जय खोडल माता !
आजच्या या विशेष कार्यक्रमात खोडलधामची पावन भूमी आणि खोडल मातेच्या भक्तांचा सहवास लाभणे माझ्यासाठी परम भाग्याची बाब आहे. जनकल्याण आणि सेवा क्षेत्रात श्री खोडलधाम ट्रस्टने आज आणखी एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अमरेलीमध्ये आज पासून कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे काम सुरू होत आहे. येत्या काही आठवड्यात श्री खोडलधाम ट्रस्ट-कागवड च्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. तुम्हा सर्वांना या आयोजनाच्या खुप खुप शुभेच्छा.
माझ्या कुटुंबीयांनो,
14 वर्षांपूर्वी लेवा पाटीदार समाजाने सेवा, संस्कार आणि समर्पणाचा हाच संकल्प घेऊन श्री खोडलधाम ट्रस्टची स्थापना केली होती. तेव्हापासून या ट्रस्टने आपल्या सेवा कार्याने लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी काम केले आहे. शिक्षण क्षेत्र असो, कृषी क्षेत्र असो किंवा आरोग्य क्षेत्र असो, आपल्या ट्रस्टने प्रत्येक क्षेत्रात निरंतर काम करण्याचा प्रयत्न केला आहे. अमरेलीमध्ये उभारले जात असलेले कर्करोग रुग्णालय सेवा भावाचे आणखी एक उदाहरण बनेल. या रुग्णालयामुळे अमरेलीसह सौराष्ट्राच्या मोठ्या क्षेत्राला लाभ पोहोचणार आहे.
मित्रांनो,
कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार करणे हे कोणत्याही व्यक्ती किंवा कुटुंबासमोर एक मोठे आव्हान असते. कर्करोगावर उपचार करताना कोणत्याही रुग्णाला कसल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याच विचाराने गेल्या नऊ वर्षात देशात जवळपास 30 नवी कर्करोग रुग्णालये विकसित करण्यात आली आहेत. याशिवाय नव्या 10 कर्करोग रुग्णालय निर्माणाचे काम प्रगतीपथावर आहे.
मित्रांनो,
कर्करोगाचे निदान योग्य वेळी झाले पाहिजे ही बाब कर्करोगावर उपचार करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. आपल्या छोट्या गावातील लोकांना जेव्हा कर्करोग झाल्याचे लक्षात येते तोवर खूप उशीर झालेला असतो, कर्करोग शरीरात सगळीकडे पसरलेला असतो. अशा स्थिती पासून बचाव करण्यासाठीच केंद्र सरकारने गाव स्तरावर दीड लाखाहून अधिक आयुष्मान आरोग्य केंद्रांची निर्मिती केली आहे. या आयुष्मान आरोग्य केंद्रांमध्ये कर्करोगासह इतर अनेक गंभीर आजारांचे त्याच्या प्रारंभिक टप्प्यातच निदान करण्यावर भर देण्यात येत आहे. जेव्हा जेव्हा कर्करोगाचे प्रारंभिक टप्प्यातच निदान होते तेव्हा त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना देखील खूप मदत होते. केंद्र सरकारच्या या प्रयत्नामुळे महिलांना देखील खूप फायदा झाला. गर्भाशय मुखाचा कर्करोग असो, स्तनांचा कर्करोग असो या आजारांच्या प्रारंभिक टप्प्यातील निदानात आयुष्मान आरोग्य मंदिर महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.
मित्रांनो,
गेल्या वीस वर्षात गुजरातने आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साध्य केली आहे. आज गुजरात भारताचे सर्वात मोठे आरोग्य केंद्र बनत आहे. 2002 पर्यंत गुजरात मध्ये केवळ 11 वैद्यकीय महाविद्यालये होती. आज त्यांची संख्या वाढून ती 40 वर पोहोचली आहे. या 20 वर्षांमध्ये येथील एमबीबीएस अभ्यासक्रमातील प्रवेश क्षमता वाढवून जवळपास पाचपट झाली आहे. स्नातकोत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश क्षमता देखील जवळपास तीन पटीने वाढली आहे. आता तर आपल्या राजकोटमध्ये एम्स देखील आहे. 2002 पर्यंत गुजरात मध्ये केवळ 13 फार्मसी महाविद्यालये होती. आज त्यांची संख्या वाढून शंभराच्या जवळपास पोहोचली आहे. गेल्या 20 वर्षात पदविका फार्मसी महाविद्यालयांची संख्या देखील 6 वरून 30 च्या आसपास पोहोचली आहे. गुजरात राज्याने आरोग्य क्षेत्रात अनेक सुधारणांचे प्रारुप सादर केले आहे. इथे प्रत्येक गावात सामुदायिक आरोग्य केंद्र उघडण्यात आले आहे. आदिवासी आणि गरीब भागांमध्ये प्रत्येक गावांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यात आली आहे. गुजरात मध्ये 108 रुग्णवाहिका सेवेवर दिवसेंदिवस लोकांचा विश्वास वाढतच चालला आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
देशातील लोक आरोग्यपूर्ण आणि सशक्त असणे, ही बाब देशाच्या विकासासाठी देखील आवश्यक आहे. खोडल मातेच्या आशीर्वादाने आज आमचे सरकार याच विचारांना अनुसरून वाटचाल करत आहे. गरिबांना गंभीर आजारांमध्ये उपचारांची चिंता करावी लागू नये यासाठीच आम्ही आयुष्मान भारत योजना सुरू केली होती. आज या योजनेच्या मदतीने सहा कोटींहून अधिक लोकांनी रुग्णालयात दाखल होऊन आपल्यावर उपचार करून घेण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये कर्करोगांच्या रुग्णांचे देखील मोठे प्रमाण आहे. जर आयुष्मान भारत योजना अस्तित्वात नसती तर या गरिबांना उपचार करून घेण्यासाठी सूमारे एक लाख कोटी रुपये खर्च करावे लागले असते. आमच्या सरकारने 10 हजार जन औषधी केंद्र उघडली असून या केंद्रांवर लोकांना 80 टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत. आता सरकार प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांची संख्या वाढवून 25 हजारावर नेणार आहे. सवलतीच्या दरात मिळणाऱ्या औषधांमुळे रुग्णांच्या 30 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. सरकारने कर्करोगांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती देखील नियंत्रणात ठेवल्या आहेत. त्यामुळे कर्करोगांच्या अनेक रुग्णांना याचा फायदा झाला आहे.
मित्रांनो,
तुम्हा सर्वांशी माझा खूप जुना ऋणानुबंध आहे. मी जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये उपस्थित होतो तेव्हा काही ना काही आवाहन करतो. आज देखील मी तुम्हाला केलेल्या आवाहनांचा पुनरुच्चार करू इच्छितो. एक प्रकारे माझी नऊ आवाहने आहेत. आणि जेव्हा देवीचे काम असेल तेव्हा तर नवरात्रीची आठवण येणे स्वाभाविक आहे, म्हणूनच माझी 9 आवाहने असल्याचे मी सांगतो. तुम्ही यापैकी काही क्षेत्रांमध्ये यापूर्वीच उपक्रम राबवण्याची सुरूवात केली असल्याचे मी जाणून आहे. तरीही तुमच्यासाठी, तुमच्या नव्या पिढीसाठी मी या 9 आवाहनांचा पुनरुच्चार करत आहे. पहिले आवाहन - पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवणे आणि जल संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना जागृत करणे. दुसरे आवाहन - गावोगावी जाऊन लोकांना डिजिटल आर्थिक व्यवहाराप्रती जागृत करणे. तिसरे आवाहन - आपले गाव, आपला विभाग, आपल्या शहराला स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर स्थापित करण्यासाठी काम करणे. चौथे आवाहन - शक्य असेल तिथे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, भारतात तयार झालेल्या उत्पादनांचाच वापर करणे. पाचवे आवाहन - पर्यटक म्हणून शक्य असेल तितके आपल्या देशातील पर्यटन स्थळांना भेट देऊन देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देणे. सहावे आवाहन - सेंद्रिय शेती संदर्भात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जागरूक करत रहा. माझे सातवे आवाहन आहे - भरड धान्याला, श्री अन्नाला आपल्या आयुष्याचा भाग बनवा आणि त्याचा जास्तीत जास्त प्रचार - प्रसार करा. माझा आठवे आवाहन आहे - तंदुरुस्तीसाठी योग आणि खेळांवर भर द्या. त्यांनाही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा. माझे नववे आवाहन आहे - कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून आणि व्यसनांपासून कायम दूर रहा, त्यांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका.
मित्रांनो,
तुम्ही सर्वजण आपली जबाबदारी संपूर्ण निष्ठेने आणि सामर्थ्याने पार पाडत राहाल याचा मला पूर्ण विश्वास आहे. अमरेलीमध्ये तयार होत असलेले, निर्माणाधीन असलेले कर्करोग रुग्णालय देखील संपूर्ण समाजाच्या कल्याणाचे उदाहरण बनेल. मी लेवा पाटीदार समाज आणि श्री खोडलधाम ट्रस्टला त्यांच्या भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा देत आहे. खोडल मातेच्या कृपेने तुम्ही सर्वजण याच प्रकारे समाजसेवेत रत रहा. पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
पण, जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, वाईट वाटून घेऊ नका. ईश्वराच्या कृपेने आपल्या इथे देखील आज-काल लक्ष्मीचा निवास दिसून येत आहे, आणि याचा मला आनंद आहे. मात्र परदेशात जाऊन लग्न समारंभ करणे योग्य आहे का? आपल्या देशात लग्न समारंभ होऊ शकत नाही का? या गोष्टीमुळे भारतातील कितीतरी धन परदेशात जाते. तुम्ही देखील अशी वातावरण निर्मिती करू शकता की, परदेशात जाऊन लग्न समारंभ आयोजित करण्याचा जो आजार वाढत आहे, त्याला आपल्या समाजात प्रवेश मिळणार नाही. खोडल मातेच्या चरणी लग्न समारंभ का होऊ नये? म्हणूनच मी सांगतो ‘वेड इन इंडिया’ - लग्नसमारंभ हिंदुस्थानातच करा. जसे मेड इन इंडिया तसेच वेड इन इंडिया. तुम्ही माझे कुटुंबीय आहात म्हणून हे सांगण्याची इच्छा झाली. जास्त वेळ बोलणार नाही. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद!
जय खोडल माता!!