नमस्कार ,
आसाम सरकारमध्ये सरकारी नोकरी प्राप्त झालेल्या सर्व तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो. गेल्याच महिन्यात मी "बिहू"च्या काळात आसामला आलो होतो. त्या भव्य आयोजनाची आठवण आजही माझ्या मनात जशीच्या तशी आहे. त्यावेळी झालेला कार्यक्रम हा आसामी संस्कृतीच्या गौरवाचे प्रतीक दर्शविणारा होता. आसामचे भाजप सरकार युवकांच्या भवितव्याबाबत गंभीर असल्याचे आजचा रोजगार मेळावा हे द्योतक आहे. याआधीही आसाममध्ये रोजगार मेळाव्याद्वारे 40 हजाराहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. आज सुमारे 45 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. मी या सर्व तरुणांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आज भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली आसाम शांतता आणि विकासाच्या एका नव्या युगाचा साक्षीदार बनत चालला आहे. विकासाच्या या वेगामुळे आसाममध्ये सकारात्मकता आणि प्रेरणादायक वातावरण दिसून येत आहे. मला सांगण्यात आले आहे की सरकारी भरती अधिक पारदर्शक करण्यासाठी आसाम सरकारने अनेक पावले उचलली आहेत. विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी 'आसाम थेट भरती आयोग' ची स्थापना करण्यात आली आहे. पूर्वीच्या प्रक्रियेत प्रत्येक विभागाचे नियम वेगळे होते. त्यामुळे अनेकवेळा वेळेवर भरती होऊ शकली नाही. विविध विभागांच्या पदांसाठीही उमेदवारांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागत होत्या. आता या सर्व प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आल्या आहेत. यासाठी आसाम सरकार खरोखरच अभिनंदनास पात्र आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण सर्वांनी आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. अमृत काळाची ही पुढील 25 वर्षे तुमच्या सेवाकाळा इतकीच महत्त्वाची आहेत. प्रत्येक सामान्य नागरिकासाठी आसाम सरकारचा चेहरा आता तुम्हीच आहात. तुमची वागणूक, तुमची विचारसरणी, तुमचा काम करण्याचा दृष्टीकोन, तुमची सर्वसामान्य जनतेप्रती सेवेची भावना, त्याचा जनतेवर होणारा परिणाम आता खूप मोठा असेल. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागेल. आज आपला समाज झपाट्याने महत्त्वाकांक्षी होत आहे. मुलभूत सुविधांसाठी लोक कित्येक दशके वाट पहायचे, ते दिवस गेले. आजकाल कोणत्याही नागरिकाला विकासासाठी एवढी प्रतीक्षा करावीशी वाटत नाही. 20-20 क्रिकेटच्या या युगात देशातील जनतेला पटापट निकाल हवे आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणांना सुद्धा त्यानुसार स्वत:ला बदलावे लागेल. देशातील नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारीही सरकारी कर्मचाऱ्यांवर आहे. ज्या मेहनतीने आणि समर्पणाने तुम्हाला इथे आणले आहे, त्याच मार्गावर तुम्हाला पुढे जायचे आहे. तुम्हाला नेहमी शिकत राहायचे आहे. यामुळेच तुम्ही समाज आणि व्यवस्था या दोन्हींना सुधारण्यात हातभार लावू शकाल.
मित्रांनो,
आज भारत अतिशय वेगाने आपल्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करीत आहे. नवनवीन महामार्ग आणि द्रुतगती मार्ग असो, नवीन रेल्वे मार्ग तयार करणे असो, नवीन बंदरे असो, विमानतळ आणि जलमार्गांचे निर्माण कार्य असो, या प्रकल्पांवर लाखो, कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रत्येक प्रकल्प, त्या प्रत्येकावर सरकारकडून खर्च केला जाणारा निधी, रोजगार आणि स्वयंरोजगारामध्ये वाढ करीत आहे. उदाहरणार्थ, जर एखादे विमानतळ बनवायचे असेल तर, त्यासाठी अभियंते, तंत्रज्ञ, हिशेब तपासनीस , श्रमिक वर्ग, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे, साधने, लोखंड आणि सिमेंट अशा कितीतरी गोष्टींची आवश्यकता असते. याचा अर्थ एका निर्माण कार्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. भारत आज ज्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहे, लोकांचे जीवनमान सुलभ बनविण्याचे काम करत आहे, त्यामुळेही देशाच्या काना-कोप-यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. 2014 नंतर आमच्या सरकारने देशामध्ये जवळपास 4 कोटी पक्की घरकुले बनवून ती गरीबांना राहण्यासाठी दिली. या घरांमध्ये शौचालय, गॅस जोडणी, नळाव्दारे पाणी, विजेची जोडणी अशा आवश्यक सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. ही घरे बनविण्यासाठी, त्यामध्ये इतर सोई सुविधा निर्माण करण्यासाठी उत्पादन क्षेत्र, लॉजिस्टिक्स, कुशल कामगार आणि श्रमिक बंधू -भगिनींचे परिश्रम मोठ्या प्रमाणावर कामी आले आहेत. याचा अर्थ, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होत गेल्या. रोजगार निर्मितीमध्ये आयुष्मान भारत योजनेचीही खूप मोठी भूमिका आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे देशामध्ये अनेक नवीन रूग्णालये आणि दवाखाने सुरू झाले आहेत. काही आठवड्यापूर्वीच मला एम्स गुवाहाटी आणि तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली होती. गेल्या काही वर्षांमध्ये आसाममध्ये दंत चिकित्सा महाविद्यालयांचाही विस्तार झाला आहे. यामुळे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित युवकांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.
मित्रांनो,
आज अनेक नवीन क्षेत्रांमध्येही युवक पुढे जात आहेत, अशा क्षेत्रांविषयी दहा वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल. देशात स्टार्टअप परिसंस्था निर्माण झाली आहे, त्यामुळे देशामध्ये लाखों प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. कृषी, सामाजिक कार्यक्रम, सर्वेक्षण आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये ड्रोनला वाढती मागणी असल्यामुळे युवकांना अनेक नवीन संधी उपलब्ध होत आहेत. आज भारतामध्ये कोट्यवधी मोबाइल फोनचे उत्पादन होते. प्रत्येक गावामध्ये ब्रॉडबॅंड कनेक्टिव्हिटी पोहोचली आहे. यामुळेही खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळत आहे. सरकारमध्ये काम करताना एक योजना, एक निर्णय यांचा प्रभाव, कशा पद्धतीने लोकांच्या जीवनात परिवर्तन घेवून येते, हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
मित्रांनो,
भाजपा सरकारच्या धोरणांमुळेच आज ईशान्येकडील राज्यांमध्ये खूप मोठ्या संख्येने युवक, विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होत आहेत. भाजपा सरकार युवकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी देवून आम्ही नवीन भारताच्या निर्माणाच्या दिशेने अधिक वेगाने पावले टाकत आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आणि आपल्या कुटुंबियांचे खूप -खूप अभिनंदन !
धन्यवाद!!