महामहिम, स्त्री आणि पुरुष गण, नमस्कार!
अतुल्य भारतात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो ! पर्यटन मंत्री म्हणून, जागतिक स्तरावर दोन ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे क्षेत्र हाताळताना, तुम्हाला स्वतः पर्यटक बनण्याची संधी मिळणे दुर्मिळ आहे. पण, तुम्ही गोव्यात आहात - भारतातील एक प्रमुख पर्यटन आकर्षण. म्हणूनच, मी तुम्हाला तुमच्या गंभीर चर्चेतून थोडा वेळ काढून गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि आध्यात्मिक बाजू पाहण्याची विनंती करतो !
महामहिम,
आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये एक म्हण आहे. अतिथी देवो भवः , याचा अर्थ, 'अतिथी म्हणजे देव' आणि, हाच आमचा पर्यटनाप्रति दृष्टीकोन आहे. आपले पर्यटन स्थळ हे केवळ दर्शनासाठी नाही. तो एक तल्लीन करणारा अनुभव आहे. संगीत असो वा खाद्य संस्कृती, कला असो वा संस्कृती, भारतातील विविधता खरोखरच भव्य आहे. उंच हिमालय पर्वतरांगांपासून ते घनदाट जंगलांपर्यंत, कोरड्या वाळवंटापासून ते सुंदर समुद्रकिनाऱ्यापर्यंत, साहसी खेळांपासून ते ध्यान धारणेपर्यंत, भारतामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. आमच्या G-20 अध्यक्षपदाच्या काळात, आम्ही संपूर्ण भारतात 100 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 200 बैठका आयोजित करत आहोत. या बैठकांसाठी भारतात येऊन गेलेल्या तुमच्या मित्रांना जर तुम्ही विचारले तर मला खात्री आहे की कोणतेही दोन अनुभव एकसारखे नसतील.
महामहिम,
भारतात, या क्षेत्रातील आमचे प्रयत्न आमचा समृद्ध वारसा जतन करण्याबरोबरच पर्यटनासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर केंद्रित आहेत. आध्यात्मिक पर्यटन विकसित करण्यावर आमचे लक्ष केंद्रित केले आहे. कारण भारत जगातील प्रत्येक प्रमुख धर्माच्या यात्रेकरूंना आकर्षित करतो. पायाभूत सुविधांमधील सुधारणांनंतर, वाराणसी हे शाश्वत शहर, जे प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक आहे, ते आता पूर्वीच्या तुलनेत दहा पटीने अधिक म्हणजेच 7 कोटी यात्रेकरूंना आकर्षित करते. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखी नवीन पर्यटन स्थळे देखील निर्माण करत आहोत. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून त्याचे बांधकाम झाल्यानंतर एका वर्षात सुमारे 2.7 दशलक्ष पर्यटकांनी तिथे भेट दिली आहे. गेल्या नऊ वर्षांत आम्ही देशातील पर्यटनाची संपूर्ण परिसंस्था विकसित करण्यावर विशेष भर दिला आहे. वाहतूक संबंधी पायाभूत सुविधांपासून ते आदरातिथ्य क्षेत्रापर्यंत, कौशल्य विकासापर्यंत आणि आमच्या व्हिसा प्रणालींमध्येही आम्ही आमच्या सुधारणांच्या केंद्रस्थानी पर्यटन क्षेत्र ठेवले आहे. आतिथ्य क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती, सामाजिक समावेशकता आणि आर्थिक प्रगतीसाठी मोठी क्षमता आहे. इतर अनेक क्षेत्रांच्या तुलनेत यात महिला आणि तरुणांना अधिक रोजगार मिळतो. शाश्वत विकास उद्दिष्टे जलद गतीने साध्य करण्यासाठी आम्ही पर्यटन क्षेत्राच्या प्रासंगिकतेला देखील महत्व देत आहोत याचा मला आनंद आहे.
हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, पर्यटन एमएसएमई आणि गंतव्यस्थान व्यवस्थापन या परस्परांशी जोडलेल्या पाच प्राधान्य क्षेत्रांवर तुम्ही काम करत आहात. हे प्राधान्यक्रम भारतीय तसेच ग्लोबल साउथचे प्राधान्यक्रम प्रतिबिंबित करतात. नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संवर्धित वास्तविकता यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ, भारतात, आम्ही भारतात बोलल्या जाणार्या भाषांच्या विस्तृत श्रेणीचे वास्तविक वेळेत भाषांतर सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यावर काम करत आहोत. मला विश्वास आहे की सरकार, उद्योजक, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सहकार्याने पर्यटन क्षेत्रात अशा तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीला गती मिळू शकेल. आपल्या पर्यटन कंपन्यांना वित्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी, व्यवसायाचे नियम सुलभ करण्यासाठी आणि कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे.
दहशतवादामुळे फूट पडते, मात्र पर्यटन सर्वांना एकत्र आणते असे म्हणतात. खरंच, पर्यटनामध्ये समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्याची क्षमता आहे. ज्यामुळे सुसंवादी समाज निर्माण होऊ शकेल. संयुक्त राष्ट्र पर्यटन संघटना (यूएनडब्ल्यूटीओ) बरोबर भागीदारीत G20 पर्यटन डॅशबोर्ड विकसित केला जात आहे हे ऐकून मला आनंद होत आहे. हे सर्वोत्कृष्ट पद्धती, केस स्टडी आणि प्रेरणादायी कथा एकत्र आणेल. हे अशा प्रकारचे पहिले व्यासपीठ असेल आणि तुमचा चिरस्थायी वारसा असेल. मला आशा आहे की तुमचे विचारमंथन आणि "गोवा आराखडा" पर्यटनाचे परिवर्तनात्मक सामर्थ्य साकार करण्याच्या आपल्या सामूहिक प्रयत्नांमध्ये गुणात्मक वाढ करेल. भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे ब्रीदवाक्य, ''वसुधैव कुटुंबकम्''- ''एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य'' हे जागतिक पर्यटनाचे देखील ब्रीदवाक्य होऊ शकेल.
भारत हा सण-उत्सवांचा देश आहे. आपल्याकडे देशभरात वर्षभर सण असतात. गोव्यात लवकरच साओ जोआओ उत्सव सुरु होणार आहे. मात्र आणखी एक उत्सव आहे ज्याला तुम्ही भेट दिलीच पाहिजे. लोकशाहीच्या जननीत लोकशाहीचा उत्सव. पुढील वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. एक महिन्याहून अधिक काळ चालणाऱ्या या उत्सवादरम्यान, सुमारे एक अब्ज मतदार हा उत्सव साजरा करतील, लोकशाही मूल्यांवर त्यांचा अढळ विश्वास पुनर्स्थापित करतील. दहा लाखांहून अधिक मतदान केंद्रांसह, या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी, त्याचे वैविध्य पाहण्यासाठी तुम्हाला ठिकाणांची उणीव भासणार नाही. या सर्वात महत्त्वाच्या जागतिक उत्सवांसाठी मी तुम्हा सर्वांना भारतात येण्यासाठी आमंत्रित करतो. आणि त्या आमंत्रणासह, मी तुम्हा सर्वांना तुमच्या विचारमंथनात यश लाभो यासाठी शुभेच्छा देतो.
धन्यवाद!