जागतिक बँकेच्या अध्यक्ष, मोरोक्कोच्या ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत विकास मंत्री, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी निर्मला सीतारामन जी, लॉर्ड निकोलस स्टर्न, प्राध्यापक सनस्टीन आणि इतर मान्यवर अतिथी,
नमस्कार!
मला आनंद होत आहे की, जागतिक बँकेने हवामान बदलावर वर्तणुकीतील बदलांचा प्रभाव यावर हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो जागतिक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे हे पाहून खूप आनंद झाला आहे.
मित्रहो,
चाणक्य या महान भारतीय तत्त्ववेत्त्याने दोन हजार वर्षांपूर्वी हे लिहिले होते :
जल बिन्दु निपातेन क्रमशः पूर्यते घटः| स हेतुः सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य च |
जेव्हा पाण्याचे छोटे थेंब एकत्र येतात, तेव्हा ते मडके भरते. त्याचप्रमाणे ज्ञान, सत्कर्म किंवा संपत्ती यांची हळूहळू वाढ होते . यात आपल्यासाठी एक संदेश आहे. स्वतंत्रपणे पाण्याचा प्रत्येक थेंब मोठा दिसत नाही. पण जेव्हा असे अनेक थेंब एकत्र येतात, तेव्हा त्यांचा प्रभाव पाडतो. त्याचप्रमणे वसुंधरेसाठी केलेले प्रत्येक चांगले कृत्य अपुरे वाटू शकते. परंतु जेव्हा जगभरातील अब्जावधी लोक एकत्रितपणे ते करतात, तेव्हा त्याचा प्रभाव देखील खूप मोठा असतो. मला वाटते की आपल्या पृथ्वीतलासाठी योग्य निर्णय घेणार्या व्यक्ती आपल्या वसुंधरेच्या रक्षणासाठीच्या या लढ्यात महत्त्वाच्या आहेत. हाच मिशन लाइफचा गाभा आहे.
मित्रहो ,
या चळवळीची बीजे फार पूर्वी पेरली गेली होती. 2015 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत, मी वर्तणुकीतील बदलाच्या गरजेबद्दल बोललो. तेव्हापासून आपण खूप लांबचा पल्ला गाठला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये, मी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस यांनी मिशन LiFE चा प्रारंभ केला होता. कोप -27 च्या निष्कर्ष दस्तावेजाची प्रस्तावना देखील शाश्वत जीवनशैली आणि उपभोग यावर भाष्य करते. आणि हवामान बदल क्षेत्रातील तज्ञांनी देखील हा मंत्र स्वीकारला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.
मित्रहो ,
जगभरातील लोक हवामान बदलाबद्दल खूप काही ऐकतात. त्यांच्यापैकी अनेकांना खूप चिंता भेडसावतात, कारण ते याबद्दल काय करू शकतात हे त्यांना माहिती नसते. केवळ सरकारे किंवा जागतिक संस्थांची यात भूमिका आहे, असाच त्यांचा समज करून दिला जातो. जर त्यांना हे कळले की ते देखील योगदान देऊ शकतात, तर त्यांची चिंता कृतीत बदलेल.
मित्रहो,
हवामान बदलाचा सामना केवळ कॉन्फरन्स टेबलवरून करता येणार नाही. प्रत्येक घरातील जेवणाच्या टेबलवरून याच्याशी लढा द्यावा लागेल. जेव्हा एखादी कल्पना चर्चेच्या टेबलवरून जेवणाच्या टेबलावर जाते, तेव्हा ती एक व्यापक चळवळ बनते. प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीला जाणीव करून देणे की त्यांच्या निवडीमुळे वसुंधरेला अधिक चांगले बनवण्यात आणि गती प्रदान करण्यात मदत होऊ शकते. मिशन LiFE हे हवामान बदलाविरूद्धच्या लढाईचे लोकशाहीकरण करण्याविषयी आहे. जेव्हा लोक याबाबत जागरूक होतात की त्यांच्या दैनंदिन जीवनातील साध्या सरळ कृती प्रभावशाली आहेत, तेव्हा पर्यावरणावर याचा खूप सकारात्मक प्रभाव पडेल.
लोक चळवळ आणि वर्तनातील बदल या बाबतीत भारतातील जनतेने गेल्या काही वर्षांत खूप काही केले आहे. लोकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे भारतातील अनेक भागांमध्ये लिंग गुणोत्तर सुधारले. लोकांनीच मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले. नद्या असोत, समुद्रकिनारे असोत किंवा रस्ते असोत, सार्वजनिक ठिकाणे कचरामुक्त राहतील हे लोक सुनिश्चित करत आहेत. आणि, लोकांनीच एलईडी बल्बचा प्रयोग यशस्वी केला. भारतात जवळपास 370 दशलक्ष एलईडी बल्ब विकले गेले आहेत. यामुळे दरवर्षी सुमारे 39 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टाळण्यास मदत होते . भारतातील शेतकऱ्यांनी सुमारे सात लाख हेक्टर शेतजमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणली आहे. पर ड्रॉप मोअर क्रॉपचा मंत्र अंगिकारल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली आहे. अशी आणखी बरीच उदाहरणे आहेत.
मित्रहो,
मिशन लाइफ अंतर्गत, आमचे प्रयत्न अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहेत जसे की: •स्थानिक संस्थांना पर्यावरणपूरक बनवणे, • पाण्याची बचत करणे, • उर्जेची बचत करणे, • कचरा आणि ई-कचरा कमी करणे, • निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे, • नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे, • भरड धान्यांच्या वापराला प्रोत्साहन वगैरे.
या प्रयत्नांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे –
या प्रयत्नांमुळे पुढील गोष्टी साध्य होतील –
• बावीस अब्ज युनिट्सपेक्षा जास्त ऊर्जेची बचत करणे
• नऊ ट्रिलियन लिटर पाण्याची बचत करणे ,
• तीनशे पंचाहत्तर दशलक्ष टन इतका कचरा कमी करणे,
• जवळपास एक दशलक्ष टन ई-कचऱ्याचा पुनर्वापर आणि 2030 पर्यंत सुमारे एकशे सत्तर दशलक्ष डॉलर्सच्या अतिरिक्त खर्चात बचत करणे .
याशिवाय, पंधरा अब्ज टन अन्नाची नासाडी कमी करण्यास आपली मदत करेल. हे किती मोठे आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला तुलनात्मकरीत्या समजावतो. अन्न आणि कृषी संघटनेनुसार 2020 मध्ये जागतिक प्राथमिक पीक उत्पादन सुमारे नऊ अब्ज टन होते!
मित्रहो ,
जगभरातील देशांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मला सांगण्यात आले आहे की जागतिक बँक समूह एकूण वित्तपुरवठ्याचा वाटा म्हणून हवामान वित्तपुरवठा 26% वरून 35% पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. साधारणपणे पारंपारिक पैलूंवर या हवामान वित्तपुरवठ्यात भर दिला जातो. वर्तनात्मक उपक्रमांसाठी देखील पुरेशा वित्तपुरवठा पद्धती तयार करणे आवश्यक आहे. मिशन लाइफ सारख्या वर्तनात्मक उपक्रमांना जागतिक बँकेने दिलेल्या पाठबळाचा अनेक पटींनी प्रभाव दिसून येईल.
मित्रहो,
या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या जागतिक बँकेच्या टीमचे मी अभिनंदन करतो. आणि, मला आशा आहे की या बैठकांमधून व्यक्तींना वर्तन बदलाकडे वळवण्यासाठी नवीन उपाय समोर येतील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद !