प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ
मुंबई मेट्रो रेल्वे 2A आणि 7 या मार्गांचे लोकार्पण
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे आणि सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन
20‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन
मुंबईतील सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचा काँक्रिटीकरण प्रकल्पाची पायाभरणी
“भारताच्या संकल्पावर जग विश्वास दाखवत आहे”
“छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन डबल इंजिन सरकारमध्ये स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रकर्षाने दिसून येत आहे”
“भारत आपल्या भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर भविष्यवादी विचार आणि आधुनिक दृष्टिकोन ठेवून खर्च करत आहे”
“वर्तमानातील आवश्यकता आणि भविष्यातील शक्यता यांचा विचार करून कार्य सुरु आहे”
“अमृत काळात महाराष्ट्रातील अनेक शहरे भारताच्या विकासाचे सारथ्य करतील”
“शहरांच्या विकासाकरता क्षमता आणि राजकीय इच्छाशक्तीची कमतरता नाही”
“मुंबईच्या विकासाकरता केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाचा समन्वय असणं आवश्यक आहे”
“स्वनिधी ही एखाद्या कर्ज योजनेपेक्षा अधिक आहे, पथ विक्रेत्यांच्या आत्मसन्मानाचा हा पाया आहे”
“सबका प्रयास अर्थात सर्वांच्या प्रयत्नांची जोड मिळते तेव्हा काहीच अशक्य नसते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे डिजिटल इंडिया”

भारतमाता की जय

भारतमाता की जय

मुंबईतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार !

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी जी, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र  फडणवीस जी, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी, विधानसभेचे अध्यक्ष  राहुल नार्वेकरजी, महाराष्ट्र सरकारमधले सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि मोठ्या संख्येनं आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो.

आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी आज झाली आहे. मुंबईसाठी अत्यंत आवश्यक मेट्रो असो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं आधुनिकीकरणाचे काम असो, रस्त्यांच्या सुधारणांचा मोठा प्रकल्प असो आणि बाळासाहेब ठाकरे जी यांच्या नावानं 'आपला दवाखानाची' सुरुवात असो, हे मुंबई शहराला अधिक चांगले करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. थोड्या वेळापूर्वी मुंबईतल्या पदपथ फेरीवाल्यांच्या बँक खात्यात पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पैसे जमा झाले. या सर्व लाभार्थिंना आणि सर्व मुंबईकरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.

 

बंधू भगिनींनो,

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आज भारत मोठी स्वप्न बघणे आणि ती पूर्ण करण्याचे साहस करत आहे. नाहीतर आपल्याकडे एक मोठा काळ केवळ गरिबीवर फक्त चर्चा करणे, जगाकडून मदत मागणे अशी कशीबशी गुजराण करणे यातच गेला. आता हे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच होत आहे, जेव्हा जगालाही भारताच्या मोठमोठ्या संकल्पांबाबत विश्वास वाटत आहे. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारताच्या निर्माणाची जितकी उत्सुकता भारतीयांना आहे तितकाच आशावाद जगातही दिसून येत आहे. आत्ताच शिंदे जी दावोसचा आपला अनुभव सांगत होते. सगळीकडेच असा अनुभव येत आहे. भारताबाबत जगात इतकी सकारात्मकता आहे कारण आज सर्वांना असे वाटते, भारत आपल्या सामर्थ्याचा खूपच उत्तम  पद्धतीने सदुपयोग करून घेत आहे. आज प्रत्येकाला वाटत आहे, भारत गतिमान विकासासाठी, समृद्धीसाठी जे अतिशय आवश्यक आहे, ते करत आहे. आज भारत अभूतपूर्व आत्मविश्वासाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने स्वराज आणि सुराज्याची भावना आजच्या हिंदुस्थानमध्ये डबल इंजिन सरकारमध्ये प्रबळपणे प्रकट होते.

बंधू-भगिनींनो,

आम्ही असा काळ पाहिला आहे जेव्हा गरिबांच्या कल्याणासाठीचे पैसे घोटाळ्यात जायचे, कराबाबत संवेदनशीलतेचा पूर्णपणे अभाव होता. यामुळे झालेलं नुकसान कोट्यवधी देशवासियांना भोगावं लागलं. गेल्या आठ वर्षात आम्ही हा दृष्टिकोन बदलला आहे. आज भारत भविष्यकालीन विचार आणि आधुनिक दृष्टिकोन ठेवून आपल्या भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर खर्च करत आहे. आज देशात एकीकडे घर, शौचालय, वीज, पाणी, स्वयंपाकाचा गॅस, मोफत उपचार, वैद्यकीय महाविद्यालये, एम्स, आयआयटी, आयआयएम यासारख्या सुविधांची वेगानं निर्मिती होत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आधुनिक कनेक्टीव्हीटीवरही तितकाच भर दिला जात आहे. ज्या प्रकारच्या आधुनिक पायाभूत सुविधांची कधी कल्पना केली जात असे, आज तशा पायाभूत सुविधा देशात निर्माण होत आहेत. म्हणजेच देशात आजच्या गरजा आणि भविष्यातील समृद्धीच्या संधी दोन्हींवर एकसाथ काम केले जात आहे. जगातल्या मोठमोठ्या अर्थव्यवस्था आज कठीण स्थितीला सामोरं जात आहेत, मात्र अशा कठीण काळातही भारत 80 कोटींहून अधिक देशवासियांना मोफत रेशन देऊन त्यांच्या घरातली चूल कधीही विझू देत नाही. अशा परिस्थितीतही भारत पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. यातून आजच्या भारताची प्रतिबद्धता दिसून येते. विकसित भारताच्या आपल्या संकल्पाचं प्रतिबिंब आहे.

 

बंधू- भगिनींनो,

विकसित भारताच्या निर्माणात आपल्या शहरांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. यातही महाराष्ट्राचा विचार करता, आगामी 25 वर्षात राज्यातली अनेक शहरे भारताच्या विकासाला गती देणार आहेत. म्हणूनच मुंबईला भविष्यासाठी सज्ज करणं ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे. आमची ही प्रतिबद्धता मुंबईत मेट्रो नेटवर्कच्या  विस्तारातूनही दिसून येते. वर्ष 2014 पर्यंत मुंबईत फक्त 10-11 किलोमीटर मेट्रो चालवली जात होती.  तुम्ही डबल इंजिन सरकार सत्तेवर आणलं आणि वेगानं याचा विस्तार सुरू झाला. आम्ही डबल इंजिन सरकार बनवताच याचा झपाट्याने विस्तार झाला. काही काळासाठी कामात शिथिलता नक्कीच आली मात्र शिंदेंजी आणि देवेंद्रजी यांची जोडी येताच पुन्हा आता वेगाने काम सुरु झाले आहे. मुंबईत 300 किमी नेटवर्क च्या दिशेने आपण झपाट्याने वाटचाल करत आहोत.

मित्रांनो, आज देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्राच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीलाही यातून लाभ होत आहे. डबल इंजिन सरकारचा सामान्य व्यक्तीलाही त्याच आधुनिक सुविधा, तीच स्वच्छता त्याच गतीचा अनुभव देण्याचा मानस आहे जो कधीकाळी फक्त सुखवस्तू लोकांनाच मिळायचा. म्हणून, आज रेल्वे स्थानकेही विमानतळांप्रमाणेच विकसित करण्यात येत आहेत. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील कायापालट होणार आहे. आमची ही संकल्पना एकविसाव्या शतकातील शानदार रुपाने विकसित होणार आहे. इथे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा बनल्या आहेत. सामान्य प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात हेच उद्दिष्ट आहे. कामासाठी ये-जा सुलभ व्हावी, हे स्थानक केवळ रेल्वे सुविधांपुरते मर्यादित राहणार नाही तर ते मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी चे देखील केंद्र बनेल. म्हणजे, बस असो, मेट्रो असो, टॅक्सी असो रिक्षा असो, वाहतुकीची सर्व साधने इथे एकाच छताखाली जोडलेली असतील. याद्वारे प्रवाशांना अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. हीच मल्टीमोडल कनेक्टिव्हीटी आहे जी आपण देशातील प्रत्येक शहरात विकसित करणार आहोत.

 

मित्रहो,

आधुनिक होणारी मुंबई लोकल, मेट्रोचे व्यापक नेटवर्क, दुसऱ्या शहरातून वंदे भारत आणि बुलेट ट्रेन द्वारे गतिमान आधुनिक कनेक्टिव्हीटी आगामी काही वर्षात मुंबईचा कायापालट करतील. गरीब मजुरापासून कर्मचारी, दुकानदार आणि मोठमोठे व्यावसायिक सर्वांसाठी  राहणे सुविधाजनक होईल. एवढेच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही मुंबईत ये-जा करणे सुलभ होईल. किनारी मार्ग असो, इंदू मिल स्मारक असो, नवी मुंबईचे विमानतळ असो, ट्रान्स हार्बर लिंक असो, असे अनेक प्रकल्प मुंबईला नवी ताकद देत आहेत. धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास, सर्वकाही आता पटरीवर येत आहे आणि यासाठी मी शिंदेजी आणि देवेंद्रजी यांचे अभिनंदन करतो. मुंबईचे रस्ते सुधारण्यासाठी देखील आज मोठ्या प्रमाणावर जे काम सुरु झाले आहे हे देखील डबल इंजिन सरकारची कटीबद्धता दर्शवते.

बंधू आणि भगिनींनो,

आज आम्ही देशातील शहरांच्या संपूर्ण परिवर्तनाचे काम करत आहोत. प्रदूषणापासून स्वच्छतेपर्यंत शहरांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण शोधले जात आहे. म्हणून आपण इलेकट्रीक वाहतुकीवर इतका भर देत आहोत की त्यासाठी पायाभूत सुविधा तयार करत आहोत. जैव-इंधन आधारित वाहतूक प्रणाली लवकरच आणण्याचा आमचा मानस आहे. हायड्रोजन इंधनाशी निगडित वाहतूक प्रणालीसाठी सुद्धा देशात मिशन मोडवर काम सुरु आहे. इतकेच नव्हे तर आम्ही आपल्या शहरात कचऱ्याची जी समस्या आहे, ती देखील नव्या तंत्रज्ञानाने दूर करण्यासाठी आम्ही एकेक पाऊल उचलत आहोत. कचऱ्यातून संपत्ती चे (Waste to Wealth) मोठे अभियान देशात सुरु आहे. नदीत खराब पाणी मिसळू नये म्हणून जल प्रक्रिया संयंत्र बसवली जात आहेत.

मित्रांनो,

शहरांच्या विकासासाठी देशाकडे सामर्थ्याची आणि राजकीय इच्छाशक्तीची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. मात्र, आपल्याला आणखी एक गोष्ट जाणून घ्यायला हवी कि मुंबई सारख्या शहरात प्रकल्प तोपर्यंत झपाट्याने पूर्ण केले जाऊ शकत नाहीत जोपर्यंत स्थानिक पालिकांचे प्राधान्य गतिमान विकासाचे नसे. जेव्हा राज्यात विकासासाठी समर्पित सरकार असते, जेव्हा शहरात सुशासनासाठी समर्पित शासन असते तेव्हा ही कामे प्रत्यक्षात वेगाने साकार होतात. म्हणूनच, मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज संस्थांची भूमिका खूप मोठी आहे. मुंबईच्या विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची कोणतीच उणीव नाही. फक्त मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे. जर तो भ्रष्टाचारात गुंतेल, पैसे बँकेच्या तिजोरीत अडकून असतील, विकास कामे रोखण्याची वृत्ती असेल तर मुंबईचे भविष्य उज्ज्वल कसे असेल? मुंबईची जनता, इथले सर्वसामान्य त्रास सोसत राहिले, हे शहर विकासासाठी प्रतीक्षा करत राहील अशी स्थिती एकविसाव्या शतकातील भारतात कधीही स्वीकारार्ह नसेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर कधीच स्वीकारार्ह होणार नाही. मी मुंबईच्या लोकांची प्रत्येक समस्या जाणून खूप मोठ्या जबाबदारीने हे विधान करत आहे की भाजपाचे सरकार असो, एनडीए चे सरकार असो, कधी विकासापुढे राजकारण येऊ देत नाही. विकास आमच्यासाठी सर्वात मोठे प्राधान्य आहे. आपल्या राजकीय स्वार्थाच्या पूर्ततेसाठी भाजपा आणि एनडीए ची सरकारे कधी विकास कार्ये थांबवत नाहीत. परंतु, मी पहिल्यांदाच मुंबईत असे होताना वेळोवेळी बघितले आहे; पीएम स्वनिधी योजना देखील याचे एक उदाहरण आहे. आमच्या शहरात, फेरीवाले, पदपथविक्रेते, श्रमिक मित्र जे शहराच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वपूर्ण घटक आहे त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यांदाच योजना सुरु केली. आम्ही या छोट्या व्यापाऱ्यांसाठी बँकांकडून स्वस्तात बिगर हमी कर्ज मंजूर केले. देशात सुमारे 35 लाख फेरीवाल्यांना याचा लाभ मिळाला आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातही 5 लाख मित्रांना कर्ज मंजूर झाले आहे. आजही एक लाखाहून अधिक मित्रांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग झाले आहेत. हे काम खूप आधी व्हायला हवे होते.  मात्र, मधल्या काही काळात, डबल इंजिनाचं सरकार नसल्याने, प्रत्येक कामात अडथळे आणले गेले, आडकाठी करण्यात आली. ज्याचं नुकसान या सर्व लाभार्थ्यांना सोसावं लागलं. असं पुन्हा होऊ नये यासाठी, गरजेचं आहे, की दिल्लीपासून महाराष्ट्र आणि मुंबईपर्यंत देखील सर्वांचे प्रयत्न एकत्रित व्हावेत, उत्तम ताळमेळ असलेली व्यवस्था निर्माण व्हावी.

 

 मित्रांनो,

 आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवं की स्वनिधी योजना केवळ कर्ज देणारी योजना नाही तर ही आपल्या पदपथावर विक्री करणाऱ्या, फेरीवाल्यांचं आर्थिक सामर्थ्य वाढवणारं अभियान आहे. ही स्वनिधी योजना, स्वाभिमान देणारं औषध आहे. मला असं सांगण्यात आलं आहे की, स्वनिधीच्या लाभार्थ्यांना डिजिटल देवाणघेवाणी संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईत सव्वा तीनशे शिबिरं आयोजित करण्यात आली. यामुळे आपल्या हजारो फेरीवाल्या बांधवांनी डिजिटल देवाणघेवाण सुरु देखील केली आहे. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसेल की, इतक्या कमी वेळात, देशभरातल्या स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांनी जवळ जवळ 50 हजार कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार केले आहेत. ज्यांना आपण अशिक्षित समजतो, ज्यांना आपण कोणत्याही प्रकारच्या भाषेत अपमानित करत असतो, त्या माझ्या छोट्या छोट्या मित्रांनी, जे आज आपल्या समोर बसले आहेत, या पदपथावर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी मोबाईलवर ऑनलाइन 50 हजार कोटी रुपयांचं काम केलं आहे आज. आणि त्यांचा हा पराक्रम, त्यांचा हा परिवर्तनाचा मार्ग, निराशावाद्यांसाठी खूप मोठं उत्तर आहे, जे म्हणायचे रस्त्यावरती विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहार कसे करता येणार? डिजिटल इंडियाच्या यशाचं उदाहरण हे आहे, की जेव्हा सर्वांचे प्रयत्न एकत्रित होतात, तेव्हा अशक्य असं काहीच उरत नाही. सर्वांचे प्रयत्न याच भावनेनं, आपण सर्व मिळून मुंबईला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ. आणि मी माझ्या पदपथावर विक्री करणाऱ्या फेरीवाल्या बांधवांना सांगू इच्छितो, तुम्ही माझ्यासोबत चालत रहा, तुम्ही दहा पावलं चाललात तर मी तुमच्यासाठी अकरा पावलं चालेन. मी हे यासाठी सांगतोय, की आपले पदपथावर विक्री करणारे फेरीवाले बांधव, सावकाराकडे व्याजाने पैसे घ्यायला जात असत, दिवसभर व्यापार करण्यासाठी त्यांना एक हजार रुपयांची गरज असेल, तर तो आधीच शंभर रुपये कापून घेत असे आणि फक्त 900 रुपयेच देत असे. आणि संध्याकाळी गेल्यावर जर एक हजार रुपये त्याने परत केले नाहीत तर दुसऱ्या दिवशी त्याला पैसे मिळत नसत. आणि कधी जर माल विकला गेला नाही, आणि हजार रुपये परत दिले नाहीत, तर व्याज वाढत जात असे. रात्री त्याची मुलं उपाशी झोपत असत. या सर्वांपासून वाचवण्यासाठी तुमच्यासाठी ही स्वनिधी योजना आहे.

 

 मित्रांनो,

 जितका अधिक तुम्ही डिजिटल उपयोग कराल, घाऊक खरेदी करायला जाल तिथे देखील त्याला डिजिटल पेमेंट करा. जिथे विक्री करत असाल तिथे देखील खरेदी करणाऱ्यांना सांगा की डिजिटल पेमेंट करा. मग स्थिती अशी येईल की तुम्हाला व्याजाचा एक नवा पैसा लागणार नाही, तुम्ही कल्पना करू शकता की तुमचे किती पैसे वाचतील. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, किती मोठं काम होणार आहे, मी यासाठी सांगतो मित्रांनो, मी तुमच्यासोबत उभा आहे, तुम्ही दहा पावलं चाललात तर मी अकरा पावलं चालण्यासाठी तयार आहे, मी वचन द्यायला आलोय. तुमच्या उज्वल भविष्यासाठी आज मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून वचन देण्यासाठी या मुंबईच्या मातीत आलो आहे मित्रांनो, आणि मला विश्वास आहे, छोट्या छोट्या लोकांच्या परिश्रम आणि पुरुषार्थानं देश नवी शिखरं पार करुनच राहील. याच विश्वासानं जेव्हा मी आज पुन्हा एकदा तुमच्याकडे आलो आहे, मी सर्व लाभार्थ्यांना, सर्व मुंबईकरांना, पूर्ण महाराष्ट्राला, आणि मुंबई तर देशाचं स्पंदन आहे. सर्व देशवासियांनाही मी या विकास कार्यासाठी शुभेच्छा देतो. शिंदेजी आणि देवेंद्रजी यांची जोडी, तुमच्या स्वप्नांना साकार करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

बोला, भारत माता की जय! भारत माता की जय ! खूप खूप धन्यवाद!  

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi to launch multiple development projects worth over Rs 12,200 crore in Delhi on 5th Jan

Media Coverage

PM Modi to launch multiple development projects worth over Rs 12,200 crore in Delhi on 5th Jan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 जानेवारी 2025
January 04, 2025

Empowering by Transforming Lives: PM Modi’s Commitment to Delivery on Promises