ओदिशाचे राज्यपाल रघुवर दासजी, मुख्यमंत्री आणि माझे मित्र नवीन पटनायकजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, विश्वेश्वर तुडु, संसदेतील माझे सहकारी नितेश गंगा देवजी, आयआयएम संबलपुर संस्थेचे संचालक प्राध्यापक महादेव जयस्वाल, इतर माननीय आणि सभ्य स्त्री-पुरुषहो!
आज ओदिशाच्या विकासयात्रेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्चाच्या या विकास प्रकल्पांबद्दल मी ओदिशाच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन करतो. शिक्षण, रेल्वे, रस्ते, वीज, पेट्रोलियम या क्षेत्रांशी संबंधित अनेक प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांचा लाभ ओदिशा राज्यातील गरीब, श्रमिक, कर्मचारी, दुकानदार, व्यापारी, शेतकरी यांना म्हणजेच समाजाच्या प्रत्येक वर्गातील लोकांना होणार आहे. हे उपक्रम, ओदिशा राज्यात सोयीसुविधा निर्माण करण्यासोबतच येथील तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधी देखील घेऊन येणार आहेत.
मित्रांनो,
भारताचे महान सुपुत्र, माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न देण्याचा निर्णय देखील आज देशाने घेतला आहे. भारताचे उप-पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून आणि त्याचबरोबर अनेक दशके एक निष्ठावान, जागरूक संसद सदस्य म्हणून माननीय अडवाणी यांनी जी देशसेवा केली आहे त्याला तोड नाही. अडवाणी यांचा हा गौरव म्हणजे देशाच्या सेवेसाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्यांना देश कधीच विसरत नाही या गोष्टीचे प्रतिक आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे प्रेम आणि त्यांचे मार्गदर्शन मला सतत मिळत राहिले हे मी माझे भाग्यच समजतो. मी आदरणीय अडवाणीजी यांच्या दीर्घायुष्याची कामना करतो आणि ओदिशाच्या या महान भूमीवरून समस्त देशवासियांतर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आम्ही ओदिशाला शिक्षणाचे, कौशल्य विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा सतत प्रयत्न केला आहे. गेल्या दशकात ओदिशामध्ये ज्या आधुनिक संस्था सुरु झाल्या आहेत, शिक्षण संस्था उभारण्यात आल्या आहेत त्या संस्था ओदिशामधील तरुणांचे नशीब बदलून टाकत आहेत. आयसर ब्रह्मपूर असो अथवा भुवनेश्वर येथील इन्स्टिटयुट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी अशा अनेक शिक्षणसंस्था येथे स्थापन झाल्या आहेत. आता आयआयएम संबलपुर देखील व्यवस्थापन शास्त्र शिकवणाऱ्या आधुनिक संस्थेच्या रुपात ओदिशाच्या भूमिकेला आणखीन मजबूत करत आहे. मला आठवत आहे, 3 वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात या आयआयएमचा कोनशीला समारंभ करण्याची संधी मला मिळाली आहे. अनेक अडचणी येऊनदेखील आता या संस्थेचा देखणा परिसर उभा राहिला आहे.आणि तुम्हा सर्वांचा जो उत्साह मी बघतो आहे ना, तर त्यामुळे हा परिसर तुम्हाला किती आवडला आहे हे मला दिसते आहे. या संस्थेच्या उभारणीशी जोडल्या गेलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मी कौतुक करतो.
मित्रांनो,
जेव्हा भारतातील प्रत्येक राज्य विकसित होईल तेव्हाच आपण विकसित भारताचे लक्ष्य साध्य करू शकू. म्हणूनच, गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही ओदिशाला प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक पाठींबा देत आहोत. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ओदिशा आज पेट्रोलियम आणि पेट्रो-केमिकल क्षेत्रात देखील नवी उंची गाठत आहे.गेल्या दशकभरात ओदिशा राज्यात पेट्रोलियम आणि पेट्रो-केमिकल या क्षेत्रांमध्ये सव्वा लाख कोटी रुपयांहून अधिक निधीची गुंतवणूक करण्यात आली आहे. पूर्वीच्या काळाच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांमध्ये रेल्वेच्या विकासासाठी ओदिशा राज्याला अर्थसंकल्पात12 पट अधिक तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेमधून गेल्या 10 वर्षांमध्ये ओदिशाच्या गावांमध्ये सुमारे 50 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. राज्यात 4 हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या नव्या राष्ट्रीय महामार्गांची उभारणी करण्यात आली आहे. आजही येथे राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित 3 मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे झारखंड आणि ओदिशा या राज्यांच्या दरम्यान दळणवळण अधिक सुलभ होईल तसेच या प्रवासाचा वेळ देखील कमी होईल. हा भाग खनिकर्म, वीजनिर्मिती तसेच पोलाद उद्योगांच्या शक्यतांसाठी प्रसिद्ध आहे. या नव्या संपर्क सुविधेमुळे या संपूर्ण भागात नवे उद्योग सुरु करण्याच्या शक्यता निर्माण होतील, रोजगाराच्या हजारो नव्या संधी निर्माण होतील. आज संबलपुर-तालचेर टप्प्यातील रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण, झार-तरभा पासून सोनपूर पर्यंतच्या नव्या रेल्वे मार्गाचा शुभारंभ होत आहे. पुरी-सोनपूर एक्स्प्रेसमुळे सुबर्नपूर जिल्हा म्हणजेच आपला सोनपूर जिल्हा आज रेल्वे सेवेशी जोडला जात आहे. यामुळे भाविकांसाठी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेणे आणखीनच सोपे होणार आहे. ओदिशामधील प्रत्येक कुटुंबाला पुरेशा प्रमाणात आणि किफायतशीर दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही अखंडितपणे प्रयत्न करत आहोत. आज येथे ज्या सुपर क्रिटीकल आणि अल्ट्रा सुपर क्रिटीकल औष्णिक उर्जा प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे त्यांचे देखील हेच उद्दिष्ट आहे.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्र सरकारने जी धोरणे तयार केली आहेत त्यांचा ओदिशा राज्याला मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. आम्ही खनिकर्म क्षेत्रात ज्या सुधारणा केल्या आहेत त्यांचा सर्वात मोठा लाभार्थी ओदिशा आहे. खनिकर्म धोरणात बदल घडून आल्यानंतर ओदिशा राज्याच्या महसुलात 10 पट वाढ झाली आहे. पूर्वीच्या काळात ज्या राज्यामध्ये खनन होत असे त्या भागाला किंवा त्या राज्याला खनिज उत्पादनापासून म्हणावा तितका फायदा मिळू शकत नसे. आम्ही या नीतीमध्ये देखील बदल केला.केंद्रातील भाजपा सरकारने जिल्हा खनिज फाउंडेशनची स्थापना केली. त्याद्वारे खनिज उत्पादनातून झालेल्या लाभाचा एक भाग त्याच क्षेत्राच्या विकासासाठी खर्च केला जाईल याची सुनिश्चिती करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून देखील ओदिशा राज्याला आतापर्यंत जवळजवळ 25 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी मिळाला आहे. ज्या भागात खनन होत आहे तेथील लोकांच्या कल्याणासाठी हा पैसा खर्च केला जात आहे. मी ओदिशाच्या जनतेला हा शब्द देतो की केंद्र सरकार अशाच समर्पित भावनेसह ओदिशाच्या विकासासाठी यापुढेही काम करत राहील.
मित्रांनो,
मला येथून एका फार मोठ्या कार्यक्रमासाठी जायचे आहे, तो कार्यक्रम मोकळ्या मैदानात आहे तेव्हा तेथे वातावरण वेगळेच असेल. त्यामुळे मी येथे तुमचा फार वेळ घेत नाही. मात्र त्या कार्यक्रमात मी बराच वेळ घेऊन सविस्तर बोलणार आहे. 15 मिनिटांनंतर त्या कार्यक्रमात मी पोहोचेन. विकास कार्यांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि माझ्या तरुण मित्रांचे विशेष अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद !