नमस्कार मित्रांनो,
आज 70 हजारापेक्षा जास्त तरुणांना भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सरकारी नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र मिळत आहे. आपण सर्वांनी मोठे कष्ट करून हे यश मिळवलेले आहे. मी आपणाला आणि आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आहे.
काही दिवसांपूर्वी गुजरात मध्ये पण असाच हजारो लोकांना रोजगार देणारा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच महिन्यात आसाम मध्ये ही अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. भारत सरकार आणि भाजपा प्रणित राज्य सरकारांमध्ये अशा प्रकारचे रोजगार मिळावे हे तरुणांप्रती असलेल्या आपल्या कटिबद्धतेचे एक प्रतीक आहे.
मित्रांनो,
मागच्या नऊ वर्षांमध्ये भारत सरकारनं सरकारी भरती प्रक्रिया अधिक वेगाने करण्याला, ती अधिक पारदर्शी आणि कोणताही भेदभाव न करता करण्याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वी स्टाफ सिलेक्शन बोर्डमध्ये (Staff Selection Board)आवेदन करणे सुद्धा खूप कठीण होत होते.
एक अर्ज घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते, कागदपत्रांना अटेस्टेड( साक्षांकित) करण्यासाठी सुद्धा गॅझेटेड(सनदी) अधिकाऱ्यांना शोधावे लागत होते. पुन्हा अर्ज टपालाद्वारे पाठवले जात होते आणि यामध्ये सुद्धा हे कळत नसायचे की तो अर्ज वेळेत पोहोचेल की नाही पोहोचेल.
जिथे पोहोचायचे आहे तिथे पोहोचले की नाही पोहोचले, आज अर्ज करण्यापासून निकाल येईपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन झालेली आहे. आज कागदपत्रांना सेल्फ अटेस्टेड (स्व साक्षांकित) केले तरी काम होऊन जाते. श्रेणी सी आणि श्रेणी डी या पदांसाठीच्या भरती प्रक्रियेमध्ये होणारे इंटरव्यू (मुलाखत) पद्धती सुद्धा आता संपुष्टात आलेली आहे. या सर्व प्रयत्नांचा सर्वात अधिक फायदा हा झाला आहे की भ्रष्टाचार असो वा वशिलेबाजी यांची शक्यता आता पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे.
मित्रांनो,
आजचा दिवस एका आणखी कारणाने खूप विशेष आहे, नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संपूर्ण देश आनंद उत्साह आणि विश्वासाने नाचू गाऊ लागला होता. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आपली पावलं पुढे टाकणारा भारत आज विकसित भारत बनण्याचा प्रयत्न करत आहे.
जसे 9 वर्षांपूर्वी 16 मे ला लोकसभा निवडणुकीचे निकाल आले होते त्याच प्रकारे आज एक आणखी महत्त्वपूर्ण दिवस आहे, आज आपला एक महत्त्वाचा प्रदेश जो हिमालयाच्या कुशीत वसलेला आहे, सिक्कीम राज्याचा सुद्धा आज स्थापना दिवस आहे.
मित्रांनो,
या 9 वर्षाच्या आपल्या प्रवासात रोजगाराच्या नवीन संधींना केंद्रस्थानी ठेवून सरकारचे धोरण तयार करण्यात आले. आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे असो वा ग्रामीण भागांचा विकास असो किंवा मग जीवनाशी निगडित विविध सुविधांचा विस्तार असो भारत सरकारच्या प्रत्येक योजना, प्रत्येक धोरणात तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहे.
मित्रांनो,
मागच्या नऊ वर्षांमध्ये भारत सरकारने भांडवली खर्चामध्ये जवळजवळ 34 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. पायाभूत सुविधांसाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात सुद्धा भांडवली खर्चामध्ये 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमधून देशामध्ये नवीन महामार्ग बनवले जात आहेत, नवीन विमानतळ, नवीन रेल्वे मार्ग, नवीन पूल अशा अनेक आधुनिक पायाभूत सोयी सुविधांच्या निर्मितीमुळे देशामध्ये लाखो नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. ज्या वेगाने आणि ज्या आवाक्याने आज भारत काम करत आहे आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या इतिहासात हे सर्व अभूतपूर्व असे आहे. सत्तर वर्षांमध्ये भारतात केवळ 20 हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण(Electrification)झालेले होते.
परंतु आमच्या सरकार काळामध्ये मागच्या 9 वर्षांमध्ये भारतात अंदाजे 40 हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झालेले आहे. 2014 च्या पूर्वी आपल्या देशामध्ये प्रत्येक महिन्याला केवळ 600 मीटर नवीन मेट्रो मार्ग निर्माण केले जायचे परंतु आज भारतात प्रत्येक महिन्याला सहा किलोमीटर; त्या वेळेचे गणित हे मीटर मध्ये होते, आजचे गणित किलोमीटरचे आहे. आज सहा किलोमीटर लांबीच्या नवीन मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होत आहेत. 2014 च्या पूर्वी देशात चार लाख किलोमीटर पेक्षाही कमी ग्रामीण रस्ते होते. आज देशात सव्वा सात लाख किलोमीटर पेक्षाही जास्त ग्रामीण असते आहेत ते पण आधीच्या दुप्पट. 2014 च्या आधी देशामध्ये फक्त 74 विमानतळ होते आज देशात विमानतळांची संख्या वाढवून ती 150 च्या जवळजवळ पोहोचली आहे, ती सुद्धा दुप्पट.
मागच्या नऊ वर्षांमध्ये देशात गरिबांसाठी जी चार कोटी पक्की घरे बनवली जात होती त्यापासून सुद्धा रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. गावागावात सुरू झालेले पाच लाख सार्वजनिक सर्विस सेंटर; रोजगाराचे मोठे माध्यम बनलेली आहेत, तरुणांना ती ग्रामीण पातळीवरचे उद्योजक (village level entrepreneurs)बनवत आहेत.
गावांमध्ये तीस हजाराहून अधिक पंचायत भवन निर्माण करण्याचे काम असो की नऊ कोटी घरांना पिण्याच्या पाण्याची जोडणी देणे असो या सर्व अभियानांमधून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. देशांमध्ये येणारी परदेशी गुंतवणूक असो किंवा भारताची विक्रमी निर्यात असो, हे देशाच्या कानाकोपऱ्यात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत आहे.
मित्रांनो,
मागच्या नऊ वर्षांमध्ये कामाच्या स्वरूपामध्ये(Nature of Job) सुद्धा वेगाने बदल झालेले आहेत, बदलत्या या परिस्थितीमध्ये तरुणांसाठी नवनवीन क्षेत्रे निर्माण होत आहेत केंद्र सरकार या नवीन क्षेत्रांना सतत पाठिंबा देत आहे.
या नऊ वर्षांमध्ये देशात स्टार्टअप संस्कृतीची नवीन क्रांती पाहायला मिळाली. 2014 मध्ये देशांमध्ये जेव्हा अगदी मोजकेच 100 स्टार्टअप स्थापन झालेले होते, आता मात्र त्यांची ही संख्या आज एक लाख स्टार्टअप पर्यंत पोहोचली आहे आणि हे अनुमान लावले जात आहे की या स्टार्टअप मधून कमीत कमी दहा लाख तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळालेल्या आहेत.
मित्रांनो,
या नऊ वर्षांमध्ये देशाने कॅब एग्रीगेटर्स(Cab Aggregators) म्हणजेच ॲपच्या(App) माध्यमातून टॅक्सीला भारतीय शहरांची नवीन लाईफ लाईन होत असताना पाहिलेले आहे, या 9 वर्षामध्ये ऑनलाइन वितरण प्रणालीची एक अशी पद्धती निर्माण झालेली आहे ज्यामुळे लाखो तरुणांना रोजगार प्राप्त झालेले आहेत. या 9 वर्षांमध्ये ड्रोन क्षेत्रात सुद्धा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. खतांच्या फवारणी पासून ते औषधांच्या पुरवठ्यापर्यंत सर्व ठिकाणी ड्रोन यंत्राचा वापर वाढलेला आहे. या नऊ वर्षांमध्ये शहरी गॅस वितरणाच्या सुविधा सुद्धा 60 शहरांपासून वाढत जाऊन ही संख्या 600 पेक्षा जास्त शहरांपर्यंत पोचलेली आहे.
मित्रहो,
गेल्या नऊ वर्षांमध्ये भारत सरकारने मुद्रा योजनेंतर्गत 23 लाख कोटी रुपये देशातील युवकांना दिले आहेत. या पैशातून कोणी आपला नवीन व्यापार , कारभार सुरु केला आहे. कोणी टॅक्सी खरेदी केली आहे तर कोणी आपलं दुकान वाढवलं आहे. आणि यांची संख्या लाखात नाही. मी अभिमानाने सांगतो यांची संख्या कोटींमध्ये आहे. जवळपास 8 ते 9 कोटी लोक असे आहेत ज्यांनी मुद्रा योजनेच्या मदतीने प्रथमच स्वतःचं स्वतंत्र काम सुरु केलं आहे. आज जे आत्मनिर्भर भारत अभियान सुरु आहे, देशात उत्पादक व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यासाठी याचाही आधार मिळेल. PLI योजनेंतर्गत सरकार उत्पादनासाठी जवळपास 2 लाख कोटी रुपयांची मदत देत आहे. हा निधी भारताला जगाचे उत्पादन केंद्र म्हणून आकाराला आणण्यासोबतच लाखो युवकांना रोजगारासाठीही सहकार्य करेल.
मित्रहो,
भारतातील युवकांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्याचे कौशल्य अवगत असणे खूप आवश्यक आहे, त्यासाठी देशांमध्ये उच्च शिक्षण संस्था कौशल्य विकास संस्थांची निर्मिती युद्ध स्तरावर होत आहे. वर्ष 2014 पासून 2022 पर्यंत प्रत्येक वर्षी एक नवीन आयआयटी आणि एक नवीन आयआयएम तयार झाले आहे. गेल्या नऊ वर्षात जवळपास प्रत्येक आठवड्याला एक विद्यापीठ आणि प्रत्येक दिवशी दोन महाविद्यालये उघडली गेली आहेत. आमचे सरकार येण्यापूर्वी देशात 720 च्या जवळपास विद्यापीठे होती आता त्यांची संख्या वाढून 1100 हून जास्त झाली आहे. सात दशकांमध्ये देशात केवळ सात एम्स तयार केले गेले. गेल्या नऊ वर्षांमध्ये आम्ही पंधरा नवीन एम्स उभारण्याकडे पाऊल टाकले आहे. यामध्ये काही रुग्णालयांनी आपल्या सेवा पुरवण्यासही सुरूवात केली आहे. 2014 पर्यंत देशात 400 पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालये होती. आज यांची संख्या वाढून जवळपास 700 झाली आहे. महाविद्यालये वाढली तेव्हा साहजिकच जागांची संख्याही वाढली. युवकांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठीच्या संधीमध्ये वाढ झाली आहे. साल 2014 पूर्वी आमच्या देशात एमबीबीएस आणि एमडीच्या जागा फक्त 80 हजाराच्या आसपास होत्या. आता देशात एमबीबीएस आणि एमडीच्या जागा वाढून एक लाख 70 हजारहूनही जास्त झाल्या आहेत.
मित्रहो,
कोणत्याही कामासाठी कौशल्याचा विकास करण्यामध्ये आमच्या या आयटीआय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. गेल्या नऊ वर्षात देशात जवळपास रोज एक नवीन आयटीआय आकारास आणली गेली आहे. आज देशातील जवळपास पंधरा हजार आयटीआयमध्ये देशाच्या नवीन गरजांनुसार नवीन शिक्षणक्रम सुरू केले जात आहेत. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत सव्वा कोटींहून जास्त युवकांना कौशल्य प्रशिक्षण सुद्धा दिले गेले आहे.
मित्रहो,
सरकारच्या या प्रयत्नांमुळे कितीतरी नवीन क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. मी आपल्याला फक्त एकच उदाहरण देतो ते म्हणजे कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे. जर आपण 2018-19 या वर्षानंतर कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या एकूण पगारपत्रकाचे आकडे बघितले तर साडेचार कोटीहून अधिक लोकांना नियमित नोकऱ्या मिळाल्या आहेत. कामगार भविष्य निर्वाह निधी संस्थेचा जो डेटा आहे त्यावरून कळते की देशात फॉर्मल जॉब्स मध्ये सतत वाढ होत आहे. फॉर्मल जॉब्समधील या वाढीबरोबरच देशात स्वयंरोजगारांच्या संधीसुद्धा सातत्याने वाढत आहेत.
मित्रहो,
गेल्या काही आठवड्यांमध्ये ज्या प्रकारच्या बातम्या आल्या आहेत, त्यातून भारतात उद्योग आणि गुंतवणुकीबद्दल सकारात्मकता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी वॉलमार्टच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर माझे बोलणे झाले. ही कंपनी येत्या तीन चार वर्षांमधून भारतातून 80 हजार कोटी रुपयांच्या सामानाची निर्यात करू लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमचे जे युवक वाहतूक आणि पुरवठा साखळी क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. सिस्कोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या भारत यात्रेदरम्यान मला सांगितले की त्यांच्यासमोर भारतात तयार होणाऱ्या 8 हजार कोटी रुपयांच्या उत्पादनाच्या निर्यातीचे लक्ष्य आहे. काही दिवसांपूर्वी अॅपल चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा भारतात आले होते. भारताचे उज्वल भविष्य विशेषतः मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत त्यांना भारतावर भरपूर विश्वास असल्याचे दिसले. जगातील नामवंत सेमीकंडक्टर कंपनी एनएक्सपी चे वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी सुद्धा मला नुकतेच भेटले. ते भारताच्या सेमीकंडक्टर इकॉसिस्टीमची निर्मिती आणि त्याचे सामर्थ्य याबाबतीत सकारात्मक होते. फॉक्सकॉननेसुद्धा भारतात अनेक प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक सुरू केली आहे. पुढील सप्ताहात मी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहे. ते सर्व भारतात गुंतवणुक करण्याच्या बाबतीत उत्साहाने भारलेले आहेत. या साऱ्या चर्चा, सारे प्रयत्न दाखवून देतात की भारतात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी किती वेगाने वाढत आहेत.
मित्रहो,
देशात होत असलेल्या विकासाच्या या महायज्ञात, एवढ्या पण मोठ्या प्रमाणावरील परिवर्तनात आता आपली भूमिका अगदी साधी आहे. येत्या 25 वर्षात आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासोबतच विकसित भारताचा संकल्पही साकार करायचा आहे. माझा आपणा सर्वांना आग्रह आहे की या संधीचा भरपूर उपयोग करून घ्या. आज आपल्या जीवनात शिक्षणाचा एक नवीन प्रवास चालू झाला आहे. सरकारचा मुख्य भर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन कौशल्य प्रशिक्षण देण्यावरही आहे. तेच लक्षात ठेवून कर्मयोगी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म (iGoT) सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मवर कितीतरी प्रकारचे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. आपण त्यांचा पूर्ण उपयोग करून घ्या. आपली क्षमता जेवढी वाढेल तेवढाच त्याचा आपल्या कामांवर सकारात्मक प्रभाव पडेल. आणि सक्षम लोकांमुळे कामावर जो सकारात्मक प्रभाव पडतो तो देशातील सर्व उपक्रमांमधल्या सकारात्मकतेला गती देतो. आज या महत्वपूर्ण काळात, आपल्या जीवनातील एका खूप महत्त्वपूर्ण मुक्कामावर पुन्हा एकदा मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देतो. त्याबरोबरच आपले कुटुंबीय, आपल्या कुटुंबीयांना यासाठी की त्यांनी आपल्याला आशेने अपेक्षेने आणि उत्साहाने जीवनात पुढे जाण्यासाठी खूप काही दिले आहे, मी आज त्यांनाही अनेक अनेक शुभकामना देतो. आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतानाच पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.