ब्रम्हाकुमारी संस्थेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतन मोहिनी जी,मंत्रिमंडळातले माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी,ब्रम्हाकुमारी संस्थेचा सर्व सदस्यवर्ग, अन्य मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,
ब्रम्हाकुमारींद्वारे सुरु करण्यात आलेल्या जल-जन अभियानाच्या प्रारंभी आपणा सर्वांसमवेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. आपणा सर्वांसमवेत सहभागी होणे, आपल्याकडून शिकणे, जाणणे हे माझ्यासाठी नेहमीच विशेष राहिले आहे. स्वर्गीय दादी जानकी जी यांच्याकडून मिळालेला आशीर्वाद म्हणजे माझी ठेव आहे. मला स्मरते आहे 2007 मध्ये दादी प्रकाश मणी जी यांच्या ब्रम्हलोक गमनाच्या वेळी अबू रोड इथे येऊन मी श्रद्धांजली अर्पण केली. गेल्या काही वर्षांमध्ये ब्रह्मकुमारी भगिनींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी अनेकदा मला स्नेहपूर्ण निमंत्रण दिले. या आध्यात्मिक परिवाराचा सदस्य म्हणून आपणा सर्वांसमवेत येण्याचा माझाही नेहमीच प्रयत्न असतो. 2011 मध्ये अहमदाबाद इथला ‘फ्युचर ऑफ पॉवर’ कार्यक्रम असो, 2012 मध्ये संस्थेच्या स्थापनेच्या 75 वर्षांशी संबंधित कार्यक्रम असो, 2013 मध्ये संगम तीर्थधाम कार्यक्रम असो किंवा 2017 मध्ये ब्रम्हाकुमारीज संस्थेचा ऐंशीवा स्थापना दिन असो किंवा गेल्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संलग्न स्वर्णिम भारत कार्यक्रम असो, आपणा सर्वांमध्ये मी येतो तेव्हा आपला हा स्नेह, ही आपुलकी मला भारावून टाकते. ‘ स्व’मधून बाहेर पडत समाजासाठी सर्वस्व अर्पण करणे,आपणा सर्वांसाठी आध्यात्मिक साधनेचे स्वरूप राहिले आहे म्हणून ब्रम्हकुमारीशी माझे विशेष नाते राहिले आहे.
मित्रांनो,
पाणी टंचाई हे भविष्यातले एक संकट म्हणून घोंघावत आहे अशा काळात ‘जल-जन अभियान’ सुरु होत आहे. भूतलावर जल संसाधने किती मर्यादित आहेत हे 21 व्या शतकातले जग गांभीर्याने जाणते. मोठ्या लोकसंख्येमुळे जल सुरक्षा भारतासाठीही एक मोठा प्रश्न आहे. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृत काळात आज देश पाण्याकडे भविष्य म्हणून पाहत आहे. पाणी असेल तर आपले भविष्य असेल म्हणून आपण सर्वांनी मिळून आजपासूनच प्रयत्न करायला हवेत. जल सुरक्षा हा संकल्प एक लोक चळवळ म्हणून देश पुढे नेत आहे याचा मला आनंद आहे. ब्रम्हकुमारी यांच्या या जल- जन अभियानातून लोक भागीदारीच्या या प्रयत्नांना नवे बळ प्राप्त होईल. यामुळे जल सुरक्षा अभियानाची व्याप्तीही वाढेल,प्रभावही वृद्धिंगत होईल. ब्रम्हकुमारी संस्थेशी संबंधित सर्व वरिष्ठ ,मार्गदर्शक,लाखो अनुयायी यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
भारतातल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच निसर्ग,पर्यावरण आणि पाणी याबाबत संयमित,संतुलित आणि संवेदनशील व्यवस्था घालून दिली होती. आपल्याकडे म्हटले गेले आहे, - ‘मा आपो हिंसी’. म्हणजेच पाणी नष्ट करू नका,त्याचे संवर्धन करा. ही भावना हजारो वर्षांपासून आपल्या आध्यात्माचा भाग आहे,आपल्या धर्माचा भाग आहे. हे आपल्या समाजाची संस्कृती आहे, आपल्या सामाजिक चिंतनाचा भाग आहे. म्हणूनच आपण पाण्याला देव मानतो आणि नद्यांना माता. जेव्हा एखादा समाज, निसर्गाशी असा भावबंध जोडतो तेव्हा, जग ज्याला शाश्वत विकास म्हणते तो अशा समाजाची जीवनशैली होते.यासाठी आज भविष्यातल्या आव्हानांवर आपण उपाय शोधत आहोत तेव्हा प्राचीन काळातल्या या चेतनेचा पुनर्जागर करायला हवा. जल संवर्धनाच्या मुल्यांबाबत देशवासियांमध्ये तशीच आस्था आपल्याला निर्माण करायला हवी. जल प्रदुषणाला कारणीभूत ठरणारी प्रत्येक बाब आपल्याला दूर करायला हवी. नेहमीप्रमाणेच भारताच्या आध्यात्मिक संस्थांची, ब्रह्मकुमारींची यात मोठी भूमिका आहे.
मित्रांनो,
जल संवर्धन आणि पर्यावरण यासारख्या विषयांना जटील मानून त्यांचा विचार सोडून द्यायचा अशी नकारात्मक वृत्ती मागील काही दशकांमध्ये आपल्याकडे बनली होती. काही लोक तर हे इतके कठीण काम आहे की ते होऊच शकत नाही असे मानत होते. मात्र गेल्या 8-9 वर्षात देशाने ही मानसिकताही बदलली आहे आणि परिस्थितीतही बदल केला आहे. ‘नमामि गंगे’ याचे एक ठळक उदाहरण आहे. आज केवळ गंगाच नव्हे तर तिच्या उपनद्याही स्वच्छ होत आहेत. गंगा नदीच्या किनारी नैसर्गिक शेती सारखे अभियानही सुरु झाले आहे. ‘नमामि गंगे’ अभियान आज देशाच्या विविध राज्यांमध्ये एक मॉडेल ठरत आहे.
मित्रांनो,
जल प्रदूषणाबरोबरच भूगर्भातल्या पाण्याची घटती पातळी, हेही देशासाठी एक आव्हान आहे. यासाठी ‘कॅच द रेन’ अभियान सुरु करण्यात आले असून या अभियानाने आता जोर पकडला आहे. देशातल्या हजारो ग्रामपंचायतींमध्ये अटल भूजल योजनेद्वारा जल संवर्धनाला प्रोत्साहन दिले जात आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती करण्याचे अभियानही जल संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
मित्रांनो,
आपल्या देशात जीवनासाठी अतिशय महत्वाची पाण्यासंदर्भातली व्यवस्था पहिल्यापासून महिलांच्या हाती राहिला आहे. आज देशात जल जीवन अभियानासारखी महत्वाच्या योजनेचे नेतृत्व पाणी समितीच्या द्वारे गावातल्या महिला करत आहेत. आपल्या ब्रम्हकुमारी भगिनी देश तसेच जागतिक पातळीवरही ही भूमिका बजावू शकतात. जल संवर्धनाबरोबरच पर्यावरणाशी संबंधित विषयही आपण प्रगल्भतेने हाताळले पाहिजेत. शेतीसाठी पाण्याच्या संतुलित वापराकरिता देश ठिबक सिंचनासारख्या तंत्राला प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करावा यासाठी आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. भारताने सुचवल्याप्रमाणे अवघे जग यावर्षी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत आहे. आपल्या देशात पूर्वापार, श्री अन्न बाजरी,श्री अन्न ज्वारी यासारखी भरड धान्ये आपल्या आहाराचा भाग राहिली आहेत. या धान्यात पोषक तत्त्वेही भरपूर असतात आणि या शेतीसाठी पाणीही कमी लागते.म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी आहारात याचा समावेश करावा यासाठी आपण प्रबोधन केले तर या अभियानाला अधिक बळ मिळेल आणि जल संवर्धनामध्येही वृद्धी होईल.
आपल्या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून ‘जल –जन अभियान’ यशस्वी होईल याचा मला विश्वास आहे.आपण एक सुजलाम भारत आणि उज्वल भविष्य घडवू.आपणा सर्वाना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा.ओम शांती !