सन्माननीय, स्त्री-पुरुष सज्जनांनो, नमस्कार! मी तुम्हा सर्वांचे भारतात स्वागत करतो. भविष्य, शाश्वतता किंवा वाढ तसेच विकास याविषयी कोणतीही चर्चा ऊर्जेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत सर्व स्तरावरील विकासावर त्याचा परिणाम होतो.
मित्रांनो,
आपली भिन्न वास्तविकता लक्षात घेता, आपले ऊर्जा संक्रमणाचे मार्ग भिन्न आहेत. मात्र, आमची उद्दिष्टे एकच आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे. हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणासाठी भारत खूप प्रयत्न करत आहे. भारत हे सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. तरीही, आम्ही आमच्या हवामान बदल विषयक वचनबद्धतेवर जोरकसपणे पुढे जात आहोत. भारताने हवामान बदला संदर्भात नेतृत्वाची भूमिका घेतली आहे. आम्ही आमचे गैर-जीवाश्म विद्युत क्षमता लक्ष्य नऊ वर्षे अगोदरच गाठले आहे. आम्ही आता उच्च लक्ष्य निश्चित केले आहे. 2030 पर्यंत 50 टक्के गैर-जीवाश्म क्षमता गाठण्याची आमची योजना आहे. सौर आणि पवन उर्जा क्षेत्रात भारत जगात नेतृत्व करत आहे. मला आनंद आहे की कार्यगटाच्या प्रतिनिधींनी पावागड सोलर पार्क आणि मोढेरा सोलर व्हिलेजला भेट दिली. त्यांनी स्वच्छ ऊर्जेसाठीची भारताची वचनबद्धता आणि प्रमाण पाहिले आहे.
मित्रांनो,
भारतात, आम्ही गेल्या नऊ वर्षांत 190 दशलक्षाहून अधिक कुटुंबांना एलपीजीशी जोडले आहे. प्रत्येक गावाला वीजेशी जोडण्याचा ऐतिहासिक टप्पाही आम्ही गाठला आहे. आम्ही लोकांना पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस देण्याचे काम करत आहोत. काही वर्षांत 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला सेवा देण्याची या कार्यक्रमाची क्षमता आहे. सर्वांसाठी सर्वसमावेशक, लवचिक, न्याय्य आणि शाश्वत ऊर्जेसाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मित्रांनो,
छोटी छोटी पावले मोठे परिणाम देतात. 2015 मध्ये, आम्ही एलईडी दिवे वापरण्यासाठी एक योजना सुरू करून छोटीशी चळवळ सुरू केली. हा जगातील सर्वात मोठा एलईडी वितरण कार्यक्रम बनला आहे. यातून दरवर्षी 45 अब्ज युनिट्सपेक्षा जास्त ऊर्जा बचत होते. आम्ही जगातील सर्वात मोठा कृषी पंप सौर उपक्रम देखील सुरू केला आहे. भारताच्या देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ 2030 पर्यंत वार्षिक 10 दशलक्ष विक्रीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आम्ही या वर्षी 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या उपक्रमाला सुरूवात केली आहे. 2025 पर्यंत याची व्याप्ती संपूर्ण देशभरात पोहचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भारतास कार्बनरहित करण्यासाठी, आम्ही पर्याय म्हणून हरित हायड्रोजनवर मिशन मोडवर काम करत आहोत. हरित हायड्रोजन आणि त्याच्या उप-उत्पादनांचे उत्पादन, वापर आणि निर्यात या क्षेत्रात भारताला जागतिक केन्द्र बनवण्याचा उद्देश आहे. आम्ही शिकलो ते सामायिक करण्यात आम्हाला आनंद होत आहे.
मित्रांनो,
शाश्वत, न्याय्य, परवडणारे, सर्वसमावेशक आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमण पुढे नेण्यासाठी जग या गटाकडे पहात आहे. हे करत असताना विकसनशील (ग्लोबल साउथमधील) देशातील आपले बंधू-भगिनी मागे राहू नयेत हे महत्त्वाचे आहे. आपण विकसनशील देशांसाठी कमी खर्चात वित्तपुरवठा सुनिश्चित केला पाहिजे. तंत्रज्ञानातील तफावत भरून काढण्यासाठी, ऊर्जा सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्यासाठी आपण मार्ग शोधले पाहिजेत. आणि, आपण 'भविष्यासाठी इंधन' यासंदर्भात सहकार्य मजबूत केले पाहिजे. 'हायड्रोजनवरील उच्च-स्तरीय सिद्धांत' हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. ट्रान्स-नॅशनल ग्रिड इंटरकनेक्शन ऊर्जा सुरक्षा वाढवू शकतात. आम्ही या प्रदेशातील आमच्या शेजाऱ्यांसोबत परस्पर फायदेशीर सहकार्याला प्रोत्साहन देत आहोत. आणि मी तुम्हाला सांगू शकतो, आम्ही उत्साहवर्धक परिणाम पाहत आहोत. आंतर-संलग्न हरित ग्रिड्सची दृष्टी लक्षात घेऊन परिवर्तन होऊ शकते. हे आपल्या सर्वांना आपली हवामान उद्दिष्टे पूर्ण करण्यास, हरित गुंतवणुकीला चालना देण्यास आणि लाखोंची रोजगार निर्मिती करण्यास सक्षम करेल. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या ''एक सूर्य, एक जग, एक ग्रिड या हरित ग्रिड उपक्रमात सहभागी होण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो.
मित्रांनो,
आपल्या सभोवतालची काळजी घेणे नैसर्गिक असू शकते. ते सांस्कृतिकही असू शकते. भारतात, तो आपल्या पारंपारिक ज्ञानाचा एक भाग आहे. आणि तिथूनच मिशन लाइफला ताकद मिळते. पर्यावरणस्नेही जीवनशैली आपल्यापैकी प्रत्येकाला हवामान बदलात विजेता बनवेल.
मित्रांनो,
आपण कसेही संक्रमण करत असलो तरी आपले विचार आणि कृती नेहमीच आपली ''एक वसुंधरा'' टिकवून ठेवण्यास, आपल्या ''एक कुटुंब''च्या हिताचे रक्षण करण्यास आणि हरित ''एक भविष्य''कडे वाटचाल करण्यात मदत करतात. तुमच्या विचारमंथनात तुम्हाला यश मिळावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद!