इंदूरमधील रामनवमी दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केले दुःख
"भारतीय रेल्वेच्या इतिहासातील दुर्मिळ घटनांपैकी एक म्हणजे पंतप्रधानांनी एकाच रेल्वे स्थानकाला अत्यंत कमी कालावधीत दोनदा दिली भेट"
“भारत आता नवीन विचार आणि दृष्टिकोनासह काम करत आहे”
“वंदे भारत हे भारताच्या उत्साहाचे आणि उर्मीचे प्रतीक. हे आमची कौशल्ये, आत्मविश्वास आणि क्षमता दर्शवते”
"ते मतपेढीसाठी खुशामतीमध्ये (तुष्टीकरण) व्यग्र होते, आम्ही नागरिकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी(संतुष्टीकरण) कटिबद्ध आहोत "
"एक स्थानक एक उत्पादन' अंतर्गत 600 विक्रीकेंद्रे कार्यरत असून अल्पावधीत एक लाख उत्पादनांची खरेदी झाली आहे"
"भारतीय रेल्वे ही देशातील सर्वसामान्य कुटुंबांसाठी सुविधा पर्याय बनत आहे"
"आज मध्य प्रदेश सातत्यपूर्ण विकासाची नवीन गाथा लिहित आहे"
"एकेकाळी ‘बीमारू’ राज्य म्हटल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशची कामगिरी विकासाच्या बहुतांश मापदंडांवर प्रशंसनीय आहे "
"भारतातील गरीब, भारतातील मध्यमवर्ग, भारतातील आदिवासी, भारतातील दलित-मागास, प्र

भारत माता की जय, 

भारत माता की जय, 

मध्य प्रदेशचे राज्यपाल  मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री भाई शिवराज जी, रेल्वे मंत्री अश्विनी जी, इतर मान्यवर आणि भोपाळमधल्या मोठ्या संख्येने उपस्थित  माझ्या प्रिय बंधू - भगिनींनो,

इंदूर मधल्या मंदिरात रामनवमीला  जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी  आधी  दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपल्यातून  अकाली निघून  गेलेल्यांना  मी  श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक भावना व्यक्त करतो.जे भाविक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

 

मित्रहो, आज मध्य प्रदेशला आपली पहिली वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे मिळाली आहे.वंदे भारत एक्सप्रेसमुळे भोपाळ आणि दिल्ली दरम्यानचा प्रवास आणखी वेगाने होईल. व्यावसायिक,युवक,व्यापारी वर्गासाठी ही गाडी नव-नव्या सुविधा घेऊन येईल.

मित्रहो,

या कार्यक्रमाचे आयोजन ज्या आधुनिक आणि भव्य राणी कमलापती स्थानकावर होत आहे त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्यही  आपण सर्वांनी मला दिले होते.आज इथूनच दिल्लीसाठी आधुनिक वंदे भारत रेल्वे रवाना करण्याची संधी आपण मला दिली आहे. एखाद्या पंतप्रधानांनी एकाच स्थानकाला  इतक्या कमी काळात दोनदा भेट देण्याचा प्रसंग रेल्वेच्या इतिहासात क्वचितच आला असेल. मात्र आधुनिक भारतात नव्या व्यवस्था उभारल्या जात आहेत,नव्या परंपरा निर्माण केल्या जात आहेत आणि आजचा कार्यक्रम याचेही एक उत्तम उदाहरण आहे.

मित्रहो,

या गाडीतून प्रवासी म्हणून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांशी मी आताच संवाद साधला.या गाडीबाबत त्यांच्या मनात असलेली उत्सुकता,उत्साह पाहण्यासारखा होता. वंदे भारत गाडी,विकसित भारतासाठीची इच्छा आणि औत्सुक्य याचे हे एक प्रकारे प्रतीकच आहे. हा कार्यक्रम ठरवताना याची तारीख 1 एप्रिल असल्याचे मला सांगण्यात आले. मी म्हटले 1 एप्रिल कशाला ठेवता,1 एप्रिलला मोदी जी वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत अशी बातमी जेव्हा वर्तमानपत्रात येईल तेव्हा  मोदी एप्रिल फूल करतील असे कॉंग्रेसच्या मित्रांनी नक्कीच म्हणतील. मात्र आपण पाहता आहातच की ही गाडी 1 एप्रिलला निघाली आहे.

 

मित्रहो,

आपले कौशल्य,आपले सामर्थ्य,आपल्या आत्मविश्वासाचेही हे प्रतिक आहे. भोपाळला येणारी ही गाडी तर पर्यटनाला मोठी चालना देणारी   ठरणार आहे. या गाडीमुळे सांची स्तूप,भीमबेटका,भोजपूर आणि उदयगिरी गुंफा यासारख्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. पर्यटन वाढल्यानंतर रोजगाराच्या अनेक संधी वाढतात, लोकांच्या उत्पन्नातही वाढ होते हे आपण जाणताच. म्हणजेच वंदे भारत, लोकांचे उत्पन्न वाढवण्याचेही माध्यम ठरेल,या भागाच्या विकासाचेही माध्यम बनेल.

मित्रहो,

21 व्या शतकातला भारत आता नवा विचार,नव्या दृष्टीकोनाने काम करत आहे. पूर्वीची सरकारे खुशामतीत इतकी दंग होती की देशवासियांच्या  समस्या दूर करून त्यांना समाधानी करण्याकडे त्यांचे लक्षच नव्हते. व्होट बँक खुश करण्यात ते दंग होते तर आम्ही देशवासियांना संतुष्ट, समाधानी करण्यासाठी समर्पित आहोत.पूर्वीच्या सरकारांचा आणखी एका गोष्टीवर मोठा भर होता,देशातल्या एकाच कुटुंबाला ती देशातले प्रथम कुटुंब मानत असत. देशातली गरीब कुटुंबे, मध्यम वर्ग सर्वाना वाऱ्यावर सोडले होते. या कुटुंबांच्या आशा-अपेक्षा, त्यांना वाली नव्हता. याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे आपली भारतीय रेल्वे. खरे तर भारतीय रेल्वे, सर्वसामान्य भारतीय कुटुंबांचे प्रवासाचे साधन आहे. आई-वडील,मुले,आजी-आजोबा सर्वाना एकत्र जायचे असेल तर रेल्वे हेच साधन अनेक दशकांपासून राहिले आहे. सर्वसामान्य कुटुंबांचे प्रवासाचे हे साधन आधुनिक करायला हवे होते ना ?  रेल्वेला अशाच दुरवस्थेत सोडून देणे योग्य होते का ?

 

मित्रहो,

स्वातंत्र्यानंतर भारताला रेल्वेचे एक तयार असे मोठे जाळे मिळाले होते. इच्छाशक्ती असती तर तेव्हाची सरकारे झपाट्याने रेल्वेला आधुनिक करू शकली असती. मात्र राजकीय स्वार्थापोटी, लोकांना भुलवणाऱ्या आश्वासनापोटी रेल्वेच्या विकासाचा बळी देण्यात आला.स्वातंत्र्याला इतकी दशके उलटल्यानंतरही आपली ईशान्येकडील राज्ये रेल्वेद्वारे जोडली गेलेली नव्हती.   2014 मध्ये आपण मला सेवेची संधी दिली तेव्हा ही परिस्थिती बदलण्याचा मी निश्चय केला.मी ठरवले की आता असे होणार नाही, रेल्वेचा कायापालट  होणारच.भारतीय रेल्वेचे जाळे, जगातले सर्वश्रेष्ठ जाळे कसे ठरेल यासाठी गेली नऊ वर्षे आमचे अथक प्रयत्न सुरु आहेत. 2014 पूर्वी रेल्वेसंदर्भात कोणकोणत्या बातम्या येत असत हे आपल्याला माहितच आहे. इतक्या विशाल रेल्वे जाळ्यामध्ये हजारो मानवरहित फाटके होती. त्या ठिकाणांहून अनेकदा दुर्घटनांच्या बातम्या येत असत.शालेय विद्यार्थ्यांच्या मृत्युच्या बातम्यानी हृदय पिळवटून निघे. आज ब्रॉडगेज जाळे, मानवरहित फाटकांपासून मुक्त झाले आहे.पूर्वी रेल्वे अपघात,जीवितहानीच्या बातम्या जणू नित्याच्याच असत. आज भारतीय रेल्वे खूपच सुरक्षित झाली आहे. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेमध्ये मेड इन इंडिया कवच प्रणालीचा विस्तार करण्यात येत आहे.

मित्रहो,

केवळ अपघातांपासून सुरक्षितता इतकेच नव्हे तर प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाश्याची काही तक्रार किंवा त्याला अडचण  आल्यास त्याचे त्वरित निराकरण केले जाते. आपत्कालीन परिस्थितीतही अतिशय कमी वेळात मदत पोहोचवली जाते. या व्यवस्थेचा सर्वात मोठा लाभ आपल्या भगिनी वर्गाला झाला आहे. पूर्वी अस्वच्छतेसंदर्भात अनेक तक्रारी येत असत. रेल्वे स्थानकांवर थोडा वेळ थांबणेही  शिक्षेसारखे वाटत असे. त्याशिवाय गाड्या अनेक तास उशिरा येत असत.आज स्वच्छताही उत्तम होऊ लागली आहे आणि गाड्या वेळेवर येत नसल्याच्या तक्रारीही सातत्याने कमी होत आहेत.    

 

पूर्वी तर परिस्थिती अशी होती की लोकांनी तक्रार करणेच बंद केले होते, त्यांचे ऐकणारेच कोणी नव्हते. तुम्हाला आठवत असेल पूर्वी तिकिटांचा काळाबाजार ही सर्वसामान्य बाब होती. प्रसारमाध्यमांमधून नेहमीच या संदर्भातली स्टिंग ऑपरेशन्स दाखवली जात होती. पण आज तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही अशा अनेक समस्यांचे निराकरण केले आहे.
मित्रहो,

आज भारतीय रेल्वे, देशातील छोटे शिल्पकार आणि कारागीरांची उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे एक मोठे माध्यम बनू लागली आहे. One Station One Product या योजने अंतर्गत ज्या भागात ते रेल्वे स्थानक आहे त्या भागातील प्रसिद्ध कपडे, कलाकृती, पेंटिंग्ज, हस्त शिल्प, भांडी यांसारख्या वस्तू प्रवाशांना स्थानकावरच खरेदी करता येतील. याची देखील देशात जवळ-जवळ 600 आऊटलेट्स तयार करण्यात आली आहेत. अतिशय थोड्या कालावधीत यातून एक लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी खरेदी केली आहे, याचा मला आनंद होत आहे.

 

मित्रहो,

आज भारतीय रेल्वे, देशातील सामान्य कुटुंबांसाठी सोयीचा पर्याय बनू लागली आहे. आज देशातील अनेक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. आज देशातील 6 हजार स्थानकांवर Wifi ची सुविधा देण्यात येत आहे. देशातील 900 पेक्षा जास्त प्रमुख रेलवे स्थानकांवर सीसीटीवी लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. आपली ही वंदे भारत एक्सप्रेस तर संपूर्ण देशात, आपल्या युवा पीढ़ीमध्ये सुपरहिट झाली आहे. वर्षभर या  ट्रेनमधील सीट फुल होऊ लागल्या आहेत.  देशातील प्रत्येक कोपऱ्यातून वंदे भारत सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. पूर्वी खासदारांची पत्रे येत असायची, ही पत्रे कशासाठी असायची?  खासदार लिहायचे अमुक ट्रेन या रेल्वे स्थानकावर थांबवण्याची व्यवस्था करावी, सध्या दोन स्थानकांवर थांबते, ती तीन स्थानकांवर थांबवण्याची व्यवस्था करावी, या ठिकाणी थांबवा, त्या ठिकाणी थांबवा, हेच सर्व असायचे. आज मला सांगायला आनंद होत आहे की आता खासदार आमच्याकडे लवकरात लवकर वंदे भारत सुरू करा अशी मागणी करत पत्र लिहू लागले आहेत.

मित्रहो,

रेल्वे प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढवण्याची ही मोहीम सातत्याने अतिशय जलद गतीने सुरू आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात देखील रेल्वेला विक्रमी निधी देण्यात आला आहे. एक काळ होता जेव्हा रेल्वेच्या विकासाच्या गोष्टी व्हायच्या त्यावेळी होणाऱ्या तोट्याबद्दल बोलले जायचे. पण जर विकासाची इच्छाशक्ती असेल, हेतू स्वच्छ असेल आणि निष्ठा ठाम असेल तर नवे मार्ग तयार होतच राहतात. गेल्या 9 वर्षात आम्ही रेल्वेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत सातत्याने वाढ केली आहे. मध्य प्रदेशसाठी देखील 13 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. तर 2014 पूर्वी मध्य प्रदेशासाठी दर वर्षी सरासरी 600 कोटी रुपये, तुम्ही सांगा 600 कोटी रुपयांची रेल्वेविषयक अर्थसंकल्पीय तरतूद कुठे आणि कुठे 13 हजार कोटी.

मित्रहो,

आज रेल्वेमध्ये कशा प्रकारे आधुनिकीकरण होत आहे, याचे एक उदाहरण म्हणजे विद्युतीकरणाचे काम देखील आहे. आज आपण जवळपास रोजच ऐकत असाल की देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागातील रेल्वे जाळ्याचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. ज्या 11 राज्यांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे त्यामध्ये मध्य प्रदेश देखील समाविष्ट आहे. 2014 पूर्वी दर वर्षी सरासरी 600 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होत असायचे. आता दर वर्षी सरासरी 6000 किलोमीटरचे विद्युतीकरण होत आहे. ही आहे आमच्या सरकारची काम करण्याची गती.  

मित्रहो,

मध्य प्रदेशने आज जुने दिवस मागे टाकले आहेत याचा मला आनंद आहे. आता मध्य प्रदेश सातत्याने विकासाची नवी गाथा लिहीत आहे. शेती असो वा उद्योग, आज MP चे सामर्थ्य भारताच्या सामर्थ्याचा विस्तार करत आहे. विकासाच्या ज्या निकषांवर एके काळी मध्य प्रदेशला ‘बीमारू’ म्हटले जात होते त्यापैकी बहुतेकांमध्ये मध्य प्रदेशची कामगिरी प्रशंसनीय आहे. आज MP गरिबांची घरे बनवणाऱ्या राज्यांमधील अग्रणी राज्य आहे. प्रत्येक घरात पाणी पुरवठा करण्यामध्येही मध्य प्रदेश चांगले काम करत आहे. गव्हासहित अनेक पिकांच्या उत्पादनात देखील आपल्या मध्य प्रदेशचे शेतकरी नवे विक्रम करत आहेत.  उद्योगांच्या बाबतीत हे राज्य सातत्याने नव्या विक्रमांच्या दिशेने आगेकूच करत आहे. या सर्व प्रयत्नांमुळे येथील युवा वर्गासाठी अनके संधींच्या शक्यता देखील निर्माण होत आहेत.  

 

मित्रहो,

देशाच्या विकासासाठी होत असलेल्या या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मला तुम्हा सर्व देशवासीयांचे लक्ष आणखी एका गोष्टीकडे वेधून घ्यायचे आहे. आपल्या देशात काही लोक आहेत जे 2014 नंतरच अगदी ठामपणे हे धरून चालत आहेत आणि सार्वजनिक रित्या देखील बोलले आहेत  आणि त्यांनी आपला संकल्प जाहीर केला आहे. काय केले आहे- त्यांनी आपला संकल्प जाहीर केला आहे. आम्ही मोदी यांची प्रतिमा मलीन करणारच. यासाठी या लोकांनी अगदी पद्धतशीर लोकांना सुपारी देऊन ठेवली आहे आणि स्वतः देखील आघाडी सांभाळत आहेत. या लोकांना साथ देण्यासाठी काही लोक देशातच आहेत आणि काही देशाबाहेर राहून आपले काम करत आहेत. हे लोक सातत्याने हा प्रयत्न करत आहेत की कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोदी यांची प्रतिमा मलीन करायची. पण आज भारताचा गरीब वर्ग, भारताचा मध्यम वर्ग, भारताचे आदिवासी, भारताचे दलित-मागास, प्रत्येक भारतीय आज मोदींचे सुरक्षा कवच बनला आहे आणि म्हणूनच हे लोक बिथरले आहेत. हे लोक नवनवीन क्लृप्त्या शोधून काढत आहेत. 2014 मध्ये यांनी मोदींची इमेज, मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा संकल्प केला. आता या लोकांनी संकल्प केला आहे- मोदी, तुमची कबर खोदली जाणार. यांची कारस्थाने सुरू असतानाच तुम्हाला, प्रत्येक देशवासीयाला देशाच्या विकासावर लक्ष केंद्रित करायचे आहे, राष्ट्रनिर्मितीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आपल्याला विकसित भारतामध्ये मध्य प्रदेशच्या भूमिकेमध्ये आणखी वाढ करायची आहे. ही नवी वंदे भारत एक्स्प्रेस याच संकल्पाचा एक भाग  आहे. पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या सर्व नागरिक बंधुभगिनींचे, भोपाळच्या नागरिक बंधुभगिनींचे या आधुनिक ट्रेनसाठी खूप-खूप अभिनंदन, तुम्हा सर्वांचा प्रवास मंगलमय होवो, याच शुभेच्छेसह खूप खूप धन्यवाद.   

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi