माझ्या प्रिय देशबांधवांनो,
स्वातंत्र्यदिनाच्या या पवित्र प्रसंगी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे भारतमातेच्या लाखो मुलामुलींचे त्याग, बलिदान, आणि भारतमातेला स्वतंत्र बनवण्याप्रती त्यांचा संकल्प, अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे, स्वातंत्र्यवीरांचे, नरवीरांना, शहीदांना वंदन करण्याचे हे पर्व आहे. आपले सैन्यातील शूर जवान, निमलष्करी जवान, पोलीस, सुरक्षा दलाशी संबंधित प्रत्येकजण, भारतमातेच्या रक्षणात सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात, आज त्या सर्वांना हृदयपूर्वक, आदरपूर्वक स्मरण करण्याचा, त्यांच्या महान त्याग तपस्येला वंदन करण्याचे पर्व आहे.
आणखी एक नाव – अरविंद घोष, क्रांतीदूत ते अध्यात्म यात्रा, आज त्यांची जन्म जयंती आहे. त्यांचा संकल्प पूर्ण करायचा, आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. त्यांचे आशीर्वाद कायम आपल्याबरोबर राहोत. आज आपण विशिष्ट परिस्थितीतून जात आहोत. आज छोटी मुले माझ्यासमोर दिसत नाहीत. आपले उज्वल भविष्य, कोरोनाने सर्वांना रोखले आहे.
या कोरोना कालावधीत लक्षावधी कोविड योद्धे, डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील, सफाई कामगार असतील, रुग्णवाहिका चालवणारे असतील, कुणाकुणाची नावे घेऊ, ज्यांनी इतका दीर्घकाळ ज्याप्रकारे ‘सेवा परमो धर्म:’ हा मंत्र जगून दाखवला. पूर्ण समर्पण भावनेने भारतमातेच्या सुपुत्रांची सेवा केली आहे, अशा सर्व कोरोना योद्धयांना मी आज नमन करतो. या कोरोना काळात आपले अनेक बंधू भगिनी प्रभावित झाले. अनेक कुटुंबे प्रभावित झाली. अनेकांनी आपले प्राण गमावले. त्या कुटुंबीयांप्रती मी संवेदनशीलता व्यक्त करतो. आणि या कोरोना विरुद्ध मला विश्वास आहे १३० कोटी लोकांची अगम्य इच्छाशक्ती, संकल्पशक्ती विजय मिळवून देईल. आपण विजयी होऊ.
गेल्या काही दिवसात आपण एकप्रकारे अनेक संकटाना आपण सामोरे जात आहोत. पुराचा प्रकोप, विशेषतः पूर्व भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारतात, कुठे दरडी कोसळल्यात, अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेकांनी आपले प्राण गमावले. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकारांबरोबर खांद्याला खांदा भिडवून अशा संकटाच्या काळात नेहमी देश एक बनून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल, तात्काळ जितकी मदत करता येईल तेवढी यशस्वीपणे करत आहोत. स्वातंत्र्याचे पर्व आपल्यासाठी स्वातंत्र्याचे पर्व आहे, स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करत नवसंकल्पांसाठी ऊर्जाची संधी असते, एक प्रकारे आपल्यासाठी नवी प्रेरणा घेऊन येते. नवा उमंग आणि नवा उत्साह घेऊन येतो. आणि यावेळी संकल्प करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि शुभ प्रसंग देखील आहे. कारण पुढल्या वर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू तेव्हा आपण ७५ व्या वर्षात पदार्पण करू. ही खूप मोठी संधी आहे. म्हणूनच पुढल्या दोन वर्षांसाठी खूप मोठे संकल्प आपल्याला करायचे आहेत. १३० कोटी लोकांना करायचे आहेत. ७५ व्या वर्षात प्रवेश करू, जेव्हा ७५ वर्षे पूर्ण करू तेव्हा संकल्पपूर्तीचे महापर्व म्हणून साजरे करू. आपल्या पूर्वजांनी अखंड एकनिष्ठ तपस्या करून, त्याग आणि बलिदानाची उच्च भावना प्रस्थापित करून आपल्याला ज्याप्रकारे स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यांनी झोकून दिले आपण हे विसरू नये की गुलामगिरीच्या इतक्या प्रदीर्घ काळात एकही क्षण असा नव्हता, सेवा एकही क्षेत्र असे नव्हते जेव्हा स्वातंत्र्याची इच्छा नव्हती, स्वातंत्र्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही, त्याग केला नाही, एकप्रकारे तारुण्य तुरुंगात व्यतीत केले, जीवनातील सर्व स्वप्नांची फाशीवर जाताना आहुती दिली. अशा वीरांना नमन करताना आणि मग एकीकडे सशक्त क्रांती, दुसरीकडे राष्ट्र जागरणाबरोबर जन आंदोलनाला नवी ऊर्जा दिली आणि आपण स्वतंत्र भारताचे पर्व साजरे करू शकलो. या लढाईत या स्वतंत्र भारताचा आत्मा कुचलण्याचे अगणित प्रयत्न झाले. भारताला आपली संस्कृती, परंपरा रीती रिवाज उखडून टाकण्यासाठी काय झाले नाही. शेकडो वर्षांचा कालखंड होता, साम, दाम, दंड, भेद सर्वोच्च पातळीवर होते. काही असे मानत होते कि, ‘यावत् चंद्र दिवाकरौ’ आम्ही इथे राज्य करायला आलो आहोत. मात्र स्वातंत्र्याच्या निर्धाराने त्यांचे सर्व मनसुबे जमीनदोस्त केले. इतका विशाल देश, अनेक राजेरजवाडे , अनेक खानपान, अनेक भाषा किती विविधतेने नटलेला देश कधी एक होऊन स्वातंत्र्यलढा देऊ शकत नाही , मात्र या देशाची प्राणशक्ती ते ओळखू शकले नाहीत. अंतर्भूत जी प्राणशक्ती आहे, जिने एका सूत्रात आपल्याला बांधून ठेवले आहे. जेव्हा तो पूर्ण ताकदीने मैदानात विस्तारवादाच्या विचारसरणीने जगभरात जिथे जिथे जाता येईल तिथे तिथे पसरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचे स्वातंत्र्य आंदोलन जगासाठी देखील प्रेरणा कुंज बनले. दीपस्तंभ बनले. जगभरातही स्वातंत्र्याची झलक दिसली. जे लोक विस्तारवादाच्या मागे होते त्यांनी विस्तारवादाचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी जगावर दोन महायुध्ये लादली, जगाला उध्वस्त केले, मानवतेला हानी पोहचवली. मात्र अशा कालखंडातही युद्धाच्या काळातही भारताने आपल्या स्वातंत्र्याची पकड घट्ट ठेवली. कमी होऊ दिली नाही. गरज भासली तेव्हा बलिदान देत राहिला. कष्ट करत राहिला. जन आंदोलन उभे करण्याची गरज भासली तेव्हा जन आंदोलन उभे केले. भारताच्या लढाईने जगभरात स्वातंत्र्यासाठी वातावरण तयार केले. भारताच्या शक्तीमुळे जगात जो बदल झाला, विस्तारवादाला आव्हान निर्माण केलं इतिहास ते कधी नाकारू शकत नाही.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
स्वातंत्र्याच्या लढाईत भारताने पूर्ण जगात आपली एकजुटतेची, सामूहिकतेची ताकद दाखविली. आपल्या उज्वल भविष्याप्रती संकल्प प्रेरणा, ऊर्जा घेऊन देश पुढे जात राहिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १३० कोटी भारतीयांनी संकल्प केला, आत्मनिर्भर भारत बनण्याचा. आत्मनिर्भर भारत आज सगळ्या भारतीयांच्या मनात मस्तिष्कात रुजला आहे. आज सगळीकडे त्याची छाप आहे. आत्मनिर्भर भारत आज १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आपल्याला माहित आहे जेव्हा मी आत्मनिर्भर बाबत बोलतो तेव्हा २५-३० वर्षांवरचे नागरिक असतील, त्यांनी आपल्या घरात ऐकले असेल, मुले २०-२१ वर्षांवरची असतील तर ते आपल्या पायांवर उभे राहण्याची अपेक्षा करतील. आपण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या काळापासून एक पाऊल दूर आहोत. भारतालाही आपल्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या लढ्यात यशस्वी होईल.
भारताला आत्मनिर्भर बनणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे ते देशासाठी देखील आवश्यक आहे. म्हणूनच मला विश्वास आहे ,भारत हे स्वप्न साकार करू शकेल. या देशाच्या नागरिकांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, देशाच्या प्रतिभेचा अभिमान आहे, मला देशाच्या युवकांमधील, महिलांमधील सामर्थ्यावर विश्वास आहे. भारताची विचारसरणी, दृष्टिकोन यावर विश्वास आहे. इतिहास साक्ष आहे. भारत जे ठरवतो ते करून दाखवतो. आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारत-बाबत जगाला उत्सुकता आहे
भारताकडून अपेक्षा आहेत. म्हणूनच या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला पात्र बनवणे खूप आवश्यक आहे. स्वतःला तयार करणे आवश्यक आहे. भारतासारखा विशाल देश, युवा शक्तीने भरलेला देश, आत्मनिर्भर भारताची पहिली अट असते, आत्मविश्वासाने भरलेला भारत , त्याचा हाच पाया असतो. आणि त्यातच विकासाला नवी ऊर्जा देण्याचे सामर्थ्य असते. भारत विशेष परिवारांच्या संस्कारानी वाढलेला आहे. जे वेद म्हणायचे ‘वसुधैव कुटुंबकम’ तर विनोबाजी भावे म्हणायचे ‘जय जगत’. म्हणूनच जग हे आपल्यासाठी एक कुटुंब आहे. म्हणूनच आर्थिक विकास देखील व्हायला हवा आणि त्याचबरोबर मानव आणि मानवतेचे महत्व असायला हवे हे लक्षात घेऊनच आपण मार्गक्रमण करत आहोत.
आमच्यासाठी जग एक परिवार आहे म्हणूनच आर्थिक विकासा बरोबरच मानव आणि मानवता ही केंद्रस्थानी राहायला हवी. त्याचे महत्व असायला हवे.आज जग परस्पराशी जोडलेले आहे. आज जग एकमेकावर अवलंबून आहे,म्हणूनच काळाची गरज आहे,की जागतिक अर्थव्यवस्थेत भारतासारख्या विशाल देशाचे योगदान वाढले पाहिजे. विश्व कल्याणाप्रती भारताचे कर्तव्य आहे, आणि भारताला आपले योगदान वाढवायचे असेल तर भारताला स्वतःला सशक्त व्हावे लागेल,भारताला आत्म निर्भर व्हावे लागेल,आपल्याला जगाच्या कल्याणासाठीही, स्वतःला सामर्थ्यवान करावेच लागेल.आपली मुळे जेव्हा मजबूत असतील, आपले सामर्थ्य असेल तेव्हा आपण जगाचे कल्याण करण्याच्या दिशेने पावले उचलू शकतो. आपल्या देशात अथांग नैसर्गिक संपत्ती आहे,काय नाही आपल्याकडे, आज काळाची गरज आहे की आपल्या या नैसर्गिक संपत्तीमध्ये आपण मूल्यवर्धन करायला हवे,आपण आपल्या मानव संपदेत मूल्यवृद्धी करायला हवी,नवी शिखरे गाठायला हवीत आपण कुठपर्यंत कच्चा माल विदेशात पाठवत राहणार आहोत… कच्चा माल विदेशात पाठवायचा आणि तयार माल देशात परत आणायचा ? हा खेळ कधीपर्यंत चालणार ? आणि म्हणूनच आपल्याला आत्म निर्भर व्हायचे आहे. आपल्या प्रत्येक शक्तीवर, जागतिक आवश्यकते अनुसार मूल्यवृद्धी करायची आहे,ही आपली जबाबदारी आहे हे मूल्यवर्धन करण्याच्या दिशेने आपल्याला पुढे जायचे आहे. जगासाठी योगदान देण्यासाठी आम्ही पुढे जाऊ इच्छितो. त्याच प्रकारे कृषीक्षेत्र. एक काळ होता जेव्हा आपण बाहेरून गहू मागवून आपला उदरनिर्वाह करत होतो, मात्र आपल्या देशाच्या शेतकऱ्यानी कमाल करून दाखवली, भारत आज कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर भारत झाला आहे.आज भारताचा शेतकरी, भारताच्याच नागरिकांचे पोट भरतो असे नव्हे तर आज भारत अशा स्थितीमध्ये आहे की जगात ज्याला आवश्यकता आहे त्यालाही आपण अन्न देऊ शकतो. आपली ही शक्ती आहे, आत्म निर्भरतेचीही ही ताकद आहे, आपल्या कृषी क्षेत्रातही मूल्यवृद्धी आवश्यक आहे.जागतिक आवश्यकतेनुसार आपल्या कृषी जगतात बदलाची आवश्यकता आहे
आज देश अनेक महत्व पूर्ण पावले उचलत आहे. आपण अंतराळक्षेत्र खुले केले, देशाच्या युवकांना संधी मिळाली, देशाच्या कृषी क्षेत्राला कायद्यातून मुक्त केले,बंधनातून मुक्त केले,आम्ही आत्म निर्भर व्हायचा प्रयत्न केला आहे. भारत अंतराळ क्षेत्रात सामर्थ्यवान बनतो तेव्हा शेजाऱ्याना त्याचा नक्कीच लाभ मिळतो. आपण जेव्हा उर्जा क्षेत्रात सामर्थ्यवान होतो तेव्हा जो देश आपला अंधकार नष्ट करू इच्छितो, भारत त्याच्या मदतीसाठी येऊ शकतो. देशाच्या आरोग्य पायाभूत सुविधा क्षेत्र आत्म निर्भर होते तेव्हा जगातल्या अनेक देशांना पर्यटन, आरोग्य विषयक स्थान म्हणून, भारत पसंतीचे स्थान होऊ शकतो. म्हणूनच आपल्याला आवश्यक आहे, की आपण भारतात निर्मिती झालेल्या वस्तूंची संपूर्ण जगात वाहवा होईल. एक काळ होता, आपल्या देशात ज्या वस्तू निर्माण होत होत्या, आपल्या स्टीलमन शक्ती द्वारा जे काम होत होते,त्याची जगात प्रशंसा होत होती,इतिहास याला साक्ष आहे. आपण आत्म निर्भरतेबाबत बोलतो तेव्हा, केवळ आयात कमी करणे इतकाच आपला विचार नाही, आत्म निर्भरते विषयी बोलतो तेव्हा, आपले हे जे कौशल्य आहे,मानव संसाधनांचे सामर्थ्य आहे, जेव्हा वस्तू बाहेरून येऊ लागतात, तेव्हा त्याचे सामर्थ्य नष्ट होऊ लागते.पिढी पासून नष्ट होऊ लागते. आपल्याला आपले हे सामर्थ्य टिकवायचेही आहे आणि वाढवायचेही आहे.कौशल्य वाढवायचे आहे.सृजनशीलता वाढवायची आहे, आणि त्यासह आपल्याला पुढे जायचे आहे. कौशल्य विकासाच्या दिशेने आपल्याला भर द्यायचा आहे. आत्म निर्भर भारतासाठी आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी.
माझ्या प्रिय भारतवासियांनो,
मी जाणतो की मी जेव्हा आत्मनिर्भर होण्याबाबत बोलतो तेव्हा, अनेक शंका व्यक्त केल्या जातात, मी मानतो, की आत्म निर्भरभारता साठी लाखो आव्हाने आहेत, जग जेव्हा स्पर्धेच्या वळणावर आहे तेव्हा आव्हाने वाढूही शकतात, मात्र देशा समोर जेव्हा लाखो आव्हाने आहेत, तर देशाकडे त्यावर तोडगा सांगणाऱ्या करोडो शक्तीही आहेत. माझे देशवासीही आहेत जे तोडगा काढण्याचे सामर्थ्ये देतात. आता पहा कोरोना संकट काळात आपण पाहिले अनेक बाबीसाठी आपण कठीण काळात आहोत, आपल्या देशाच्या युवकांनी,उद्योजकांनी आपल्या देशाच्या उद्योग जगताने विडा उचलला, ज्या देशात एन -95 निर्माण होत नव्हता, निर्माण होऊ लागले, पीपीई बनत नव्हते, ते तयार होऊ लागले, व्हेंटीलेटर बनत नव्हते आता तयार होऊ लागले, देशाच्या आवश्यकतेची पूर्तता तर झालीच त्याच बरोबर जगात निर्यात करण्याची आपली ताकद निर्माण झाली. जगाची आवश्यकता होती, आत्मनिर्भर भारत जगाला कशी मदत करू शकतो हे आपण आज पाहू शकतो, म्हणूनच जगाच्या कल्याणासाठी योगदान देण्याची भारताची जबाबदारी आहे. स्वतंत्र भारताची मानसिकता काय असली पाहिजे, स्वतंत्र भारताची मानसिकता असली पाहिजे, व्होकल फॉर लोकल, आपली जी स्थानिक उत्पादने आहेत त्याचे आपण गुणगान करायला हवे. आपण आपल्याच वस्तूंचे गुणगान करणार नाही, तर त्यांना चांगले बनण्यासाठी संधीही मिळणार नाही.त्यांची हिम्मत वाढणार नाही,चला आपण सर्वजण मिळून संकल्प करूया स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्ष च्या पर्वाकडे वाटचाल करत आहोत तेव्हा व्होकल फॉर लोकल हा जीवन मंत्र करूया. सर्व मिळून भारताच्या या सामर्थ्याला प्रोत्साहन देऊया.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपला देश काय कमाल करतो कसा पुढे जातो,हे आपण जाणतो.कोणी विचार करू शकत होते का , की कधी गरिबांच्या जन धन खात्यात लाखो करोडो रुपये थेट हस्तांतरित होऊ शकतात, शेतकऱ्याच्या कल्याणासाठी एपीएमसी सारख्या कायद्यात इतके बदल आणले जाऊ शकतात, कोणी विचार करू शकत होते का , की आपल्या व्यापाऱ्या वर लात्क्ती तलवार होती,अत्यावश्यक सेवा कायदा, इतक्या वर्ष नंतरत्यातही बदल होईल, कोणी विचार करू शकत होते का , की आपले अंतराळ क्षेत्र आपल्या युवकांसाठी खुले केले जाईल,आज आपण पाहत आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो, एक देश एक रेशन कार्ड असो,एक देश एक ग्रीड असो, नादारी आणि दिवाळखोरी विषयीचा कायदा असो, बँकांचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न असो, देशाची सच्चाई बनली आहे. भारतात परिवर्तनाच्या या कालखंडात सुधारणांच्या परिणामांना जग पाहत आहे. एका पाठोपाठ एक ,एकमेकांशी जोडलेल्या आपण ज्या सुधारणा करत आहोत, त्या जग अतिशय बारकाईने पाहत आहे,त्याचेच कारण आहे गेल्या वर्षी भारतात थेट परकीय गुंतवणुकीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले. गेल्या वर्षीभारतात एफडीआय मध्ये अठरा टक्के वृद्धी झाली आहे.म्हणूनच कोरोना काळातही जगातल्या मोठ्या कंपन्या भारताकडे वळत आहेत. हा विश्वास असाच निर्माण झाला नाही.जग असेच मोहित झाले नाही, त्यासाठी भारताने आपल्या धोरणावर, भारताने आपल्या लोकशाहीवर,भारताने आपल्या अर्थ व्यवस्थेच्या पायाच्या मजबुतीवर जे काम केले आहे त्यामुळे हा विश्वास निर्माण झाला आहे.जगातले अनेक व्यावसाय भारताला साखळी पुरवठा केंद्र म्हणून पाहत आहेत. आता आपल्याला मेक इन इंडियाच्या बरोबरीने मेक फॉर वर्ल्ड हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. 130 कोटी देश वासियांचे सामर्थ्य जेव्हा एकाच वेळेत कोरोनाच्या या काळात एकीकडेपूर्वेकडे चक्री वादळ पश्चिमेकडे चक्री वादळ , वीज कोसळून अनेक मृत्यू झाल्याच्या बातम्या, कुठे वारंवार भू स्खलन झाल्याच्या घटना, छोटे मोठे भूकंप धक्के, हे कमी म्हणून की काय आपल्या शेतकर्यांना टोळ धाडीचा सामना करावा लागला एका पाठोपाठ संकटे येत गेली,मात्र देशाने आपला विश्वास गमावला नाही. देश आत्म विश्वासाने पुढे जात राहिला. देश वासीयांच्या जीवनाला, देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोंनाच्या प्रभावातून लवकरात लवकर बाहेर काढण्याला आमचे प्राधान्य आहे. यात महत्वाची भूमिका राहील नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईप लाईन प्रकल्पाची यावर एकशे दहा लाख कोटी त्यापेक्षा जास्त खर्च केला जाईल. त्यासाठी वेग वेगळ्या क्षेत्रात सुमारे सात हजार प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. यातून देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल एक नवी गती मिळेल. संकट काळात जितक्या पायाभूत सुविधा बळकट केल्या जातील तितक्या आर्थिक घडामोडी वाढतात, लोकांना रोजगार मिळतो,काम मिळते त्याच्याशी सबंधित काम मिळते,छोटे मोठे उद्योग, शेतकरी प्रत्येक वर्गाला याचा मोठा लाभ होतो.आज मी एका बाबीचे स्मरण करू इच्छितो,जेव्हा अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी सुवर्ण चतुर्भुज ही दूरगामी योजना सुरु केली होती. देशाचे रस्ते जाळे आधुनिक करण्याकडे नेले होते. आजही सुवर्ण चतुर्भुज योजने कडे देश अभिमानाने बघत आहे. आपला हिंदुस्थान बदलत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
अटलजींनी आपल्या काळात हे काम केले आता आपल्याला ते पुढे न्यायचे आहे.आपण आता कप्प्यात राहू शकत नाही. रस्त्याचे काम रस्त्यात जाईल, रेल्वेचे रेल्वेत जाईल, रेल्वेचा रस्त्याशी सबंध नाही,विमान तळाचा बंदराशी संबंध नाही, बस स्थानकाचा रेल्वेची संबंध नाही,अशी स्थिती चालणार नाही. आपल्या पायाभूत सुविधा सर्वंकष असाव्यात, एकीकृत असाव्यात एकमेकाशी पूरक असाव्यात रेल्वेशी रस्ता पूरक आहे,रस्त्याशी बंदर पूरक, नव्या शतकासाठी आपल्याला मल्टी मोडल पायाभूत सुविधा जोडण्यासाठी आपण पुढे जात आहोत. हा नवा आयाम राहील. मोठे स्वप्न घेऊन यावर काम सुरु केले आहे,मला विश्वास आहे, हे कप्पे संपुष्टात आणून आपल्या सर्व व्यवस्थेला नवी ताकद देतील.याच्या बरोबरीने आपले सागर किनारे, जागतिक व्यापारात समुद्र किनाऱ्याचे स्थान महत्वाचे आहे. आपण बंदर केन्द्री विकास घेऊन चालतो तेव्हा येत्या काळात आपण समुद्री किनारी भागात चार पदरी रस्ते करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधेच्या दिशेने काम करू.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या शास्त्रात एक महत्वाची बाब सांगितली आहे, ‘सामर्थ्य्मूलं स्वातंत्र्यं, श्रममूलं च वैभवम्’ म्हणजे कोणत्याही समाजाचा, कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा स्रोत म्हणजे त्याचे सामर्थ्य आणि त्याचे वैभव, उन्नती, तसेच प्रगतीचा स्रोत म्हणजे त्याची श्रमशक्ती होय. म्हणूनच सामान्य नागरिक, मग तो शहरातील असो किंवा गावातील. त्याच्या मेहनतीला तोड नाही. मेहनतीने जेव्हा समाजाला सुविधा मिळतात, जीवनातील दररोजच्या अडचणींचा संघर्ष जेव्हा कमी होतो तेव्हा त्याची ऊर्जा, त्याची शक्ती अधिक प्रभावशाली होते, अचंबित करते. गेल्या सहा वर्षांमध्ये देशातील मेहनत मजुरी करणाऱ्या लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी विविध गावांमध्ये अनेकविध योजना राबविल्या गेल्या आहेत. आपण पाहू शकता; बँक खाते असो, पक्क्या घरांचा प्रश्न असो, मोठ्या प्रमाणावर शौचालयांची निर्मिती असो, घरोघरी वीज जोडणी देण्याची बाब असो, माता भगिनींची धुरापासून सुटका करण्यासाठी गॅस जोडणी देणे असो, गरिबातील गरिबाला विमा कवच देण्याचा प्रयत्न असो, चांगल्यातल्या चांगल्या रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी असलेली आयुष्मान भारत योजना असो, शिधावाटप दुकानांना तंत्रज्ञानाने जोडण्याचा मुद्दा असो; प्रत्येक गरीबापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोणत्याही भेदभावाशिवाय पूर्ण पारदर्शकतेने लाभ पोहोचविण्यात गेल्या सहा वर्षात खूप प्रगती झाली आहे. कोरोनाच्या संकट काळातही या योजनांद्वारे खूप मदत झाली आहे. या कालावधीत कोट्यवधी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर पोहचवणे, शिधापत्रिका असो वा नसो 80 कोटीहून जास्त देशबांधवांच्या घरातील चूल पेटती ठेवण्यासाठी, 80 कोटी देशबांधवांना मोफत अन्नधान्य पुरविण्याचे काम असो, 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बँकेत थेट लाभ हस्तांतरण असो, या गोष्टीचा काही वर्षांपूर्वी आपण विचार पण करू शकत नव्हतो; कल्पनाच करू शकत नव्हतो कि दिल्लीहून मदत म्हणून दिलेले पैसे गरिबांच्या खात्यात शंभर टक्के जमा होतील. हे यापूर्वी अशक्यप्राय वाटत होते. आपल्याच गावात रोजगारासाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु करण्यात आले आहे. श्रमिक बांधव स्वतःची कौशल्ये विकसित करतील, नवीन कौशल्ये आत्मसात करतील यावर विश्वास दाखवत, श्रमशक्तीवर विश्वास ठेवून, गावातील साधनसामुग्रीवर भरवसा ठेवून आम्ही स्वदेशीचा बोलबाला करीत (व्होकल फॉर लोकल) कौशल्ये नव्याने शिकून, कौशल्य विकासाद्वारे देशातील गरिबांच्या उन्नतीसाठी, आमच्या श्रमशक्तीला सक्षम करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. आर्थिक व्यवहारांचे केंद्र शहर असल्यामुळे गावातून दूरवरून लोक शहरात येतात त्यामुळे शहरांमध्ये जे श्रमिक आहेत, मग ते रस्त्यावरील फेरीवाले असोत, रेल्वे रूळांवरील असोत, बँकेतून त्यांना थेट पैसे देण्याची योजना सुरु आहे. लाखो लोकांनी इतक्या कमी कालावधीत या कोरोना परिस्थितीतही याचा लाभ घेतला आहे. आता त्यांना कुठूनही जास्त व्याजाने खाण्यापिण्यासाठी पैसे घेण्याची गरज पडणार नाही. बँकेतून तो स्वतः अधिकाराने पैसे काढू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा शहरांमध्ये श्रमिक येतात तेव्हा त्यांच्या वास्तव्याची सोय झाली तर त्यांच्या कार्यक्षमतेतही वाढ होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन शहरात त्यांच्यासाठी आम्ही निवास व्यवस्थेची मोठी योजना आखली आहे ज्याद्वारे जेव्हा श्रमिक शहरात येईल तेव्हा तो त्याच्या कामासाठी, मोकळ्या मनाने आत्मविश्वासाने बाहेर पडेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
हे पण बरोबर आहे कि विकासाच्या या यात्रेत आपण बघितले असेल कि समाज जीवनात कोणी मागासलेले राहते, गरिबीतून बाहेर पडू शकत नाही, राष्ट्र जीवनातही काही क्षेत्र असतात, काही भूभाग असतात, काही प्रदेश असतात जे विकासात मागे पडतात. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी आम्हाला संतुलित विकास आवश्यक आहे आणि आम्ही 110 पेक्षा जास्त आकांक्षीत जिल्हे निवडले आहेत ते 110 जिल्हे जे सरासरीपेक्षा सुद्धा मागासलेले आहेत त्यांना राज्याच्या राष्ट्राच्या सरासरी स्तरावर आणायचे आहे. सर्व बाबींचा सर्वार्थाने विचार करायचा आहे. सर्वाना चांगले शिक्षण, चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी तेथील लोकांना रोजगाराच्या स्थानिक संधी उपलब्ध होण्यासाठी या सर्वांसाठी हे सर्व जे एकशे दहा मागासलेले आकांक्षीत जिल्हे आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरु आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आत्मनिर्भर भारताची महत्वपूर्ण प्राथमिकता म्हणजे आत्मनिर्भर कृषी आणि आत्मनिर्भर किसान. याकडे अजूनही आपण दुर्लक्ष करू शकत नाही. शेतकऱ्यांना, मागील काळात आपण पाहिले आहे एकापाठोपाठ एक सुधारणा स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या काळाने केल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांना अगणित बंधनातून मुक्त करण्याचे काम आम्ही केले आहे. आपण विचारही करू शकत नाही कि आपल्या देशात तुम्ही अगदी साबण बनवत असाल तर हिंदुस्थानच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन तो साबण विकू शकता, तुम्ही कपडे बनवत असाल तर देशाच्या कोणत्याही भागात जाऊन कपडे विकू शकता. तुम्ही साखर तयार केली तर तीसुद्धा विकू शकता मात्र माझा शेतकरी ज्याची खूप लोकांना कल्पनाही नसेल; आपल्या देशातील शेतकरी त्याचे उत्पादन त्याच्या मर्जीनुसार विकू शकत नव्हता, त्याला जिथे शेतमाल विकायचा आहे तिथे विकू शकत नव्हता; त्याला आखून दिलेल्या मर्यादेतच तो उत्पादन विकू शकत होता. त्याला या बंधनातून आम्ही मुक्त केले आहे. आता हिंदुस्थानातील शेतकरी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ शकेल कारण आता तो देशातीलच काय पण जगातही कोणत्याही कानाकोपऱ्यात त्याचा माल त्याच्या हिमतीवर विकू शकतो. आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक पर्यायी मार्गांवरही भर दिला आहे. त्याच्या शेतीकामात निविष्ठांचा खर्च कमी करण्यासाठी, डिझेल पंपातून मुक्ती देण्यासाठी त्याला सौर पंप देण्यासाठी, अन्नदाता उर्जदाता बनविण्यासाठी, मधमाशीपालन असो, मत्स्यपालन, कुक्कुटपालन असे अनेक उपक्रम त्यासोबत जोडले जाऊन त्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने काम करीत आहोत. आमचे कृषिक्षेत्र आधुनिक बनले पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे. किंमत वाढण्यासाठी, मूल्यवर्धन होण्यासाठी, शेतीप्रक्रिया असो, वेष्टनाची प्रक्रिया असो त्याला सांभाळण्याची प्रक्रिया असो यासाठी चांगल्या पायाभूत सुविधांची गरज आहे.
आपण पाहिले असेल कि या कोरोना कालखंडात मागील काही दिवसात एक लाख कोटी रुपये कृषी पायाभूत सुविधांसाठी भारत सरकारने वितरित केले आहेत आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ज्या पायाभूत सुविधा असतील त्याद्वारे शेतकरी त्याच्या मालाचे मूल्य प्राप्त करू शकतो, जागतिक बाजारात त्याचे उत्पादन विकू शकतो. जागतिक बाजारात त्याचा वावर वाढेल. आज आम्हाला ग्रामीण उद्योग मजबूत करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात विशिष्ट उद्देशाने आर्थिक क्लस्टर तयार केले जातील. कृषी आणि बिगर कृषी उद्योगांना गावात एक यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नवीन एफपीओ म्हणजेच कृषी उत्पादक संघटना बनवायचा जो आम्ही प्रयत्न केला आहे त्याद्वारे आर्थिक सबलीकरणाचे काम होईल.
बंधू, भगिनींनो मी मागच्या वेळी इथे जलजीवन अभियानाची घोषणा केली होती आणि आज त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. मी आज अभिमानाने सांगू शकतो कि आम्ही जे स्वप्न पाहिले आहे कि पिण्याचे शुद्ध पाणी, नळाद्वारे पाणीपुरवठा आमच्या देशबांधवांना मिळाला पाहिजे. आरोग्याच्या तक्रारींच्या उपाययोजनासुद्धा शुद्ध पाण्याशी निगडित आहेत. अर्थव्यवस्थेतही त्याचे मोठे योगदान असते. त्यादृष्टीने जल जीवन अभियान सुरु करण्यात आले. आज मला समाधान आहे कि प्रत्येक दिवशी आम्ही एक लाखाहून अधिक घरांमध्ये, दररोज एक लाखाहून अधिक घरांमध्ये, पाणी पोहचवीत आहोत; नळाद्वारे पाणीपुरवठा करीत आहोत. गेल्या एक वर्षात दोन कोटी कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. विशेष करून जंगलात दूरवर राहणाऱ्या आमच्या आदिवासींच्या घरापर्यंत पाणीपुरवठा करण्याचे अभियान सुरु आहे. मला आनंद आहे कि आज जल जीवन अभियानाद्वारे अभियानाद्वारे देशात निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण केले आहे. जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये ही निकोप स्पर्धा सुरु आहे. शहरांमध्ये ही स्पर्धा सुरु आहे, राज्या राज्यांमध्ये निकोप स्पर्धा होत आहे. प्रत्येकाला वाटत आहे कि पंतप्रधानांचे हे जल जीवन अभियानाचे स्वप्न आपापल्या स्तरावर पूर्ण करावे. सहकारी, सार्वभौमत्वाला नवी ताकद या जल जीवन अभियानाद्वारे प्राप्त झाली आहे. त्याच्या साथीने आम्हीही पुढे जात आहोत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
कृषी क्षेत्र असो, लघु उद्योग क्षेत्र असो किंवा आमचा नोकरदार वर्ग असो हे साधारण सर्वच लोक भारताच्या मध्यमवर्गाचा हिस्सा आहेत आणि या मध्यमवर्गातून तयार झालेले व्यावसायिक आज जगात आपले नाव गाजवीत आहेत. मध्यमवर्गातून आलेले आमचे डॉक्टर, वकील, इंजिनिअर, वैज्ञानिक सर्वच जण जगात आपली ओळख निर्माण करीत आहेत. म्हणूनच ही गोष्ट खरी आहे कि मध्यमवर्गाला जितक्या संधी मिळतात त्यापेक्षा कैकपटीने तो आपली छाप पाडतो यासाठी मध्यमवर्गाला सरकारी हस्तक्षेपापासून मुक्ती हवी आहे , त्यांना नवीन संधी हव्या आहेत, खुले मैदान हवे आहे आणि आमचे सरकार मध्यमवर्गाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करीत आहे. अद्भुत गोष्टी करण्याची ताकद मध्यमवर्गात असते. सुलभ जीवनाचा लाभ कोणाला होणार असेल तर तो आमच्या मध्यमवर्गाला सर्वाधिक होणार आहे. इंटरनेटची बाब असो, स्वस्त स्मार्ट फोनचा मुद्दा असो, उडान योजनेद्वारे विमानाची तिकिटे स्वस्त होण्याची गोष्ट असो, आमचे महामार्ग असोत, दूरसंचार मार्ग असो या सर्व गोष्टी मध्यमवर्गीयांची ताकद वाढविणाऱ्या आहेत. आज तुम्ही बघत असाल कि मध्यमवर्गीयांमध्ये जे गरिबीतून वर आले आहेत त्यांचे पहिले स्वप्न असते ते त्याचे स्वतःचे घर असावे. सुखासमाधानाचे आयुष्य असावे असे त्याला वाटते. देशात आम्ही मोठे काम केले ते ईएमआय क्षेत्रात. कारण गृहकर्ज स्वस्त झाली आणि जेव्हा कोणी घरासाठी कर्ज घेतो तेव्हा कर्जाची प्रतिपूर्ती करताना सुमारे सहा लाख रुपयांची सूट त्याला मिळते. इतकेच नाही मागील दिवसात लक्षात आले कि प्रत्येक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबाने पैसे गुंतविले आहेत मात्र गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण न झाल्या कारणाने त्यांना स्वतःचे घर मिळत नाही, भाडे भरावे लागत आहे, त्यासाठी भारत सरकारने पंचवीस हजार कोटी रुपयांचा विशेष निधी तयार करून अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करून मध्यमवर्गीयांना घरे उपलब्ध होण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. खूप वेगाने कर कमी झाले आहेत, आयकर कमी झाला आहे. आज किमान व्यवस्थांद्वारे आम्ही देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.
सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेशी जोडणे म्हणजे मध्यमवर्गीयांच्या पैशाना हमीद्वारे जोडण्याची योजना आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रात झालेल्या सुधारणा झाल्या आहेत, कृषी क्षेत्रात ज्या सुधारणा झाल्या आहेत त्यांचा थेट लाभ आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळणार आहे त्यामुळे हजारो कोटी रुपयांचा विशेष निधी आज जो आमच्या व्यापारी वर्गाला, आमच्या लघु उद्योजकांना लाभ मिळवून देणार आहे. सर्वसाधारण भारतीयांची ताकद, त्याची ऊर्जा आत्मनिर्भर भारत अभियानाचा मोठा आधार आहे. ही ताकद कायम ठेवण्यासाठी सातत्याने काम सुरु आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यात, आधुनिक भारताच्या निर्मितीत, नव्या भारताच्या निर्माणात, समृद्ध आणि सुखी भारताच्या निर्मितीत देशाच्या शिक्षण पद्धतीचे मोठे महत्व आहे. याच विचाराने देशाला तीन दशकानंतर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
हिंदुस्थानच्या प्रत्येक कोपऱ्यात याच्या स्वागताच्या बातम्या नवी ऊर्जा, नवा विश्वास देत आहेत. हे शिक्षण, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आमच्या विद्यार्थ्यांना मूलभूत गोष्टींशी जोडेल मात्र त्याचबरोबरीने त्याला जागतिक स्तरावर नागरिक बनण्याचे सामर्थ्य प्रदान करेल. विद्यार्थी त्याच्या मूलभूत गोष्टींशी जोडलेला असेल तरी त्याचे कर्तृत्व आभाळ गवसणारे असेल. आज आपण पाहिले असेल कि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एक विशेष भर देण्यात आला आहे तो राष्ट्रीय संशोधन संस्थेवर. देशाला प्रगती करण्यासाठी नवोन्मेषाची गरज असते. नावीन्यतेला, संशोधनाला जेव्हढी बळकटी मिळेल तेवढेच देशाला पुढे जाण्यासाठी, स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी खूप ताकद मिळेल. आपण विचार केला होतात का कि कधी इतक्या वेगाने गावापर्यंत ऑनलाईन क्लासचे वातावरण तयार होईल.कधी कधी संकटातही काही अशा गोष्टी नव्याने समोर येतात ज्या नवीन ताकद देतात. म्हणूनच आपण बघितले असेल कि कोरोना काळात ऑनलाईन क्लासेस ही एक प्रकारची संस्कृती तयार झाली आहे. ऑनलाईन व्यवहारही वाढत आहेत.
‘भीम यूपीआय’ च्या माध्यमातून एक महिन्यामध्ये तीन लाख कोटी रूपयांचे व्यवहार अवघ्या एक महिन्यात झाले आहेत. याचा कोणालाही गर्व वाटेल. भारतासारख्या देशामध्ये भीम यूपीआयने तीन लाख कोटी रूपयांचे व्यवहार झाले आहेत. याचाच अर्थ आपण बदललेल्या स्थितीला स्वीकार करण्याचा प्रयत्न करीत आहोत, याचेच हे एक उत्तम उदाहरण आहे. आपण पाहिले असेल 2014च्या आधी पाच डझन फक्त पाच डझन पंचायतीमंध्ये ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या होत्या. गेल्या पाच वर्षामध्ये सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्याचे लक्ष्य निश्चित करून आम्ही काम सुरू केले. ज्या एक लाख पंचायतींचे काम बाकी राहिले आहे, तिथेही अतिशय वेगाने काम सुरू करण्यात आले आहे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. सर्व गावांची अगदी लहान लहान गावांची भागीदारीही डिजिटल भारताच्या दृष्टीने महत्वाची आहे. गावांना डिजिटल करणे आता अनिवार्य बनले आहे. गावातल्या लोकांनाही अशा प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांच्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेवून, आम्ही पहिल्यांदा जो कार्यक्रम बनविला होता. तो पंचायतपर्यंत आधी पोहोचविणार आहे. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की, आमची जी सर्वच्या सर्व सहा लाख गावे आहेत, त्या सर्व गावांपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचविण्यात येत आहे. गरज पडली म्हणून आम्ही आमच्या कामांचे प्राधान्यक्रमही बदलले आहेत. सहा लाखांपेक्षा जास्त गावांमध्ये हजारो-लाखो किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे आणि आम्ही निश्चित केले आहे की, एक हजार दिवसांमध्ये, एक हजार दिवसांच्या आत देशातल्या सहा लाखांपेक्षा जास्त गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे काम पूर्ण करण्यात येईल.
काळाप्रमाणे बदलत चाललेले तंत्रज्ञान लक्षात घेवून सायबर स्पेस या क्षेत्रावर आपल्याला जास्तीत जास्त निर्भर रहावे लागणार आहे. परंतु सायबर स्पेसबरोबर अनेक धोकेही जोडूनच येतात. हे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घेतले आहे. यामुळे आपल्या देशाचे सामाजिक ताणे-बाणे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था, आणि आपल्या देशाच्या विकास कामांमध्ये धोके निर्माण करण्याचा, बाधा आणण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. अशा सर्व गोष्टींविषयी भारत अतिशय सतर्क आहे. आणि या धोक्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले योग्य निर्णयही घेत आहे. इतकेच नाही, तर नवीन व्यवस्थाही निरंतर विकसित करण्यात येत आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये नवीन सायबर सुरक्षा रणनीतीचा एक संपूर्ण आराखडा देशाच्या समोर मांडण्यात येईल. आगामी काळामध्ये संबंधित सर्व संस्थांना, घटकांना जोडून आपल्याला सायबर सुरक्षेअंतर्गत सर्वांना एकसाथ जावे लागणार आहे; त्यासाठी रणनीती बनवण्यात येत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
भारतामध्ये महिला शक्तीला ज्या ज्यावेळी संधी मिळाली, त्या त्यावेळी त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. देशाला बळकट केले आहे. महिलांना स्वरोजगार आणि रोजगार मिळावा, त्यांना समान संधी मिळावी, यासाठी आज देश कटिबद्ध आहे. आज भारतामध्ये महिला अगदी जमिनीखाली जावून खनिजांच्या खाणींमध्ये जावूनही काम करीत आहेत. तसेच आज माझ्या देशाच्या कन्या लढावू विमानेही मोठ्या दिमाखात आकाशात घेवून जात आहेत. ज्या देशातल्या महिलांना लढावू वैमानिक बनण्याची संधी दिली जाते, आज भारतही दुनियेतल्या अशा काही विशिष्ट देशांमध्ये सहभागी आहे. गर्भवतींना वेतनाबरोबरच सहा महिन्यांची सुट्टी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. अशीच गोष्ट मुस्लिम भगिनींची आहे. आमच्या देशात तीन तलाकच्या कारणाने अनेक महिलां पीडीत झाल्या आहेत. त्यांची या त्रासातून सुटका करण्याचे काम आम्ही केले. महिलांच्या हातात आर्थिक सत्ता यावी, यासाठीही प्रयत्न केले. जे 40 कोटी जनधन खाते उघडण्यात आले, त्यापैकी 22 कोटी बँक खाती ही आमच्या भगिनींची आहेत. कोरोना काळामध्ये जवळपास 30हजार कोटी रूपये, या माता-भगिनींच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. मुद्रा कर्ज- जवळपास 25 हजार कोटींचे मुद्रा कर्ज देण्यात आले आहे. यापैकी 70 टक्के मुद्रा कर्ज घेणा-या आमच्या माता- भगिनी आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजनेनुसार त्यांना स्वतःचे घर मिळत आहे. विशेष म्हणजे, त्या घरांची नोंदणीही त्या महिलांच्याच नावाने केली जात आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
देशातल्या गरीबातल्या गरीबाच्या आरोग्याची चिंताही सरकारला आहे. यासाठी हे सरकार निरंतर काम करीत आहे. आम्ही जनौषधी केंद्राच्या माध्यमातून अवघ्या एक रूपयांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले आहेत, यासाठी खूप मोठे काम केले आहे. देशभरातल्या सहा हजार जनौषधी केंद्रांमार्फत गेल्या अगदी अल्प काळावधीमध्ये जवळपास पाच कोटींपे़क्षा सॅनिटरी पॅड आमच्या या गरीब महिलांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. कन्या- मुली यांच्यामध्ये असलेले कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, त्यांच्या विवाहाचे वय किती असावे, यासाठी आम्ही अभ्यास, संशोधन करणारी समिती बनविली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर लगेचच कन्यांच्या विवाहासाठी विशिष्ट वय निश्चित करण्याविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
कोरोनाच्या काळामध्येही आरोग्य या क्षेत्राकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आत्मनिर्भरतेचा सर्वात मोठा धडा आपल्याला आरोग्य क्षेत्र किती महत्वाचे आहे, याने दिला. आता या क्षेत्रातले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुढे जायचे आहे. आता पहा, कोरोनाच्या प्रारंभीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये चाचणी प्रयोगशाळा कार्यरत नव्हत्या. आज देशभरामध्ये 1400 चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोप-यामध्ये आता कोरोनाची चाचणी होवू शकते. ज्यावेळी कोरोनाचे संकट आले, त्यावेळी एका दिवसामध्ये फक्त 300 चाचण्या केल्या जावू शकत होत्या. इतक्या कमी काळामध्ये आमच्या लोंकानी अभूतपूर्व जी शक्ती दाखवली आहे, त्यामुळे आज प्रत्येक दिवशी सात लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. पहा कधी आम्ही प्रारंभ 300 पासून केला होता, आणि आता आम्ही सात लाखांपर्यंत पोहोचलो आहोत. देशामध्ये नवीन एम्स, नवीन वैद्यकीय, आरोग्य संस्थांची निर्मिती केली जात आहे, तसेच वैद्यकीय सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहे. पाच वर्षांमध्ये एमबीबीएस, एमडी मध्ये 45 हजारांपेक्षा जास्त जागांवर विद्यार्थींना प्रवेश देण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त ‘वेलनेस सेंटर’ सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी एक तृतीयांश वेलनेस सेंटर तर याआधीच कार्यरत झालेली आहेत. विशेष म्हणजे या केंद्रांची गावातल्या लोकांना कोरोनामध्ये खूप मोठी मदत झाली आहे. कोरोना काळामध्ये वेलनेस सेंटरने अतिशय महत्वाची भूमिका गावांमध्ये निभावली आहे.
आरोग्य क्षेत्रामध्ये आजपासून एक भव्य काम सुरू करण्यात येणार आहे. आणि यामध्ये तंत्रज्ञानाचीही खूप मोठी, महत्वाची भूमिका असणार आहे. आजपासून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ म्हणजेच ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान’ चा प्रारंभ करण्यात येत आहे. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ आज सुरू होत आहे. भारताच्या आरोग्य क्षेत्रामध्ये हे अभियान एक नवीन क्रांती घेवून येणार आहे. कोणालाही औषधोपचार करताना होणार त्रास कमी व्हावा, यासाठी तंत्रज्ञानाची अतिशय उत्तम पद्धतीने मदत घेवून हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ आय.डी. म्हणजे ‘आरोग्य ओळखपत्र’ देण्यात येईल. या आरोग्य ओळखपत्रामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल माध्यमातून जमा केली जाईल. प्रत्येकाने केलेल्या आरोग्य चाचण्या, प्रत्येकाचे आजार, तुम्ही कोणत्या आरोग्य चाचण्या केल्या, डॉक्टरकडून- कोणते औषध घेतले, त्यांनी तुमच्या आजाराचे नेमके काय निदान केले, कधी काय औषध दिले, केलेल्या चाचणीचा अहवाल काय आला, अशी सगळी माहिती त्या एकाच आरोग्य आय.डी.मध्ये आपल्याला मिळू शकणार आहे. डॉक्टरांनी रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले असो, पैसे जमा करावे लागणार असो, या सर्व गोष्टींचा तपशील सर्वांना मिळू शकणार आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या माध्यमातून वैद्यकीय विषयक अनेक प्रश्नांतून सुटका मिळू शकणार आहे. यामुळे उत्तम आरोग्य मिळवताना, आमचा प्रत्येक नागरिक अगदी योग्य निर्णय घेवू शकेल. ही व्यवस्था आता देशात लवकरच होणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
ज्यावेळी आता कोरोनाची गोष्ट निघते, त्यावेळी एक गोष्ट स्वाभाविक आहे की, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की, कोरोनाची लस कधी तयार होणार आहे? हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या अगदी संपूर्ण दुनियेमध्ये सर्वांच्या मनामध्ये येत आहे. याविषयी मी आपल्याला सांगू इच्छितो की, देशातले आमचे संशोधक कार्य करीत आहेत. आमच्या संशोधकांची प्रतिभा ऋषिमुनींच्या प्रमाणे प्रयोगशाळांमध्ये काम करीत आहे. सर्व संशोधक अगदी जीव लावून कार्यरत आहेत. सर्वजण अखंड, निरंतर तपस्या करीत आहेत. अतिशय कठोर परिश्रम करीत आहेत. आणि भारतामध्ये एक नाही, दोन नाही, तीन- तीन तीन व्यक्ती, संस्था त्याच्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत. संशोधकांकडून ज्यावेळी हिरवा कंदिल दाखवला जाईल, त्यावेळी कोरोनाच्या लशीचे मोठ्या- व्यापक प्रमाणात निर्मितीचे काम केले जाईल. त्यासाठी जी काही तयारी करणे आवश्यक आहे, ती सर्वतोपरी करण्यात आली आहे. अतिशय वेगाने लस निर्माणाचे काम करून ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचविण्याचे येईल. लस कमीत कमी कालावधीमध्ये कशी पोहोचेल, याचाही विचार केला आहे. त्यासाठी आराखडाही अगदी तयार आहे. या कामाची रूपरेखाही तयार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जागी विकासाचे चित्र वेगवेगळे दिसते. काही क्षेत्रे खूप पुढे आहेत. काही क्षेत्रे खूप मागे आहेत. हे असंतुलन आत्मनिर्भर होण्यास बाधा आणते. विकासामध्ये असलेले हे अतिशय महत्वाचे,मोठे आव्हान आपण मानू शकतो. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे मी प्रारंभी म्हणालो, 120 जिल्ह्यांना बरोबर घेवून जायचे आहे. सर्वांना आम्ही विकासामध्ये बरोबरीने घेवून पुढे जावू इच्छितो. यासाठी कनेक्टिव्हिटी सुधारणे, ही आमची प्राथमिकता आहे. आता आपण पहा- हिंदुस्थानच्या पश्चिमी भाग पहा, हिंदुस्थानचा मध्य भाग पहा आणि हिंदुस्थानचा पूर्व भागही पहा. उत्तर प्रदेश असो, ईशान्य भारत, ओरिसा असो, बिहार असो, बंगाल असो या सर्व आमच्या भागामध्ये अपार संपदा आहे. नैसर्गिक संपदेचे हे भंडार आहेत. इस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर असो पूर्वेकडील राज्यात गॅस पाईप लाईन जोडण्याची गोष्ट असो किंवा नवीन रेल्वे, रोड पायाभूत प्रकल्प उभा करायचा असो , नवीन बंदर उभारायचे असो म्हणजे पूर्ण विकासाच्या दृष्टीने अवसंरचनात्मक प्रकल्प उभा करायचा असल्यास आम्ही पूर्ण ताकदीनिशी तो विकसित करत आहोत.
लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याची अनेक वर्षांपासूनची त्यांची मागणी होती , त्यांची आकांक्षा होती ती आकांक्षा पूर्ण करण्याचे आपण मोठे काम केले आहे. हिमालयाच्या उंचीत वसलेले लडाख विकासाच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे. आता केंद्रीय विद्यापीठ तिथे निर्माण होत आहे, नवीन संशोधन केंद्र बनत आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम सुरु झाले आहेत, विजेसाठी साडेसात हजार मेगावॅटची सोलर पार्कची योजना बनत आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
लडाखची अनेक वैशिष्ट्य आहेत ती आपल्याला सांभाळायची आहेत संवर्धन करायचे आहे. ईशान्य भागात सिक्कीमने आपली सेंद्रिय राज्याची ओळख बनवली, तशीच लडाख लेह कारगिल हे संपूर्ण क्षेत्र आपल्या देशासाठी कार्बन न्यूट्रल म्हणून ओळख बनवू शकतात. यासाठी भारत सरकार तिथल्या नागरिकांच्या मदतीने एक नमुना स्वरूप , प्रेरणारूप कार्बन न्यूट्रल आणि ते देखील विकासाचे मॉडेल तिथल्या आवश्यकतांच्या पूर्तीचे मॉडेल बनवण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारताने दाखवून दिले आहे कि पर्यावरणाचे संतुलन राखत वेगवान विकास शक्य आहे. आज भारत वन वर्ल्ड , वन सन , वन ग्रीडच्या कल्पनेसह जगात विशेषतः सौर उर्जेला प्रेरित करत आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या उत्पादनात आज भारताने जगातल्या पाच अव्वल देशांमध्ये स्थान निर्माण केले आहे. प्रदूषण उपयांबाबत भारत सजग आहे आणि सक्रिय देखील आहे. स्वच्छ भारत अभियान असेल, धूरमुक्त स्वयंपाकाची गॅस व्यवस्था असेल, एलईडी दिव्यांचे अभियान, सीएनजी आधारित वाहतुकीची व्यवस्था असेल, इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी प्रयत्न असेल आपण कुठेही कसर सोडली नाही. पेट्रोलपासून प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादन वाढवण्यावर आणि त्याच्या वापरावर भर दिला जात आहे. ५ वर्षांपूर्वी आपल्या देशात इथेनॉलची काय स्थिती होती. पाच वर्षांपूर्वी आपल्या देशात ४० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होत होते , आज पाच वर्षात ते पाचपट झाले आहे. आज २०० कोटी लिटर इथेनॉल बनत आहे. जे पर्यावरणासाठी खूप उपयुक्त आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
देशातल्या १०० निवडक शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन सह, सर्वांगीण दृष्टिकोनासह लोकसहभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रदूषण कमी करण्यासाठी मिशन मोड पद्धतीने काम करणार आहोत. भारत अभिमानाने म्हणू शकतो कि भारत त्या खूप कमी देशांपैकी एक आहे जिथे जंगलांचा विस्तार होत आहे. आपल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी भारत संवेदनशील आहे. आपण यशस्वीपणे प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट आपण यशस्वीपणे राबवले आहे. आपल्याकडे वाघांची संख्या वाढली आहे. आगामी काळात आशियाटिक लायन प्रोजेक्ट लायनची सुरुवात होत आहे. प्रोजेक्ट लायन अंतर्गत भारतीय सिंहांची सुरक्षा , आवश्यक पायाभूत सुविधा, त्यांच्यासाठी आवश्यक विशेष आरोग्य सुविधा यावर काम होणार आहे. प्रोजेक्ट लायनवर भर दिला जाईल. त्याचबरोबर आणखी एका कामावर भर दिला जाणार आहे. प्रोजेक्ट डॉल्फिन चालवले जाईल. नद्या, समुद्रात राहणाऱ्या दोन्ही प्रकारच्या डॉल्फिनवर लक्ष केंद्रित केले जाईल., यामुळे जैवविविधतेला बळ मिळेल, आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच पर्यटनाचे आकर्षण बनेल.या दिशेने आपण पुढे जाणार आहोत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
जेव्हा आपण एक असाधारण लक्ष्य घेऊन असाधारण प्रवासाला निघतो तेव्हा वाटेत आव्हानांचा भडीमार होतो, आणि आव्हाने देखील असामान्य होतात. इतक्या संकटातही सीमेवरही देशाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले, मात्र एलओसी ते एलएसी पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिले त्यांना आपल्या सैन्याने , आपल्या वीर जवानांनी त्याना त्यांच्या भाषेत प्रत्त्युत्तर दिले. भारताच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी संपूर्ण देश एकजुटीने भरलेला आहे, संकल्पाने प्रेरित आहे आणि सामर्थ्यावर अतूट श्रद्धेने पुढे वाटचाल करत आहे. या संकल्पासाठी वीर जवान काय करू शकतात, देश काय करू शकतो हे लडाखमध्ये जगाने पाहिले आहे.
मी आज मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या त्या सर्व वीर जवानांना लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन आदरपूर्वक नमन करतो. दहशतवाद असेल किंवा विस्तारवाद असेल, भारत आज निकराने लढा देऊ शकतो. आज जगाचा भारतावरचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून १९२ पैकी १८४ देशांनी भारताला पाठिंबा दिला , ही आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. जगात आपण कसे संबंध स्थापन केले आहेत त्याचे हे उदाहरण आहे . हे तेव्हा शक्य आहे जेव्हा भारत स्वतः मजबूत असेल, सशक्त असेल .भारत सुरक्षित असेल. याच विचाराने आज अनेक कामे केली जात आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपल्या शेजारी देशांबरोबर मग ते जमिनीने जोडले असतील किंवा सागरी सीमेने, आपल्या संबंधांना आपण सुरक्षा विकास विश्वासाच्या भागीदारीने जोडत आहोत. भारताचा निरंतर प्रयत्न आहे आपल्या शेजारी देशांबरोबर आपले प्राचीन सांस्कृतिक सामाजिक आर्थिक सम्बन्ध अधिक दृढ करू. दक्षिण आशियात जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहते. आपण सहकार्य आणि संवादाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या जनतेच्या समृद्धीसाठी अगणित संधी निर्माण करू शकतो. या क्षेत्रातील देशाच्या सर्व नेत्यांची एवढ्या विशाल लोकसंख्येच्या प्रगतीची मोठी जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी दक्षिण आशियातल्या सर्वाना राजकीय नेत्यांना, बुद्धिवंतांना आवाहन करतो, या क्षेत्रात जितकी शांतता नांदेल, सौहार्द असेल, तेवढे ते मानव हिताचे असेल. संपूर्ण जगाचे हित त्यात समाहित आहे.
आज शेजारी देश केवळ तेच देश नाहीत ज्यांच्याशी आपल्या भौगोलिक सीमांचा संबंध आहे, तर असे देश देखील आहेत ज्यांच्याशी आपली मने जुळतात , नात्यात समरसता असते, मेळ असतो. मला आनंद आहे कि गेल्या काही महिन्यात भारताने विस्तारित शेजारी म्हणून सर्व देशांबरोबर आपले संबंध अधिक मजबूत केले आहेत. पश्चिमी देशांबरोबर आपल्या राजकीय, आर्थिक , मानवी संबंधाच्या प्रगतीत अनेक पटीने वाढ झाली. विश्वास अनेक पटीने वाढला आहे. या देशांबरोबर आले आर्थिक संबंध विशेषतः ऊर्जा क्षेत्रातली भागीदारी महत्वाची आहे. या सर्व देशात मोठ्या संख्येने भारतीय बांधव काम करत आहेत. ज्याप्रकारे या देशांनी कोरोना संकटाच्या काळात भारतीयांची मदत केली, भारत सरकारच्या विनंतीचा सन्मान केला त्यासाठी भारत या सर्व देशांचा आभारी आहे. आणि मी त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. ज्याप्रकारे आपले पूर्वेचे आसियान देश , जे आपले सागरी शेजारी देश आहेत ते देखील भारतासाठी विशेष महत्वाचे आहेत. त्यांच्याबरोबर भारताचे हजारो वर्ष जुने धार्मिक आणि सांस्कृतिक सम्बन्ध आहेत. बौद्ध धर्माची परंपरा आपल्याला जोडते. संरक्षण उत्पादनात ‘आत्मनिर्भर भारत’ साठी मोठीं पावले उचलण्यात आली आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नुकतीच शंभराहून अधिक सैन्य उपकरणाची आयात रोखण्यात आली आहे. क्षेपणास्त्रपासून हलक्या युद्ध हेलिकॉप्टर पर्यंत, असॉल्ट रायफल पासून ते वाहतूक विमानापर्यंत सर्व ‘मेक इन इंडिया’ असतील. आपले तजस ही आपले तेज, आपली ताकद दाखवण्यासाठी आधुनिक आवश्यकतानुसार सज्ज होत आहे .देशाच्या सुरक्षेत आपल्या सीमा आणि किनारी पायाभूत सुविधांची मोठी भूमिका आहे. आज हिमालयाची शिखरे असोत किंवा हिंदी महासागराची बेटे असोत, प्रत्येक दिशेने कनेक्टिव्हिटी विस्तारावर भर दिला जात आहे, लडाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्या देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन नवे रस्ते तयार करण्यात आले आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपला इतका मोठा समुद्र किनारा आहे, मात्र त्याच बरोबर आपल्याकडे तेराशेहून अधिक बेटं आहेत. काही निवडक बेटांचे महत्व पाहून त्यांचा वेगाने विकास करण्यासाठी आपण वाटचाल करत आहोत. आपण पाहिले असेल काही दिवसांपूर्वी अंदमान निकोबार मध्ये समुद्रा अंतर्गत ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्पाचे लोकार्पण झाले. अंदमान निकोबारलाही चेन्नई आणि दिल्ली प्रमाणे इंटरनेट सुविधा आता उपलब्ध होईल. आता आपण लक्षद्वीपलाही अशाच पद्धतीने जोडण्यासाठी काम पुढे नेणार आहोत. पुढच्या एक हजार दिवसात लक्षद्वीपलाही वेगवान इंटरनेट सुविधेने जोडण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. सीमा आणि किनारी भागातल्या युवकांचा विकास, त्यालाही सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून , विकासाच्या मॉडेलच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत. याच दिशेने एक पाऊल , एक मोठे अभियान आम्ही सुरू करत आहोत. आपले जे सीमा भाग आहेत, जे किनारी भाग आहेत तिथले सुमारे 173 जिल्हे आहेत, जे कोणत्या ना कोणत्या देशाची सीमा किंवा समुद्र किनाऱ्याला लागून आहेत, येत्या काळात एनसीसीचा विस्तार त्या सीमा भागातल्या युवकांसाठी करण्यात येईल. सीमा भागात आम्ही सुमारे एक लाख नवे एनसीसीचे कॅडेटस तयार करणार आहोत. आणि त्या मध्ये एक तृतीयांश कन्या असतील यासाठीही प्रयत्न राहील. सीमा भागातल्या कॅडेटसना सैन्यदल प्रशिक्षित करेल. किनारी भागातल्या कॅडेटसना नौदल प्रशिक्षण देईल आणि जिथे हवाई तळ आहे तिथल्या कॅडेटसना हवाई दल प्रशिक्षण देईल. सीमा आणि किनारी भागांना आपत्तीशी तोंड देण्यासाठी एक प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. युवकांना सशस्त्र दला मध्ये करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्यही मिळेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
गेल्या वर्षी लाल किल्यावरून मी सांगितले होते, गेली पाच वर्षे गरजांची पूर्तता आणि पुढची पाच वर्षे आकांक्षांच्या पुर्ततेची आहेत. गेल्या एक वर्षात देशाने अनेक मोठ्या आणि महत्वपूर्ण निर्णयांचा टप्पा पार केला. गांधीजींच्या 150 जयंतीला भारताच्या गावांनी स्वतः ला हागणदारी मुक्त केले आहे. आस्थेमुळे पीडित शरणार्थींना नागरिकत्व देण्याचा कायदा, दलित, मागास, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्गीयांसाठी आरक्षणाचे अधिकार वाढवण्याची बाब असो, आसाम आणि त्रिपुरात, ऐतिहासिक शांतता करार असो, सैन्याची सामूहिक शक्ती अधिक प्रभावी करण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती असो, कर्तारपूरसाहिब कॉरिडॉरची विक्रमी वेळात निर्मिती असो, देशाने इतिहास घडवला, इतिहास घडताना पाहिला आणि असाधारण काम करून दाखवले. दहा दिवसांपूर्वी अयोध्येत भगवान राम यांच्या भव्य मंदिर निर्मितीचे काम सुरू झाले. राम जन्मभूमीच्या अनेक वर्षे जुन्या विषयाचा शांततापूर्ण तोडगा निघाला आहे. देशाच्या जनतेने, ज्या संयमाने आणि समजूतदारपणाने, आचरण केले आहे, व्यवहार केला आहे, हे अभूतपूर्व आहे आणि भविष्यासाठी आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. शांतता, एकता आणि सद्भावना हीच तर आत्मनिर्भर भारताची शक्ती आहे. हाच सलोखा, हाच सद्भाव भारताच्या उज्वल भविष्याची हमी आहे. हाच सदभाव घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.
विकासात, या महा यज्ञात प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीने आपल्याकडुन थोडी तरी आहुती द्यायची आहे. या दशकात, भारत नवे धोरण आणि नव्या रितीसह पुढे वाटचाल करेल. आता साधारण काम नाही चालणार, आता, होते असे, चालून जाते असे म्हणण्याचा काळ संपला आहे, आपण जगात कोणाहीपेक्षा कमी नाही, आपण सर्वोच्च राहण्याचा प्रयत्न करू आणि म्हणूनच आपण सर्वश्रेष्ठ उत्पादन, सर्व श्रेष्ठ मनुष्य बळ, सर्वश्रेष्ठ प्रशासन, प्रत्येक बाबतीत सर्वश्रेष्ठ बनण्याचे लक्ष्य घेऊन स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षासाठी आंपल्याला वाटचाल करायची आहे. आपली धोरणे, आपल्या प्रक्रिया, आपली उत्पादने, सर्व काही उत्तमातले उत्तम राहील तेव्हाच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही परीकल्पना साकार होईल.
आज आपल्याला पुन्हा संकल्प करायची आवश्यकता आहे, हा संकल्प स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा आहे. हा संकल्प 130 कोटी देशवासीयांसाठी आहे, हा संकल्प आपल्या भावी पिढीसाठी आहे, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आहे, हा संकल्प आत्मनिर्भर भारतासाठी आहे, आपल्याला धडा घ्यावा लागेल, आपल्याला प्रतिज्ञा करावी लागेल, आपण आयात कमीत कमी करण्याच्या दिशेने योगदान देऊ, आपण आपल्या लघु उद्योगांना सशक्त करू, आपण सर्वजण ‘लोकल साठी व्होकल’ होऊ, आपण अधिक नवोन्मेष आणू, आपण सबलीकरण करू आपल्या युवकांचे, महिलांचे, आदिवासींचे, दिव्यांगाचे, दलितांचे, गरिबांचे, गावांचे, मागासांचे, प्रत्येकाचे आज भारताने, असाधारण वेगाने अशक्य ते शक्य केले आहे. हीच इच्छाशक्ती, हीच निष्ठा, घेऊन प्रत्येक भारतीयाला पुढे जायचे आहे. 2022 मध्ये आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे पर्व आलेच आहे, आपण एक पाऊल दूर आहोत, आपल्याला दिवस रात्र एक करायची आहे.
21 व्या शतकाचे हे तिसरे दशक स्वप्नांची पूर्तता झाल्याचे दशक राहिले पाहिजे. कोरोना मोठी आपत्ती आहे, भारताची विजय यात्रा रोखू शकत नाही. मी बघत आहे, एक नव्या पहाटेची लालिमा, एक नव्या आत्म निर्भर भारताचा शंख नाद.
एकदा पुन्हा आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
या माझ्यासमवेत दोन्ही हात उंचावून, जयजयकार करा,
भारत माता की– जय
भारत माता की– जय
भारत माता की– जय
वंदे मातरम
वंदे मातरम
वंदे मातरम
जय हिंद!
जय हिंद!