विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 70,000 जणांना नियुक्ती पत्रे केली वितरित
“संपूर्ण जग आज भारताच्या विकास प्रवासात भागीदार होण्यास उत्सुक आहे ”
“भारत आज राजकीय स्थिरतेसाठी ओळखला जातो आणि आजच्या जगात याचे महत्व खूप आहे. भारत सरकार आज हे निर्णयक्षम सरकार म्हणून ओळखले जाते. हे सरकार आज प्रगतीशील आर्थिक आणि सामाजिक निर्णयांसाठी ओळखले जाते”
"सरकारी योजनांमुळे नागरिकांच्या कल्याणांचा परिणाम अनेक पटींनी वाढला आहे"
"नोकऱ्यांसाठी पैसे द्यायचे ('रेटकार्ड'चे) दिवस गेले, सध्याचे सरकार तरुणांच्या भविष्याच्या 'सुरक्षिततेवर' लक्ष केंद्रित करते"
“भाषेचा दुरुपयोग करून फूट पाडण्यात आली, आताचे सरकार भाषेला रोजगाराचे सशक्त माध्यम बनवत आहे”
“आता सरकार आपल्या सेवा घरोघरी पोहोचवत नागरिकांच्या घराघरात पोहोचत आहे”

नमस्कार !

राष्ट्रीय स्तरावर होणारे हे रोजगार मेळावे रालोआ आणि भाजपा सरकारची नवी ओळख बनले आहेत. आज पुन्हा एकदा 70 हजारांहून अधिक युवकांना नियुक्ती पत्र मिळाली आहेत. मला आनंद वाटतो की, भाजपशासित राज्य सरकारे देखील सर्व भाजपशासित राज्यांमध्ये असे रोजगार मेळावे सातत्याने आयोजित करत आहेत. सध्याच्या काळात सरकारी नोकरीत येणाऱ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे.

स्वातंत्र्याचा अमृत काळ नुकताच सुरू झाला आहे. पुढल्या 25 वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य तुमच्यासमोर आहे. वर्तमानासोबतच देशाच्या उज्वल भविष्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करायचे आहेत. आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व युवकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो आणि खूप शुभेच्छा देतो.

 

मित्रहो,

आज भारतात खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रात सातत्याने नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.  स्वयंरोजगारासाठीही मोठ्या संख्येने आपले तरुण पुढे येत आहेत. बँक गॅरंटीशिवाय आर्थिक मदत देणाऱ्या मुद्रा योजनेने कोट्यवधी युवकांची मदत केली आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया यांसारख्या मोहिमांनी युवकांचे सामर्थ्य  आणखी वाढवले आहे. सरकारकडून मदत मिळालेले हे तरुण आता स्वतः अनेक तरुणांना नोकऱ्या देत आहेत.

गेल्या काही वर्षांत ज्याप्रकारे युवकांना मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, हे अभियान देखील अभूतपूर्व आहे. देशात सरकारी नोकऱ्या देणाऱ्या  एसएससी, यूपीएससी  आणि आरआरबी  सारख्या प्रमुख संस्था पूर्वीच्या तुलनेत या व्यवस्थांच्या माध्यमातून अधिक युवकांना नोकऱ्या देत आहेत. आत्ताच दाखवलेल्या चित्रफितीतही त्याचा उल्लेख आहे.

परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, व्यवस्थित आणि सोपी करण्यावरही या संस्थांचा भर आहे. पूर्वी नोकरभरतीच्या परीक्षा पूर्ण करण्यासाठी जी प्रक्रिया असायची, ती  पूर्ण व्हायला वर्ष- दीड वर्ष लागायची आणि जर कुणी कोर्ट कचेरीत गेले तर दोन ते पाच वर्षे वाया जायची. या सर्व गोष्टींमधून बाहेर पडून आता काही महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जात आहे.

 

मित्रहो,

आज संपूर्ण जग आपल्या विकासाच्या प्रवासात आपल्यासोबत चालण्यास तयार आहे. भारतावर इतका विश्वास आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर इतका विश्वास यापूर्वी कधीही नव्हता. तुम्हाला माहित आहे की, एकीकडे जागतिक मंदी, कोरोनासारखी भयंकर जागतिक महामारी, दुसरीकडे युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय, अशा अनेक अडचणी जगभरात दिसत आहेत. हे सर्व असूनही, आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, या सर्व समस्या असूनही, भारत आपली अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेत आहे.

आज जगातील मोठ-मोठ्या कंपन्या उत्पादनासाठी भारतात येत आहेत. आज भारताचा परकीय चलनाचा साठा विक्रमी पातळीवर आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येते, तेव्हा उत्पादन वाढते, उद्योग विस्तारतात, नवे उद्योग उभे राहतात, उत्पादन वाढते, निर्यात वाढते आणि साहजिकच हे काम नवीन तरुणांशिवाय होऊ शकत नाही, आणि त्यामुळेच रोजगार खूप वेगाने वाढतो.

सरकारच्या निर्णयांनी खाजगी क्षेत्रात लाखो नवीन संधी कशा निर्माण केल्या आहेत, याचे आता आमचे डॉ जितेंद्र सिंह जी प्रत्येक वाक्यात तपशीलवार वर्णन करत होते.  मात्र मला तुमच्यासमोर एक उदाहरण ठेवायचे आहे. जसे ऑटोमोबाईल क्षेत्र आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचे योगदान साडेसहा टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगाने मोठी झेप घेतली आहे.

आज भारतातून जगातील अनेक देशांमध्ये प्रवासी वाहनांची निर्यात वाढत आहे. व्यावसायिक वाहनांची निर्यात, एवढेच नाही तर आपली तीन-चाकी-दुचाकी वाहने, त्यांची निर्यातही खूप वाढत आहे.10 वर्षांपूर्वी हा उद्योग सुमारे 5 लाख कोटी रुपयांचा होता. आज या उद्योगाने 5 लाख कोटींवरून 12 लाख कोटींच्याही पुढे झेप घेतली आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीचा भारतातही सातत्याने विस्तार होत आहे. भारत सरकारची  उत्पादन संलग्न प्रोत्साहन  योजना वाहन  उद्योगालाही सहाय्यकारी ठरत आहे. जलद गतीने पुढे जात अशी क्षेत्रं लाखो युवकांसाठी  रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहेत.

मित्रहो,

आज भारत एक दशकापूर्वीच्या तुलनेत अधिक स्थिर, अधिक सुरक्षित आणि अधिक मजबूत देश आहे. राजकीय भ्रष्टाचार, योजनांमधील गैरव्यवहार, जनतेच्या पैशाचा गैरवापर, ही सर्व जुन्या सरकारांची ओळख बनली होती. आज भारत राजकीय स्थिरतेसाठी ओळखला जातो. राजकीय स्थैर्य, त्याला जगात खूप महत्त्व आहे.

आज भारत सरकार हे निर्णायक सरकार म्हणून ओळखले जाते. एक निर्णायक सरकार. आज भारत सरकार आर्थिक आणि प्रगतीशील सामाजिक सुधारणांसाठी ओळखले जात आहे. आज जागतिक संस्था सतत घोषणा करत आहेत, अंदाज वर्तवत  आहेत आणि आत्मविश्वासाने सांगत आहेत की महामार्ग असो किंवा रेल्वेचे काम असो, जीवन सुलभतेची चर्चा असो किंवा व्यवसाय सुलभतेची चर्चा असो, भारत मागील सरकारांपेक्षा सरस कामगिरी करत आहे.

गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. लाखो कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीतून रोजगाराच्या कोट्यवधी संधीही निर्माण झाल्या आहेत.  आता मी सामाजिक पायाभूत सुविधांचे उदाहरण देतो, जो आपल्या सामाजिक जीवनाशी संबंधित विषय आहे. आणि ते आहे  पाणी आणि त्यासाठी आम्ही जल जीवन मिशन सुरू केले आहे. या जल जीवन मिशनवर आतापर्यंत सुमारे 4 लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

जेव्हा हे अभियान सुरू झाले तेव्हा ग्रामीण भागातील प्रत्येक 100 घरांपैकी, म्हणजे गावात 100 घरे असली, तर केवळ 15 घरांमध्ये पाईपने पाणी यायचे.  मी ही सरासरी सांगतोय, 100 घरांपैकी 15 घरांमध्ये पाईपने पाणी यायचे. आज जल जीवन अभियानामुळे प्रत्येक 100 पैकी 62 घरांमध्ये पाईपने पाणी येऊ लागले आहे आणि अजूनही  वेगाने काम सुरू आहे. आज देशातील 130 जिल्हे असे आहेत - हे काही छोटे क्षेत्र नाही, असे 130 जिल्हे आहेत जिथे प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात नळाने  पाणी येते.

आणि मित्रहो,

ज्या घरांमध्ये आता शुद्ध पाणी पोहोचत आहे , तिथल्या लोकांचा वेळही वाचला आहे, पण त्याहूनही महत्त्वाचा लाभ होत आहे , तो म्हणजे गंभीर आजारांपासूनही त्यांची सुटका झाली आहे. शुद्ध पिण्याचे पाणी आरोग्यासाठी उत्तम औषध ठरते. प्रत्येक घरापर्यंत पाईपद्वारे पाणी पोहोचू लागल्यावर अतिसारामुळे होणारे 4 लाख मृत्यू टळले आहेत, 4 लाख जीव वाचले, म्हणजेच जलजीवन मिशनमुळे 4 लाख लोकांचे प्राण वाचले आहेत असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवल्याने देशातल्या गरिबांचे 8 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे वाचणार आहेत म्हणजे गरिबांचे पैसे वाचणार आहेत, मध्यम वर्गीय कुटुंबाचे पैसे वाचणार आहेत असे हा अभ्यास अहवाल सांगतो. पाण्यासाठी व्यवस्था करणे, पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर उपचारासाठी हे पैसे खर्च करावे लागत असत. जल जीवनचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यामुळे महिलांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

या रोजगार मेळाव्यातून नोकरी प्राप्त करणारे आपण सर्वजण हे जाणताच की सरकारच्या एक - एक योजनेचा किती पटीने प्रभाव असतो. जल जीवन अभियानाचे उदाहरण मी आपल्यासमोर ठेवले आहे.आपण सरकारी यंत्रणेत आला आहात तेव्हा सरकारच्या प्रत्येक योजनेमधले आपल्या विभागाचे लक्ष्य झपाट्याने पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण परिश्रम घ्याल असा मला विश्वासही आहे आणि अपेक्षाही आहे.

मित्रांनो,

देशात सुरू असलेले हे रोजगार अभियान,पारदर्शकता आणि सुशासन तसेच उत्तम प्रशासन या दोन्हींचे प्रमाण आहे. आपल्या देशात घराणेशाही असणाऱ्या राजकीय पक्षांनी, प्रत्येक व्यवस्थेत वशिलेबाजीला  प्रोत्साहन दिले हे आपण सर्वांनी पाहिले आहेच. सरकारी नोकरीच्या बाबतीत हे घराणेशाही असलेले पक्ष वशिलेबाजीला,शिफारशी आणि भ्रष्टाचाराला थारा देत असत. या घराणेशाहीवाल्या पक्षांनी देशातल्या कोट्यवधी युवकांचा विश्वासघात केला आहे.

2014 मध्ये आमचे सरकार आल्यानंतर भर्ती परीक्षांमध्ये पारदर्शकता आली आहे वशिलेबाजीला थारा उरलेला नाही.केंद्र सरकारने गट क आणि गट ड संवर्गातल्या भरतीसाठी आता मुलाखती न घेण्याचा निर्णय घेतल्याने लाखो युवकांना त्याचा लाभ झाला आहे.एकीकडे सरकारचे हे प्रामाणिक प्रयत्न आणि दुसरीकडे मला वाटते माझ्या युवा मित्रांनी ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तथ्यांवर आधारित काही गोष्टी उघडकीला येत आहेत तर दुसरीकडे  वशिलेबाजी.

एक - दोन दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये आलेला अहवाल आपण पाहिला असेल,वर्तमानपत्रामध्ये, दूरचित्रवहिन्यांवर बरेच काही पाहायला मिळाले. एका राज्याची त्यामधे चर्चा आहे आणि चर्चा काय आहे तर एका राज्यामध्ये ‘नोकरीसाठी पैसे’ या घोटाळ्याच्या चौकशीतून ज्या बाबी समोर आल्या आहेत त्या माझ्या देशातल्या युवा वर्गासाठी अतिशय चिंतेचा विषय आहेत.

त्या राज्याची काय पद्धत आहे, हे सामोरे आले आहे,सरकारी नोकरी  हवी असेल तर प्रत्येक पदासाठी, आपण हॉटेलमध्ये गेल्यावर तिथल्या खाद्य पदार्थांचे दर दर्शवणारे रेटकार्ड  असते ना,तसेच प्रत्येक पदासाठी रेट कार्ड. हे रेटकार्ड पण कसे तर छोट्या-छोट्या गरिबांची लुट केली जात आहे. सफाई कामगार म्हणून काम करायचे असेल तर त्यासाठी हा दर राहील, भ्रष्टाचारात इतके पैसे द्यावे लागतील. चालकाची नोकरी हवी असेल तर त्यासाठी हा दर राहील.लिपिकाची नोकरी हवी असेल,शिक्षकाची नोकरी हवी असेल, परिचारिकेची नोकरी हवी असेल  तर हा दर राहील. आपण विचार करा त्या राज्यात ‘रेट कार्ड’ आहे आणि कट मनी चा कारभार चालतो. देशातले युवक कुठे जातील, हे स्वार्थी राजकीय पक्ष नोकरीसाठी रेटकार्ड करतात.

आता पहा काही दिवसांपूर्वी आणखी एक प्रकरण समोर आले. रेल्वेच्या एका तत्कालीन मंत्र्याने नोकरी देण्याच्या बदल्यात गरीब शेतकऱ्यांची  जमीन आपल्या नावे केली होती. नोकरीच्या बदल्यात जमीन, हे प्रकरण सीबीआय हाताळत आहे, न्यायालयात हे प्रकरण सुरु आहे. 

बंधू- भगिनीनो,

आपणासमोर दोन्ही गोष्टी एकाच वेळी आहेत. एकीकडे घराणेशाही, वशिलेबाजी, भ्रष्टाचार, रोजगाराच्या नावावर देशाच्या युवकांना लुटणारे पक्ष, नोकरीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी रेट कार्ड, प्रत्येक बाबीत कट मनी. रेट कार्ड हा त्यांचा रस्ता तर आम्ही युवकांचे उज्वल भविष्य सुरक्षित करण्याचे काम करत आहोत. ही रेट कार्ड आपले सामर्थ्य, आपल्या क्षमता, आपल्या स्वप्नांचा चकाचुर करतात. तर आम्ही आपणा सर्वांची  स्वप्ने साकार करण्यासाठी परिश्रम घेत आहोत. संकल्प  साकारण्यासाठी काम करत आहोत. आपली प्रत्येक इच्छा,आकांक्षा जोपासण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. देशाच्या युवकांचे भविष्य रेटकार्डच्या आधारावर  ठरेल की चोख प्रणालीअंतर्गत सुरक्षित पद्धतीने बहरेल हे आता देशच ठरवेल.

मित्रांनो,

वशिलेबाजीवाले हे पक्ष देशातल्या जनतेच्या प्रगतीच्या संधी हिरावून घेतात. तर आम्ही देशातल्या सामान्य जनतेसाठी नव- नव्या संधी निर्माण करत आहोत.

मित्रांनो, 

आपल्या देशात काही राजकीय पक्षांनी, भाषा हे लोकांना परस्परांशी झगडण्याचे, देशात दुफळी निर्माण करण्यासाठीचे हत्यार बनवले तर आम्ही भाषा हे लोकांना रोजगार पुरवण्याचे,त्यांना सबल करण्याचे माध्यम करत आहोत. कोणालाही आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी भाषा हा अडसर ठरू नये  याची सुनिश्चिती आमचे सरकार करत आहे. भर्ती परीक्षा,प्रवेश परीक्षा मातृभाषेत घेण्यावर भारत सरकारचा भर राहिल्याने त्याचा सर्वात जास्त लाभ आपल्या देशाच्या मुला- मुलींना होत आहे, आपल्या युवकांना होत आहे. प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेतल्याने युवकांना आपली क्षमता  सिद्ध करण्याची संधी सहज उपलब्ध होत आहे.

मित्रांनो,

झपाट्याने आगेकूच करणाऱ्या भारतात सरकारी व्यवस्था आणि सरकारी कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धतही वेगाने बदलत आहे. एक काळ होता जेव्हा नागरिक सरकारी कार्यालयात चकरा मारत असत. आज सरकार आपल्या सेवा घेऊन नागरिकांच्या दारी पोहोचत आहे. जनतेच्या अपेक्षा जाणून, त्या-त्या भागाच्या आवश्यकता लक्षात घेऊन आमचे सरकार अखंड काम करत आहे. जनतेप्रती संवेदनशील राहत विविध सरकारी कार्यालये आणि विभागांचे कामकाज चालवण्यावर भर देण्याला आमचे प्राधान्य आहे.

अनेक मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून, डिजिटल सेवांच्या माध्यमातून  सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा आता खूपच सुलभ झाल्या आहेत. सार्वजनिक तक्रारींचे निवारण  करणारी प्रणाली सातत्याने बळकट करण्यात येत आहे. हे सर्व परिवर्तन घडत असताना आपणालाही देशाच्या नागरिकांप्रती पूर्णपणे संवेदनशील राहत काम करायचे आहे. या सुधारणा आपल्याला अधिक पुढे न्यायच्या आहेत. या सर्वांबरोबरच सातत्याने नवे शिकण्याची प्रवृत्ती आपणाला कायम जोपासायची आहे.

सरकारी यंत्रणेत प्रवेश हे जीवनाचे अंतिम ध्येय असू शकत नाही. आपणाला याही पुढे जायचे आहे आणि नवे शिखर साध्य करायचे आहे. आपल्या जीवनाची नवी स्वप्ने, नवे संकल्प, नवे सामर्थ्य बहरून आले पाहिजे. यासाठी सरकारने ऑनलाईन पोर्टल, हे ऑनलाईन पोर्टल आहे ते iGoT च्या माध्यमातून नवी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याच्या वापरकर्त्यांच्या संख्येने नुकताच 10 लाखाचा आकडा पार केला.

या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध अभ्यासक्रमांचा आपण पूर्ण लाभ घ्या. नोकरीमध्ये आपणाला याचा खूप उपयोग होईल. आपल्या प्रगतीसाठी नवे मार्ग खुले होतील. मित्रांनो, मी आपणाला यापेक्षा प्रगती करताना पाहू इच्छितो. आपणही प्रगती करावी आणि देशाचीही प्रगती साध्य व्हावी. येती 25 वर्षे आपल्या प्रगतीची आहेत आणि आपणा सर्वांसाठी देशाच्या प्रगतीचीही आहेत.

चला,

अमृत काळाच्या येत्या 25 वर्षांच्या प्रवासात आपण खांद्याला खांदा लावून, सर्वांनी एकत्र येऊन विकसित भारत हा संकल्प साध्य करण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करूया, आगेकूच करूया.आपणा सर्वांचे  आणि आपल्या कुटुंबियांचे पुन्हा एकदा  खूप-खूप अभिनंदन !

खूप-खूप धन्यवाद !    

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi