तुमकुरु जिल्ले, गुब्बी तालुकिना, निट्टूर नगरदा, आत्मीय नागरीक-अ बंधु, भगि-नियरे, निमगेल्ला, नन्ना नमस्कार गडु!
कर्नाटक ही संत, ऋषी-मुनींची भूमी आहे. कर्नाटकने आध्यात्म, ज्ञान आणि विज्ञानाची महान भारतीय परंपरा नेहमीच बळकट केली आहे. यातही तुमकुरुचे विशेष महत्त्व आहे. सिद्धगंगा मठाची यात खूप मोठी भूमिका आहे. पूज्य शिवकुमार स्वामी जी यांनी घालून दिलेला ‘त्रिविधा दसोही’ म्हणजेच "अन्न" ,"अक्षर" आणि "आश्रय " यांचा वारसा आज सिद्धलिंग महास्वामी जी पुढे नेत आहेत. मी आदरणीय संतांना नमन करतो. गुब्बी स्थित श्री चिदम्बर आश्रम आणि भगवान चन्नबसवेश्वर यांनाही मी वंदन करतो !
बंधू आणि भगिनींनो,
संतांच्या आशीर्वादाने आज कर्नाटकातील तरुणांना रोजगार देणाऱ्या , ग्रामस्थ आणि महिलांना सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या , देशाचे सैन्य आणि मेड इन इंडियाला बळ देणाऱ्या शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. आज तुमकुरूला देशातला खूप मोठा हेलिकॉप्टर कारखाना मिळाला आहे. आज तुमकुरू औद्योगिक वसाहतीची पायाभरणीही झाली आणि याचबरोबर तुमकुरु जिल्ह्यातील शेकडो गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे कामही सुरू झाले आहे आणि त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रहो,
कर्नाटक युवा प्रतिभा , युवा नवोन्मेष यांची भूमी आहे. ड्रोन निर्मितीपासून तेजस लढाऊ विमाने बनवण्यापर्यंत, कर्नाटकच्या उत्पादन क्षेत्राची ताकद जग पाहत आहे. दुहेरी इंजिन सरकारने कर्नाटकला गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनवले आहे. दुहेरी इंजिन सरकार कसे काम करते , याचे उदाहरण आज ज्या हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण झाले , ते देखील आहे. वर्ष 2016 मध्ये आपल्या संरक्षणविषयक गरजांसाठी परकीय देशांवरील आपले अवलंबित्व कमी करायचे असा संकल्प करून त्याची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला लाभले होते. मला आनंद आहे की आज अशी शेकडो शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे भारतात तयार होत आहेत आणि आपल्या सैन्याकडून ती वापरली जात आहेत. आज आधुनिक असॉल्ट रायफल पासून रणगाडे, तोफ, नौदलासाठी विमानवाहू जहाजे, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, वाहतूक विमाने या सर्व गोष्टींची निर्मिती भारत स्वतः करत आहे. 2014 पूर्वीचा , हा आकडा लक्षात ठेवा,लक्षात ठेवाल ! 2014 पूर्वीच्या 15 वर्षांत एरोस्पेस क्षेत्रात जेवढी गुंतवणूक झाली , त्याच्या पाच पट गेल्या 8-9 वर्षांत झाली आहे. आज आपण आपल्या सैन्याला मेड इन इंडिया शस्त्रे देत आहोतच .शिवाय 2014 च्या तुलनेत आपली संरक्षण विषयक निर्यातही अनेक पटींनी वाढली आहे. आगामी काळात तुमकुरू येथे शेकडो हेलिकॉप्टर तयार होणार आहेत आणि यामुळे येथे सुमारे 4 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. जेव्हा असे उत्पादन कारखाने उभारले जातात तेव्हा आपल्या सैन्याची ताकद तर वाढतेच, शिवाय हजारो रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात. तुमकुरुच्या हेलिकॉप्टर कारखान्यामुळे इथे आसपासच्या अनेक छोटे -छोटे उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल.
मित्रहो,
जेव्हा राष्ट्र प्रथम भावनेने काम होते , तेव्हा यश नक्कीच मिळते. गेल्या 8 वर्षात एकीकडे आम्ही सरकारी कारखाने, सरकारी संरक्षण कंपन्यांच्या कामकाजात सुधारणा केली तर दुसरीकडे खाजगी क्षेत्रासाठीही दरवाजे उघडले. याचा किती लाभ झाला, ते आपण HAL- हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये पाहत आहोत. आणि आज मी काही वर्षांपूर्वीच्या गोष्टींची आठवण करून देऊ इच्छितो, माध्यमांचे लक्ष नक्कीच जाईल, हेच एचएएल आहे , ज्याचा वापर आमच्या सरकारवर विविध प्रकारचे खोटे आरोप करण्यासाठी निमित्त म्हणून केला गेला. हेच एचएएल आहे, ज्याचे नाव घेऊन लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले गेले, लोकांना भडकवले गेले. संसदेचे कित्येक तास वाया घालवले. मात्र माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो , खोटे किती का मोठे असेना , कितीही वेळा सांगितले, मोठ्या लोकांकडून सांगण्यात आले असले तरी एक ना एक दिवस ते सत्यासमोर हरतेच . आज एचएएलचा हा हेलिकॉप्टर कारखाना, एचएएलची वाढती शक्ती, अनेक जुन्या असत्य गोष्टी आणि खोटे आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडत आहे. सत्य स्वतः सांगत आहे. आज तेच एचएएल भारतीय सैन्यासाठी आधुनिक तेजस बनवत आहे, जगाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आज एचएएल संरक्षण क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेला बळ देत आहे.
मित्रहो,
आज इथे तुमकुरु औद्योगिक वसाहतीचे कामही सुरु झाले आहे. फूड पार्क ही हेलीकॉप्टर कारखान्यानंतर तुमकुरुला मिळालेली आणखी एक मोठी भेट आहे. जेव्हा ही नवीन औद्योगिक वसाहत उभी राहील , तेव्हा तुमकुरू कर्नाटकच नव्हे तर भारतातील एक मोठे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होईल. हा चेन्नई-बंगळुरू औद्योगिक मार्गिकेचा भाग आहे. सध्या चेन्नई-बंगळुरू, बंगळुरू-मुंबई आणि हैदराबाद-बंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरचे काम सुरू आहे. या सर्वांमध्ये कर्नाटकचा मोठा भाग येतो. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा अंतर्गत तुमकुरु औद्योगिक वसाहत बांधली जात असल्याचा मला आनंद आहे. मुंबई-चेन्नई महामार्ग, बंगळुरू विमानतळ, तुमकुरु रेल्वे स्थानक , मंगळुरु बंदर आणि गॅस कनेक्टिव्हिटी, अशा मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीशी ते जोडले जात आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगार निर्माण होणार आहे.
मित्रहो,
दुहेरी इंजिनच्या सरकारचे जेवढे लक्ष भौतिक पायाभूत सुविधांवर आहे, तेवढेच आम्ही सामाजिक पायाभूत सुविधांवरही भर देत आहोत. गेल्या काही वर्षांत आम्ही निवासक्के नीरू, भूमिगे नीरावरी म्हणजेच प्रत्येक घरात पाणी, प्रत्येक शेताला पाणी याला प्राधान्य दिले आहे. आज देशभरात पिण्याच्या पाण्याच्या जाळ्याचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जलजीवन मिशनच्या तरतुदीत 20 हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. जेव्हा प्रत्येक घरात पाणी पोहोचते, तेव्हा सर्वात जास्त लाभ गरीब महिला आणि लहान मुलींना होतो. त्यांना शुद्ध पाणी भरून आणण्यासाठी घरापासून दूर जावे लागत नाही. गेल्या साडेतीन वर्षांत देशातील नळाद्वारे पाण्याची व्याप्ती 3 कोटी ग्रामीण कुटुंबांवरून वाढून 11 कोटी कुटुंबांपर्यंत विस्तारली आहे. आमचे सरकार निवासक्के नीरु बरोबरच भूमिगे नीरावरी यावर भर देत आहे. अर्थसंकल्पात अप्पर भद्रा प्रकल्पासाठी सुमारे 5,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे तुमकुरु, चिकमगलुरू, चित्रदुर्ग आणि दावणगेरे सह मध्य कर्नाटकातील मोठ्या दुष्काळ-प्रवण भागाला याचा फायदा होणार आहे. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याची दुहेरी इंजिन सरकारची वचनबद्धता यावरून दिसून येते. शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर आणि सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या आपल्या छोट्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
मित्रहो,
यंदा गरीब , मध्यमवर्गाचे कल्याण केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची जगभरात चर्चा होत आहे. विकसित भारत घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, सर्वांनी सहभागी व्हावे, सर्वांनी कसे प्रयत्न करावेत यावर बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे.
भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल तेव्हा त्या सबल भारताचा पाया या वेळच्या अर्थसंकल्पात अधिक भक्कम करण्यात आला आहे.हा अर्थसंकल्प म्हणजे समर्थ भारत,संपन्न भारत, स्वयंपूर्ण भारत, शक्तिमान भारत, गतिमान भारताच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे.स्वातंत्र्याच्या अमृत काळात कर्तव्य पथावरून वाटचाल करताना विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी या अर्थसंकल्पाचे मोठे योगदान आहे. गाव,गरीब,शेतकरी,वंचित,आदिवासी,मध्यम वर्ग, महिला, युवा,ज्येष्ठ नागरिक,सर्वांसाठी या अर्थसंकल्पात मोठ – मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. हा लोकप्रिय अर्थसंकल्प आहे.सर्वांचे हित साधणारा अर्थसंकल्प आहे. सर्वस्पर्शी अर्थसंकल्प आहे. भारताच्या युवाशक्तीला रोजगाराच्या नव्या संधी देणारा अर्थसंकल्प आहे.भारताच्या नारीशक्तीची भागीदारी वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे.भारताचे कृषी क्षेत्र, गावांना आधुनिक करणारा हा अर्थ संकल्प आहे. श्री अन्न द्वारे छोट्या शेतकऱ्यांना जागतिक बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे.भारतात रोजगाराला चालना देणारा आणि स्व रोजगाराला बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही
‘अवश्यकते, आधारा मत्तु आदाया’ म्हणजे आपल्या गरजा,आपल्याला देण्यात येणारे सहाय्य आणि आपले उत्पन्न या बाबींकडे लक्ष पुरवण्यात आले आहे. कर्नाटकच्या प्रत्येक कुटुंबाला याचा लाभ होईल.
बंधू- भगिनीनो,
पूर्वी समाजातल्या ज्या वर्गाला सरकारी मदत मिळणे कठीण होते, अशा वर्गाच्या सबलीकरणासाठी 2014 नंतर सरकारचा प्रयत्न राहिला आहे. या वर्गापर्यंत सरकारी योजना एकतर पोहोचत नव्हत्या किंवा मध्यस्थ त्यांना लुबाडत होते.आपण पहा, पूर्वी जो वर्ग सरकारी सहाय्यापासून वंचित होता त्या वर्गापर्यंत आम्ही मागील वर्षांमध्ये सरकारी सहाय्य पोहोचवले आहे. आमच्या सरकारच्या काळात कार्मिक-श्रमिक अशा प्रत्येक वर्गाला प्रथमच पेन्शन आणि विमा सुविधा प्राप्त झाल्या आहेत. आमच्या सरकारने छोट्या शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी पीएम किसान सन्मान निधीचे बळ दिले आहे. फेरीवाले, फुटपाथवर काम करणारे, रस्त्यावरचे विक्रेते यांना आम्ही प्रथमच बँकाकडून हमीविना कर्ज दिले.या वर्षीच्या अर्थसंकल्पातही हीच भावना जोपासण्यात आली आहे. देशात प्रथमच आपल्या विश्वकर्मा बंधू-भगिनींसाठी योजना आणण्यात आली आहे. विश्वकर्मा म्हणजे हाती चालणाऱ्या साहित्यांच्या मदतीने आपल्या कौशल्याला मूर्त रूप देत सृजनाची निर्मिती करणारे, स्व रोजगाराला चालना देणारे आपले मित्र. कुंभार,कम्मारा, अक्क्सालीगा,शिल्पकार,गारेकेलसदवा, बडगी यांच्यासारखे आपले जे मित्र आहेत अशा लाखो कुटुंबाना, पीएम विकास योजनेद्वारे आपले कला-कौशल्य अधिक समृद्ध करण्यासाठी मदत मिळेल.
मित्रहो,
आमच्या सरकारने, या जागतिक महामारीच्या काळात रेशनवर होणाऱ्या खर्चाची चिंताही गरीब कुटुंबाना ठेवली नाही. या योजनेवर आमच्या सरकारने चार लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. गावांमध्ये प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के घर देण्यासाठी अर्थसंकल्पात 70 हजार कोटी रुपयांची अभूतपूर्व तरतूद करण्यात आली आहे. यातून कर्नाटकमधल्या अनेक गरीब कुटुंबांना पक्के घर मिळेल, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडेल.
बंधू आणि भगिनीनो,
या अर्थसंकल्पात मध्यम वर्गासाठी अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले आहेत. सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य प्राप्ती कर असल्याने मध्यम वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष करून 30 वर्षापेक्षा कमी वयाचा युवा वर्ग,ज्यांची नोकरी नवी आहे, व्यवसाय नवा आहे त्यांच्या खात्यात दरमहा पैशांची जास्त बचत होणार आहे.इतकेच नव्हे तर जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या साठी ठेव मर्यादा 15 लाख रुपयांवरून वाढवून 30 लाख म्हणजे दुप्पट करण्यात आली आहे. यामुळे त्यांना दर महिना मिळणारा परतावा आणखी वाढेल. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी रजा रोखीकरणावरची कराची सूट दीर्घ काळ केवळ 3 लाख रुपये होती.आता 25 लाखापर्यंतचे रजा रोखीकरण कर मुक्त करण्यात आले आहे. यामुळे तुमकुरू, बेंगलुरू सह कर्नाटक आणि देशातल्या लाखो कुटुंबांकडे आणखी पैसा येईल.
मित्रहो,
महिलांसाठी वित्तीय समावेशकतेला भाजपा सरकारने सर्वोच्च प्राधान्यापैकी एक मानले आहे.महिलांच्या वित्तीय समावेशकतेमुळे घरात त्यांच्या मताला वजन येते,घरामधल्या निर्णयात त्यांची भागीदारी यामुळे वाढते. आमच्या माता-भगिनी, कन्या बँकांशी मोठ्या प्रमाणात जोडल्या जाव्यात यासाठी या अर्थसंकल्पात आम्ही मोठी पाऊले उचलली आहेत. महिला सन्मान बचत पत्र घेऊन आम्ही आलो आहोत. यामध्ये भगिनी दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. ज्यावर सर्वात जास्त साडेसात टक्के व्याज मिळेल. कुटुंब आणि समाजात महिलांची भूमिका यामुळे अधिक वाढेल. सुकन्या समृद्धी, जन धन बँक खाती,मुद्रा कर्ज आणि घर दिल्यानंतर महिला आर्थिक सबलीकरणासाठीचे हे आणखी एक मोठे पाऊल आहे. गावांमध्ये महिला बचत गटांचे सामर्थ्य आणखी वाढावे यासाठीही अर्थसंकल्पात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
बंधू आणि भगिनीनो,
या अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे मदत, सहकार क्षेत्राचा विस्तार यावर भर देण्यात आला आहे. यातून शेतकरी,पशुपालक आणि मच्छिमार वर्गाला लाभ होणार आहे. ऊसाशी संबंधित सहकारी समित्यांना विशेष मदत दिल्याने कर्नाटकमधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. येत्या काळात अनेक नव्या सहकारी संस्था उभ्या राहतील आणि धान्यासाठी देशभरात मोठ्या संख्येने गोदामेही निर्माण होतील.याद्वारे छोटे शेतकरीही आपले धान्य गोदामात ठेवून चांगला भाव आल्यावरच त्याची विक्री करतील.इतकेच नव्हे तर नैसर्गिक शेतीद्वारे छोट्या शेतकऱ्यांचा खर्च कमी रहावा यासाठी हजारो सहाय्यता केंद्र निर्माण केली जात आहेत.
मित्रहो,
कर्नाटक मध्ये आपण सर्वजण भरड धान्याचे महत्व जाणताच.म्हणूनच या धान्यांना आपण सर्वजण पूर्वीपासूनच श्री धान्य म्हणता.कर्नाटकच्या लोकांची हीच भावना देश आता पुढे नेत आहे.आता संपूर्ण देशात भरड धान्यांना श्री अन्न म्हणून ओळख दिली जात आहे.श्री अन्न म्हणजे धान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ.कर्नाटकमध्ये तर श्रीअन्न रागी, श्रीअन्न नवणे, श्रीअन्न सामे, श्रीअन्न हरका, श्रीअन्न कोरले, श्रीअन्न ऊदलु, श्रीअन्न बरगु, श्रीअन्न सज्जे, श्रीअन्न बिड़ीजोड़ा, अशी श्री अन्नांची पिके शेतकरी घेतो. कर्नाटकच्या ‘रागी मुद्दे’, ‘रागी रोट्टी’ यांची चव कोण विसरेल ? या वर्षीच्या अर्थ संकल्पात श्री अन्न उत्पादनावर मोठा भर देण्यात आला आहे. कर्नाटक मधल्या दुष्काळ प्रवण भागातल्या छोट्या शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा लाभ होईल.
मित्रहो,
दुहेरी इंजिन सरकारच्या मनःपूर्वक प्रयत्नांमुळे भारताच्या नागरिकाचा आत्मविश्वास दुणावला आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाचे जीवन सुरक्षित करण्यासाठी, भविष्य समृद्ध करण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करत आहोत. आपणा सर्वांचा अखंड आशीर्वाद ही आमची उर्जा आहे, आमची प्रेरणा आहे. अर्थसंकल्प आणि आज तुमकुरूमध्ये विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले आहे त्यासाठी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.आज इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व जण इथे आला आहात, आम्हाला आशीर्वाद देत आहात यासाठी आपणा सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
धन्यवाद !