गायत्री परिवाराचे सर्व उपासक, सर्व समाजसेवक
उपस्थित साधक सहकाऱ्यांनो,
महिला आणि पुरुषहो,
गायत्री परिवाराचे कोणतेही आयोजन इतके पवित्र असते की त्यामध्ये सहभागी व्हायला मिळणे ही देखील खरोखरच खूप मोठी भाग्याची गोष्ट असते. आज देव संस्कृती विद्यापीठाद्वारे आयोजित अश्वमेध यज्ञाचा एक भाग बनायला मिळत असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. जेव्हा मला गायत्री परिवाराकडून या अश्वमेध यज्ञात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले होते, तेव्हा, वेळेच्या अभावाबरोबरच माझ्यासमोर एक दुविधा देखील होती. व्हिडिओच्या माध्यमातून देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यात एक समस्या ही होती की सामान्य माणूस अश्वमेध यज्ञाचा संबंध सत्तेच्या विस्ताराशी जोडून पाहतो. सध्या निवडणुकीच्या दिवसात तर हे स्वाभाविकच आहे की अश्वमेध यज्ञाचे इतर काही अर्थ देखील काढले गेले असते. पण नंतर मग मी पाहिले की हा अश्वमेध यज्ञ, आचार्य श्रीराम शर्मा यांच्या भावनांचा पुरस्कार करत आहे. अश्वमेध यज्ञाचा नवा अर्थ प्रस्थापित करत आहे, तशा माझ्या सर्व दुविधा दूर झाल्या.
आज गायत्री परिवाराचा अश्वमेध यज्ञ, सामाजिक संकल्पाचे एक महा-अभियान बनला आहे. या अभियानामुळे जे लाखो युवा नशेच्या आणि व्यसनाच्या विळख्यापासून मुक्त राहणार आहेत त्यांची असीम ऊर्जा राष्ट्र उभारणीच्या कामात उपयोगी ठरेल. युवा हेच आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत. युवा वर्गाची निर्मिती हीच देशाच्या भविष्याची निर्मिती आहे. त्यांच्या खांद्यावरच या अमृतकाळात भारताला विकसित बनवण्याची जबाबदारी आहे. मी या यज्ञासाठी गायत्री परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. मी तर स्वतः देखील गायत्री परिवाराच्या शेकडो सदस्यांना वैयक्तिक रित्या ओळखतो. तुम्ही सर्वजण भक्तीभावाने, समाजाला सशक्त करण्यात गुंतलेले आहात. श्रीराम शर्माजींचे सिद्धांत, त्यांची तथ्ये, वाईट गोष्टींविरोधात लढण्याचे त्यांचे साहस, वैयक्तिक जीवनातील शुचिता, सर्वांना प्रेरित करणारी आहे. तुम्ही ज्या प्रकारे आचार्य श्रीराम शर्माजी आणि माता भगवतीजींचा संकल्प पुढे नेत आहात, ते खरोखरच प्रशंसनीय आहे.
मित्रहो,
व्यसन एक अशी सवय आहे ज्यावर नियंत्रण ठेवले गेले नाही तर त्यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. यामुळे समाजाची, देशाची खूप मोठी हानी होते. म्हणूनच आमच्या सरकारने 3-4 वर्षांपूर्वी एका राष्ट्रव्यापी नशा मुक्त भारत अभियानाची सुरुवात केली होती. मी माझ्या मन की बात कार्यक्रमात देखील हा विषय उपस्थित करत राहिलो आहे. आतापर्यंत भारत सरकारच्या या अभियानात 11 कोटींपेक्षा जास्त लोक सहभागी झाले आहेत. लोकांना जागरूक करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आल्या आहेत, शपथ कार्यक्रम झाले आहेत, पथनाट्ये झाली आहेत. सरकारच्या या अभियानासोबत सामाजिक संघटना आणि धार्मिक संस्थांना देखील जोडण्यात आले आहे. गायत्री परिवार तर स्वतः या अभियानात सरकारसोबत सहभागी आहे. प्रयत्न हाच आहे की व्यसनाच्या विरोधातील संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. आपण पाहिले आहे की जर सुक्या गवताच्या गंजीला आग लागली असेल तर कोणी त्यावर पाणी फेकतो, कोणी माती टाकतो. जास्त समजूतदार व्यक्ती त्या सुक्या गवताच्या ढिगाऱ्यातून आगीपासून वाचलेल्या गवताला लांब हटवण्याचा प्रयत्न करतो. आजच्या या काळात गायत्री परिवाराचा हा अश्वमेध यज्ञ, याच भावनेला समर्पित आहे. आम्हाला आमच्या युवा वर्गाचा नशेपासून बचाव करायचा देखील आहे आणि ज्यांना याचे व्यसन लागले आहे, त्यांची या व्यसनाच्या विळख्यातून सुटका देखील करायची आहे.
मित्रांनो,
आपण आपल्या देशाच्या युवांना जितक्या मोठ्या लक्ष्यांसोबत जोडू, तितकेच ते लहान-लहान चुकांपासून वाचतील. आज देश विकसित भारताच्या उद्दिष्टावर काम करत आहे, आज देश आत्मनिर्भर होण्याच्या उद्दिष्टावर काम करत आहे. तुम्ही पाहिले आहे की भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 शिखर परिषदेचे आयोजन 'One Earth, One Family, One Future' या संकल्पनेच्या आधारे झाले आहे. आज जग 'One sun, one world, one grid' सारख्या सामाईक प्रकल्पांवर काम करायला तयार झाले आहे.
'One world, one health' सारखी मिशन्स आज आपल्या सामाईक मानवी संवेदना आणि संकल्पांची साक्षीदार बनत आहेत. अशा राष्ट्रीय आणि जागतिक अभियानांमध्ये आपण जितके जास्त देशातील युवा वर्गाला सहभागी करू, तितके जास्त युवा चुकीच्या मार्गावर जाण्यापासून दूर राहतील. आज सरकार खेळांना इतक्या जास्त प्रमाणात प्रोत्साहन देत आहे... आज सरकार विज्ञान आणि संशोधनाला इतक्या जास्त प्रमाणात प्रोत्साहन देत आहे... चांद्रयानच्या यशामुळे कशा प्रकारे युवा वर्गामध्ये तंत्रज्ञानाची नव्याने आवड निर्माण झाली आहे ते तुम्ही पाहिले आहेच... असा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक अभियान, देशाच्या युवांना आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरण्यासाठी प्रेरित करतो. फिट इंडिया चळवळ असो....खेलो इंडिया स्पर्धा असो....हे प्रयत्न, ही अभियाने, देशाच्या युवांना प्रेरित करतात आणि एक प्रेरित युवा कधीही नशेच्या दिशेने वळू शकत नाही. देशाच्या युवा शक्तीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी सरकारने देखील ‘मेरा युवा भारत’ नावाने खूप मोठी संघटना स्थापन केली आहे. केवळ 3 महिन्यातच यामध्ये जवळपास दीड कोटी युवा सहभागी झाले आहेत. यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात युवा शक्तीचा योग्य वापर होऊ शकेल.
मित्रांनो,
देशातील नशेच्या या समस्येपासून मुक्ती देण्यामध्ये खूप मोठी भूमिका... कुटुंबाची देखील आहे, आपल्या कौटुंबिक मूल्यांची देखील आहे. आपण नशामुक्तीला तुकड्यांमध्ये पाहू शकत नाही. जेव्हा एक संस्था म्हणून कुटुंब कमकुवत होते, ज्यावेळी कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण होते, तेव्हा याचा परिणाम सर्वत्र दिसू लागतो. ज्यावेळी कुटुंबात सामूहिक भावना कमी होऊ लागते... ज्यावेळी कुटुंबातील लोक अनेक-अनेक दिवस एकमेकांना भेटत नाहीत, एकत्र बसत नाहीत... ज्यावेळी आपल्या सुख-दुःखांची देवाणघेवाण करत नाहीत... त्यावेळी अशा प्रकारच्या धोक्यांमध्ये वाढ होते. कुटुंबाचा प्रत्येक सदस्य आपापल्या मोबाईलमध्येच गर्क राहिला तर मग त्याचे जग खूपच लहान होत जाईल. म्हणूनच देशाला व्यसनमुक्त बनवण्यासाठी एक संस्था म्हणून कुटुंब मजबूत होणे तितकेच गरजेचे आहे.
मित्रांनो,
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी मी सांगितले होते की आता भारताचा एक हजार वर्षांचा नवा प्रवास सुरू होत आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण त्या नव्या युगाची चाहूल पाहात आहोत. व्यक्ति निर्माणातून राष्ट्र निर्माणाच्या या महाअभियानात आपण नक्की यशस्वी होऊ, असा मला ठाम विश्वास आहे. याच संकल्पासह, पुन्हा एकदा गायत्री परिवाराला खूप-खूप शुभेच्छा.
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!