हर हर महादेव!
कार्यक्रमात आमच्या सोबत असलेले विविध राज्यांचे आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, पर्यटन उद्योगातील सहकारी, देश-विदेशातून वाराणसीला आलेले पर्यटक, इतर मान्यवर, स्त्री-पुरुषहो,
आज आकांक्षांनी भरलेला लोहरीचा सण आहे. आगामी दिवसात आपण उत्तरायण, मकर संक्रांत, भोगी, बिहू, पोंगल यांसारखे अनेक सण देखील साजरे करणार आहोत. मी देशात आणि जगामध्ये हे सण साजरे करत असलेल्या सर्व लोकांना शुभेच्छा देत आहे, शुभकामना देत आहे.
मित्रहो,
आपले सण, दान-दक्षिणा, तप-तपस्या, आपल्या संकल्पांच्या सिद्धीविषयी आपली आस्था, आपल्या मान्यतांचे स्वतःचे एक महत्त्व आहे. आणि यात देखील आपल्या नद्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अशा वेळी आपण सर्व जलमार्गांच्या विकासाशी संबंधित इतक्या मोठ्या उत्सवाचे साक्षीदार बनत आहोत. आज माझ्या काशीहून दिब्रुगडदरम्यान जगातील सर्वात जास्त लांबीच्या नदीजलप्रवासाचा- गंगा विलास क्रूझचा शुभारंभ झाला आहे. यामुळे पूर्व भारतातील अनेक पर्यटनस्थळे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर प्रामुख्याने येणार आहेत. काशीमध्ये गंगेच्या पलीकडे नव्याने निर्मित या अद्भुत टेंट सिटीमुळे तिथे येण्याचे आणि राहण्याचे आणखी एक मोठे कारण देशातील-जगभरातील पर्यटकांसाठी भाविकांसाठी निर्माण झाले आहे. याबरोबरच आज पश्चिम बंगालमध्ये मल्टी-मोडल टर्मिनल, यूपी आणि बिहारमध्ये फ्लोटिंग जेटी, आसाममध्ये मेरीटाइम स्किल सेंटर, शिप रिपेयर सेंटर, टर्मिनल कनेक्टिविटी प्रकल्प अशा 1 हज़ार कोटी रुपयांहून जास्त प्रकल्पांची पायाभरणी देखील झाली आहे. पूर्व भारतात व्यापार आणि पर्यटनाशी संबंधित शक्यतांचा विस्तार होणार आहे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
मित्रहो,
गंगा जी आपल्या साठी केवळ एक जलप्रवाह नाही आहे. तर प्राचीन काळापासून या महान भारत भूमीच्या तप-तपस्येचा साक्षीदार आहे. भारताच्या स्थिती-परिस्थिती कशाही राहिलेल्या असतील, माता गंगेने नेहमीच कोटी-कोटी भारतीयांचे पोषण केले आहे, त्यांना प्रेरित केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गंगा जींच्या किनाऱ्यालगतचा संपूर्ण पट्टाच विकासाच्या बाबतीत मागे पडत गेला यापेक्षा जास्त मोठे दुर्भाग्य काय असू शकते. पुढे जाण्याचा तर विचारच करू नका. याच कारणामुळे लाखो लोकांचे गंगेच्या किनाऱ्यावरून पलायन देखील झाले. याच स्थितीमध्ये बदल करण्याची गरज होती म्हणून आम्ही एका नव्या दृष्टीकोनाने काम करण्याचा निर्धार केला. आम्ही एकीकडे नमामि गंगेच्या माध्यमातून गंगेच्या निर्मलतेसाठी काम केले. तर दुसरीकडे अर्थ गंगा ही मोहीम देखील राबवली. अर्थ गंगा म्हणजे आम्ही गंगेच्या आजूबाजूला वसलेल्या राज्यांमध्ये आर्थिक व्यवहारांचे एक नवे वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलली. ही गंगा विलास क्रूझ, या अर्थ गंगा मध्ये तिच्या मोहिमेला नवे बळ देईल. उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश प्रवासाच्या वेळी ही क्रूझ सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करेल.
मित्रहो,
आज मी त्या सर्व परदेशी पर्यटकांचे विशेष अभिनंदन करत आहे, जे या क्रूझच्या माध्यमातून पहिल्या सफरीवर रवाना होत आहेत. तुम्ही सर्व एका प्राचीन शहरातून एका आधुनिक क्रूझमधून प्रवास करण्यासाठी निघत आहात. मी आपल्या या सर्व परदेशी पर्यटक सहकाऱ्यांना विशेषत्वाने सांगेन की, तुम्ही ज्या कशाची कल्पना केली आहे ते सर्व भारतात आहे. त्यामध्ये तुमच्या कल्पनेपेक्षाही बरेच काही आहे. भारताचे वर्णन शब्दात करता येणार नाही. भारताची अनुभूती केवळ हृदयातूनच घेता येईल. कारण भारताने नेहमीच आपल्या मनाची कवाडे सर्वांसाठी खुली केली आहेत, मग तो कोणताही प्रदेश असो वा धर्म. जगाच्या विविध भागातील आमच्या सर्व पर्यटक मित्रांचे आम्ही स्वागत करतो.
मित्रहो,
हा क्रूझ प्रवास एकाच वेळी अनेक नवे अनुभव घेऊन येणार आहे. जे लोक यामध्ये अध्यात्माचा शोध घेत आहेत त्यांना वाराणसी, काशी, बोधगया, विक्रमशिला, पाटणा साहिब आणि माजुलीचा प्रवास करण्याचे भाग्य लाभेल. ज्यांना मल्टीनॅशनल क्रूझचा अनुभव घ्यायचा आहे त्यांना ढाक्यातून प्रवास करण्याची संधी मिळेल. ज्यांना भारताची नैसर्गिक विविधता पाहायची आहे त्यांना ही क्रूझ सुंदरबन आणि आसामच्या जंगलांची सफर घडवेल. ज्या लोकांना भारताच्या नद्यांशी संबंधित प्रणाली जाणून घेण्यामध्ये रुची आहे, त्यांच्यासाठी हा प्रवास खूपच महत्त्वाचा असेल. कारण ही क्रूझ 25 वेगवेगळ्या नद्यांमधून किंवा नद्यांच्या प्रवाहामधून विहार करणार आहे. आणि ज्या लोकांना भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही एक चांगली संधी आहे. म्हणजेच भारताचा वारसा आणि आधुनिकता यांचा अद्भुत संगम आपल्या या प्रवासात पाहायला मिळणार आहे. क्रूझ प्रवासाचे हे नवे युग या क्षेत्रातील आपल्या युवा सहकाऱ्यांना रोजगाराच्या-स्वयंरोजगाराच्या संधी देखील देणार आहे. परदेशी पर्यटकांसाठी तर हे आकर्षण असेलच पण देशातील जे पर्यटक यापूर्वी अशा प्रकारचा अनुभव घेण्यासाठी परदेशात जात होते ते आता पूर्व भारताकडे वळू लागतील. ही क्रूझ ज्या भागातून जाईल त्या भागामध्ये विकासाचा नवा मार्ग तयार करेल. क्रूझ पर्यटनासाठी अशाच प्रकारच्या व्यवस्था आम्ही देशभरातील नदी जलमार्गात तयार करत आहोत. शहरांदरम्यान लांब रिव्हर क्रूझ व्यतिरिक्त आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये लहान क्रूझना देखील प्रोत्साहन देत आहोत. काशीमध्येही अशा प्रकारची व्यवस्था आता सुरू आहे. प्रत्येक स्तरातील पर्यटकांच्या आवाक्यात असावी यासाठी परवडणाऱ्या दरातील क्रूझपासून लक्झरी क्रूझपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा देशात विकसित केल्या जात आहेत.
मित्रहो,
देशात क्रूझ पर्यटन आणि वारसा स्थळांच्या पर्यटनाचा हा संगम अशा काळात होत आहे, ज्या काळात भारतात पर्यटनाचा एक भक्कम हंगाम सुरू होत आहे. भारताची जागतिक भूमिका जसजशी वाढत आहे, तसतशी भारताला पाहण्याची, भारताला जाणून घेण्याची आणि भारताला समजून घेण्याची उत्सुकता देखील वाढत आहे. म्हणूनच गेल्या 8 वर्षात आम्ही भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या विस्तारावर विशेष भर दिला आहे. आम्ही आमच्या श्रद्धांची स्थाने, तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक स्थळांच्या विकासाला देखील प्राधान्य दिले आहे.
काशी नगरी तर आमच्या या प्रयत्नांचे जिवंत साक्षीदार बनले आहे. आज माझ्या काशीचे रस्ते रुंद होत आहेत, गंगाजीचे घाट स्वच्छ होत आहेत. काशी विश्वनाथ धामच्या पुनर्बांधणीनंतर भाविक आणि पर्यटकांमध्ये जो उत्साह दिसून येत आहे तो अभूतपूर्व आहे. आपले नाविक, रस्त्यावरचे विक्रेते, रिक्षावाले, दुकानदार, हॉटेल-गेस्ट हाऊसचे मालक या सर्वांना गेल्या वर्षभरात काशीला आलेल्या यात्रेकरूंमुळे फायदा झाला आहे. आता गंगा नदीच्या पलीकडच्या भागात असलेली ही नवीन टेंट सिटी काशीला येणाऱ्या यात्रेकरू आणि पर्यटकांना एक नवा अनुभव देईल. या टेंट सिटीत आधुनिकताही आहे, अध्यात्म आणि श्रद्धाही आहे. रागापासून ते स्वादापर्यंत बनारसची प्रत्येक चव आणि रंग या टेंट सिटीमध्ये पाहायला मिळतील.
मित्रहो,
आजचे हे आयोजन म्हणजे 2014 पासून देशात जी धोरणे ठरवली गेली, निर्णय घेतले गेले आणि दिशा ठरवली गेली याचे प्रतिबिंब आहे. 21 व्या शतकातील हे दशक भारतातील पायाभूत सुविधांच्या परिवर्तनाचे दशक आहे. या दशकात भारतातील लोकांना आधुनिक पायाभूत सुविधांचे असे चित्र पाहायला मिळणार आहे, ज्याची पूर्वी कल्पना करणेही कठीण होते. मग ती घरे, शौचालये, वीज, पाणी, स्वयंपाकाचा गॅस, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये या सारख्या सामाजिक पायाभूत सुविधा असोत, डिजिटल पायाभूत सुविधा असोत किंवा रेल्वे, महामार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग यासारख्या भौतिक पायाभूत सुविधा असोत. आज हा भारताच्या वेगवान विकासाचा, विकसित भारताच्या उभारणीचा सर्वात मजबूत स्तंभ आहे. रुंद महामार्ग, सर्वात आधुनिक विमानतळ, आधुनिक रेल्वे स्टेशन, सर्वात उंच आणि सर्वात लांब पूल, सर्वात उंचावर बांधलेला सर्वात लांब बोगदा यातून नव्या भारताच्या विकासाचे प्रतिबिंब आपण सर्वजण अनुभवतो आहोत. त्यातही नदी जलमार्ग हे भारताचे नवे सामर्थ्य बनत आहे.
मित्रहो,
आज गंगा विलास क्रूझची सुरवात होणे ही काही सामान्य घटना नाही. एखादा देशजेव्हा स्वबळावर अवकाशात उपग्रह स्थापित करतो तेव्हा तो त्या देशाची तांत्रिक कार्यक्षमता दाखवत असतो. त्याचप्रमाणे 3200 किलोमीटरहून अधिकचा हा प्रवास भारतातील अंतर्देशीय जलमार्गांचा विकास, नदी जलमार्गांसाठी निर्माण होत असलेल्या आधुनिक संसाधनांचे जिवंत उदाहरण आहे. 2014 पूर्वी देशात जलमार्गाचा फारसा वापर होत नव्हता. हे देखील कधी तर, भारताला जलमार्गाद्वारे व्यापाराचा हजारो वर्षांचा इतिहास होता. 2014 पासून, भारत या प्राचीन शक्तीला आधुनिक भारताच्या वाहतूक व्यवस्थेत एक प्रमुख शक्ती बनवण्यात सक्रीय आहे. देशातील प्रमुख नद्यांमधील नदी जलमार्गांच्या विकासासाठी आम्ही कायदा केला आहे, सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. 2014 मध्ये देशात फक्त 5 राष्ट्रीय जलमार्ग होते. आज, 24 राज्यांमध्ये 111 राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्याचे काम सुरू आहे. यापैकी सुमारे 2 डझन जलमार्गांवर सध्या सेवा सुरू आहेत. आठ वर्षांपूर्वीपर्यंत नदीपात्रातून केवळ 30 लाख मेट्रिक टन मालाची वाहतूक होत होती. आज ही क्षमता तीन पटीने वाढली आहे. नदीपात्राचा वापर करणाऱ्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. त्यातही गंगेवर तयार होणारा हा राष्ट्रीय जलमार्ग संपूर्ण देशासाठी आदर्श प्रारुपाच्या रुपात विकसित होत आहे. आज हा जलमार्ग वाहतूक, व्यापार आणि पर्यटनासाठी महत्त्वाचे माध्यम बनत आहे.
मित्रहो,
आजचे आयोजन, पूर्व भारताला, विकसित भारताचे विकास इंजिन बनवण्यास मदत करेल. पश्चिम बंगालमधील हल्दिया येथील आधुनिक बहुआयामी टर्मिनल वाराणसीला जोडते. हे भारत-बांगलादेश प्रोटोकॉल मार्गाशी देखील जोडलेले आहे आणि ईशान्येला देखील जोडते. ते कोलकाता बंदर आणि बांगलादेशला देखील जोडते. म्हणजेच यूपी-बिहार-झारखंड-पश्चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंत व्यापार आणि व्यवसाय सुलभ करणार आहे. त्याचप्रमाणे जेटी आणि रो-रो फेरी टर्मिनलचे जाळेही तयार केले जात आहे. त्यामुळे ये-जा करणे सोपे होणार असून, मच्छिमार आणि शेतकऱ्यांनाही सोयीचे होणार आहे.
मित्रहो,
प्रवासी क्रूझ असो वा मालवाहू जहाज, ते केवळ वाहतूक आणि पर्यटनाला चालना देत नाहीत तर त्यांच्या सेवेशी संबंधित संपूर्ण उद्योगही नवीन संधी निर्माण करतात. त्यासाठी आवश्यक कर्मचारी आणि कुशल लोकांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था आवश्यक आहे. यासाठी गुवाहाटी येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. गुवाहाटीमध्ये जहाजांच्या दुरुस्तीसाठी एक नवीन सुविधा व्यवस्था उभारली जात आहे.
मित्रहो,
जलमार्ग हे पर्यावरणाच्या रक्षणासाठीही चांगले आहेत आणि पैशांचीही बचत करतात. एका अभ्यासानुसार, जलमार्गाने वाहतुकीचा खर्च रस्त्यांपेक्षा अडीच पट कमी आहे. त्याच वेळी, जलमार्गाने वाहतुकीचा खर्च रेल्वेच्या तुलनेत एक तृतीयांश कमी आहे. यावरुन जलमार्गामुळे इंधनाची किती बचत होते, किती पैसा वाचतो याची कल्पना तुम्ही करू शकता. जलद गतीने बांधले जाणारे हे जलमार्ग भारताने बनवलेल्या नवीन दळणवळण धोरणात खूप मदत करणारे आहेत. यातही महत्वपूर्ण म्हणजे भारताकडे हजारो किलोमीटर जलमार्गाचे जाळे निर्माण करण्याची क्षमता आहे. भारतात असलेल्या सव्वाशेहून अधिक नद्या आणि उपनद्यांचा वापर प्रवासी आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो. या जलमार्गांमुळे भारतातील बंदर-आधारित-विकासात वाढ होण्यास मदत होईल. येत्या काही वर्षात भारतात जलमार्ग, रेल्वे आणि महामार्गांचे बहुआयामी प्रारुपात्मक आधुनिक जाळे निर्माण व्हावे, असा प्रयत्न आहे. आपण बांगलादेश आणि इतर देशांशीही करार केले आहेत, ज्यामुळे ईशान्येकडील जल संपर्क व्यवस्थाही सशक्त होत आहे.
मित्रहो,
विकसित भारत घडवण्यासाठी सशक्त संपर्क व्यवस्था आवश्यक आहे. त्यामुळेच आमचे हे अभियान अखंड सुरू राहील. नदी जलशक्ती, देशाच्या व्यापार आणि पर्यटनाला नवी उंची देईल, या सदिच्छांसह मी सर्व क्रूझ प्रवाशांना आनंददायी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद!