महामहिम, महोदय आणि महोदया, नमस्कार!
मी तुम्हा सर्वांचे भारतात स्वागत करतो. शेती हा मानवी संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणूनच, कृषी मंत्री या नात्याने तुमचे कार्य हे केवळ अर्थव्यवस्थेचे एक क्षेत्र हाताळणे एवढेच नाही. मानवतेच्या भविष्याची मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. जागतिक स्तरावर, शेती हे दोन पूर्णांक पाच अब्ज लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. ग्लोबल साउथमध्ये, जीडीपीमध्ये शेतीचा वाटा जवळपास 30 टक्के आणि नोकऱ्यांमध्ये 60 टक्के आहे. आणि आज या क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. महामारीमुळे अडथळे आलेली पुरवठा साखळी भू-राजकीय तणावाच्या प्रभावामुळे अधिक विस्कळीत झाली आहे. हवामानातील बदलामुळे तीव्र हवामानाच्या घटना अधिकाधिक आणि वारंवार होत आहेत. ही आव्हाने ग्लोबल साउथला सर्वाधिक जाणवतात.
मित्रांनो,
या सर्वात महत्वाच्या क्षेत्रात भारत काय करत आहे हे मला तुम्हाला सांगायचे आहे. 'मूलभूत गोष्टींकडे परतणे' आणि 'भविष्याकडे आगेकूच' अशाप्रकारचा मिलाफ असलेले आमचे धोरण आहे. आम्ही नैसर्गिक शेती तसेच तंत्रज्ञान-आधारित शेतीला प्रोत्साहन देत आहोत. संपूर्ण भारतातील शेतकरी आता नैसर्गिक शेती करत आहेत. ते कृत्रिम खते किंवा कीटकनाशके वापरत नाहीत. पृथ्वीचे संरक्षण करणे, मातीच्या आरोग्याचे रक्षण करणे, 'पर ड्रॉप, मोअर क्रॉप 'म्हणजेच 'प्रति थेंब, अधिक पीक' उत्पादन तसेच सेंद्रिय खते आणि कीटक व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे यावर त्यांचे लक्ष केंद्रित आहे.
त्याच वेळी, आमचे शेतकरी उत्पादकता वाढवण्यासाठी अंत:स्फूर्तिने तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. ते त्यांच्या शेतात सौर उर्जेची निर्मिती आणि वापर करत आहेत. योग्य पीकांची निवड करण्यासाठी ते मृदा आरोग्य कार्ड वापरत आहेत आणि पोषक तत्वांची फवारणी करण्यासाठी तसेच त्यांच्या पिकांची निगराणी करण्यासाठी ड्रोन देखील वापरत आहेत. हा ''मिश्र दृष्टीकोन'' कृषी क्षेत्रातील अनेक समस्या सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असा माझा विश्वास आहे.
मित्रांनो,
तुम्हाला माहिती आहेच की, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे प्रतिबिंब हैदराबादमध्ये तुम्हाला वाढण्यात येणाऱ्या जेवणाच्या ताटात दिसेलच. या ताटात भरड धान्य ज्याला आम्ही भारतात श्रीअन्न म्हणतो, त्यापासून बनवलेल्या विविध रुचकर पदार्थांचा समावेश आहे. हे सुपरफूड केवळ खाण्यासाठी आरोग्यदायी आहेत असे नाही, तर कमी पाण्यात, कमी प्रमाणात खत वापरून भरड धान्याचे उत्पादन घेता येते तसेच ते अधिक कीड-प्रतिरोधक असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करतात. अर्थातच, भरड धान्य काही नवीन नाही. हजारो वर्षांपासून त्यांची लागवड केली जात आहे. पण बाजार आणि व्यापार पद्धतीचा आपल्या निवडीवर इतका प्रभाव पडला की आपण पारंपरिकरित्या पिकवलेल्या पिकांचे मूल्य विसरलो आहोत. श्रीअन्न भरड धान्याचा आपल्या आवडीचे अन्न म्हणून स्वीकार करु या. आमच्या स्वतःच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, भारत भरड धान्य अशी निगडीत सर्वोत्तम पद्धती, संशोधन आणि तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून भरड धान्य संशोधन संस्था विकसित करत आहे.
मित्रांनो,
जागतिक अन्नसुरक्षा साध्य करण्यासाठी सामूहिक कृती कशी सुरू करता येईल, याबद्दल जाणीवपूर्वक विचार करावा, असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करून शाश्वत आणि सर्वसमावेशक अन्नप्रणाली तयार करण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. खत पुरवठ्यासाठी जागतिक साखळी मजबूत करण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. त्याच वेळी, मातीचे आरोग्य, पिकांचे आरोग्य आणि उत्पादन भरघोस काढता यावे, अशा कृषी पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. जगाच्या विविध भागांतील पारंपरिक पद्धती आपल्याला पुनरुत्पादक शेतीसाठी पर्याय विकसित करण्यास प्रेरित करू शकतात. नवोन्मेषी संकल्पना आणि डिजिटल तंत्रज्ञान यांनी आपल्या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याची आपल्याला गरज आहे. आम्ही ‘ग्लोबल साउथ’ मधील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडू शकतील, असे उपायही केले पाहिजेत. शेती आणि अन्नाचा अपव्यय कमी करण्याचीही नितांत गरज आहे मात्र, त्याऐवजी कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे.
मित्रांनो,
जी -20 अंतर्गत भारताने कृषी क्षेत्राविषयी काही प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. त्यामध्ये आपल्या वसुंधरेचे आरोग्य सुधारण्याासाठी ‘एक पृथ्वी’ तसेच या पृथ्वीवर वास्तव्य करणारे आपण सर्वजण एकच परिवार आहे, म्हणून आपल्या या 'एक कुटुंबा'मध्ये सुसंवाद निर्माण करणे, एकोपा निर्माण करणे यामुळे सर्वांच्या उज्ज्वल 'एक भविष्या'ची आशा करणे, यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहेत. अन्न सुरक्षा आणि पोषणावरील ‘डेक्कन उच्चस्तरीय तत्त्वे’; आणि बाजरी तसेच इतर धान्यांसाठी ''महर्षी'' उपक्रम अशा दोन उपक्रमांवर दोन ठोस परिणाम मिळावेत, यासाठी तुम्ही कार्यरत आहात, हे जाणून मला आनंद झाला. या दोन उपक्रमांना दिलेला पाठिंबा, सर्वसमावेशक, शाश्वत आणि लवचिक शेतीला समर्थन देणारी गोष्ट आहे. या बैठकीमध्ये होणारे तुम्हा सर्वााचे विचारमंथन फलदायी ठरावे, अशी कामना करतो.
धन्यवाद.