“ही परिषद म्हणजे जगभरातील विविध संसदीय पद्धतींचा एक अनोखा संगम”
“पी-20 शिखर परिषद त्या भूमीवर होत आहे जी केवळ लोकशाहीची जननी म्हणूनच ओळखली जात नाही तर ती जगातील सर्वात मोठी लोकशाही देखील आहे”
“भारत केवळ जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांचेच आयोजन करत नाही, तर त्यामध्ये लोकसहभाग देखील सातत्याने वाढत आहे”
“भारताने निवडणुकीची प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानासोबत संलग्न केली आहे”
“आज भारत प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देत आहे”
“विभागलेले जग मानवतेला भेडसावणाऱ्या प्रमुख आव्हानांवर उपाययोजना करू शकत नाही”
“हा काळ शांतता आणि बंधुभावाचा आहे, एकत्र वाटचाल करण्याचा हा काळ आहे. सर्वांचा विकास आणि कल्याणाचा हा काळ आहे. आपल्याला जागतिक विश्वासविषयक समस्यांवर मात करायची आहे आणि मानवकेंद्री विचाराने पुढे जायचे आहे”

नमस्कार,

140 कोटी भारतीयांच्या वतीने मी जी-20 संसदीय अध्यक्ष परिषदेमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.  ही शिखर परिषद म्हणजे एक प्रकारे जगभरातील विविध संसदीय लोकशाही पद्धतींचा महासंगम (महाकुंभ) आहे.  तुम्ही सर्व प्रतिनिधी वेगवेगळ्या संसदेच्या कार्यशैलींच्या  अनुभवांनी संपन्न आहात.  असे समृद्ध लोकशाही अनुभव घेऊन तुमचे भारतात येणे आम्हा सर्वांसाठी खूप आनंददायी आहे.

 

मित्रहो,

भारतात सध्याचा हा काळ उत्सवांचा हंगाम असतो. या दिवसांमध्ये संपूर्ण भारतात खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे केले जातात. मात्र जी-20 ने यावेळेस हे उत्सवी वातावरण आणि त्याचा उत्साह संपूर्ण वर्षभर निर्माण केला. आम्ही पूर्ण वर्षभर जी-20 च्या प्रतिनिधींचे भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आतिथ्य केले आहे. यामुळे या शहरांमध्ये कायम उत्सवी वातावरण टिकून राहिले. त्यानंतर भारताने चंद्रावर स्वारी केली. यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे आणखी उधाण आले.  त्यानंतर, आम्ही इथे दिल्लीतच जी-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले.  आणि आता ही पी-20 शिखर परिषद इथे होत आहे.  कोणत्याही देशाची सर्वात मोठी ताकद ही तेथील नागरिक, या नागरिकांची इच्छाशक्ती असते.  आज ही परिषद, लोकांसाठी, ही ताकद देखील साजरी करण्याचे एक माध्यम बनले आहे.

मित्रांनो,

लोकशाहीची जननी, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या अशा भारतभूमीवर ही पी-20 शिखर परिषद होत आहे. जगातील विविध संसदांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हे माहित आहे की संसद हे वैचारिक वादविवाद आणि प्रदीर्घ चर्चांचे महत्त्वाचे स्थान असते. आपल्याकडे अगदी हजारो वर्षांपूर्वी सुद्धा वैचारिक वादविवाद आणि चर्चांची खूपच मूर्तिमंत उदाहरणे आहेत. आपल्या सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीच्या जुन्या ग्रंथांमध्ये, आपल्या वेदांमध्ये सभा आणि समित्यांचे उल्लेख आढळून येतात. यात एकत्र येऊन समाजाच्या हिताचे सामूहिक निर्णय घेतले जात असत. आपला सगळ्यात जुना वेद असलेल्या ऋग्वेदात सांगितले गेले आहे- संगच्छ-ध्वं संवद-ध्वं सं, वो मनांसि जानताम् ! म्हणजेच आपण एकत्र वाटचाल करायला हवी, एकत्र संवाद साधायला हवा आणि आपली मने जुळायला हवीत!आपल्याकडे त्याकाळी सुद्धा ग्रामसभांमधून चर्चेच्या माध्यमातून  गावांशी संबंधित निर्णय घेतले जात होते.  ग्रीक राजदूत मेगास्थेनिस देखील भारतात अशी व्यवस्था पाहून खूप  आश्चर्यचकीत झाले.  भारतातील विविध राज्यांमधील या व्यवस्थेवर त्यांनी सविस्तर लिहिले आहे.  तुम्हाला हे जाणून देखील आश्चर्य वाटेल की आपल्याकडे तामिळनाडूमध्ये 9 व्या शतकातील दगडी शिलालेख आहे.  त्यात ग्राम विधानसभेचे नियम आणि संहितेचा उल्लेख आहे. आणि आपल्याला हे जाणून देखील गंमत वाटेल की, कोणत्या सदस्याला कोणत्या कारणास्तव, कोणत्या परिस्थितीत अपात्र ठरवले जाऊ शकते, हे देखील त्या 1200 वर्षे जुन्या शिलालेखावर लिहिले आहे. हे  मी बाराशे वर्षांपूर्वीचे बोलतोय.  मला तुम्हाला अनुभव मंटपाबद्दलही सांगायचे आहे.  मॅग्ना कार्टापूर्वीही आपल्याकडे १२व्या शतकात “अनुभव मंटप” ची परंपरा होती.  यामध्ये वादविवाद आणि चर्चेलाही प्रोत्साहन देण्यात आले.  प्रत्येक वर्गातील, प्रत्येक जातीचे, प्रत्येक समाजाचे लोक "अनुभव मंटप" मध्ये आपले विचार मांडण्यासाठी येत असत.  जगतगुरु बसवेश्वरांची ही देणगी आजही भारताला अभिमानास्पद आहे, भारताचा मान  वाढवणारी आहे.  ५ हजार वर्षे जुन्या वेदांपासून आजपर्यंतचा हा प्रवास, संसदीय परंपरांचा हा विकास, केवळ आपलाच वारसा नाही तर संपूर्ण जगाचा वारसा आहे.

 

मित्रहो,

भारताच्या संसदीय प्रक्रियांमध्ये कालानुरुप सातत्याने सुधारणा होत आहेत आणि त्या अधिक शक्तिशाली झाल्या आहेत.  भारतात आपण सार्वत्रिक निवडणुका म्हणजे  सर्वात मोठा सोहळाच मानतो.  1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून, भारतात 17 सार्वत्रिक निवडणुका आणि 300 हून अधिक राज्य विधानसभांच्या निवडणुका झाल्या आहेत.  भारत केवळ जगातील सर्वात मोठी निवडणुक प्रक्रियाच राबवत नाही, तर या प्रक्रीयेत लोकांचा सहभागही सातत्याने वाढतच चालला आहे.  2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशवासीयांनी माझ्या पक्षाला सलग दुसऱ्यांदा विजयी केले. 2019 ची सार्वत्रिक निवडणूक ही मानवी इतिहासातील सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया राबवण्याचा प्रयोग होता.  यामध्ये 60 कोटी म्हणजेच 600 दशलक्षांहून (मिलियन) जास्त मतदारांनी सहभाग घेतला. तुम्ही कल्पना करा, त्यावेळी भारतात 91 कोटी म्हणजेच 910 दशलक्ष नोंदणीकृत मतदार होते.  हा आकडा संपूर्ण युरोपच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.  भारतातील एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी सुमारे 70 टक्के मतदान हे दर्शवते की लोकांचा भारतातील संसदीय पद्धतींवर किती विश्वास आहे!  आणि यातही महिलांचा जास्तीत जास्त सहभाग हा देखील महत्त्वाचा घटक होता.  2019 च्या निवडणुकीत भारतीय महिलांनी विक्रमी संख्येने मतदान केले.  आणि मित्रांनो, केवळ आकडेवारीच्या आधारावरच नाही तर राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीतही भारताच्या निवडणुकांसारखे उदाहरण आपल्याला जगात सापडणार नाही.  2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 600 हून अधिक राजकीय पक्षांनी भाग घेतला.  या निवडणुकांमध्ये 1 कोटी म्हणजेच 10 दशलक्षांहून जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी निवडणुकीची कामे केली.  निवडणुकीसाठी देशात 1 दशलक्ष म्हणजेच 10 लाखांहून अधिक मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती.

मित्रांनो

कालानुरुप, भारताने निवडणूक प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाचीसुद्धा जोड दिली आहे.  भारत सुमारे 25 वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र- ई व्ही एम चा उपयोग करत आहे.  ईव्हीएमच्या वापरामुळे आपल्या कडे निवडणुकीतील पारदर्शकता आणि निवडणूक प्रक्रियेतील कार्यक्षमता या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे.  भारतात, मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांतच निवडणुकीचे निकाल बाहेर येतात.

 

आता मी तुम्हाला आणखी एक आकडा देत आहे. तो ऐकून आपण पण आश्चर्यचकित व्हाल. आपल्याला माहीत आहे, की पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भारतात सर्वसाधारण निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत, 100 कोटी मतदार म्हणजे एक अब्ज लोक मतदान करणार आहेत. मी पी-20 शिखर परिषदेसाठी आलेल्या आपल्या सर्व प्रतिनिधींना ह्या सर्वसाधारण निवडणुका बघण्यासाठी निमंत्रण देतो. भारतात आपले पुन्हा एकदा स्वागत करतांना आम्हाला अत्यंत आनंद होईल.

मित्रांनो,

काही दिवसांपूर्वी, भारताच्या संसदेने एक मोठा निर्णय घेतला आहे, तो निर्णय मी आपल्याला सांगू शकतो. भारताने आपल्या संसदेत आणि राज्य विधानसभेत महिलांना 33 टक्के निरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमधे सुमारे 32 लाख म्हणजे 3 दक्षलक्ष पेक्षा अधिक निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. यापैकी सुमारे 50 टक्के महिला प्रतिनिधी आहेत. भारतात, आज प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जात आहे. आमच्या संसदेने घेतलेला हा निर्णय, आपल्या संसदीय परंपरेला अधिक समृद्ध करणार आहे.

मित्रांनो,

भारताच्या संसदीय परंपरांवर, देशबांधवांचा एक अतूट विश्वास आणि एक मोठे कारण आहे. ते जाणून आणि समजून घेणे, आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ही शक्ती आहे, आपली विविधता, आपली भव्यता आपल्या विविधतेतील चैतन्य. आपल्या देशात प्रत्येक श्रद्धा असलेले लोक आहेत, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, अनेक प्रकारच्या राहणीमानाच्या पद्धती आहेत. भारतात शेकडो भाषा बोलल्या जातात,शेकडो बोली बोलल्या जातात. लोकांपर्यंत मिनटा मिनटाला सूचना आणि माहिती पोहचवण्यासाठी 28 भाषांमधील 900 पेक्षा अधिक टीव्ही वाहिन्या भारतात आहेत. आणि 24x7 आहेत.

 

सुमारे, 200 भाषांमधे आमच्याकडे 33 हजार पेक्षा अधिकाधिक पेक्षा वर्तमानपत्रे प्रकाशित होतात. आमच्याकडे सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुमारे 3 अब्ज वापरकर्ते आहेत. यावरून आपल्याला असे जाणवते, की भारतात माहितीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची पातळी केवढी  उंच आहे, सशक्त आहे. एकविसाव्या शतकातल्या या जगात, भारतातील हे चैतन्य, विविधतेतील एकता, आपली खूप मोठी शक्ती आहे. हे चैतन्यच आपल्याला प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची, प्रत्येक अडचणीतून एकत्रित येऊन तोडगा काढण्याची प्रेरणा देते.

मित्रांनो,

जगातील वेगवेगळ्या कोपऱ्यात जे घडत आहे, त्यापासून आज कोणीच अलिप्त राहू शकत नाही. संघर्ष आणि वादविवाद या संकटांचा आज सगळे जग सामना करत आहे. संकटानी भरलेले हे जग कोणाच्याच हिताचे नाही. मानवतेसमोर जी आव्हाने आहेत, त्यावर एक खंडित, विभागलेले जग उपाय शोधू शकत नाही. हा शांतता आणि बंधूभावाचा काळ आहे. एकत्रित वाटचाल करण्याचा काळ आहे. हा सर्वांचा विकास आणि कल्याण करण्याचा काळ आहे. आपल्याला जागतिक विश्वास निर्माण करून, ही संकटे दूर करावी लागणार आहे, आणि मानवकेंद्री विचारांवर पुढे जावे लागणार आहे. आपल्याला जगाला, एक देश, एक कुटुंब, एक भविष्य या भावनेतून बघावे लागेल. जगाशी संबंधित निर्णय घेण्यात, सर्वांचा जितका जास्त सहभाग असेल, तितका त्याचा अधिकाधिक प्रभाव पडेल. आणि याच भावनेने, भारताने आफ्रिकन महासंघाला G-20 चे स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव मांडला आणि मला अत्यंत आनंद आहे, की सर्व देशांनी तो प्रस्ताव मान्य केला. या मंचावर देखील, सकल आफ्रिकन संसदेचे प्रतिनिधी सहभागी झाल्याचे बघून मला आनंद झाला आहे.

 

मित्रांनो,

मला सांगण्यात आलं आहे, की आपले सभापती ओम बिर्लाजी, तुम्हाला आज संध्याकाळी संसद भवनात सुद्धा घेऊन जाणार आहेत. तिथे तुम्ही पूज्य महात्मा गांधींना श्रद्धांजली देखील देणार आहात. तुम्हाला माहित आहे भारत अनेक दशकांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करतो आहे. दहशतवाद्यांनी हजारो निर्दोष भारतीयांचे जीव घेतले आहेत. संसदेच्या नव्या इमारतीजवळच तुम्हाला भारताची जुनी संसद सुद्धा दिसेल. जवळपास 20 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी आपल्या संसदेवर हल्ला केला होता. आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्या वेळी संसदेचं अधिवेशन सुरु होतं. दहशतवाद्यांनी खासदारांना ओलीस ठेवण्याची, त्यांना जीवे मारण्याची तयारी केली होती. भारत अशा अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत देत आज इथपर्यंत पोचला आहे. आता जगाला देखील जाणीव होत आहे, की दहशतवाद जगासाठी किती मोठी समस्या आहे, किती मोठं आव्हान आहे. दहशतवाद भलेही कुठेही झाला, कुठल्याही कारणानी झाला असेल, कुठल्याही रुपात होत असेल, पण तो मानवतेच्या विरोधातच असतो. अशा परिस्थितीत आपणा सर्वांना दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घ्यावी लागेल. खरं म्हणजे यावर आणखी एक जागतिक भूमिका आहे, ज्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. दहशतवादाच्या व्याख्येविषयी एकवाक्यता बनू शकली नाही हे अतिशय दुःखद आहे. भारत आजही संयुक्त राष्ट्रात दहशतवाद विरोधी लढाईसाठी आंतरराष्ट्रीय संमेलन आणि सहमतीसाठी बघत आहे. जगाच्या या भूमिकेचा फायदा मानवतेचे शत्रू घेत आहेत. जगभरातील संसदांना आणि प्रतिनिधींना हा विचार करावा लागेल की दहशतवादाविरुद्ध या लढाईत आपण एकत्र येऊन कसं काम करू शकतो.

मित्रांनो,

जगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी लोक सहभागा पेक्षा चांगलं माध्यम असूच शकत नाही. मी नेहमीच असे मानत आलो आहे, की सरकारं बहुमातानी बनतात, पण देश सहमतीने चालवले जातात. आपल्या संसदा आणि हे P20 फोरम देखील या भावनेला बळ देऊ शकतात. वादविवाद आणि चर्चा यांच्या माध्यमातून जग अधिक चांगले बनविण्याच्या आपल्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल. मला विश्वास आहे, भारतात आपल प्रवास सुखाचा होईल. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना या शिखर परिषदेच्या यशासाठी आणि भारतात आपल्या सुखद प्रवासासाठी शुभेच्छा देतो.

खूप – खूप धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi