"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्‍ये भारताच्या आदिवासी वारशाचे भव्य चित्र आदि महोत्सवात सादर होत आहे"
‘सबका साथ सबका विकास’हा मंत्र जपत भारत 21 व्या शतकामध्‍ये वाटचाल करत आहे.
"आदिवासी समाजाचे कल्याण हा माझ्यासाठी वैयक्तिक नातेसंबंध आणि भावनांचा विषय आहे"
"आदिवासी परंपरा मी जवळून पाहिल्या आहेत, त्या जगल्या आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे"
"आदिवासी गौरवाबाबत अभूतपूर्व अभिमान बाळगूनच देशाची वाटचाल सुरू आहे"
“देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असो, आदिवासी मुलांच्या शिक्षणाला माझे प्राधान्य”
“सरकार वंचितांच्या विकासाला प्राधान्य देत असल्याने देश नव्या उंचीवर जात आहे”

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अर्जुन मुंडा जी, फग्गन सिंह कुलस्ते जी,  रेणुका सिंह जी, डॉक्टर भारती पवार जी, बिशेश्वर टुडू जी, इतर मान्यवर आणि देशाच्या विविध राज्यातून आलेले माझे सगळे आदिवासी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आदि महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आदि महोत्सव देशाच्या आदिवासी वारशाची भव्य प्रस्तुती करत आहे. आता मला या आदिवासी परंपरेची गौरवशाली झलक बघण्याची संधी मिळाली. वेगवेगळे रस, विविध रंग! इतके सुंदर पोशाख आणि इतक्या गौरवास्पद परंपरा ! विविध प्रकारच्या चवी, अनेक प्रकारचे संगीत, असं वाटत होतं जणू काही भारताची विविधता, त्याची भव्यता, खांद्याला खांदा लावून एकत्र उभी आहे.

हे भारताच्या त्या अनंत आकाशासारखे आहे, ज्यात त्याच्या विविधता इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे खुलून वर आली आहे. आणि इंद्रधनुष्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.हे सगळे रंग जेव्हा एकमेकांत मिसळतात, तेव्हा त्यांचा एक प्रकाशपुंज तयार होतो, हा पुंज जगाला एक दृष्टी देतो, आणि एक दिशाही देतो. ह्या अनंत विविधता जेव्हा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ च्या सूत्रात एकत्र गोवल्या जातात,तेव्हा भारताचे भव्य स्वरूप जगासमोर येते. तेव्हा भारत आपल्या सांस्कृतिक प्रकाशाने जगाला मार्गदर्शन करतो.

हा आदि महोत्सव 'विविधतेतील एकता' आपल्या याच सामर्थ्याला नव्या उंचीवर नेत आहे. हा महोत्सव ' विकास आणि वारसा' ह्या विचाराला आणखी अधिक जिवंत करत आहे. मी माझ्या आदिवासी बंधू - भगिनींना आणि आदिवासी हितासाठी काम करणाऱ्या संस्थांना ह्या महोत्सवाच्या आयोजनासाठी शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकातील भारत,' सबका साथ, सबका विकास ' या मंत्रावर चालतो आहे. ज्याला आधी अतिशय दूरवरचं मानलं जात होतं, त्या दिल्लीचे सरकार आता स्वतः चालत त्यांच्याजवळ येत आहे. आणि जो स्वतःला आधी दूरवरचा, बाह्य प्रवाहातला समजत होता, त्याला आता सरकारने मुख्य प्रवाहात आणले आहे. गेल्या आठ - नऊ वर्षात आदिवासी समाजाशी संबंधित आदि महोत्सवासारखे कित्येक कार्यक्रम देशासाठी एक अभियान म्हणूनच साजरे केले गेले. अशा कित्येक कार्यक्रमात मी स्वतः देखील सहभागी झालो आहे. याचे कारण, आदिवासी समाजाचे हित, माझ्यासाठी व्यक्तिगत नाते आणि भावनांचा विषय आहे. जेव्हा मी राजकीय जीवनात कार्यरत नव्हतो, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, त्यावेळी मला अनेक राज्यांमध्ये, आणि त्यातही आमच्या आदिवासी समुदायाच्या लोकांमध्ये जाण्याच्या अनेक संधी मिळत असत.

मी देशाच्या कानाकोपऱ्यात आदिवासी समाजासोबत, आदिवासी कुटुंबांसोबत कित्येक आठवडे व्यतीत केले आहेत. मी आपल्या परंपरा तुमच्यामध्ये राहून अत्यंत जवळून फक्त पाहिल्या आहेत, असे नव्हे, तर त्या जगलो आहे. आणि त्यांच्यातून खूप काही शिकलोही आहे. गुजरात मध्ये देखील उमरगामपासून अंबाजीपर्यंत गुजरातच्या संपूर्ण पूर्व पट्टयात, त्या आदिवासी पट्टयात माझ्या आयुष्यातील अतिशय महत्वाची वर्षे माझ्या आदिवासी बंधू भगिनींच्या  सेवेत घालवण्याचे भाग्य मला मिळाले होते. आदिवासींच्या जीवनशैलीने मला देशाविषयी, आपल्या परंपरा आणि वारशाविषयी खूप काही शिकवले आहे. म्हणूनच, जेव्हा मी तुमच्यामध्ये येतो, तेव्हा मला एका वेगळ्याच आपलेपणाचा अनुभव येतो. आपल्यामध्ये येऊन, आपल्या माणसात आल्याची जाणीव होते.

मित्रांनो,

आदिवासी समाजाला सोबत घेऊन आज देश ज्या अभिमानाने पुढे जातो आहे, असं आधी कधीच झालं नाही. मी जेव्हा परदेशी राष्ट्र प्रमुखांना भेटतो, आणि त्यांना भेटवस्तू देतो, तेव्हा माझा प्रयत्न असतो की त्यात काही ना काही तरी माझ्या आदिवासी बंधू भगिनींनी बनविलेल्या भेटवस्तू असल्या पाहिजेत.

आज भारत पूर्ण जगात मोठ मोठ्या मंचावर जातो तेव्हा आदिवासी परंपरा आपला वारसा म्हणून जगासमोर प्रस्तुत करतो. आज भारत जगाला सांगत आहे की,  हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, अशी जी जागतिक आव्हाने आहेत, जर त्यावर उत्तर हवं असेल तर, या, माझ्या आदिवासी परंपरेतली जीवनशैली बघा, तुम्हाला मार्ग सापडेल. आज जेव्हा शाश्वत विकासाची चर्चा होते, तेव्हा आपण अभिमानाने सांगू शकतो, आम्ही कशा प्रकारे जगाला आपल्या आदिवासी समजाकडून खूप काही शिकायची गरज आहे. आपण कशा प्रकारे वृक्षांशी, जंगलांशी, नद्यांशी, डोंगरांशी आपल्या पिढ्यांचे नाते निर्माण करू शकतो, आपण कशा प्रकारे नैसर्गिक स्रोतांचा वापर करूनही त्यांचे संरक्षण करू शकतो, त्यांचे संवर्धन करू शकतो, याची प्रेरणा आपले आदिवासी बंधू भगिनी सातत्याने आपल्याला देत असतात आणि हीच गोष्ट आज भारत संपूर्ण जगाला सांगत आहे.

मित्रांनो,

आज भारताच्या पारंपरिक आणि विशेषतः आदिवासी समाज तयार करत असलेल्या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे. आज ईशान्येची उत्पादने परदेशात देखील निर्यात होत आहेत. आज बांबू पासून तयार केलेली उत्पादने वेगाने लोकप्रिय होत आहेत. आपल्याला आठवत असेल, आधीच्या सरकारांच्या काळात बांबू तोडण्यावर आणि त्याचा उपयोग करण्यावर कायद्याने बंदी होती. आम्ही बांबूला गवताच्या श्रेणीत आणलं आणि त्याच्यावर जे काही निर्बंध होते, ते आम्ही काढून टाकले. यामुळे बांबू उत्पादने आता एक मोठा उद्योग खाली आहेत. आदिवासी उत्पादने जास्तीत जास्त बाजारपेठांमध्ये जावी, यांना ओळख मिळावी, त्यांची मागणी वाढावी, या दिशेने सरकार सातत्याने काम करत आहे.

वनधन मिशनचे उदाहरण आपल्यासमोर आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांत 3 हजारांपेक्षा जास्त वनधन विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. 2014 पूर्वी असे खूप कमी लघु वन उत्पादने होती, जी हमी भावाच्या कक्षेत येत होती. आता ही संख्या वाढून 7 पट झाली आहे. आता अशी जवळपास 90 लघु वन उत्पादने आहेत, ज्यांना सरकार किमान हमी भाव देत आहे. 50 हजार पेक्षा जास्त वनधन बचत गटांच्या माध्यमातून लाखो आदिवासी लोकांना याचा लाभ होत आहे. देशात जे बचत गटांचे एक फार मोठे जाळे तयार होत आहे, त्याचा देखील लाभ आदिवासी समाजाला झाला आहे. 80 लाख पेक्षा जास्त बचत गट, या वेळी वेगवेगळ्या राज्यांत कार्यरत आहेत. या बचत गटांत सव्वा कोटी पेक्षा जास्त आदिवासी सदस्य आहेत, त्यातही आमच्या माता भगिनी आहेत. याचा देखील मोठा लाभ आदिवासी महिलांना मिळत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आज सरकार आदिवासी कलेला प्रोत्साहन देण्यावर, आदिवासी युवकांच्या कौशल्य विकासावर देखील भर देत आहे. या वेळच्या अर्थसंकल्पात पारंपरिक कारागिरांसाठी पीएम - विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. पीएम-विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत दिली जाईल, कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल, तुमच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मदत केली जाईल. याचा खूप मोठा फायदा आपल्या तरुण पिढीला होणार आहे. आणि मित्रांनो, हा प्रयत्न केवळ काही क्षेत्रांपुरताच मर्यादित नाही. आपल्या देशात शेकडो आदिवासी समुदाय आहेत. त्यांच्या अनेक परंपरा आणि कला अशा आहेत, ज्यात अपरिमित संधी लपलेल्या आहेत. म्हणून देशात नवीन आदिवासी संशोधन केंद्रे देखील सुरू केली जात आहेत. या प्रयत्नांनी आदिवासी तरुणांसाठी त्यांच्याच भागांत नव्या संधी निर्माण होत आहेत.

मित्रांनो,

जेव्हा मी 20 वर्षांपूर्वी गुजरातचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. तिथे आदिवासी क्षेत्रांत ज्या कुठल्या शाळा होत्या, इतका मोठा आदिवासी समुदाय होता, मात्र आधीच्या सरकारांची आदिवासी क्षेत्रात विज्ञान शाखेच्या शाळा सुरू करणे ही प्राथमिकता नव्हती.

आता जरा विचार करा, जर आदिवासी मुलांनी  विज्ञान हा विषय शिकलाच नाही, तर डॉक्टर-अभियंता कसं बनणार? त्या पूर्ण भागात आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये विज्ञान शिक्षणाची तरतूद उपलब्ध करुन देऊन, या आव्हानांवर आम्ही मात केली. आदिवासी मुलं, मग ती देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील असोत, त्यांचं शिक्षण, त्यांचं भवितव्य, माझा प्राधान्यक्रम आहे.

आज देशातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या संख्येत पाचपट वाढ झाली आहे. 2004 ते 2014 दरम्यान 10 वर्षांत फक्त 90 एकलव्य मॉडेल निवासी शाळा उघडण्यात आल्या होत्या. मात्र, 2014 ते 2022 या  8 वर्षांत 500 हून जास्त एकलव्य शाळांना मान्यता देण्यात आली आहे. सध्या यापैकी 400 हून जास्त शाळांमध्ये वर्ग आणि अभ्यास सुरु सुद्धा झाले आहेत. 1 लाखांहून जास्त आदिवासी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी या शाळांमधून शिक्षण घ्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात, अशा शाळांमध्ये सुमारे 40 हजारांहून जास्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भर्ती करणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. आदिवासी मुला मुलींना मिळणाऱ्या छात्रवृत्तीतही दुपटीहून जास्त वाढ केली आहे. याचा लाभ,30 लाख विद्यार्थ्यांना मिळत आहे.

मित्रहो,

आदिवासी मुला-मुलींना भाषेच्या अडचणीमुळे खूप त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण घेता येण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आता आपली आदिवासी मुलं, तरुण तरुणी स्वतःच्या मातृभाषेतून शिकू शकतील, प्रगती साधू शकतील.

मित्रांनो,

देश जेव्हा तळागाळातील शेवटच्या व्यक्तीला प्राधान्य देतो, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रगतीची कवाडं  आपोआप उघडतात.  आमचं सरकार वंचितांना प्राधान्य याच मंत्रानं देशाच्या विकासाचे नवनवीन पैलू आजमावत आहे.  सरकार ज्या आकांक्षी जिल्हे आणि आकांक्षी भागांचा विकास करण्यासाठी मोहीम राबवत आहे, त्यापैकी बहुतांश  आदिवासीबहुल प्रदेश आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पात आदिवासी-अनुसूचित जमातींसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतुदी 2014 च्या तुलनेत पाचपट वाढवण्यात आली आहे.  आदिवासी भागात उत्तम आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.  आधुनिक संपर्क व्यवस्था वाढल्यामुळे पर्यटन आणि उत्पन्नाच्या संधीही वाढत आहेत.  एकेकाळी डाव्या अतिरेकी विचारसरणीनं  ग्रस्त असलेली देशातील हजारो गावं आता 4जी संपर्क यंत्रणेनं जोडली जात आहेत.  म्हणजेच जे तरुण आपापल्या भागातील दुर्गमतेमुळे जगापासून वेगळे पडत फुटीरतावादाच्या जाळ्यात अडकत होते, ते आता आंतरजाल (इंटरनेट) आणि पायाभूत सुविधांद्वारे मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत.  हा 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' (सर्वांचं सहकार्य, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचा प्रयत्न) या तत्वाचा  मुख्य प्रवाह आहे आणि तो अगदी दूरदूरवर देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत आहे. प्राचीन परंपरा आणि आधुनिकतेच्या संगमाची ही चाहूल आहे, आणि त्यावरच नव्या भारताची मजबूत इमारत उभी राहील.

मित्रहो,

गेल्या 8-9 वर्षातील आदिवासी समाजाची वाटचाल,  देश समता आणि समरसतेला कसं प्राधान्य देत आहे,  या होत असलेल्या बदलाची,  साक्षीदार आहे.  स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात पहिल्यांदाच देशाचं नेतृत्व एका आदिवासीच्या हातात आहे. प्रथमच एक आदिवासी महिला राष्ट्रपतींच्या रूपाने सर्वोच्च पदावर स्थानापन्न होत भारताचा गौरव वाढवत आहे.  देशात आज पहिल्यांदाच आदिवासी इतिहासाला एवढी ओळख मिळत आहे.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या आदिवासी समाजाचं किती मोठं योगदान आहे, त्यांनी किती मोठी भूमिका बजावली हे आपण सर्व जाणतो. मात्र, इतिहासाची ती सोनेरी पानं, वीर-वीरांगनांचं ते बलिदान झाकून ठेवण्याचा प्रयत्न अनेक दशकं सुरू राहिला.  आता अमृत महोत्सवात देशानं, भूतकाळातील त्या शौर्यगाथांवरील विस्मृतीची धूळ झटकून ते सर्व अध्याय देशासमोर उलगडण्याचा विडा उचलला आहे.

देशानं पहिल्यांदाच भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी आदिवासी गौरव दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागवणारी संग्रहालयं उघडली जात आहेत. गेल्या वर्षी मला झारखंड राज्यातील रांची इथं भगवान बिरसा मुंडा यांना वाहिलेल्या संग्रहालयाचं लोकार्पण करण्याची संधी मिळाली. देशात हे असं आता पहिल्यांदाच होत आहे, मात्र याचे परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्यांवर दिसून येतील. ही प्रेरणा देशाला युगानुयुगे दिशा दाखवत राहील.

मित्रांनो,

आपल्याला आपल्या भूतकाळाचा वारसा पुढे न्यायचा आहे, पराकोटीच्या कर्तव्यभावनेनं भविष्यासाठी पाहिलेली स्वप्नं साकार करून दाखवायची आहेत.  हा संकल्प पुढे नेण्यासाठी आदि महोत्सवासारखे कार्यक्रम हे एक सशक्त माध्यम आहे. आपल्याला ही एक मोहीम म्हणून पुढे न्यावी लागेल, लोकचळवळ  बनवावी लागेल.  असे कार्यक्रम वेगवेगळ्या राज्यांमध्ये अधिकाधिक प्रमाणात व्हायला हवेत.

मित्रहो,

या वर्षी, संपूर्ण जग भारतानं घेतलेल्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष देखील साजरं करत आहे.  मिलेट्स  म्हणजे ज्यांना आपण सामान्य भाषेत भरड धान्य  म्हणून ओळखतो, त्याच भरडधान्यांच्या पायावर  शतकानुशतकं आपलं आरोग्य सुरक्षित होतं.  आणि तो आपल्या आदिवासी बंधुभगिनींच्या आहाराचा प्रमुख भाग आहे.  आता भारतानं या भरडधान्याला, जे एक प्रकारचं सुपर फूड म्हणजे महाअन्न आहे, त्या महाअन्नाला श्रीअन्न हे नाव ही ओळख दिली आहे. उदाहरणार्थ श्रीअन्न बाजरी, श्रीअन्न ज्वारी, श्रीअन्न रागी, अशी अनेक नावं दिली आहेत.  येथील महोत्सवातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर सुद्धा स्वादिष्‍ट श्रीअन्नाचा येणारा सुगंधाचा  दरवळ आपल्याला घेता येत आहे.  आपल्याला आदिवासी भागातील श्रीअन्नाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करायचा आहे.

यामुळे लोकांना चांगलं आरोग्य तर लाभेलच सोबत आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. मला पूर्ण खात्री आहे की आपल्या याच प्रयत्नांमुळे आपण सर्वजण एकत्र मिळून विकसित भारताचं आपलं स्वप्न साकार करू. सरकारनं आज दिल्लीत एवढा भव्य महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात देशभरातील आपल्या आदिवासी बंधू-भगिनींनी अनेक वैविध्यपूर्ण वस्तू बनवून  आणल्या आहेत. विशेष करुन शेतामध्ये पिकवलेली उत्तमोत्तम उत्पादनं त्यांनी इथे आणली आहेत.मी दिल्लीकरांना, हरयाणा जवळील गुरुग्राम वगैरेच्या परिसरातील लोकांना, उत्तर प्रदेशच्या नोएडा गाजियाबादच्या लोकांना आज इथून जाहीर रित्या आग्रह करतोय,  दिल्लीकरांनाही जरा विशेष आग्रह करतोय की आपण खूप मोठ्या संख्येनं या महोत्सवाला भेट द्या. आणखी काही दिवस हा मेळावा सुरू राहणार आहे. आपण बघा, देशात दुर्गम भागातल्या वनराई मध्ये देखील कसे देशातील वेगवेगळ्या तऱ्हेचे गुणी लोक देशाचं भविष्य घडवत आहेत.

जे लोक आरोग्याविषयी जागरूक आहेत, जे आहारातील प्रत्येक पदार्थाची आहारविषयक रितीभातींची अत्यंत काळजी घेतात, विशेषत: अशा माता-भगिनींना माझी विनंती आहे की आपण इथे या आणि आपली वनोत्पादनं शारीरिक पोषणासाठी किती समृद्ध आहेत ते पहा.  तुम्हाला हे पटेल आणि भविष्यात तुम्हीसुद्धा इथेच सतत मागणी नोंदवाल  आता इथे जशी ईशान्येकडून आलेली हळद आहे, विशेषत: आपल्या मेघालयातून.  तिच्यात जी पोषण मुल्यं आहेत, तशाप्रकारची हळद कदाचित जगात कुठेही नाही.  आता जेव्हा आपण ही हळद घेतो तेव्हा आपल्याला कळतं की होय, आपण आपल्या स्वयंपाकघरात आता हीच हळद वापरणार आहोत.  आणि म्हणूनच मी खास दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील इथल्या परिसरात राहणाऱ्या लोकांना, त्यांनी इथे यावे अशी विनंती करतो आणि माझी तर अशी इच्छा आहे की माझ्या आदिवासी बंधू-भगिनींनी इथे विक्रीसाठी आणलेल्या मालापैकी एकही गोष्ट त्यांना परत न्यावी लागणार नाही याची चोख काळजी दिल्लीकरांनी घ्यावी. त्यांचा सर्व माल इथे विकला गेला पाहिजे.  त्यांना एक नवी उमेद मिळेल आणि आपल्याला एक आत्मिक समाधान लाभेल.

चला, आपण सर्वजण मिळून हा आदि महोत्सव चिरस्मरणीय बनवूया, अविस्मरणीय बनवूया, यशस्वी करूया. आपणा सर्वांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

खूप खूप धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"