अमेठी येथील माझ्या प्रिय कुटुंबियांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. अमेठी खासदार क्रीडा स्पर्धेच्या समारोप सत्रात तुमच्यासोबत असणे आणि या सत्रात सहभागी होणे, हे माझ्यासाठी खूपच विशेष आहे. देशात खेळांच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी पदकांचे शतक ओलांडले आहे. या स्पर्धा सुरू असतानाच अमेठीतील खेळाडूंनीही क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवले आहे. खासदार क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. या स्पर्धेतून मिळालेली नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास तुम्हालाही नक्कीच जाणवत असेल, या संपूर्ण प्रदेशातील लोकांना ते जाणवत असेल आणि केवळ ऐकूनच मलाही ते जाणवू लागते. हा उत्साह आणि आत्मविश्वास आपल्याला कायम राखायचा आहे, तो वाढवायचा आहे, त्याची जोपासना करायची आहे, खत-पाणी द्यायचे आहे. गेल्या 25 दिवसात तुम्हाला मिळालेला अनुभव हा तुमच्या क्रीडा कारकीर्दीसाठी एक उत्तम पायाभरणी ठरणारा आहे. या मोहिमेत शिक्षक, निरीक्षक, शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रतिनिधींच्या भूमिकेत सहभागी होऊन या युवा खेळाडूंना पाठिंबा देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी अभिनंदन करतो. एक लाखापेक्षा जास्त खेळाडूंचे एकत्र येणे, ते सुद्धा इतक्या छोट्या भागात, ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. अमेठीच्या खासदार भगिनी स्मृती इराणी जी यांचे मी विशेष अभिनंदन करतो, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
मित्रहो,
कोणत्याही समाजाच्या विकासासाठी, त्या समाजात खेळाचा विकास होणे, खेळाला आणि खेळाडूंना भरभराटीची संधी मिळणे अत्यंत गरजेचे असते. ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करणे, हरल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणे, संघात सहभागी होऊन पुढे जाणे, या सर्व भावना युवा वर्गाच्या मनात खेळाच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या विकसित होतात. भाजपाच्या शेकडो खासदारांनी आपापल्या भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून समाज आणि देशाच्या विकासाचा नवा मार्ग तयार केला आहे. या प्रयत्नांचे परिणाम येत्या काही वर्षांत देशाला ठळकपणे दिसतील. अमेठीचे युवा खेळाडू येत्या काही वर्षांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच पदके जिंकतील. आणि या स्पर्धेतून मिळालेला अनुभवही खूप उपयोगी पडेल, असा विश्वास मला वाटतो.
मित्रहो,
जेव्हा एखादा खेळाडू मैदानात उतरतो तेव्हा स्वतःला आणि आपल्या संघाला विजयी करणे हे त्याचे एकमेव ध्येय असते. आज संपूर्ण देश खेळाडूंसारखा विचार करत आहे. खेळाडूसुद्धा खेळताना प्रथम राष्ट्राचा विचार करतात. त्या क्षणी ते सर्वस्व पणाला लावतात आणि देशासाठी खेळतात, यावेळी देशही मोठ्या ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारत विकसित करण्यात देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची एक भूमिका आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्राला एक भावना, एक ध्येय आणि एका संकल्पासह पुढे जावे लागेल. हाच विचार करून आम्ही देशातील तुमच्यासारख्या तरुणांसाठी टॉप्स स्कीम आणि खेलो इंडिया गेम्ससारख्या योजना राबवत आहोत. आज TOPS योजनेअंतर्गत शेकडो खेळाडूंना देश-परदेशात प्रशिक्षण दिले जात आहे. या खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची मदत केली जाते आहे. खेलो इंडिया खेळांतर्गत 3 हजारपेक्षा जास्त खेळाडूंना दरमहा 50 हजार रुपयांची मदत केली जाते आहे. या रकमेतून ते आपले प्रशिक्षण, आहार, कोचिंग, किट, आवश्यक उपकरणे आणि इतर खर्च भागवू शकतात.
माझ्या प्रिय कुटुंबियांनो,
आजच्या बदलत्या भारतात छोट्या शहरांतील प्रतिभेला मोकळेपणाने पुढे येण्याची संधी मिळत आहे. आज जर स्टार्टअप्समध्ये भारताचे असे नाव असेल, तर त्यात लहान शहरांतील स्टार्टअपचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत तुम्ही पाहिले असेल की क्रीडा जगतात प्रसिद्ध झालेली अनेक नावे छोट्या शहरातून आली आहेत. हे घडू शकले कारण आज भारतात युवा वर्गाला पुढे जाण्यासाठी पूर्ण पारदर्शकतेने संधी मिळत आहे. आशियाई क्रीडास्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडूही मोठ्या शहरांतून आलेले नाहीत. यातील अनेक खेळाडू लहान शहरांमधले आहेत. त्यांच्या प्रतिभेचा आदर करून आम्ही त्यांना सर्व सोयीसुविधा दिल्या आहेत. या खेळाडूंनी परिणाम दाखवून दिला आहे. आमच्या उत्तर प्रदेशच्या अन्नू राणी, पारुल चौधरी यांच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशाला अभिमानास्पद वाटते आहे. या भूमीने देशाला सुधा सिंग यांच्यासारखे खेळाडूही दिले आहेत. आपण अशी प्रतिभा प्रकाशात आणली पाहिजे, तीची जोपासना केली पाहिजे आणि तिला वाव दिला पाहिजे. आणि यासाठी ही 'खासदार क्रीडा स्पर्धा' हे सुद्धा एक उत्तम माध्यम आहे.
माझ्या प्रिय खेळाडूंनो,
तुमच्या सर्व मेहनतीचे फळ येत्या काळात मिळेल, असा विश्वास मला वाटतो. एक दिवस तुमच्यापैकी कोणीतरी भारताच्या तिरंगा ध्वजासह जगभरात देशाचा सन्मान वाढवेल. अमेठीतील तरुणांनीही खेळावे आणि बहरावे, या सदीच्छेसह तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्या अनेकानेक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.