नमस्कार मित्रांनो,
थंडी पडायला थोडा उशीर होतो आहे आणि खूप हळूहळू थंडी पडायला लागली आहे. राजकीय तापमान मात्र वेगाने वाढतो आहे. कालच देशाच्या चार राज्यांतील निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत आणि हे निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहेत.
जे देशातील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहेत, देशाच्या उज्ज्वल भविष्याप्रती समर्पित आहेत त्यांच्यासाठी हे निकाल उत्साहवर्धक आहेत. विशेषतः, संपूर्ण समाजातील सर्व घटकांतील शहरी आणि ग्रामीण भागांतील महिला, समाजाच्या सर्व स्तरांतील शहरी तसेच ग्रामीण युवक, प्रत्येक समुदायातील शेतकरी, तसेच माझ्या देशातील गरीब जनता, हे असे चार महत्त्वपूर्ण घटक आहेत ज्यांना सक्षम करणाऱ्या, त्यांचे भविष्य सुनिश्चित करणाऱ्या ठोस योजना तयार करणे आणि या योजनांच्या लाभांचे प्रत्येक व्यक्तीपर्यंत वितरण होईल याची खात्री करणे या तत्वांसाठी जे तत्पर राहतात त्यांना समाजाचा भरपूर पाठींबा मिळत जातो. आणि जेव्हा उत्तम प्रशासन व्यवस्था असते, जन हिताला संपूर्णपणे पाठबळ मिळालेले असते तेव्हा सत्ताविरोधी हा शब्दच अप्रस्तुत होऊन जातो. आम्ही हे सतत पाहतो आहोत, कोणी याला सत्तेच्या बाजूचे म्हणो, कोणी उत्तम प्रशासन म्हणो, कोणी पारदर्शकता म्हणो, तर कोणी याला देशहिताच्या, जनहिताच्या ठोस योजना म्हणो, पण सतत हा अनुभव येतो आहे. आणि इतक्या उत्तम जनादेशानंतर आज आपण संसदेच्या या नव्या मंदिरात भेटतो आहोत.
या संसद भवनाच्या नव्या परिसराचे जेव्हा उद्घाटन झाले त्यावेळी संसदेचे एक लहानसे सत्र आयोजित करण्यात आले होते, त्यात हा ऐतिहासिक निर्णय झाला होता. यावेळी मात्र या भवनात दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळणार आहे. हे संसद भवन नवे आहे, त्यामुळे येथील व्यवस्थेमध्ये काही त्रुटी जाणवू शकतात. जेव्हा येथे सतत काम सुरु राहील, तेव्हा संसद सदस्य आणि येथे भेट देणारे इतर लोक तसेच माध्यम प्रतिनिधींच्या देखील हे लक्षात येईल की थोड्याफार दुरुस्तीनंतर या त्रुटी नाहीशा करता आल्या तर बरे होईल. आणि मला असा विश्वास वाटतो की आदरणीय राष्ट्रपती तसेच अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली अशा बाबींकडे पूर्ण लक्ष दिले जाईल. आणि तुम्हां सर्वांना देखील मी सांगेन की अशा लहान-मोठ्या त्रुटी तुमच्या लक्षात आल्या तर त्याकडे आमचे लक्ष जाईल असा प्रयत्न नक्की करा. याचे कारण असे आहे की जेव्हा अशा गोष्टींची उभारणी होत असते तेव्हा गरज पडेल तसे त्यात बदल करून घेणे आवश्यक ठरते.
देशाने नकारात्मकतेला नाकारले आहे. संसदेचे प्रत्येक सत्र सुरु होताना विरोधी पक्षांशी आमची चर्चा होत असते, आमचे मुख्य पथक त्यांच्याशी विचार विनिमय करते, त्यांना भेटून आम्ही संपूर्ण सहकार्य देण्याची विनंती करतो, सहयोगाचा आग्रह धरतो. यावेळी देखील तशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया अमलात आणली आहे. तसेच तुम्हां सर्वांच्या माध्यमातून देखील मी सार्वजनिक स्वरुपात नेहमीच आमच्या सर्व संसद सदस्यांना तसा आग्रह करत असतो. लोकशाहीचे हे मंदिर जनतेच्या आकांक्षांसाठी, विकसित भारताचा पाया अधिक मजबूत करण्यासाठीचा एका महत्त्वाचा मंच आहे.
मी सर्व माननीय सदस्यांना आग्रह करतो की त्यांनी अधिकाधिक तयारीनिशी भवनात यावे, पटलावर जी विधेयके मंडळी जातील त्यावर सखोल चर्चा व्हावी, उत्तमोत्तम सूचना केल्या जाव्यात आणि त्या सूचनांच्या माध्यमातून त्यावर निर्णय व्हावा. याचे कारण असे की जेव्हा एखादा संसद सदस्य काही सूचना करतो तेव्हा त्या बाबतीत त्याच्याकडे मुलभूत पातळीवरील अनुभवाचा उत्तम पाया असतो. मात्र जर चर्चाच झाली अन्ही तर देशवासियांना त्या बाबतीत माहिती मिळणे राहून जाते. आणि म्हणून मी पुन्हा हा आग्रह करतो.
आणि निवडणुकांमधून नुकत्याच हाती आलेल्या निकालांच्या आधारावर बोलायचे तर विरोधी पक्षातील सहकाऱ्यांसाठी ही अगदी सुवर्णसंधी आहे. संसदेच्या या सत्रादरम्यान निवडणुकीतील पराभवाचा राग व्यक्त करण्याऐवजी, विरोधी पक्ष या पराजयातून बोध घेऊन गेली 9 वर्ष जी नकारात्मकतेची विचारधारा स्वीकारलेली आहे तो सोडून देऊन या सत्रात जर सकारात्मकतेसह पुढे जातील तर देशचा देखील त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यांच्यासाठी नवी कवाडे उघडतील... आणि ते विरोधी पक्षात असले तरीही मी त्यांना एक चांगला सल्ला देऊ इच्छितो की सकारात्मक विचारांसह सोबत या. आम्ही जर दहा पावले चालत असू तर तुम्ही बारा पावले चालून काही निर्णय घेऊन या.
देशात प्रत्येकाचे भविष्य उज्ज्वल आहे, कोणीही निराश होण्याची गरज नाही. मात्र, कृपा करून बाहेर झालेल्या पराजयाचा राग या सदनात काढू नका. तुम्हाला नक्कीच हताश-निराश वाटत असेल, पण तुमच्या सहकाऱ्यांना तुमचे सामर्थ्य दाखण्यासाठी काही ना काही तर करावेच लागेल. मात्र, किमान लोकशाहीच्या या मंदिराला तरी राग काढण्यासाठीचा मंच बनवू नका. अजूनही मी सांगतो आहे, माझ्या दीर्घ अनुभवाच्या बळावर सुचवतो आहे की तुमची विचारसरणी थोडीशी बदला, विरोधासाठी विरोध करण्याची पद्धत सोडून द्या, देशहितासाठी सकारात्मक बाजूच्या सोबत रहा. बरं, त्यातही काही त्रुटी असतील तर त्यावर चर्चा होऊ द्या. तुम्ही बघाल की देशवासीयांच्या मनात अशा काही गोष्टींविषयी तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे, ती कदाचित आपुलकीच्या भावनेत रुपांतरीत होईल. तुमच्यासाठी ही एक संधी आहे, ती दवडू नका.
आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळी हात जोडून विनंती करत असतो की, संसद भवनाच्या कार्यात सहयोग द्या. आज मी राजकीय दृष्टीकोनातून देखील सांगू इच्छितो की, देशाला सकारात्मकतेचा संदेश देण्यातच तुमचे भले आहे. तुमची प्रतिमा द्वेष आणि नकारात्मकतेची होणे हे लोकशाहीसाठी चांगले नाही. लोकशाहीत विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाइतकाच महत्त्वाचा आहे, तितकाच मौल्यवान आहे आणि म्हणून तो ही तितकाच सामर्थ्यशाली असला पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या भल्यासाठी मी पुन्हा एकदा माझ्या या भावना व्यक्त करत आहे.
आता देशाला विकसित होण्यासाठी 2047 पर्यंत प्रतीक्षा करण्याची इच्छा नाही. आता पुढेच जायचे आहे ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात निर्माण झाली आहे. आमच्या सर्व सन्माननीय संसद सदस्यांनी या भावनेचा आदर करून त्या भावनेला सक्षमपणे पाठबळ द्यावे अशी माझी विनंती आहे. मित्रांनो, तुम्हां सर्वांना देखील माझ्याकडून शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद।