





जय जगन्नाथ !
या कार्यक्रमाला उपस्थित ओदिशाचे राज्यपाल श्री हरी बाबू, ओदिशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री मोहन चरण माझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री, ओदिशा सरकारचे मंत्री, खासदार, आमदार, उद्योग आणि व्यवसाय जगतातील प्रमुख उद्योजक सहकारी, देश आणि जगभरातील गुंतवणूकदार आणि ओदिशाच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!
जानेवारी महिन्यात, म्हणजे 2025 च्या सुरुवातीलाच माझा ओदिशाचा हा दुसरा दौरा आहे. काही दिवसांपूर्वी मी इथे झालेल्या अनिवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आज आता उत्कर्ष ओदिशा कॉन्क्लेव्हमध्ये मी तुमच्या सोबत आलो आहे. मला सांगण्यात आले आहे की ओदिशामध्ये आयोजित केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी व्यवसायविषयक शिखर परिषद आहे. पूर्वीच्या तुलनेत पाच ते सहा पटीने अधिक गुंतवणूकदार यात सहभागी होत आहेत. ओदिशाच्या जनतेचे, ओदिशा सरकारचे या अप्रतिम कार्यक्रमासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात अभिनंदन करतो.
मित्रांनो,
मी पूर्व भारताला देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन मानतो. आणि ओदिशाची यात मोठी भूमिका आहे. इतिहास साक्षी आहे की, जेव्हा जागतिक विकासात भारताचा मोठा वाटा होता, तेव्हा त्यात पूर्व भारताचा महत्त्वाचा वाटा होता. पूर्व भारतात देशातील मोठी औद्योगिक केंद्रे होती, बंदरे होती, व्यापारी केंद्रे होती, ओदिशाचाही त्यात मोठा वाटा होता. ओदिशा त्यावेळी आग्नेय (दक्षिण पूर्व) आशियातील व्यापाराचे हे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात होते. येथील प्राचीन बंदरे एक प्रकारे भारताची प्रवेशद्वारे मानली जात. आजही ओदिशामध्ये दरवर्षी बाली जत्रा साजरी केली जाते. नुकतेच इंडोनेशियाचे राष्ट्रपती आले होते, आणि त्यांनी तर असेही म्हटले की कदाचित माझ्या डीएनएमध्ये ओदिशा आहे.
मित्रांनो,
आजचे ओदिशा त्या वारशाचा उत्सव साजरा करत आहे, जो ओदिशाला आग्नेय (दक्षिण पूर्व) आशियासोबत जोडतो. आता एकविसाव्या शतकात ओदिशा आपल्या त्या गौरवशाली वारशाचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला लागले आहे. अलिकडेच सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष ओदिशाला भेट देऊन गेले. सिंगापूर ओदिशासोबतच्या संबंधांबाबत खूपच उत्सुक आहे. आसियान देशांनीही ओदिशासोबत व्यापार आणि पारंपारिक संबंध मजबूत करण्यात रस दाखवला आहे. आज या प्रदेशात शक्यतांचे इतके दरवाजे खुले होऊ लागले आहेत, जितके स्वातंत्र्यानंतर या आधी कधीही खुले झाले नव्हते. मी येथे उपस्थित सर्व गुंतवणूकदारांना आवाहन करू इच्छितो आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे म्हटले आहे ते मी पुन्हा सांगू इच्छितो - हीच वेळ आहे, हीच वेळ आहे. ओदिशाच्या या विकासाच्या वाटचालीत तुमची गुंतवणूक तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि ही मोदींची हमी आहे.
मित्रांनो,
आज भारत विकासाच्या अशा मार्गावर वाटचाल करत आहे, ज्याला कोट्यवधी लोकांच्या aspirations चालना देत आहेत. AI AI चे युग आहे, Artificial intelligence चे आहे, त्याचीच चर्चा आहे, मात्र भरतासाठी तर केवळ AI नाही, Aspiration of India आमची ताकद आहे. आणि Aspiration तेव्हाच वाढू लागते, जेव्हा लोकांच्या needs पूर्ण होतात. गेल्या दशकभरात कोट्यवधी देशवासीयांना Empower करण्याचे फायदे आता देशाला दिसू लागले आहेत. ओदिशाही याच Aspiration चे प्रतिनिधित्व करते. ओदिशा Outstanding आहे. ओदिशा हे नव्या भारताच्या Optimism चे आणि Originality चे प्रतीक आहे. ओदिशामध्येही Opportunities पण आहेत आणि इथल्या लोकांनी नेहमीच Outperform करण्याच्या ध्यास दाखवून दिला आहे. मी गुजरातमध्ये ओदिशाहून आलेल्या सहकाऱ्यांचे कौशल्य, त्यांची मेहनत त्यांचा प्रामाणिकपणा स्वत: अनुभवला आहे. त्यामुळे आज जेव्हा ओदिशामध्ये नवनवीन संधी निर्माण होत आहेत, तेव्हा माझा ठाम विश्वास आहे, ओदिशा लवकरच विकासाची ती उंची गाठेल, जिथपर्यंत पोहोचण्याची कोणी कल्पनाही केली नसेल. मला आनंद आहे की मुख्यमंत्री मोहन चरण मांझी जी यांची संपूर्ण टीम ओदिशाच्या विकासाला वेगवान गती देण्यासाठी काम करत आहेत. अन्न प्रक्रिया, पेट्रोकेमिकल्स, बंदर आधारित विकास, मत्स्यव्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण विषयक तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, पर्यटन, खाणकाम, हरित ऊर्जा अशा प्रत्येक उद्योगा क्षेत्रात ओदिशा भारतातील आघाडीच्या राज्यांपैकी एक बनू लागले आहे.
मित्रांनो,
भारत आज अतिशय वेगाने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा मैलाचा दगड आता फार दूर नाही. गेल्या दशकभरात उत्पादन क्षेत्रातली भारताची ताकदही सर्वांना दिसू लागली लागली आहे. आता भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचे दोन मोठे स्तंभ आहेत, पहिला - आपले नवोन्मेषाधारीत सेवा क्षेत्र आणि दुसरा - भारताची गुणवत्तापूर्ण उत्पादने. देशाची झपाट्याने प्रगती केवळ कच्च्या मालाच्या निर्यातीवर होणार नाही. म्हणूनच आम्ही संपूर्ण परिसंस्थेत बदल घडवून आणत आहोत, नव्या दृष्टीकोनातून काम करत आहोत. इथून खनिजे बाहेर काढली आणि मग निर्यात करून जगातील कुठल्यातरी देशात पोहचली, तिथे त्याचे मूल्यवर्धन झाले, काही तरी नवे उत्पादन तयार झाले, आणि मग ते उत्पादन भारतात परत आले, ही परंपरा मोदींना मान्य नाही. आता ही परंपरा भारत बदलू लागला आहे. इथल्या समुद्रातून सागरी खाद्यान्न काढले जाईल, आणि मग जगातल्या कुठल्यातरी देशात त्यावर प्रक्रिया होऊन ते बाजारात पोहोचेल, ही परंपराही भारत बदलू लागला आहे. ओदिशामध्ये जी संसाधने आहेत, त्यांच्याशी संबंधित उद्योगही इथे उभारले जावेत, या दिशेने आमचे सरकार काम करत आहे. आजचा हा उत्कर्ष ओदिशा कॉन्क्लेव्ह देखील हेच स्वप्न साकार करण्याचे एक साधन आहे.
मित्रांनो,
आज जग शाश्वत जीवनशैलीबद्दल चर्चा करत आहे, हरित भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज हरित रोजगाराच्या संधी आणि शक्यताही खूप वाढू लागल्या आहेत. आपल्याला काळाच्या गरजा आणि मागणीनुसार स्वत:मध्ये बदल करावा लागेल, त्यानुसार जुळवून घ्यावे लागेल. याच विचारातून भारत, हरित भविष्यावर, हरित तंत्रज्ञानावर जास्त भर देत आहे. सौर असो, पवन असो, जलविद्युत असो, हरित हायड्रोजन असो, हे विकसित भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळ देणार आहेत. याबाबतीत ओदिशामध्ये भरपूर वाव आहे. आज देशात आपण राष्ट्रीय स्तरावर हरित हायड्रोजन अभियान आणि सौर उर्जा अभियान सुरू केले आहे. ओदिशामध्येही नविकरणीय ऊर्जेशी संबंधित उद्योगांना चालना देण्यासाठी मोठे धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत, हायड्रोजन ऊर्जेच्या उत्पादनासाठीही इथे असंख्य उपाययोजना केल्या जात आहेत.
मित्रांनो,
हरित ऊर्जेबरोबरच ओदिशात पेट्रो आणि पेट्रोकेमिकल क्षेत्राच्या विस्तारासाठीही उपक्रम आखले जात आहेत. पारादीप आणि गोपालपूर इथे dedicated industrial parks आणि investment regions उभारली जात आहेत. या क्षेत्रातही गुंतवणुकीला खूप मोठा वाव आहे. मी ओदिशा सरकारचे अभिनंदन करू इच्छितो की ओदिशाच्या विविध प्रदेशांमधील शक्यतांचा विचार करून ते जलद गतीने निर्णय घेत आहेत, नवीन परिसंस्था विकसित करत आहेत.
मित्रांनो,
21 व्या शतकातील भारतासाठी, हे जोडलेल्या पायाभूत सुविधांचे, बहु-पद्धती संचारसंपर्काचे युग आहे. आज भारतात ज्या प्रमाणात आणि ज्या वेगाने विशेष पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत त्यामुळे भारत हे गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट ठिकाण बनत आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरने जोडली जात आहे. देशाचा एक मोठा भाग, जो पूर्वी भूवेष्टित होता, तेथून आता समुद्रापर्यंत जलदगतीने पोहोचणे शक्य होत आहे. आज देशभरात डझनभर औद्योगिक शहरे उभारली जात आहेत, जी प्लग अँड प्ले सुविधांनी सुसज्ज असतील. ओडिशामध्येही अशाच प्रकारच्या शक्यतांचा शोध घेतला जात आहे. येथे रेल्वे आणि महामार्ग जाळ्याशी संलग्न असणारे हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. ओडिशातील उद्योगांचा दळणवळणाचा खर्च कमी होण्याच्या दृष्टीने सरकार येथील बंदरांना औद्योगिक क्लस्टर्सशी जोडत आहे. जुन्या बंदरांच्या विस्तारासोबतच येथे नवीन बंदरेही बांधली जात आहेत. याचा अर्थ असा की ओडिशा आता नील अर्थव्यवस्थेच्या संदर्भातही देशातील अव्वल राज्यांमध्ये समाविष्ट होणार आहे.
मित्रांनो,
सरकारचे हे प्रयत्न सुरू असताना आपणा सर्वांना मी काही विनंती करू इच्छितो. वेगाने बदलणाऱ्या या जगात जागतिक पुरवठा साखळींशी संबंधित आव्हाने आपल्या लक्षात आली असतील. विखुरलेल्या पुरवठा साखळ्या तसेच आयातीवर आधारित पुरवठा साखळ्यांवर भारत जास्त काळ विसंबून राहू शकत नाही. आपल्याला भारतातच एक मजबूत पुरवठा आणि मूल्य साखळी निर्माण करावी लागेल, जिच्यावर जागतिक चढउतारांचा कमीत कमी प्रभाव पडेल. ही सरकारची तसेच उद्योगांचीही मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच तुम्ही कोणत्याही उद्योगात असलात तरीही संबंधित मध्यम , लघु आणि सूक्ष्म उद्योगांना पाठिंबा द्या, त्यांना हाताशी धरा. तुम्ही तरुण स्टार्ट-अप्सना अधिकाधिक पाठिंबा दिला पाहिजे.
मित्रांनो,
आज कोणताही उद्योग नवीन तंत्रज्ञानाशिवाय वाढू शकत नाही. अशा परिस्थितीत संशोधन आणि नवोन्मेष खूप महत्वाचे आहेत. सरकार देशात एक अतिशय गतिमान संशोधन परिसंस्था निर्माण करत आहे. यासाठी एक विशेष निधीही निर्माण करण्यात आला आहे. व्यावसायिक शिक्षण अनुभव आणि कौशल्य विकासासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामध्येही उद्योगांनी मोकळेपणाने पुढे येऊन सरकारसोबत एकत्र काम करावे अशी सर्वांची अपेक्षा आहे. भारताची संशोधन परिसंस्था जितकी मोठी आणि उत्तम असेल तसेच कुशल तरुणांचा समूह असेल, तितका आपल्या उद्योगाला त्याचा थेट फायदा होईल. मी आपल्या सर्व उद्योग सहकाऱ्यांना आणि ओडिशा सरकारला सांगू इच्छितो की त्यांनी एकत्र येऊन इथे एक आधुनिक परिसंस्था निर्माण करावी - ओडिशाच्या आकांक्षांशी सुसंगत काम करणारी आणि येथील तरुणांना नवीन संधी प्रदान करणारी एक परिसंस्था. यामुळे ओडिशातील तरुणांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी इथेच मिळतील, ओडिशा समृद्ध होईल, ओडिशा सक्षम होईल, ओडिशाचा उत्कर्ष होईल.
मित्रांनो,
तुम्ही सर्वजण जगभर प्रवास करता, जगभरातील लोकांना भेटता. आज तुम्हाला जगात सर्वत्र भारताला जाणून घेण्याची, उमजून घेण्याची उत्सुकता जाणवू शकते. भारत समजून घेण्यासाठी ओडिशा हे एक उत्तम ठिकाण आहे. इथे आपल्याला हजारो वर्षांचा वारसा, इतिहास, श्रद्धा-अध्यात्म, घनदाट जंगले, पर्वत, महासागर, सर्वकाही एकाच ठिकाणी पाहता येते. हे राज्य विकास आणि वारशाचे एक अद्भुत प्रारूप आहे. त्याच भावनेने आम्ही ओडिशामध्ये जी-20 सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. आम्ही कोणार्क सूर्य मंदिराच्या चक्राला जी-20 च्या मुख्य कार्यक्रमाचा एक भाग बनवले होते. उत्कर्ष ओडिशामध्ये, आपल्याला ओडिशाच्या या पर्यटन क्षमतेचा देखील शोध घ्यावा लागेल. 500 किमी पेक्षा जास्त लांबीचा समुद्रकिनारा, 33 टक्क्यांहून अधिक वनक्षेत्र, इको टुरिझम आणि साहसी पर्यटनाच्या अनंत शक्यता तुमची वाट पाहत आहेत. आज भारताचे लक्ष्य आहे - भारतात येऊन लग्न करा, आज भारताचा मंत्र आहे - भारतात येऊन बरे व्हा, आणि यासाठी ओडिशाचा निसर्ग, येथील नैसर्गिक सौंदर्य खूपच उपयुक्त आहे.
मित्रांनो,
आज भारतात परिषद पर्यटनामुळेही खूप संधी निर्माण होत आहेत. दिल्लीतील भारत मंडपम आणि यशोभूमीसारखी ठिकाणे त्याची मोठी केंद्रे बनत आहेत. भुवनेश्वरला देखील एका चांगल्या कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होऊ शकतो. याच्याशी संबंधित आणखी एक नवीन क्षेत्र म्हणजे कॉन्सर्ट अर्थव्यवस्था. ज्या देशाला संगीत-नृत्य, कथाकथनाचा इतका समृद्ध वारसा आहे, जिथे संगीत मैफिलींचे ग्राहक असलेले तरुणांचे मोठे समूह आहेत तिथे संगीत अर्थव्यवस्थेसाठी अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. गेल्या १० वर्षांत थेट कार्यक्रमांचा कल आणि मागणी दोन्ही वाढल्याचे तुम्ही पाहत आहात. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही मुंबई आणि अहमदाबादमध्ये झालेल्या 'कोल्डप्ले कॉन्सर्ट'चे अद्भुत फोटो पाहिले असतील. भारतात लाईव्ह कॉन्सर्टला किती वाव आहे याचा हा पुरावा आहे. जगातील महान कलाकारही भारताकडे आकर्षित होत आहेत. कॉन्सर्ट अर्थव्यवस्थेमुळे पर्यटनाला चालना मिळते आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतात. कॉन्सर्ट अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर तसेच आवश्यक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे राज्ये आणि खाजगी क्षेत्राला माझे आवाहन आहे. कार्यक्रम व्यवस्थापन असो, कलाकारांचे सौंदर्यीकरण असो, सुरक्षा असो किंवा इतर व्यवस्था असो, या सर्वांमध्ये नवनवीन शक्यता निर्माण होत आहेत.
मित्रांनो,
भारतात पुढच्या महिन्यात पहिली जागतिक दृकश्राव्य शिखर परिषद म्हणजेच वेव्हज आयोजित केली जाणार आहे. हीदेखील एक खूप मोठी घटना असेल, ती भारताच्या सर्जनशील शक्तीला जगात एक नवीन ओळख देईल. अशा कार्यक्रमांमधून मिळणारा महसूल आणि निर्माण होणारी धारणादेखील राज्यांच्या अर्थव्यवस्थांना पुढे नेते. आणि ओडिशामध्येही त्याबाबतची मोठी क्षमता आहे.
मित्रांनो,
विकसित भारताच्या निर्मितीत ओडिशाची मोठी भूमिका आहे. ओडिशाच्या लोकांनी समृद्ध ओडिशा निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प साध्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे. तुम्हाला सर्वांना ओडिशाबद्दलचे माझे प्रेम चांगलेच माहिती आहे. पंतप्रधान म्हणून मी जवळजवळ 30 वेळा इथे आलो आहे. स्वातंत्र्यानंतर जितके पंतप्रधान आजवर झाले असतील, ते सर्व मिळून आतापर्यंत ओडिशाला आले असतील, त्यापेक्षा जास्त वेळा मी ओडिशाला भेट दिली आहे, हे तुमचे प्रेम आहे. मी इथल्या बहुतेक जिल्ह्यांना भेट दिली आहे, माझा ओडिशाच्या क्षमतेवर विश्वास आहे, माझा इथल्या लोकांवर विश्वास आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी केलेली गुंतवणूक तुमच्या व्यवसायाला आणि ओडिशाच्या प्रगतीला नवीन उंचीवर घेऊन जाईल. या भव्य कार्यक्रमाबद्दल मी पुन्हा एकदा ओडिशाच्या जनतेचे आणि सरकारचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि मी ओडिशामध्ये शक्यतांचा शोध घेणाऱ्या महान व्यक्तींना आश्वासन देतो की, ओडिशा सरकार आणि भारत सरकार तुमच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे आहे. पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद!