नमस्कार...
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, देशातील विविध संशोधन संस्थांचे संचालक, देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी, इतर उपस्थित मान्यवर आणि सभ्य स्त्री-पुरुषहो!
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात भारतासाठी एका फार मोठ्या कामगिरीचा दिवस आहे. एकविसाव्या शतकातील भारत कशा पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संशोधनाला प्राधान्य देत आगेकूच करत आहे याचे प्रतिबिंब आजच्या दिवसात दिसते आहे. आजचा भारत, संभाव्यतेच्या अमर्याद आकाशात नवनव्या संधी घडवतो आहे. आपल्या वैज्ञानिकांनी आणि अभियंत्यांनी तीन ‘परम रुद्र महासंगणक’ तयार केले आहेत. हे तीन महासंगणक देशात दिल्ली, पुणे आणि कोलकाता या शहरांमध्ये बसवण्यात आले आहेत. आजच्या दिवशीच देशासाठी अर्का आणि अरुणिक या दोन उच्च-कार्यक्षमतायुक्त संगणकीय प्रणालींचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रसंगी मी देशातील वैज्ञानिक समुदाय, अभियंते आणि सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो.
बंधू आणि भगिनींनो,
माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला मी युवकांसाठी 100 दिवसांव्यतिरिक्त आणखी 25 दिवसांच्या विशेष कार्याचे वचन दिले होते.त्याच अनुषंगाने आज मी हे महासंगणक माझ्या देशातील युवकांना समर्पित करू इच्छितो.भारतातील तरुण वैज्ञानिकांना अशा पद्धतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान देशातच उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महासंगणक फार महत्त्वाची भूमिका निभावतील.ज्या तीन महासंगणकांचे आज लोकार्पण झाले आहे ते महासंगणक भौतिकशास्त्रापासून पृथ्वीविज्ञान आणि कॉस्मोलॉजी पर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये आधुनिक संशोधनाला मदत करतील. ही अशी क्षेत्रे आहेत ज्यामध्ये आजचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विश्व भविष्यातील जगाची कल्पना करत आहे.
मित्रांनो,
या आजच्या डिजिटल क्रांतीच्या काळात संगणकीय क्षमता राष्ट्रीय क्षमतेचा पर्याय म्हणून उभ्या राहत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाच्या संधी, अर्थव्यवस्थेसाठी वृद्धीच्या संधी, देशाचे युध्दसामर्थ्य, आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षमता, जीवनमानातील, व्यवसाय करण्यातील सुलभता....आता कोणतेही क्षेत्र असे नाही जे थेट तंत्रज्ञान आणि संगणकीय क्षमतेवर अवलंबून नाही. हे तंत्रज्ञान उद्योगक्षेत्र 4.0 मध्ये भारताला यशस्वी होण्याचा सर्वात मोठा आधार आहे. या क्रांतीमध्ये आपला वाटा काही तुकड्यांमध्ये अथवा बाईट्समध्ये नव्हे तर टेरा-बाईट्स आणि पेटा-बाईट्समध्ये असला पाहिजे. आणि म्हणूनच, आजचे यश हा आपण योग्य दिशेने आणि योग्य वेगाने पुढे जात आहोत याचाच पुरावा आहे.
मित्रांनो,
आजचा नवा भारत विकास आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत उर्वरित जगाची केवळ बरोबरी करून समाधानी होऊ शकत नाही. हा नवा भारत स्वतःच्या शास्त्रीय संशोधनातून मानवतेची सेवा करण्याला स्वतःची जबाबदारी मानतो. ‘संशोधनातून आत्मनिर्भरता’ ही आमची जबाबदारी आहे. स्वावलंबनासाठी विज्ञान हा आज आपला गुरुमंत्र बनला आहे. यासाठी आपण डिजिटल भारत, स्टार्टअप भारत, मेक इन इंडिया इत्यादी अनेक ऐतिहासिक अभियाने सुरु केली आहेत. भारतातील भविष्यात येणाऱ्या पिढ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन बळकट व्हावा यासाठी देशातील विद्यालयांमध्ये 10 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग प्रयोगशाळा देखील उभारण्यात आल्या आहेत.
स्टेम (एसटीईएम) विषयांतील शिक्षणासाठी शिष्यवृत्त्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.या वर्षीच्या अर्थसंकल्पात एक लाख कोटी रुपयांच्या संशोधन निधीची देखील घोषणा करण्यात आली आहे. भारताने एकविसाव्या शतकातील जगाला आपल्या अभिनव संशोधनांनी सक्षम करावे, जगाला सशक्त बनवावे.
मित्रांनो,
भारत ज्या क्षेत्रात नवनवे निर्णय घेऊ लागलेला नाही, नवी धोरणे तयार करू लागलेला नाही असे कोणतेही क्षेत्र आज शिल्लक राहिलेले नाही. भारत आज अवकाश क्षेत्रात मोठा सामर्थ्यशाली देश बनला आहे. इतर देशांनी कित्येक अब्ज डॉलर्स खर्च करून जे यश मिळवले तेच कार्य आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी मर्यादित साधनसंपत्तीसह करून दाखवले. याच जिद्दीमुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनला आहे. हाच निर्धार दाखवत भारत आता गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. “भारताची गगनयान मोहीम फक्त अवकाशात पोहोचण्याची नव्हे तर आपल्या शास्त्रीय स्वप्नांच्या असीम उंचीला स्पर्श करण्याची मोहीम आहे.” तुम्हाला माहित आहेच की भारताने 2035 पर्यंत स्वतःचे अवकाश स्थानक उभारण्याचे ध्येय निश्चित केले आहे. आत्ता काही दिवसांपूर्वीच सरकारने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे.
मित्रांनो,
आज सेमीकंडक्टर्स देखील देशाच्या विकासाचा अत्यावश्यक घटक बनले आहेत. या संदर्भात देखील भारताने ‘इंडिया सेमीकंडक्टर अभियाना’सारखी महत्त्वाची मोहीम सुरु केली आहे. आणि अत्यंत कमी कालावधीतच आपल्याला याचे सकारात्मक परिणाम देखील मिळू लागले आहेत. भारत आता स्वतःची सेमीकंडक्टर परिसंस्था उभारत असून ती जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग असेल. आज बसवण्यात आलेल्या या तीन परम रुद्र महासंगणकांच्या माध्यमातून भारताच्या या बहुआयामी वैज्ञानिक विकासाला आणखी बळकटी मिळणार आहे.
मित्रांनो,
कोणताही देश मोठी उद्दिष्टे तेव्हाच साध्य करु शकतो जेव्हा त्याचा दृष्टिकोन उदात्त असतो. भारताचा सुपर कॉम्प्युटर पासून क्वांटम कम्प्युटींग पर्यंतचा प्रवास, याच उदात्त दृष्टिकोनाचे फलित आहे. एके काळी सुपर कॉम्प्युटर काही मोजक्या देशांचे प्रावीण्य असल्याचे मानले जात होते. मात्र, आम्ही 2015 मध्ये राष्ट्रीय सुपरकम्प्युटींग अभियानाचा प्रारंभ केला. आणि आज भारत सुपर कॉम्प्युटर च्या क्षेत्रात मोठ्या देशांची बरोबरी करत आहे. आणि आपण इथेच थांबून राहणार नाहीत. क्वांटम कम्प्युटींग सारख्या तंत्रज्ञानात भारत आतापासूनच आघाडीवर आहे. क्वांटम कम्प्युटींग क्षेत्रात भारताला प्रगती पथावर घेऊन जाण्यात आपल्या राष्ट्रीय सुपरकम्प्युटींग अभियानाची महत्वाची भूमिका असेल. हे नवे तंत्रज्ञान आगामी काळात आपले जग पूर्णपणे बदलून टाकेल. यामुळे माहिती तंत्रज्ञान; उत्पादन क्षेत्र; सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन येईल, नव्या संधी निर्माण होतील. आणि भारत या क्षेत्रात संपूर्ण जगाला नवी दिशा दर्शवण्याच्या विचाराने पुढे वाटचाल करत आहे. मित्रांनो, “विज्ञानाची सार्थकता केवळ संशोधन आणि विकासात नाही, तर समाजातील शेवटच्या टप्प्यातील व्यक्तीच्या आशा आकांक्षा…. त्याच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात आहे.”
आज जर आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहोत, तेव्हा आपण हे देखील सुनिश्चित करत आहोत की, आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान गरिबांची ताकद बनेल. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था, आपले युपीआय याची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. नुकताच आम्ही “मिशन मौसम” चा देखील प्रारंभ केला आहे, ज्यामुळे ‘वेदर रेडी’ आणि ‘क्लायमेट स्मार्ट’ भारताची निर्मिती करण्याचे आपले स्वप्न सत्यात साकारता येणार आहे. आज देखील, सुपर कॉम्प्युटर्स आणि हाय परफॉर्मन्स कम्प्युटींग प्रणाली सारखी जी उद्दिष्टे देशाने साध्य केली आहेत…. यांच्या परिणामस्वरूप देशातील गावे आणि गरिबांची सेवा करण्याची माध्यमे बनतील. हाय परफॉर्मन्स कम्प्युटींग प्रणालीच्या अवलंबामुळे हवामानाचा अंदाज वर्तवण्याची देशाची वैज्ञानिक क्षमता आणखी वृद्धिंगत होईल. आता आपण हायपर लोकल, म्हणजे, अगदी स्थानिक स्तरावर देखील हवामानाच्या संदर्भात अगदी अचूक अंदाज व्यक्त करण्यास सक्षम होऊ. म्हणजेच एक गाव किंवा त्या गावातील युवक देखील ही माहिती दैऊ शकतील. सुपर कॉम्प्युटर जेव्हा एखाद्या दुर्गम भागातील खेड्यात हवामान आणि मातीचे विश्लेषण करुन लागेल तेव्हा ही केवळ विज्ञानाची उपलब्धी नाही तर हजारो लाखो आयुष्यांमध्ये घडणारे मोठे परिवर्तन ठरेल. माझ्या देशातील छोट्यात छोट्या गावातील शेतकऱ्यासाठी जगातील सर्वोत्तम ज्ञान उपलब्ध होईल हे सुपर कॉम्प्युटरमुळे सुनिश्चित होईल.
छोट्या छोट्या गावांमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल कारण, यामुळे शेतकरी आपल्या पीकांबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील. याचा फायदा समुद्रावर मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना देखील होईल. शेतकऱ्यांना होणारे नुकसान कमी करण्याचे नवनवीन पर्याय देखील आपण शोधू शकू. यामुळे विमा योजनेच्या विविध सुविधा मिळवण्यात देखील मदत मिळेल. आपण याच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग संबंधित प्रारुपे बनवू शकतो, ज्याचा फायदा सर्व हितसंबंधी गटांना मिळेल. देशात सुपर कॉम्प्युटर तयार करण्याची विद्वत्ता आपल्याकडे आहे, ही उपलब्धी देशातील सामान्य माणसासाठी एक अभिमानास्पद बाब तर आहेच, यामुळे आगामी काळात देशवासीयांच्या, सामान्य वर्गाच्या जीवनात मोठे बदल घडविण्याचे मार्ग देखील सापडतील.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या या काळात सुपर कॉम्प्युटर्स खूप मोठी भूमिका निभावणार आहेत. ज्याप्रमाणे आज भारताने आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 5G नेटवर्क बनवले आहे, ज्याप्रमाणे आज मोठमोठ्या कंपन्यांचे फोन भारतात तयार केले जात आहेत, यामुळे देशाच्या डिजिटल क्रांतीला नवे पंख लाभले आहेत. यामुळे आम्ही तंत्रज्ञान आणि त्याचे लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवू शकलो आहोत. याच प्रमाणे भविष्यातील तंत्रज्ञान विकसित करण्याचे आपले सामर्थ्य, मेक इन इंडिया चे आपले यश … हे देशातील सामान्य माणसाला येणाऱ्या काळासाठी सज्ज करत आहेत. सुपर कॉम्प्युटरमुळे प्रत्येक क्षेत्रात नवनवीन शोध लागतील. यामुळे नव्या संधी जन्माला येतील. याचा लाभ देशातील सामान्य लोकांना देखील होईल. ते जगापेक्षा मागे राहणार नाहीत, तर खांद्याला खांदा लावून वाटचाल करतील. आणि माझ्या तरुणांसाठी, माझ्या देशाच्या युवाशक्तीसाठी, आणि भारत जेव्हा जगातील सर्वात तरुण देश आहे तेव्हा, येणारे युग जेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान या मार्गावरच चालणार आहे तेव्हा नव्या संधींचा जन्म देणारे देखील आहे. मी देशातील तरुणांना या सर्व गोष्टींसाठी विशेष शुभेच्छा देतो, या उपलब्धींसाठी मी देशवासीयांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो.
आपले युवक, आपले संशोधक या आधुनिक सुविधांचा लाभ घेतील, विज्ञानाच्या क्षेत्रात नव्या कार्यक्षेत्रांचा प्रारंभ करतील अशी मला आशा आहे. आपणा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद !