचे विषय होते. काही वर्षांपूर्वी, मी श्रीलंकेत गेलो होतो, जिथे एमजीआर यांचा जन्म झाला होता. श्रीलंकेतील आपल्या तामिळ बंधू आणि भगिनींना आरोग्य क्षेत्रातल्या सेवा पुरवणे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. भारताने दिलेली मोफत रुग्णवाहिका सेवा तिथे तामिळ समुदायासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. डीक्कोया येथील रुग्णालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मी कधीही विसरणार नाही. हे अत्यंत आधुनिक रुग्णालय असून, अनेकांना त्याचा लाभ मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रातील हे काम, ते ही विशेषत्वाने तमिळ समुदायासाठीचे काम बघून एमजी आर यांना आनंद झाला असता.
विद्यार्थी मित्रांनो,
आता तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या एका टप्प्याकडून दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याकडे प्रवास करणार आहात, हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही लर्निंग पासून हिलिंगकडे, म्हणजेच मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या वेदना दूर करण्यासाठी करणार आहात. आता परीक्षेत मार्क्स मिळवण्याच्या प्रवासातून तुमचे स्थित्यंतर आता समाजात आपल्या कार्याचा मार्क म्हणजेच ठसा उमटवण्याकडे होणार आहे.
मित्रांनो,
कोविड-19 महामारी संपूर्ण जगासमोर अनपेक्षितपणे आलेले एकदम नवे संकट होते. त्यामुळे, कशासाठीही निश्चित असा फॉर्म्युला नव्हता. अशा स्थितीत भारताने केवळ आपला नवा मार्ग तयार केला नाही, तर इतरांनाही त्या मार्गावर चालण्यासाठी मदत केली. भारतात कोरोनाचा मृत्यू दर सर्वात कमी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर उत्तम आहे. भारत संपूर्ण जगासाठी औषधे बनवीत आहे आणि आता लसही तयार करत आहे. आज जेंव्हा भारतातील वैद्यकशास्त्र, वैद्यकीय व्यावसायिक, शास्त्रज्ञ आणि औषध निर्माण क्षेत्राविषयी जगभरात कौतुक आणि आदराची भावना व्यक्त होत आहे, अशा वेळी तुम्ही सगळे पदवीधर होत आहात. आज जगभरात भारताच्या आरोग्य व्यवस्थेकडे वेगळ्या नजरेने, आदरपूर्वक आणि विश्वासार्हतेणे पाहिले जात आहे. मात्र, याचाच दुसरा अर्थ हा ही आहे की जगाला आता आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि ही जबाबदारी तुम्हा सर्वांच्या युवा आणि भक्कम खांद्यांवर आहे. कोरोना महामारीमुळे मिळालेला धडा आपल्याला क्षयरोगासारख्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी देखील उपयुक्त ठार शकेल.
मित्रांनो,
तिरुवल्लुवर म्हणाले होते: रुग्ण, डॉक्टर, औषधे आणि सुश्रुषा करणारे, हे चारही घटक मिळून उपचार पूर्ण होत असतात. कोरोना महामारीच्या संपूर्ण काळात आणि समाजाची घडी विस्कळीत झाली असतांनाही हे चार स्तंभ या अज्ञात विषाणूविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर होते. ज्या सर्वांनी या विषाणूशी लढा दिला, ते मानवतेचे ‘हिरो’ ठरले.
मित्रांनो,
आम्ही आता वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करणार आहोत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामुळे या क्षेत्रात पूर्ण पारदर्शकता येईल. नवी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठीच्या नियमांमध्ये देखील हा आयोग तर्कसंगतता आणणार आहेत. तसेच या क्षेत्रातील मनुष्यबळाची गुणवत्ता आणि उपलब्धता देखील सुधारली जाईल. गेल्या सहा वर्षात, एमबीबीएस च्या जागा 30 हजारांपेक्षा जास्त ने वाढल्या आहेत. 2014 पासून या जागांमध्ये 50% टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच पदव्युत्तर जागाही 24 हजारांनी वाढल्या आहेत, 2014 नंतर या जागा 80 टक्क्यांनी वाढल्या. 2014 साली देशात केवळ 6 एम्स होते. गेल्या सहा वर्षात आम्ही आणखी 15 एम्सना मंजुरी दिली आहे. तामिळनाडू नेहमीच वैद्यकीय शिक्षणासाठीच ओळखले जाते. राज्यातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी आमच्या सरकारने तामिळनाडूत आणखी 11 वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिली आहे. ज्या जिल्ह्यात एकही वैद्यकीय महाविद्यालय नाही, तिथे ही नवी महाविद्यालये स्थापन केली जातील. या प्रत्येक महाविद्यालयासाठी केंद्र सरकार 2 हजार कोटी रुपये देईल.
सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केली असून त्यासाठी 64 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे देशातील प्राथमिक, दुय्यम आणि जिल्हास्तरीय (प्रादेशिक) आरोग्य क्षमतांमध्ये सुधारणा होईल तसेच नवे आजार ओळखणे आणि ते बरे करण्याची मजबूत यंत्रणा तयार होईल. आपली आयुष्मान भारत योजना ही जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून या अंतर्गत 50 कोटी लोकांना सुमारे 1600 आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी मदत मिळते आहे.
जन औषधी केंद्रांमध्ये आज 7000 पेक्षा अधिक औषधे रूग्णांसाठी अत्यंत माफक दारात उपलब्ध आहेत. स्टेंट आणि गुडघा शस्त्ररोपण देखील अत्यंत माफक दारात उपलब्ध करण्यात आले असून गरीब रुग्णांना त्याचा विशेष लाभ होतो आहे.
मित्रांनो,
डॉक्टर्स हे देशातल्या सर्वाधिक आदरार्थी व्यावसायिकांपैकी एक मानले जातात, आज या महामारीनंतर तर हा आदर अधिकच वाढला आहे. आणि हा आदर यासाठी दिला जातो कारण आपल्या व्यवसायाचे गांभीर्य- अगदी अनेकदा जिथे कोणाच्या तरी जीवन-मरणाचा प्रश्न तुमच्यापुढे असतो- ते गांभीर्य लोकांना माहिती आहे. मात्र, ‘गंभीर असणे’ आणि ‘गंभीर दिसणे’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझी तुम्हा सर्वांन विनंती आहे की या व्यवसायातही तुमची विनोदाची जाण कायम ठेवा. त्यामुळे तुम्ही तुमच्या रूग्णांना आनंदी ठेवू शकाल, त्यांचे मनोधैर्य वाढवू शकाल. मी असे काही डॉक्टर्स पाहिले आहेत जे व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत निष्णात आहेत, मात्र त्याचवेळी रुग्णांशी, रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारून ते रूग्णालयातले वातावरण आनंदी ठेवतात. यामुळे लोकांनाही आशा निर्माण होते आणि रुग्ण बरे होण्यासाठी अशी सकारात्मक आशा अत्यंत महत्वाची असते आणि आपली दिलखुलास वृत्ती कायम ठेवून तुम्हाला तुमची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीही कायम राखता येईल, अशा गंभीर व्यवसायातही तुम्ही तणावमुक्त आयुष्य जगू शकाल. तुम्ही ते लोक आहात जे देशाच्या आरोग्याची काळजी घेणार आहात, आणि ते तुम्ही तेंव्हाच करू शकाल जेंव्हा तुम्ही स्वतःचे शरीर आणि आरोग्य उत्तम राखू शकाल. त्यासाठी, योग, ध्यानधारणा, धावणे, सायकलिंग अशा फिटनेस च्या सवयी स्वतःला लावून घ्या. यातूनच तुमचे कल्याण होणार आहे.
मित्रांनो,
स्वामी विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस म्हणत असत- “शिव ज्ञाने जीव सेवा” याचा अर्थ, जनसेवा हीच शिव म्हणजे देवाची सेवा आहे. आणि जर कोणाला या अमृतासमान कल्पनेला प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची संधी मिळत असेल तर ते वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. तुमच्या दीर्घ कारकीर्दीत, तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या तर प्रगती करालच, त्याशिवाय, आपली स्वतःची उन्नती साधायला कधीही विसरू नका. वैयक्तिक स्वार्थापलीकडे विचार करायला शिका. असे करण्याने तुम्ही निर्भय बनाल.
मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे या पदवीबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन ! या सोबतच, मी माझे भाषण संपवतो आणि तुम्हा सर्वांना एक ध्येयरत, उत्तम आणि आव्हानात्मक कारकीर्द लाभो अशा शुभेच्छा देतो.
धन्यवाद !