या दिवसांमध्ये रोजगार मेळावे माझ्यासाठी एक प्रमुख कार्यक्रम बनले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून मी बघत आहे की प्रत्येक आठवड्याला भाजपा -शासित कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये रोजगार मेळावे होत आहेत, हजारो युवकांना रोजगार नियुक्तीपत्र दिले जात आहेत. मला याचा आनंद आहे की मला त्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळत आहे. हे प्रतिभावंत युवक सरकारी यंत्रणेत नवीन विचार घेऊन येत आहेत, कार्यक्षमता वाढवण्यात मदत करत आहेत.
मित्रांनो,
उत्तर प्रदेशामध्ये आयोजित आजच्या रोजगार मेळाव्याचे एक विशेष महत्त्व आहे, हा रोजगार मेळावा केवळ 9000 कुटुंबंसाठी आनंदाची भेट घेऊन आला नाही तर एकप्रकारे उत्तर प्रदेशामध्ये सुरक्षेची भावना अधिक मोठ्या प्रमाणात मजबूत करत आहे. या नवीन भरती मधून उत्तर प्रदेश पोलीस दल आणखी मजबूत आणि सशक्त होत आहे. आज ज्या युवकांना नियुक्तीपत्र मिळत आहेत त्यांना या नव्या प्रारंभासाठी आणि नव्या जबाबदारी साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला हे सांगण्यात आले आहे की वर्ष 2017 पासून आतापर्यंत उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये दीड लाखाहून अधिक नवीन भरती झालेली आहे, केवळ एकाच विभागामध्ये. याचाच अर्थ भाजपाच्या शासन काळात रोजगार आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झालेली आहे.
मित्रांनो,
एक काळ होता, जेव्हा उत्तर प्रदेशची ओळख गुंड आणि उध्वस्त अशा कायदा व्यवस्था या कारणाने होत होती. आज उत्तर प्रदेशची ओळख सुदृढ अशा कायदा व्यवस्थेसाठी होत आहे, विकासाच्या मार्गावर प्रगती करणाऱ्या राज्यांमध्ये होत आहे. भाजपा सरकारने जनतेमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ केली आहे. आपण सर्व ओळखता की, जिथे जिथे कायदा व्यवस्था मजबूत असते तिथे तिथे रोजगाराच्या संधी अनेक पटीने वाढत जात असतात. जिथे जिथे व्यवसायासाठी सुरक्षित वातावरण निर्मिती होत असते, तिथे गुंतवणुकीला चालना मिळत असते. आता आपण बघू शकता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एका पद्धतीने हिंदुस्तानच्या नागरिकांसाठी हे सर्वात मोठे श्रद्धेचे केंद्र आहे,इथे अनेक तीर्थक्षेत्र आहेत. प्रत्येक परंपरेला मानणाऱ्यांसाठी उत्तर प्रदेशात सर्व काही उपलब्ध आहे. जेव्हा कायदा व्यवस्था सक्षम आहे अशी बातमी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते तेव्हा उत्तर प्रदेशामध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या सुद्धा वाढत असते आणि या दिवसांमध्ये आपण बघत आहात की भाजपाचे दुहेरी इंजिन सरकार ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशात विकासाला प्राधान्य देत आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी वाढत आहेत. एकापेक्षा एक उत्कृष्ट अशा आधुनिक महामार्गाची निर्मिती, नव नवीन विमानतळ, समर्पित फ्रेट कॅरिडॉर यांची निर्मिती, नवीन डिफेन्स कॉरिडॉर व्यवस्था, नवीन मोबाईल निर्मिती केंद्रांची स्थापना, आधुनिक जलमार्ग, उत्तर प्रदेशच्या या आधुनिक होणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा इथल्या कानाकोपऱ्यात नवीन नवीन रोजगार घेऊन येत आहेत.
मित्रांनो,
आज उत्तर प्रदेशमध्ये सर्वात अधिक महामार्ग आहेत, इथे महामार्गांचा सतत विस्तार केला जात आहे. आत्ताच मला एक कुटुंब भेटण्यासाठी आले होते, त्यांच्याबरोबर एक मुलगी सुद्धा होती, त्यांना विचारले, तुम्ही उत्तर प्रदेशामधून आहात का? त्यांनी सांगितले नाही, आम्ही तर एक्सप्रेस प्रदेशामधून आहोत. बघा ही उत्तर प्रदेशाची ओळख बनलेली आहे. प्रत्येक शहराला महामार्गाने जोडण्यासाठी नवीन रस्ते सुद्धा बनवले जात आहेत, विकासाच्या या योजना रोजगाराच्या संधी तर वाढवत आहेतच त्याचबरोबर दुसऱ्या योजनांसाठीही उत्तर प्रदेशमध्ये येण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध करत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने तिथे पर्यटन उद्योगाला समर्थन दिलेले आहे, नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळेही रोजगारांच्या संधीमध्ये मोठी वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी मी वाचत असताना कळले की लोक ख्रिसमसमध्ये गोव्याला जातात. त्यावेळी गोव्यात प्रचंड गर्दी असते. यावेळेस आकडेवारी मिळाली आहे की, गोव्यापेक्षा जास्त हॉटेल बुकिंग हे काशीमध्ये झालेले होते. काशी या लोकसभेच्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी (खासदार म्हणून) म्हणून मला याचा खूप आनंद होत आहे. याच आधी काही दिवसांपूर्वी ग्लोबल इन्वेस्टर समिट अर्थात जागतिक गुंतवणूक परिषदेमध्ये मी गुंतवणूकदारांचा उत्साह पाहिला हजारो कोटी रुपयांची ही गुंतवणूक होती. इथे सरकारी आणि बिगरसरकारी दोन्ही पद्धतीने रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.
मित्रांनो,
सुरक्षा आणि रोजगार यांच्या एकत्रित ताकदीने उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला नव्याने गती मिळाली आहे. विनाहमी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा देणाऱ्या मुद्रा योजनेमुळे उत्तर प्रदेशच्या लाखो युवकांच्या स्वप्नांना नवीन पंख दिले आहेत. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अर्थात एक जिल्हा एक उत्पादन या योजनेमुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगारांच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत, यामुळे युवकांना आपल्या कर्तृत्व शक्तीला मोठ्या बाजारांमध्ये सिद्ध करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लाखो नोंदणीकृत एमएसएमई आहेत , जो भारतातला लघु उद्योगांचा एक सर्वात मोठा पाया आहे. नवीन उद्योजकांसाठी स्टार्टअप परिसंस्था निर्मितीमध्ये उत्तर प्रदेश सरकार नेतृत्वाची भूमिका पार पाडत आहे.
मित्रांनो,
आज ज्यांना ज्यांना नियुक्तीपत्र मिळालेले आहे त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये नवीन जबाबदाऱ्या, नवीन आव्हाने आणि नवीन संधी येणार आहेत. रोज नवीन संधी आपली वाट बघत असणार आहे. या व्यतिरिक्त मी आपल्याला वैयक्तिक रूपाने उत्तर प्रदेशाचा एक लोकप्रतिनिधी एक खासदार या नात्याने आणि एवढ्या वर्षांचा माझा सार्वजनिक जीवनातल्या अनुभव पाहता मी हे सांगतो की, मित्रांनो जरी आपल्याला आज हे नियुक्तीपत्र मिळत आहे, आपण आपल्या अंतर्मनातल्या विद्यार्थ्याला कधीही मारू नका, प्रत्येक वेळेला नवीन शिका, आपली क्षमता वाढवा. आता तर ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाच्या एवढ्या व्यवस्था होत आहेत, एवढं काही शिकायला मिळत आहे, आपल्या प्रगतीसाठी हे खूपच गरजेचे आहे. आपल्या जीवनाला कधीही थांबू देऊ नका, आपले जीवन नेहमी गतिशील राहिले पाहिजे, जीवनामध्ये नवनवीन उंची गाठत चला ,यासाठी आपली योग्यता वाढवा. आपल्याला सरकारी सेवेमध्ये प्रवेश मिळालेला आहे, आपल्या जीवनाची एक सुरुवात झालेली आहे. आणि आपण याला एकप्रकारे प्रारंभ समजू शकता. आपल्याला आपल्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी आपल्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं आहे, आपलं ज्ञान सतत वाढवत राहायचं आहे. जेव्हा आपण या सेवेमध्ये प्रवेश करता , तुम्हाला नियुक्तीपत्र दिले गेले आहे. आता तुम्ही पोलिसांच्या गणवेशामध्ये सज्ज होणार आहात तर सरकार तुमच्या हातात काठी देणार आहे. परंतु हे आपण कधीही विसरू नका सरकार नंतर आलेले आहे याआधी परमात्म्याने तुम्हाला एक हृदय दिलेले आहे, यासाठी आपल्याला या काठीपेक्षा जास्त आपल्या हृदयाच्या भावनेला समजायचं आहे. तुम्हाला संवेदनशील देखील राहायचं आहे आणि या व्यवस्थेला सुद्धा संवेदनशील ठेवायचे आहे. ज्या युवकांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले आहे, त्यांच्या प्रशिक्षणाच्यावेळी या गोष्टींची नेहमी खबरदारी घेतली जाईल की, या युवकांना जास्तीत जास्त संवेदनशील कसे बनवता येईल. उत्तर प्रदेश सरकार पोलीस दलाच्या या प्रशिक्षण पद्धतीमध्ये नवीन बदल करून वेगाने सुधारणा करण्याचे काम करत आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट पोलीसिंगला समर्थन देण्यासाठी युवकांना सायबर क्राईम, फॉरेनसिक् सायन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण सुद्धा दिले जावे.
मित्रांनो,
आज नियुक्तीपत्र मिळणाऱ्या सर्व युवकांवर सर्वसामान्य नागरिकाची सुरक्षा याबरोबरच समाजाला एक नवी दिशा देण्याची सुद्धा जबाबदारी आहे. आपण लोकांसाठी सेवा आणि शक्ती या दोन्ही गोष्टींचे प्रतिबिंब होऊ शकता. आपण आपली निष्ठा आणि आदर्श संकल्प यांच्या मदतीने अशा वातावरणाची निर्मिती करा जिथे गुन्हेगार घाबरून राहतील आणि कायद्याचे पालन करणारे लोक अधिक निडर बनतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना देखील माझ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.